Home Blog Page 100

‘इनडोअर क्रिकेट’ विश्वचषकात भारताचा इंग्लंडवर २९ धावांनी विजय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सिडनी येथे सुरू असलेल्या जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (डब्लूआयसीएफ) ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने इंग्लंडचा २९ धावांनी पराभव करून विजयी प्रारंभ करून दिला. आज झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात ९९ धावा केल्या तर इंग्लंडला ७० धावाच करता आल्या.

भारताच्या १६ षटकांच्या सामन्यात पहिल्या ४ षटकात पहिल्या जोडीला फक्त ६ धावाच करता आल्या (बाद झाल्यावर प्रत्येक वेळी ५ रन वजा होतात). मात्र नंतरच्या तीन जोड्यांनी अनुक्रमे ३०, २९ व ३४ धावांची भर घातल्याने भारताला ९९ धावांचा पल्ला गाठता आला. तर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या चार जोड्यांना अनुक्रमे १९, १५, १६ व २० धावांवर रोखल्याने भारताला मोठा विजय साजरा करता आला. इंग्लंड फलंदाजीच्या वेळी दुसर्‍या व तिसर्‍या चार-चार षटकात भारतीय गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करताना १५ व १६ धावांवर रोखले हाच भारतीय विजयाचा टर्निंग पॉइंट ठरला. या षटकांदरम्यान भारतीय क्षेत्ररक्षण कमालीचे चपळ व दक्ष वाटले.

भारता तर्फे दैविक राय (१) व यतीश चन्नाप्पा (५) हि सलामीची जोडी खेळायला उतरली पण या जोडीला काही विशेष कामगिरी करता आली नाही. दुसऱ्याच्या जोडीतील विजय हनुमंतरायाप्पा (१०) व अफ्रोज पाशा (२०) तिसऱ्या जोडीतील गिरीश गोपाल (९) व नमशीद व्हि. (२०) आणि शेवटच्या जोडीतील अरिज अजीज (१६) व सुरज रेड्डी (१८) यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारताने मोठा विजय संपादन केला.

इंग्लंडच्या पहिल्या जोडीमधील जायडेन शाॅर्ट (९) व माइक गॅलर (१०) दुसऱ्या जोडीमधील नातं रिमिंगटोन (६), टॉम क्लार्क (९), तिसऱ्या जोडीतील मॅट गेलर (२०) लिम ब्रेजर (-४) तर शेवटच्या जोडीतील नव पटेल (१७) व ऑलिवर ग्रीन (३) यांना प्रभावी कामगिरी करता आली नाही.

भारताच्या सुरज रेड्डीने तीन फलंदाज बाद केले, तर अफरोज पाशा, गिरीश गोपाल व दैविक राय यांनी प्रत्येकी दोन-दोन फलंदाजांना बाद केले. या सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून भारताच्या सुरज रेड्डी ला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

डोंबिवलीतील भोपरच्या खदाणीमध्ये दोघा मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील भोपर गावात असणाऱ्या खदाणीमध्ये बुडून दोघा मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. आज सकाळी हा प्रकार घडला असून काही मुलं या खदाणीमध्ये पोहण्यासाठी उतरले होते. चार मुलांना बाहेर काढले. तर दोघा मुलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. खदाणीबाहेर गावकऱ्यांची गर्दी झाली असून हळहळ व्यक्त झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

डोंबिवलीजवळील भोपर गावातल्‍या गावदेवी मंदिरामागे असणाऱ्या या खदाणीत आयरे गावातील पाच सहा मित्र पोहायला उतरले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले आणि त्यांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. ज्याचा आवाज ऐकून काही गावकऱ्यांनी खदाणीजवळ धाव घेतली. भोपर गावातील खदणीत बुडून दोघे बुडाले तर तिघांना वाचविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे.

 

