Home आपलं शहर ४८ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत ठाण्याला अजिंक्यपद तर पुण्याला उपविजेतेपद..

४८ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत ठाण्याला अजिंक्यपद तर पुण्याला उपविजेतेपद..

0
४८ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत ठाण्याला अजिंक्यपद तर पुण्याला उपविजेतेपद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुमार गटात ठाण्याने तर मुली गटात उस्मानाबादने अजिंक्यपद मिळवत इतिहास रचला. मुलींच्या गटात उस्मानाबादचे हे सलग दुसरे अजिंक्यपद असून नाशिकचे सलग दुसरे उपविजेतेपद आहे. तर ठाण्याने गेल्या वर्षी मिळवलेल्या तिसर्‍या क्रमांकावरून हनुमान उडी मारत अजिंक्यपदाला गवसणी घातली. गेल्या वर्षी कुमारांमध्ये अहमदनगर व उस्मानाबादने विजेते व उपविजेतेपद मिळवले होते व या वर्षी या दोन्ही संघांना उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागला.

मा. खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा धाटाव (ता. रोहा) येथील कै. नथुराम (भाऊ) पाटील क्रीडानगरीत, परमपुज्य पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालय आणि एम.बी मोरे फाऊंडेशन महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर हे सामने संपन्न झाले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा विवेकानंद पुरस्कार कुमार गटात ठाण्याच्या रूपेश कोंढळकरला तर मुलींचा सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा सावित्री पुरस्कार उस्मानाबादच्या अश्विनी शिंदेला देऊन गौरवण्यात आले. या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी दहा हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या दोन्ही खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’ कडून त्यांच्या नावावर नोंदणी करून इलेक्ट्रिक बाईक पुणे येथे देणार असल्याचे जाहीर केले.

मुलींमध्ये उस्मानाबादची नाशिकला सलग दुसर्‍या वर्षी धोबीपछाड

मुलींच्या अंतिम फेरीच्या सामन्यात उस्मानाबादने नाशिकवर १०-९ असे ५ मि. राखून एक गुणाने दणदणीत विजय मिळवत सलग दुसर्‍या वर्षी अजिंक्यपद मिळवले. मध्यंतरला उस्मानाबादकडे ७-३ अशी ४ गुणांची आघाडी होती. उस्मानाबादच्या अश्विनी शिंदेने (४, ३.३० मि. संरक्षण व ३ गुण) अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. तिला प्रणाली काळे (२.५०, १.३० मि. संरक्षण व १ गुण ), संपदा मोरे (१.४०, १ मि. संरक्षण व १ गुण ) यांनी चांगली साथ दिली. या खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावरच उस्मानाबादला सलग दुसर्‍या वर्षी नाशिकला धोबीपछाड देता आली तर नाशिकला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. नाशिक तर्फे सोनाली पवार (१.३०, २ मि. संरक्षण), दीदी ठाकरे (१.३० मि. संरक्षण व ५ गुण ) यांनी चांगला खेळ केला. मात्र उस्मानाबादच्या आक्रमक खेळापुढे नाशिकचा टिकाव लागू शकला नाही. मुलींमध्ये ठाणे व सांगलीने तृतीय क्रमांक पटकवला.

कुमारांमध्ये ठाण्याने उडवला पुण्याचा धुव्वा

कुमारांच्या अंतिम सामन्यात ठाण्याने पुण्याचा १४-१२ असा ७.४० मिनिटे राखून २ गुणांनी पराभव केला. ठाण्याने आक्रमक खेळ करत मध्यन्तरला ११-४ अशी ७ गुणांची आघाडी घेतली होती त्यामुळेच ठाण्याने दादागिरी करत पुण्याचा धुव्वा उडवला. ठाण्याच्या रुपेश कोंडाळकरने (३, १.४० मि संरक्षण व ५ गुण) अष्टपैलू कामगिरी केली. त्याला सुरज झोरे (१ मि. संरक्षण व २ गुण ), वैभव मोरे (१.४०, १.१० मि. संरक्षण व १ गुण ) यांची चांगली साथ मिळाली. त्यामुळे बलाढ्य पुणे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पुण्याकडून चेतन बिका (१.४० मि. संरक्षण व २ गुण ), विवेक ब्राम्हणे (२.१० मि, संरक्षण व ३ गुण), आकाश गायकवाड (२ गुण) यांनी पराभव टाळण्याचा केलेला निकराचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. कुमारांमध्ये उस्मानाबाद व अहमदनगर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धेच्या पारितोषिक सोहळ्यासाठी खासदार सुनील तटकरे, माजी राज्यमंत्री आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राज्य खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, राज्य खो-खो संघटनेचे सचिव ऍड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

वैयक्तिक पारितोषिक मुली व कुमार गट

उत्कृष्ट संरक्षक : प्रणाली काळे (उस्मानाबाद), सुरज झोरे (ठाणे )

उत्कृष्ट आक्रमक : दीदी ठाकरे (नाशिक), चेतन बिका (पुणे )

अष्टपैलू खेळाडू : अश्विनी शिंदे, उस्मानाबाद (सावित्री पुरस्कार), रुपेश कोंडाळकर, ठाणे (विवेकानंद पुरस्कार)

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here