लोकहीत प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह येथे इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या महानगरपालिका शाळेतील दहावी उत्तीर्ण तसेच, अनुदानित व विना अनुदानित विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दिनांक १७ जून २०२५ रोजी उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे, उपायुक्त प्रसाद शिंगटे, सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग दिपाली पवार-जोशी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३६६ शाळा कार्यरत असून, त्या शाळांमध्ये सुमारे १,५०,००० (एक लाख पन्नास हजार) विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये शासकीय, खासगी शाळांचा समावेश आहे. या व्यापक शिक्षण व्यवस्थेत मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ३६ शाळा विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. महापालिकेच्या या ३६ शाळांमध्ये सुमारे १०,००० विद्यार्थी नियमित शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे.

सर्व वर्गखोल्या डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टर, इंटरनेट सुविधा आणि आधुनिक अध्यापन पद्धतींनी सुसज्ज करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासात रस वाढविण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक
महापालिकेच्या शाळांमध्ये दहावीचा वर्ग सुरू होऊन हे केवळ दुसरे वर्ष असूनही विद्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. २०२३-२४ मध्ये प्रथमच दहावीची परीक्षा देण्यात आली होती, त्या वेळी निकाल ६५% होता. पण शिक्षण विभागाने यावर काम करून यंदा २०२४-२५ मध्ये तो निकाल ९०.४५% पर्यंत नेण्यात यश मिळवले. ही प्रगती म्हणजे महापालिकेच्या शिक्षण धोरणांची प्रभावी अंमलबजावणी आणि समर्पित शिक्षकवर्गाच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे. या यशामागे महापालिकेच्या शिक्षण विभागाने केलेल्या सूक्ष्म अभ्यास, आत्मपरीक्षण आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत राबविलेल्या विशेष उपाययोजनांचा परिणाम आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक आणि भावनिक अडचणी समजून घेण्यासाठी शिक्षक, समुपदेशक, मुख्याध्यापक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी थेट संवाद साधण्याचे धोरण अवलंबले. या संवाद मोहिमेमुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न उघड झाले. उशिरा शाळेत प्रवेश, आर्थिक दुर्बलता, घरगुती जबाबदाऱ्या, अभ्यासासाठी पुरेसे साधन अभाव, यांसारख्या बाबी विद्यार्थ्यांच्या प्रगतीत अडथळा ठरत होत्या.
या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने मेंटरशिप उपक्रमाची अंमलबजावणी केली. या अंतर्गत प्रत्येक शिक्षकाने १० विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले. त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास, नियोजन, गृहपाठ, शंका निरसन, मानसिक आधार, वैयक्तिक अडचणी सोडविणे अशा विविध पैलूंवर शिक्षकांनी सातत्याने लक्ष केंद्रित केले. या विशेष नात्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमधील बंध अधिक मजबूत झाले. तसेच, अभ्यास साहित्याची वेळेवर वितरण, परीक्षेपूर्वी मार्गदर्शक, नोट्स, संभाव्य प्रश्नसंच आणि सराव पत्रिका पुरविणे, नियमित टेस्ट सिरीज, विषयवार चाचण्या आणि सराव परीक्षा यांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी सक्षम करण्यात आले.
महत्त्वाच्या विषयांमध्ये कमकुवत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ट्युशन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. यामुळे त्यांना जास्त लक्ष देऊन अभ्यास करता आला.
सत्कार समारंभात विद्यार्थ्यांप्रमाणेच गुणवत्तापूर्ण अध्यापन करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला.
यावेळी मा. आयुक्तांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्पर्धेच्या या युगात योग्य करिअर निवडणे अत्यंत गरजेचे असले, तरी त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्वभावानुसार, आवडीनुसार दिशा निवडणे. शिक्षणात केलेली सातत्यपूर्ण कामगिरी, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच यशाच्या वाटचालीतील महत्वपूर्ण योगदान ठरणार आहेत. हा सत्कार समारंभ हा केवळ विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव नसून, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक बदलांची साक्ष देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे असे आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले.