Home आपलं शहर कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून भोपर देसलेपाडा येथील अनधिकृत नळ जोडण्या निष्काशीत करण्याची धडक मोहीम सुरू..

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून भोपर देसलेपाडा येथील अनधिकृत नळ जोडण्या निष्काशीत करण्याची धडक मोहीम सुरू..

0


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेली सात आठ वर्ष डोंबिवली येथील भोपर गावात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून त्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विरोधात भोपर ग्रामस्थांनी मंगळवारी शनी मंदिर येथे तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनाचा धसका घेऊन महापालिकेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गुरुवारपासून अनधिकृत नळ जोडण्या निष्काशीत करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. गुरुवारपासून सीएनजी पंप ते देसलेपाडा अशी कारवाई सुरू करण्यात आली. कारवाई सुरू झाल्यापासून सहा अनधिकृत नळ जोडण्या सापडल्या असल्याची माहिती सूत्रांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

याबाबत ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ग्रामस्थ दिलखुश माळी म्हणाले की हे भोपर ग्रामस्थांचे यश आहे. गेली अनेक वर्ष भोपर गावातील पाणी टंचाई बाबत महापालिकेकडे आम्ही सातत्याने अर्ज-विनंत्या असा पाठपुरावा करत होतो. परंतु महापालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे आम्हाला तीव्र आंदोलनाचा पर्याय निवडावा लागला. या आंदोलनाला भोपर गावातील ग्रामस्थ नागरिक आणि डोंबिवलीतील विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते समाजसेवक आदींनी पाठिंबा दिला. विशेषता भोपरगावातील महिलां पूर्ण ताकदीनिशी या आंदोलनात उतरल्या होत्या. ठोस कारवाई करा, अशी भूमिका घेतल्यामुळे अखेर महापालिकेला अनधिकृत नळ जोडण्या निष्काशीत करण्याची कारवाई गुरुवारपासून करावी लागली आहे. यासाठी आम्ही भोपर गावातील ग्रामस्थांचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे महापालिकेने सुद्धा तातडीने निर्णय घेऊन अनधिकृत नळ जोडण्या निष्काशित करण्याची कारवाई सुरू केली. याबद्दल महापालिकेला धन्यवाद देत अधिकारी किरण वाघमारे, शैलेश कुलकर्णी यांचे सुद्धा आभारी आहोत.

नितीन माळी आणि मधुकर माळी म्हणाले की, हा महापालिकेचा विजय असून यापुढे भोपर वासियांना चांगल्या दाबाने पाणी येऊ शकेल याबद्दल भोपरवासीयांचे आम्ही मनापासून आभार मानतो. कारवाई दरम्यान एकनाथ सदू पाटील, गंगाराम पाटील, रंगनाथ ठाकूर जयवंत माळी, वैजनाथ देसले, हरिचंद्र देसले, दिलखुश माळी, ऍड. ब्रह्मा माळी, विश्वास माळी, मधुकर माळी, तानाजी पाटील, नितीन माळी, संतोष माळी, जयवंत पाटील, रमेश पाटील, ज्ञानेश्वर माळी आणि अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने कारवाई समयी उपस्थित होते.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here