Home आपलं शहर मीरा भाईंदर शहरात येत्या दोन दिवसांत 100% लॉकडाऊन करण्याचा निर्णय

मीरा भाईंदर शहरात येत्या दोन दिवसांत 100% लॉकडाऊन करण्याचा निर्णय

0
मीरा भाईंदर शहरात येत्या दोन दिवसांत 100% लॉकडाऊन करण्याचा निर्णय

मीरा भाईंदर, प्रतिनिधी :  मिरा भाईंदर शहरातील नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लघंन होत असल्याने या शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी येत्या दोन दिवसांत 100% लॉकडाऊन करण्याचा निर्णय मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनासह सर्वच राजकीय पक्षांनी अखेर घेतला आहे.
मिरा भाईंदर शहरातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता महापौर यांची सर्वपक्षीय गटनेते, उपमहापौर, स्थायी समिती सभापती सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि आयुक्त दिलीप ढोले आणि सर्व संबधित अधिकारी वर्ग यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे अनेक ठिकाणी सवेंदनाक्षम क्षेत्र निर्माण झाल्यामुळे या क्षेत्रातील सोसायट्यांमध्ये एकापेक्षा जास्त कोरोनाचा रुग्ण आढळला गेल्यास त्या सोसायटीमधील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरीकांवर पोलीस व महापालिका प्रशासन यांच्यातर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वर्दळीचे ठिकाण असलेल्या रस्त्यांवर आता यापुढे प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन हे रस्ते वाहतुकीकरीता बंद ठेवण्यात येणार आहेत.
सध्या सकाळी 7.00 ते 11.00 या वेळेत मेडिकल आणि किराणा मालाच्या दुकानदारांना परवानगी देण्यात आलेली असली तरी या दुकानदारांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लघन होत असल्याचे निर्दशनास आल्यामुळे या दुकानदारांना पहिल्यांदा समज देण्यात येईल तदनंतर दुस-यांदा दंड आकारला जाईल मात्र याउपर देखील या नियमांचे पालन न झाल्यास लॉकडाऊनचा काळ संपेपर्यंत प्रभागनिहाय नेमण्यात आलेल्या कोविड समितीच्या अहवालानुसार सदरहू दुकानांना टाळे ठोकण्यात येईल, असाही निर्णय घेण्यात आलेला आहे.
मिरा भाईंदर शहरात महानगरपालिका रुग्णालये आणि महानगरपालिकेच्या जंम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांकरिता ऑक्सीजनयुक्त आणि आय.सी.यु बेडस निर्माण करण्यात आलेले असून सध्या ऑक्सीजनचा पुरवठा समाधानकारक आहे. तसेच रेमडीसीवर लसीचा देखील पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध होत असल्याची माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी यावेळी बोलताना दिली आहे.
मीरा भाईंदर शहरातील सर्व कोविड केंद्राच्या ठिकाणी दि. 01 मे 2021 पासून 18 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here