उद्धव ठाकरेंची शिवतीर्थावर शिवसैनिकांसमोरच हात जोडून मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखील ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. या बंडखोरीमुळे ५ सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षाचेच दोन वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित करण्यात आले. दादर मधील शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. या टीकेलाही नंतर एकनाथ शिंदे गटाने जशास तसे उत्तर दिले. दरम्यान, शिवसेनेच्या या दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आता शिवसैनिकांसमोरच हात जोडून एक मोठी घोषणा केली आहे. मी महाराष्ट्राचा विभागनिहाय दौरा करणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करत होते. याआधीही मी याबद्दल सांगितलेले आहे. पुढेही सांगत राहीन. लवकरच मी महाराष्ट्राचा विभागनिहाय दौरा करणार आहे. मी तुमचे याआधीही आभार मानलेले आहेत. आताही तुमच्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सध्या सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलेला आहे. शिवसेना पक्ष कोणाचा तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याच्या जोरावर शिंदे गटाकडून धनुष्यबाण या चिन्हावर अधिकार सांगितला जात आहे. तर नोंदणीकृत पक्षातील नियमावलीचा आधार घेत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आमच्याडेच राहील असा दावा उद्धव ठाकरे समर्थकांकडून केला जात आहे. दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात असताना निवडणूक आयोग काय निकाल देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या जागतिक इनडोअर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पुरुष व २२ वर्षाखालील मुलांच्या संघाचा सहभाग..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (डब्लूआयसीएफ) च्या वतीने ८ ते १५ ऑक्टोबर २०२२ या कलावधीत इनडोर क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियात आयोजित केला आहे. या स्पर्धेत भारतासह, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, द.आफ्रिका, यूएई व सिंगापूर हे आठ संघ सहभागी झाले आहेत. तर २२ वर्षाखालील गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, द.आफ्रिका व न्यूझीलंड हे संघ सहभागी झाले आहेत. २०१४ साली न्यूझीलंड व २०१७ साली दुबई येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ चौथ्या स्थानी राहिला होता. त्यामुळे या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघातील खेळाडूंवर मोठी कामगिरी करण्याची जबाबदारी असेल.

पुरुषांचा भारताचा पहिला सामना इंग्लंड विरुध्द ९ ऑक्टो. रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ११:३० वाजता सुरू होणार आहे. दूसरा सामना सिंगापूर विरुध्द १० ऑक्टो. रोजी सकाळी ७:३० वाजता होणार आहे. तिसरा सामना विश्वचषक विजेतेपदाचा दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुध्द १० ऑक्टो. रोजी दुपारी १:३० वाजता होणार आहे. चौथा सामना यूएई विरुध्द ११ ऑक्टो. रोजी सकाळी ५:३० वाजता होणार असून पाचवा सामना त्याच दिवशी श्रीलंके विरुध्द दुपारी १:३० वाजता होणार आहे. सहावा सामना १२ ऑक्टो. रोजी दुपारी १:३० वाजता न्यूझीलंड विरुध्द होणार असून सातवा व शेवटचा साखळी सामना १३ ऑक्टो. रोजी दुपारी १:३० वाजता द.आफ्रिके विरुध्द होणार आहे. १४ ऑक्टो. रोजी उपांत्य व १५ ऑक्टो. रोजी अंतिम सामने होतील.

२२ वर्षाखालील भारतीय संघ ९ ऑक्टो. रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ३:३० वाजता ऑस्ट्रेलिया विरुध्द खेळणार आहे. १२ ऑक्टो. रोजी सकाळी ७:३० वाजता द. आफ्रिके विरुध्द व १३ ऑक्टो. रोजी सकाळी ७:३० वाजता न्यूझीलंड विरुध्द खेळेल.

भारतीय पुरुष संघ : गिरीश के.जी (कर्णधार), धनुश भास्कर (उप-कर्णधार), एरीज अजीज, दैविक राय, खिजर अहमद, रुमान चौधरी, मोहसिन नदाम्माल, नामशीद वायप्रथ, सूरज रेड्डी, विजय गौडा, यतीश गौडा, संदीप मायांना (प्रशिक्षक) व एम. एस. पुंजा (व्यवस्थापक) या स्पर्धेमध्ये मुख्य सहकारी असतील.

मराठी पाट्यांची पाहणी मुंबई महापालिका सोमवारपासून करणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुंबई महापालिकेनेही मराठी पाट्यांच्या नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. त्याकडे कानाडोळा करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. तत्पूर्वी, मुंबई महापालिकेमार्फत मुंबईतील नेमक्या किती दुकाने, आस्थापनांनी त्याचे पालन केले आहे, हे तपासले जाणार आहे. त्यानंतर त्यांना नोटीस दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१) च्या कलम ६अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनास कलम ७ नुसार ‘मराठी भाषेतून नामफलक लावणे’ बंधनकारक आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठी पाट्यांविषयी आदेश जारी केल्यानंतर पालिकेनेही त्यासाठी धोरण आखले आहे.

मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने आणि आस्थापना असून, त्यापैकी केवळ अडीच लाख दुकानांनी मराठी पाट्या लावण्याच्या नियमांची पूर्तता केली आहे. उर्वरित अडीच लाख दुकानांनी याबाबत हलगर्जीपणा दाखविल्याने पालिकेनेही कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी पाट्या अनिवार्य करताना पालिकेने ३० जूनची मुदत दिली होती. त्यानंतर व्यापारी संघटनांच्या विनंतीवरून ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र ही तारीख उलटून गेल्यानंतरही पाच लाख दुकानांपैकी ५० टक्के म्हणजे अडीच लाख दुकानांनी त्याची अंमलबजावणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मराठी पाट्या प्रकरणी व्यापारी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. अशा परीस्थितीत मराठी पाट्यांचे नियम पालिकेच्या माध्यमातून कसे राबवले जातील, याकडे लक्ष दिले जात असल्याचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले.