Home महाराष्ट्र महाराष्ट्राला स्वतंत्रपणे कोरोना लस खरेदी करू द्या; राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

महाराष्ट्राला स्वतंत्रपणे कोरोना लस खरेदी करू द्या; राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

0
महाराष्ट्राला स्वतंत्रपणे कोरोना लस खरेदी करू द्या; राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. यात त्यांनी स्वतंत्रपणे राज्याला कोरोना लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या आहेत.

काय लिहिलं आहे पत्रात..
गेल्यावर्षी कोविडची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात देखील झाले आहेत. आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असातना महाराष्ट्रातली स्थिती सर्वात बिकट झाली आहे, असं राज यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

कोविडच्या पहिल्या लाटेनंतर त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी यामुळे महाराष्ट्राचे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण आजही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो ? असा सवाल राज ठाकरेंनी मोदींना विचारला आहे.

पुढे ते म्हणाले आहेत की, कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर १०० टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे व कळकळीची आहे. म्हणूनच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्टं ठेवून, राज्यातील सर्व वयोगटातील १०० टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ ही हवीच.

कोरोनामुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्यांना केवळ परवानगीच नाही, तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, त्यातून एकमेकांना शिकण्याची संधीही मिळेल, असं राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

*राज ठाकरेंच्या पंतप्रधानांकडे पाच प्रमुख मागण्या..*
१) महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्या.
२) राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात.
३) सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी.
४) लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी.
५) कोरोनावरील उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधं उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावलं उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here