Home आपलं शहर अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विरोधात युवक काँग्रेसने दिले प्रभाग अधिकाऱ्यांना निवेदन! कारवाई न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा!

अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विरोधात युवक काँग्रेसने दिले प्रभाग अधिकाऱ्यांना निवेदन! कारवाई न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा!

0
अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विरोधात युवक काँग्रेसने दिले प्रभाग अधिकाऱ्यांना निवेदन! कारवाई न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरात अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण हा एक गंभीर मुद्दा झालेला आहे. सरकारी जमिनी, आरक्षित भूखंड, रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागा याठिकाणी प्रभाग अधिकारी, स्थानिक नगरसेवक आणि भूमाफियांच्या संगनमताने शहरात राजरोसपणे अतिक्रमण केले जात आहे. अशाच प्रकारे मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग १८ मधील मौजे नवघर जूना सर्वे क्र. ४०९, नवीन सर्वे क्र. १६६, हिस्सा क्र. ६A या जागेवरील अनाधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या झोपड्या, भंगार गोडाऊन, ऑटो गॅरेजेसच्या आड अनैतिक व्यवसाय तसेच चरसी गर्दुल्यांचा अड्डा झाला असून अश्या असामाजिक कृतींमुळे परिसरातील महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर जागेवरील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण धारकांकडून सतत घाणीचे साम्राज्य निर्माण करण्यात येते त्यामुळे परिसरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच सदर जागेवरील अनधिकृत भंगारचे गोडाऊन असल्यामुळे येथे आगीच्या दुर्घटना अनेक वेळा घडल्या असल्याने भविष्यात मोठी जीवितहानी होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. येथे मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात असल्यामुळे परिसरात प्रदूषणाचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या समस्यांवर महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी म्हणून अतिक्रमण विभागाद्वारे कारवाई करून तात्काळ अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी ओवळा-माजिवडा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल काटकर यांनी स्वतः लेखी तक्रार केली तसेच परिसरातील सोसायटी व नागरिकांकडून प्राप्त झालेले तक्रार अर्ज प्रभाग समिती ४ च्या नवनियुक्त विभाग प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त कांचना गायकवाड यांच्याकडे परिसरातील महिलांसमवेत भेट घेऊन निवेदन सुपूर्त केले.

या विषयावर याआधी देखील अनेक वेळा अनेक तक्रारी दाखल करून सुद्धा कारवाई झालेली नाही या बाबत विभाग प्रमुखांना कल्पना दिली त्या अनुषंगाने विषयाचे गांभीर्य लक्षात घेता येत्या दोन दिवसात सदर जागेची पाहणी करून तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन प्रभाग अधिकारी कांचना गायकवाड यांनी दिले आहे.
आता त्यावर किती गांभीर्याने कारवाई केली जाते हे तर येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले तरी जर आता कारवाई झाली नाही तर त्याविरोधात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ओवळा-माजिवडा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल काटकर यांनी दिला आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here