भाईंदर, प्रतिनिधी: दहिसर मार्गावरून जाणाऱ्या मेट्रोसाठी उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रूट) प्रस्तावित आहे. या मार्गाखाली गायमुख ते फाउंटन 30 मीटरचा रस्ता 60 मीटरपर्यंत वाढविण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रालयात विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संचालक आणि संरक्षक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान श्रीमती अनिता पाटील, अतिरिक्त महापालिका आयुक्त सचिन बांगर, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, उप अभियंता यतीन जाधव, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक पुरुषोत्तम शिंदे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, दहिसर मार्गावरून जाणाऱ्या मेट्रोच्या खालील मार्गाखाली 60 मीटर रुंद रस्त्याची योजना करण्यात यावी. या रस्त्याच्या मध्यभागातून मेट्रोचा उन्नत मार्ग जाईल. या संदर्भात भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. तसेच नागपूरमधील मॉडेलप्रमाणे रस्त्याचे नियोजन करावे, असेही मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

मिरा-भाईंदर महापालिकेने एक आठवड्याच्या आत वन विभागाकडे प्रस्ताव पाठवावा त्यानंतर वन विभाग मंजुरी बाबत कार्यवाही करेल. 30 मीटरचा रस्ता 60 मीटर करीत असताना भू संपादनाने बाधित होणाऱ्या लोकांना TDR च्या माध्यमातून खर्च मीरा-भाईंदर महानगरपालिका करेल व आर्थिक स्वरूपाचा खर्च मुंबई महानगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करेल, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.

प्रस्तावित रस्त्याला लागणाऱ्या एकूण जागेपैकी साधारणपणे 15 ते 20 टक्के जागा ही वन विभागाची आहे, त्यामुळे वन विभागाची मान्यता येईपर्यंत खाजगी जागेवर निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करणेबाबतही निर्देश देण्यात आले आहेत.