Home Blog

BSUP प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरण!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्याच कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे ‘धाडस’ करतील काय?

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरातील 146-ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शहरातील अनेक विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त व त्यासोबत संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक महापालिका मुख्यालयात आयोजित केलेली होती. या बैठकीमध्ये अनेक विकासकार्याशी संबंधित सविस्तर चर्चा करीत असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्याच मतदारसंघात गेल्या जवळपास वीस वर्षांपासून सुरू असलेल्या ‘BSUP’ योजनेचा देखील आढावा घेतला. ज्या लोकांना अद्यापही घरं मिळालेली नाहीत त्यांना लवकरात लवकर घरं कशी देता येतील? इमारतींचे काम किती दिवसात पूर्ण होईल? याबाबत शहर अभियंता दीपक खांबीत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्याशी चर्चा केली.

ही चर्चा सुरू असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी BSUP योजनेमध्ये भ्रष्टाचार करून ज्या लोकांनी एका पेक्षा अधिक गाळे आणि सदनिका लाटल्या आहेत किंवा ज्या लोकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका मंजूर करून घेतल्या आहेत अशा लोकांवर लवकरच गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवणार असल्याचा इशारा दिला. “BSUP योजनते भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना अजिबात माफी दिली जाणार नाही, मग ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असोत किंवा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असोत कुणाचीही गय केली जाणार नाही” असे त्यांनी स्पष्ट केले.

परंतु आता मोठा प्रश्न असा आहे की BSUP योजनेमध्ये ज्या राजकिय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकापेक्षा अधिक सदनिका लाटल्या आहेत, किंवा ज्यांनी बोगस कागदपत्रे सादर करून स्वतःला पात्र झोपडी धारक ठरवून घरं मिळविली आहेत त्यापैकी काही जण हे पूर्वीपासून तेव्हांची शिवसेना आणि आत्ताची शिंदे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत तर काही जण इतर पक्ष सोडून आता शिंदे गटाच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. म्हणजेच ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेच कार्यकर्ते झाले आहेत.

त्याच बरोबर ह्या BSUP योजनेत बोगसगिरी, भ्रष्टाचार करणाऱ्यांपैकी काही जण तर नेहमीच सावली सारखे प्रताप सरनाईक यांच्या सोबत फिरताना दिसत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या इतर काही पक्षातील लोकांनी तर स्वतःचे पाप लपवून ठेवण्यासाठीच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला असून “प्रताप सरनाईक यांचे कार्यकर्ते झाल्यास मंत्री महोदय आम्हांला वाचवतील” अशी अपेक्षा ह्या बोगसगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे. मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यांच्या आश्रयास आलेल्या ‘झोलर’ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात पाठवण्याचे धाडस दाखवतील का? की महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नुसती भीमगर्जना करून निवडणुकी नंतर “‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप” या प्रमाणे “चौकशी सुरू आहे” हे कारण सांगून प्रकरण दाबून ठेवतील? हे पाहावे लागेल.

काय आहे हे BSUP भ्रष्टाचार प्रकरण?

शहरी भागातील गरीब गरजू लोकांना पक्की घरं मिळावीत म्हणून तत्कालीन केंद्र सरकारने BSUP ही योजना लागू केली होती. मिरा-भाईंदर शहरात काशिमीरा येथील जनता नगर झोपडपट्टी येथे गेली वीस वर्षे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर केंद्र सरकारने निधी देण्याचे बंद केले आणि ही योजना अर्ध्यावर सोडून बासनात गुंडाळून ठेवली. त्यानंतर पुढे महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाच्या मदतीने ही अपूर्ण योजना पूर्ण करण्याचे ठरविले परंतु महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते यांनी या योजनेत वारेमाप भ्रष्टाचार करून या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेचा बट्याबोळ केला. त्यामुळेच आजही ही योजना अपूर्ण अवस्थेत असल्याचे आरोप केला जात आहेत.

अगदी सुरुवातीलाच ही योजना राबविण्यासाठी ज्या ‘पुनित कन्सल्टन्सी’ नावाच्या ठेकेदाराला BSUP योजनेच्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते सुरुवातीलाच त्याला काम न करताच जवळपास पन्नास कोटी रुपये बेकायदेशीरपणे अदा करण्यात आल्याचा आरोप केला गेला. पुढे त्याच पुनित कन्सल्टन्सीच्या संगनमताने सर्वेक्षण करत असताना एकाच घराला वेगवेगळे दरवाजे दाखवून त्या एकाच घरातील दोन-दोन तीन-तीन लोकांना वेगवेगळ्या घराचे सदस्य दाखवून फोटोपास बनवून हजारो झोपड्यांची संख्या फुगविण्यात आली.

आत्ताचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कट्टर कार्यकर्ते असलेले जनता नगर झोपडपट्टीत राहात असलेल्या लातूर जिल्ह्यातील काही लोकांनी तर त्यांच्या गावाकडील अनेक नातेवाईकांना इथे आणून त्यांची बोगस कागदपत्रं बनवून त्यांना जनता नगरचे रहिवासी भासवून त्यांच्या नावाने सदनिका मिळविलेल्या आहेत, तर काही आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका, राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते यांनी आपल्या स्वतःच्या नावाने किंवा आपल्या नातेवाईकांच्या नावाने एकापेक्षा जास्त घरं मिळविली आहेत. त्यानंतर ह्याच सदनिका महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकारी, राजकीय पक्षांचे काही कार्यकर्ते आणि दलाल यांच्या संगनमताने खुल्या बाजारात सर्रासपणे विक्री केल्या जात आहेत.

या भ्रष्टाचाराचा भांडाफोड झाल्यानंतर व अनेक वर्तमानपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियावर बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडे जेव्हा अनेक लोकांनी तक्रारी केल्या तेव्हा मिरा-भाईंदर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली परंतु तिथेही महापालिकेच्या त्या “धीरूभाई” ने सगळे मॅनेज केले असल्याची चर्चा आता सुरू आहे. त्यामुळे BSUP योजनेतील खरे भ्रष्टाचारी कधी पकडले जातील का? त्यांच्यावर कधी काही कायदेशीर कारवाई होईल का? हा देखील एक मोठा प्रश्न असल्याचे बोलले जात असून हा मुंबईतील आदर्श घोटाळ्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक मोठा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे.

146 ओवळा-माजीवडा मतदार संघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आणि आता परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक यांच्याच मतदारसंघात गेली वीस वर्षे ही योजना अपूर्ण अवस्थेत असताना आणि ही योजना सुरू झाली तेंव्हा पासूनच ह्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप उघडपणे केले जात असताना आतापर्यंत प्रताप सरनाईक यांनी ह्या योजनेत होत असलेल्या भ्रष्टाचारावर लक्ष का घातले नाही? आत्ताच ह्या योजनेत लक्ष घालण्याचे कारण काय? हा देखील मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याच बरोबर याच BSUP भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्याच काही कार्यकर्त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना अभय दिले जाईल? की ह्याच कार्यकर्त्यांना कारवाईची भीती दाखवून त्यांचा वापर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत करून घेतला जाईल? हे लवकरच स्पष्ट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.

मेहतांच्या बालेकिल्ल्याला सरनाईकांचे सुरुंग, भाईंदर पश्चिमेस बावन जिनालय समोर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन!

“संघटनात्मक बळकटीसाठी शिवसेनेचे आणखी एक पाऊल” – प्रताप सरनाईक 

मीरा-भाईंदर : येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेने कंबर कसायाला सुरुवात केली असून मिरा-भाईंदर शहरात शिवसेना पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने १४५ विधानसभा मतदारसंघात देखील पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भाईंदर पश्चिमेकडील देव आंगन, देवचंद नगर, जैन मंदिर (बावन जिनालय) समोर, येथे नव्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.


