Home आपलं शहर मिरा-भाईंदर शहरात लवकरच धावणार वातानुकूलित इलेक्ट्रिक बस! आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रवास करून घेतली बसची चाचणी

मिरा-भाईंदर शहरात लवकरच धावणार वातानुकूलित इलेक्ट्रिक बस! आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रवास करून घेतली बसची चाचणी

0
मिरा-भाईंदर शहरात लवकरच धावणार वातानुकूलित इलेक्ट्रिक बस! आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रवास करून घेतली बसची चाचणी

मिरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज आणि पर्यावरण पूरक 45 इलेक्ट्रिक बस गाड्या दाखल होणार! – दिलीप ढोले, आयुक्त

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना आरामदायी व सोयी सुविधांनी सज्ज अशी परिवहन सेवा देण्याचा प्रयत्न मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासन नेहमीच करत आले आहे. त्या अनुषंगाने परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी व शहरातील नागरिकांना आरामदायक परिवहन सेवेचा लाभ देण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले, परिवहन व्यवस्थापक अनिकेत मानोरकर यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत.

त्या अनुषंगाने मिरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात अत्याधुनिक व पर्यावरणपूरक अशा एकूण 45 इलेक्ट्रिक बसेस खरेदीची निविदा काढण्याची मंजुरी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या द्वारे देण्यात आली आहे.

19 ऑक्टोबर रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवास करून त्यास बसचा डेमो घेतला. सदर प्रसंगी परिवहन व्यवस्थापक अनिकेत मानोरकर, परिवहन उप-व्यवस्थापक स्वप्नील सावंत, प्रभारी प्रशासकीय अधिकारी दिनेश कानगुडे, आयुक्तांचे स्वीय सहाय्यक महेश भोसले, बस उत्पादक व पत्रकार उपस्थित होते.

मिरा-भाईंदर परिवहन सेवेमार्फत प्रतिदिन 74 बसपैकी 70 बस नागरिकांच्या सेवेत दैनंदिन उपलब्ध आहेत. शहरातील दैनंदिन लाभ घेणाऱ्या प्रवाशांचा आकडा वाढवण्याच्या दृष्टीने व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून 45 नवीन इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात 9 मीटर लांबीच्या एकूण 20 बस तर 12 मीटर लांबीच्या एकूण 25 बस शहरात येत्या काही काळात रुजू होणार आहेत. 12 मीटर लांबीच्या 25 बसपैकी एकूण 10 बस या वातानुकूलित असणार आहेत तर 15 बस या विना वातानुकूलित असणार आहेत. तसेच 9 मीटर लांबीच्या सर्व विना वातानुकूलित बसेस विकत घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकामार्फत 45 इलेक्ट्रिक बससाठी काढण्यात आलेली नविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या अत्याधुनिक व पर्यावरणपूरक 45 इलेक्ट्रिक बस मिरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेत अंदाजे 6 ते 7 महिन्यात दाखल होतील असे आयुक्तांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

मिरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेचा दैनंदिन लाभ घेणाऱ्या प्रवाशी संख्यांचा 85 हजार इतका टप्पा पार पडला असून सदर प्रवाशी संख्या ही 1 लाख 25 हजार इतकी नेण्याचा मानस मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन व्यवस्थापनने घेतला असून येणाऱ्या काळात मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना आरामदायक आणि पर्यावरण पूरक अशा बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here