Home आपलं शहर पोलिसांनी पकडलेल्या युरियायुक्त ट्रकच्या ई-वे बिलामध्ये गोलमाल

पोलिसांनी पकडलेल्या युरियायुक्त ट्रकच्या ई-वे बिलामध्ये गोलमाल

0
पोलिसांनी पकडलेल्या युरियायुक्त ट्रकच्या ई-वे बिलामध्ये गोलमाल

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: प्रमोद तिवारी

बोईसर: बोईसर पोलिसांनी ५ ऑगस्टला ताब्यात घेतलेल्या युरीयाने भरलेल्या गाडीबाबतचे गूढ अधिकच वाढले आहे. या गाडीची ५ ऑगस्टला एकाच दिवशी भिवंडी आणि तारापूर येथे बनवलेली दोन-दोन इ वे बिल समोर आल्याने या प्रकरणी संशय अधिकच गडद झाला असून पोलिसांनी या अँगलने कोणाच्याही दबावाला बळी न पडता तपास केल्यास युरियाच्या काळाबाजाराचे मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान पालघरच्या कृषी अधिक्षक कार्यालयातील निरीक्षक अधिकारी जगन सुर्यवंशी यांनी युरियाचे नमुने सील करून ते तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

५ ऑगस्टला संध्याकाळी तारापूर औदयोगिक वसाहतीतून माल भरून निघालेला आयशर टेम्पो क्र. MH-48 T-9844 खैरापाडा चेक पोस्ट येथे तपासणी दरम्यान बोईसर पोलिसांनी थांबवला असता त्यामध्ये असलेल्या मालाची टेम्पोचालक कोणतीही कागदपत्रे सादर न करू शकल्याने पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन बोईसर पोलीस स्टेशनमध्ये आणला होता.पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतल्यानंतर या टेम्पोच्या मालकाने जवळपास दीड ते दोन तासांच्या उशीराने गाडीमध्ये ९ टन युरिया असल्याचे चलन, टॅक्स इन्व्हॉईस आणि इ वे बिल सादर केले. मात्र पोलिसांना सादर केलेल्या या कागदपत्रानुसार युरियाने भरलेला हा आयशर टेम्पो पूर्णा भिवंडी येथील कृष्णा सोल्वेकेम लिमिटेड या कंपनीतून गुजरातमधील पनोली येथील हिकल लिमिटेड या कंपनीत पाठविण्यात आलेला होता.

कृष्णा सोल्वेकेम कंपनीच्या इ वे बीलामध्ये आयशर टेम्पो क्र. MH 48 T 9844 हा ९ टन युरिया भरून ५ ऑगस्टला दुपारी २.२४ वाजता गुजरातमधील पनोली येथील हिकल लिमिटेड या कंपनीकडे निघाल्याची नोंद आहे. मात्र दुसरीकडे याच दिवशी तारापूर औदयोगिक वसाहतीमधील प्लॉट क्र. W-11 या कंपनीतूनही हाच आयशर टेम्पो संध्याकाळी ५.४९ वाजता ९ टन युरिया भरून निघाल्याची नोंद इ वे बिलात करण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी आणि तारापूर येथील युरियाचे नेमकं कोणते इ वे बिल खरं आणि कोणते इ वे बिल बनावट आहे याचा गुंता अधीकच वाढला आहे. याप्रकरणी तारापूर मधील प्लॉट क्र.W-11 या कंपनीतून युरिया भरल्याचे तेथील व्यवस्थापक हे नाकारत असून आयशर टेम्पोचे मालक आणि चालक मात्र युरिया प्लॉट क्र. W-11 मधूनच टेम्पोत भरल्याचे सांगत आहेत. त्यामुळे युरियाचे हे प्रकरण जास्तच संशयास्पद बनले असून पोलिसांनी सखोल चौकशी करून याची पाळेमुळे खणून काढण्याची आवश्यकता आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here