Home आपलं शहर ‘३७ वी किशोर व किशोरी’ राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा रत्नागिरीत..

‘३७ वी किशोर व किशोरी’ राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा रत्नागिरीत..

0
‘३७ वी किशोर व किशोरी’ राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा रत्नागिरीत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईमध्ये भारतीय खो-खो महासंघाच्या व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने ‘३७ वी किशोर व किशोरी’ राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील ४८ संघ आणि जवळपास नऊशेहून अधिक खेळाडू आणि पदाधिकारी रत्नागिरीत दाखल होणार आहेत.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने होणार्‍या या स्पर्धेची जोरदार तयारी रत्नागिरीत जिल्हा खो-खो असोसिएशनकडून सुरु झाली असून, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर खो-खोची तीन मैदाने तयार केली जात आहेत. या स्पर्धेसाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत. भैय्याशेठ सामंत यांच्या पाठबळामुळे या स्पर्धेचे ‘शिवधनुष्य’ पेलण्यास पदाधिकारी सज्ज झाले आहेत.

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार योगेश कदम, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम यांच्यासह अनेक संस्थांचे पाठबळ या स्पर्धेला मिळत आहे. रत्नागिरीत नऊशेहून अधिक खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक व संघटनेचे पदाधिकारी दाखल होणार असून, रत्नागिरीकरांना खो-खोच्या वेगवान खेळाची मजा लुटता येणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेचे माजी सचिव संदीप तावडे, जिल्हाध्यक्ष बाळू साळवी, राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे, विनोद मयेकर, राजेश कळंबटे, पत्रकार राजेंद्र चव्हाण, सुरज आयरे, प्रशांत कवळे, राजेश चव्हाण, सचिन लिंगायत, प्रसाद सावंत, सुरज आयरे, सैफन चरके आदी यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर खर्‍या अर्थाने मैदानी खेळांना चालना मिळाली असून विविध स्पर्धाही उत्साही वातावरणात पार पडत आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या संघामधून रत्नागिरीच्या अपेक्षा सुतार व आरती कांबळे या दोन खेळाडूंनी आपल्या खेळाचा ठसा उमटविला आहे. रत्नागिरीत खो-खोमध्ये अनेक छोटे खेळाडू तयार होत असून, या स्पर्धेमुळे तालुक्यासह जिल्ह्यातील खेळाडूंमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here