Home आपलं शहर खेलो इंडिया युवा क्रीडा खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला दोन्ही गटात सुवर्ण पदक..

खेलो इंडिया युवा क्रीडा खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला दोन्ही गटात सुवर्ण पदक..

0
खेलो इंडिया युवा क्रीडा खो-खो  स्पर्धेत महाराष्ट्राला दोन्ही गटात सुवर्ण पदक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पंचकुला, हरयाणा, १३ जून, (क्री.प्र.) खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेअंतर्गत हरयाणा येथे संपन्न झालेल्या खो-खो स्पर्धेत शेवटच्या दिवशी अंतिम सामन्यात आज सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी कमालीचा खेळ करत सुवर्ण पदकाला गवसणी घालत महाराष्ट्राला पदक तालिकेत अव्वल ठेवण्यास महत्वाची भूमिका बजावली आहे.

आज झालेल्या सकाळच्या सत्रात मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओरिसावर २१-२० (८-६, ७-९, व जादा डावात ६-५) असा अतिशय अटितटिच्या सामन्यात रोमहर्षक विजयाची नोंद केली. नाणेफेक जिकून ओरिसाने संरक्षण घेत महाराष्ट्राला आव्हान दिले. मात्र पहिल्या डावात त्यांचा होरा चुकवत महाराष्ट्राने घेतलेली २ गुणांची आघाडी सुखावणारी होती. मात्र या आनंदावर ओरिसाच्या खेळाडूंनी जोरदार आक्रमण करत बरोबरी साधली. त्यावेळी मात्र महाराष्ट्र खो-खो चे सर्वेसर्वा डॉ. चंद्रजीत जाधव यांनी प्रशिक्षकांपर्यंत कानमंत्र देत जोरदार लढत देण्याचा सल्ला दिला. पुन्हा एकदा गुणफलकावर सर्वांची नजर खिळून होती मात्र महाराष्ट्राला आक्रमणात फक्त ६ गुणांचीच कमाई करता आली. आता सारी दरोमदार संरक्षकांवरच होती. पहिली तुकडी ३:५० मि. गारद झाल्यावर मात्र प्रेक्षकांच्या तोंडचे पाणीच पळाले. जान्हवी पेठे व प्रीती काळे यांनी ओरिसाच्या मनसुब्यांना सुरुंग लावत विजयात मोठी कामगिरी बजावली. या सामन्यात महाराष्ट्राच्या कर्णधार जान्हवी पेठे (१:३५, २:२० मि. संरक्षण ), प्रीती काळे (१:४५,२:४० मि. संरक्षण व २ गुण), संपदा मोरे (१:३०,१:४० मि. संरक्षण व ६ गुण) व वृषाली भोये (४ गुण) यांनी विजयात सुवर्ण कामगिरीची नोंद केली. तर ओरिसाच्या अर्चना (२:१५ १:४५ मि. संरक्षण व २ गुण), स्मरणिका साहू (१:३०, २:१० मि. संरक्षण व ७ गुण) व अनन्या प्रधान (१:४५, १:३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी परभवातही जोरदार कामगिरीची नोंद केली.

मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओरिसाचा १४-११ असा एक डाव ३ गुणांनी दणदणीत पराभव केला व सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या सामन्यात महाराष्ट्राच्या शुभम थोरात (२ मि. संरक्षण व २ गुण), नरेंद्र कातकडे (२ मि. संरक्षण व २ गुण), ऋषीकेश शिंदे (२ मि. संरक्षण) व रामजी कश्यप (१:५० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी विजयश्रीत दमदार कमगिरिची नोंद केली तर ओरिसाच्या टि.जगन्नाथ दास (१:१० संरक्षण व ६ गुण) व संजीतने दिलेली जोरदार लढत अपयशी ठरली.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here