या प्रसंगी जिल्हाप्रमुख राजू भोईर, १४५ विधानसभा प्रमुख विक्रमाप्रताप सिंह, शंकर झा सह मोठ्या संख्येने शिवसैनिक, स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. नव्या शाखा कार्यालयाच्या माध्यमातून पक्षाची जनतेशी अधिक जवळीक निर्माण करून स्थानिक प्रश्न सोडविण्यास व विकासकामांना चालना देण्यास मोठी मदत होणार आहे. संपूर्ण परिसरात शिवसेनेचे घोषवाक्ये, भगव्या झेंड्यांचा उत्साह व शिवसैनिकांचा जोश यामुळे उद्घाटन सोहळा ऐतिहासिक ठरला असे बोलले जात असले तरी हिंदी भाषिक जैन समाजाचे बाहुल्य असलेल्या या परिसरात शिवसेनेला किती समर्थन मिळेल? हा एक मोठा प्रश्न आहे.

या उद्घाटनावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले :

“हे कार्यालय फक्त शाखा नसून हे जनतेचे घर असेल. प्रत्येक नागरिकाचा आवाज ऐकण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व शिवसेना विचार जन-जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका पार पाडेल. १४६ विधानसभा मतदारसंघात ज्याप्रमाणे जनतेच्या समस्या सोडविल्या जातात, त्यांचे कार्य केले जाते त्याचप्रकारे या नवीन शाखा कार्यालयाच्या माध्यमातून १४५ विधानसभा मतदारसंघामधील जनतेच्या प्रश्नांचे निदान येथे केले जाईल. शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे आणि हे शाखा कार्यालय त्याचे जिवंत उदाहरण ठरेल.”

या कार्यालयाच्या निमित्ताने शिंदे गटाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्याच महायुतीच्या घटकापक्षाचे नेते आणि १४५ मिरा-भाईंदर मतदार संघाचे आमदार नरेंद्र मेहता यांना राजकीय कोंडीत पकडण्याचा डाव आखला असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पहिल्या तर प्रताप सरनाईक १४५ मिरा-भाईंदर विधानसभा मतदार संघात देखील आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत असे दिसून येत असून येणाऱ्या काळात महायुतीच्या या दोन नेत्यांमध्येच राजकीय तुंबळ महायुद्ध रंगणार कि काय? असे बोलले जात आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी कर्करोगामुळे निधन

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी कर्करोगामुळे निधन

मुंबई प्रतिनिधी, 31 ऑगस्ट : मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगामुळे निधन झाले. त्या 38 वर्षांच्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून त्या या आजाराशी झुंज देत होत्या. आज पहाटे मिरारोड येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रिया मराठे यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल “या सुखांनो या“ या मालिकेतून टाकले होते. त्यानंतर झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेत “पवित्र रिश्ता“ मधील वर्षा ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरली. “कसम से“, “बड़े अच्छे लगते हैं“, “तुझेच मी गीत गात आहे“ अशा अनेक मालिकांमधून त्यांनी उल्लेखनीय भूमिका केल्या आहेत.

अभिनयासोबतच सामाजिक जबाबदारी पार पाडत प्रिया मराठे या मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियान मोहिमेच्या ब्रँड अँबेसिडेर म्हणूनही कार्यरत होत्या. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सहकलाकार आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला. “पवित्र रिश्ता“ मधील त्यांच्या सहकलाकार उषा नाडकर्णी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “प्रिया एक उत्तम अभिनेत्री होती. इतक्या कमी वयात तिचं जाणं मनाला वेदना देणारं आहे.” ऑन-स्क्रीन पती अनुराग शर्मा यांनीही दुःख व्यक्त करत, “प्रिया अतिशय चांगली सहकलाकार आणि मैत्रीण होती. तिच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे,” असे म्हटले.

अभिनेता सबोध भावे, ज्यांना प्रिया बहिणीसारखी होती, यांनी सोशल मीडियावर लिहिले, “प्रिया शेवटपर्यंत कर्करोगाशी झुंज देत राहिली. तिचा संघर्ष प्रेरणादायी होता. मात्र नियतीपुढे आपण सर्व हतबल ठरलो.”

प्रिया मराठे यांच्या अल्पवयात झालेल्या दुर्दैवी निधनामुळे मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कारकिर्दीतील भूमिका, साधेपणा आणि सामाजिक उपक्रमांतील त्यांचे योगदान यामुळे त्या प्रेक्षकांच्या मनात सदैव जिवंत राहतील.

भाईंदर पश्चिम येथे जुगार खेळणाऱ्या २० जणांना अटक तर दोन फरार!

१ लाख २० हजार तीनशे रुपये रोख रक्कमेसह तीन लाख एकतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त!

भाईंदर, प्रतिनिधी : मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीत भाईंदर पश्चिम येथे स्टेशन जवळ एका फ्लैटमध्ये सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर भाईंदर पोलिसांनी धाड टाकून २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन जण फरार झाले आहेत. घटनास्थळावरून एक लाख वीस हजार तीनशे रोख रक्कम, मोबाईल फोन, वही, पत्ते व इतर साहित्य असा एकूण सुमारे तीन लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. एकूण २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी वीस जणांना अटक करण्यात आली आहे तर दोन इसम फरार आहेत. भाईंदर पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

भाईंदर पश्चिम येथील स्टेशन जवळ असलेल्या शांती दर्शन इमारतच्या खोली क्रमांक २०१, दुसऱ्या मजल्यावर पत्त्याचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती परिमंडळ-१ चे नवनियुक्त पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांना आदेश देऊन सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सापळा रचून छापेमारी करण्यात आली. दरम्यान जुगाराचा अड्डा सुरू असल्याचे प्रत्यक्षात दिसून आले. घटनास्थळावरून वीस जणांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या खोलीमध्ये रोख रक्कम १ लाख २० हजार तीनशे रुपये, तसेच जुगार खेळण्याची पत्ते, वही, पेन, मोबाईल व इतर साहित्य एकूण तीन लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा जुगाराचा अड्डा गेल्या अनेक महिन्यापासून सुरु असल्याचं बोलले जात आहे. कारवाईमध्ये एकूण २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी वीस जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मूळ सदनिका मालक यांना देखील आरोपी करण्यात आले आहे. दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध भाईंदर पोलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद गायकवाड, सागर चव्हाण, हेड कॉन्स्टेबल अभिजीत ठाकूर, रामनाथ शिंदे यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत काशीगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रवी ग्रुप, पंधरा नंबर बस्टॉप जवळ तसेच नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान मंदिर जवळ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जवळील कमर्शियल इमारतीमध्ये त्याच प्रमाणे काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काशीगांव परिसरात देखील अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून आता या जुगाराच्या अड्डयांवर पोलीस कधी कारवाई करणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

येत्या नवरात्र उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन….

धाराशिव, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र तुळजापूर, कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसर विकास आराखड्याची महत्वाची बैठक आज घेण्यात आली.
श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन-साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठा पैकी श्री. तुळजाभवानी देवी, तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे. देशभरातून दरवर्षी सुमारे १ ते १.५ कोटी भाविक श्री क्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात. त्यांना भविष्यात चांगल्या सुख- सुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १,८६५ कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवलाआहे. या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेले आहेत.

हा प्रकल्प जलद गतीने मार्गी लागण्यासाठी भूसंपादन, तांत्रिक मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया या तिन्ही गोष्टी समांतर पातळीवर करण्यात याव्यात अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्याचे परिवहन मंत्री यांनी सांगितले. तसेच प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी भक्तगण व पुजारी मंडळ यांच्याकडून तेथील धार्मिक प्रथा परंपरांचा आदर राखत त्यांच्या सूचना अंमलात आणाव्यात असे ही सांगितले.

श्री तुळजाभवानी देवीच्या अष्टभुजा प्रतिमेला भक्तगणांचा आणि पुजारींचा विरोध असल्याने त्यांच्या भावनांचा आदर करत श्री तुळजाभवानी देवीचे शिल्प तयार करताना पुरातत्व विभाग, इतिहास तज्ञ व अनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश दिले.


या बैठकीला छ.संभाजीनगर विभागाचे विभागिय आयुक्त जितेंद्र पापळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्या सह धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद मुख्याधिकारी डॉ. मैनाक घोष, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफाकत आमना व संबंधित अधिकारी वृंद उपस्थित होते.

श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पामुळे तुळजापूर शहराचा कायापालट होणार असून या प्रकल्पामुळे अनेक नवीन रोजगारांची संधी देखील येथील नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात असून त्यामुळे येथील सर्व नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहेत.