Home आपलं शहर मुंबईतील कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची व्यवस्था, म्हाडाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियलला हस्तांतरीत

मुंबईतील कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची व्यवस्था, म्हाडाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियलला हस्तांतरीत

0
मुंबईतील कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची व्यवस्था, म्हाडाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियलला हस्तांतरीत

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मानवतेच्या दृष्टीकोनातून मुंबई शहरात कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) उपलब्ध करून दिलेल्या १०० सदनिकांच्या चाव्या आज ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांच्या हस्ते टाटा मेमोरियल रूग्णालयाला सुपूर्द करण्यात आल्या.

श्री.पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर.श्रीनिवास, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ.राजेंद्र बडवे, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे उपसंचालक डॉ.शैलेश श्रीखंडे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.आव्हाड म्हणाले की, टाटा मेमोरियल रूग्णालय हे कर्करोग रूग्णांचे उपचार करण्यासाठी नावाजलेले रुग्णालय असून या उपचारासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून कॅन्सरग्रस्त रुग्ण येत असतात. सोबतच त्यांचे नातेवाईक व काळजीवाहू व्यक्ती येतात. परंतू त्यांच्या राहण्याची व्यवस्था नसल्याने किंवा खासगी निवासस्थानाची सोय असलेले ठिकाण आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बरेचदा नातेवाईकांना फुटपाथवर रहावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी शासनाने रूग्णालयाशेजारी असलेल्या परळ, शिवडी विभाग, महादेव पालव मार्ग, डॉ.बी.ए.रोड, करी रोड मुंबई येथील हाजी कासम चाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या समूह पुनर्विकास योजनेमधून म्हाडाचा विभागीय घटक असणाऱ्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळास एकू्ण १८८ सदनिका प्राप्त झाल्या आहेत. यापैकी सद्य:स्थितीत ३०० चौरस फुट असलेल्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रूग्णालयास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या १०० सदनिका नाममात्र दराने (रु. १ प्रति वर्ष) भाडेपट्टा करारनाम्यानुसार म्हाडाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून विशेष बाब म्हणून टाटा मेमोरियल रुग्णालयास उपलब्ध करून देण्यात आल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड यांनी सांगितले.

सदनिकांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आली असून गृहनिर्माण विभाग (म्हाडा) व टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्यामध्ये करारनामा करण्यात येणार आहे, असे श्री.आव्हाड यांनी सांगितले.

डॉ.बडवे म्हणाले की, टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये कर्करोगावर उपचारासाठी रुग्ण येत असतात. या रुग्णांवर उपचार पूर्ण झाले तरच ती रोगमुक्त होऊ शकतात. रुग्णाला पूर्णपणे रोगमुक्त होण्यासाठी २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागतो. या दोन ते तीन महिन्यांसाठी रुग्णासह रुग्णाच्या नातेवाईकांनाही मुंबईत राहणे गरजेचे आहे. दाट लोकसंख्येच्या मुंबई शहरात मध्यवर्ती ठिकाणी महाराष्ट्र शासनाने ‘म्हाडा’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या १०० सदनिका १०० रुग्णांना जीवदान देणाऱ्या ठरणार आहेत, असे डॉ.बडवे यांनी सांगितले. टाटा मेमोरियल रुग्णालयाला १०० सदनिका उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे डॉ.बडवे यांनी आभार मानले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here