Home मनोरंजन .आणि आली झुक झुक गाडी!

.आणि आली झुक झुक गाडी!

0
.आणि आली झुक झुक गाडी!

….आणि आली झुक झुक गाडी!

आजचा दिवस भारतातील प्रवासी व माल वाहतुकीच्या इतिहासाला वेगळेच वळण देणारा ठरला. याच दिवशी १८५३ साली भारतातील पहिली रेल्वे गाडी मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली.

बैल किंवा घोडे यांच्याशिवाय ही गाडी धावताना पाहून हा ‘चमत्कार’ पाहणाऱ्या हजारो बघ्यांना ही ‘जादु’च वाटली. ‘या साहेबाचं पोर मोठं अकली रे, बिनाबैलानं गाडी कशी हाकली रे’ हे गाणे मोठ्या कौतुकाने गायले जाऊ लागले.

देशात रेल्वे सुरू झाली व देशाची प्रगती तशाच वेगाने धावू लागली. या १६८ वर्षांत रेल्वेने आपली रुपे परिस्थितीनुसार बदलली. वाफेच्या इंजिनावर धावणारी रेल्वे नंतर डिझेल, विजेवर धावू लागली.

उपनगरी गाड्या, नंतर जमीनीच्या खालून धावणाऱ्या मेट्रो गाड्या आल्या. रेल्वेचे जाळे देशभर पसरले व रेल्वे भारताची जीवन वाहिनी बनली.

आता रेल्वेचा परीघ इतका विस्तारला की, भारतीय रेल्वेचं नेटवर्क चीननंतर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं नेटवर्क मानलं जातं. भारतात एकूण ७, ८५३ रेल्वे स्टेशन आहेत. देशातील रेल्वे रुळांची एकत्रित लांबी पकडली तर ती जवळपास ७० हजार किलोमीटरपर्यंत जाते.

भारतात दररोज १४,४०० गाड्या रुळावरून धावतात. त्यापैकी ७ हजार प्रवासी गाड्या आहेत. त्यातून अडीच कोटी माणसं दररोज प्रवास करतात. हा आकडा अनेक छोट्या-मोठय़ा देशांच्या लोकसंख्येपेक्षाही मोठा आहे.

भारतीय रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल साडेसोळा लाख आहे.

जमिनीखालून धावणारी पहिली मेट्रो रेल्वे कोलकात्यात १९८४ मध्ये सुरू झाली. त्यानंतर राजधानी दिल्लीत २००२ मध्ये मेट्रो धावायला लागली. मुंबईतही आता मेट्रो सेवा सुरू झाली. मात्र सध्या ती जमिनीवरुनच धावते.

मुंबईतील मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सर्वात गजबजलेले स्टेशन. इथून दररोज ३ लाख प्रवासी वेगवेगळ्या दिशेने प्रवासाला निघतात. या रेल्वे स्टेशनचा युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे.

अशा भारतीय रेल्वेचा आज वाढदिवस! आपण सारेजण रेल्वेचे अभिष्टचिंतन करूया!

Happy Birthday, Indian Railway!

– भारतकुमार राऊत

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here