Home Blog Page 101

अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदे गट हे आता आपापल्या पक्षासाठी कोणतं नाव वापरू शकतात ? ऍड. उज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा आणि शिवसेना हे नाव आगामी अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी वापरण्यास घातलेल्या बंदीच्या निर्णयावर ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गट निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात,’ असं प्राथमिक मत ऍड. उज्वल निकम यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे.

निवडणूक आयोगाचा हा अंतिम निर्णय नाही. दोन्ही गटांकडून पुरावे सादर करणे, युक्तिवाद करणे या गोष्टींना बराच कालावधी लागू शकतो, त्यामुळे अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लक्षात घेता निवडणूक आयोगाने हे तात्पुरते आदेश पारित केले असल्याचं ऍड. उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. ‘या निर्णयाविरुद्ध दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते. दोन्ही गटांना अंधेरी विधानसभेच्या निवडणुकीसाठी जर उमेदवार उभे करावयाचे असतील तर ते निवडणूक आयोगाच्या निकालाला ते आव्हान देऊ शकतात, शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबत निकाल देण्यास निवडणूक आयोगाला वेळ लागू शकतो, साधारणपणे सहा महिन्यात निवडणूक आयोगाकडून अंतिम निकाल अपेक्षित असतो. निवडणूक आयोगापुढे दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले आहेत. आता तोंडी पुरावा काय सादर केला जातो, या दोन्ही गोष्टी लक्षात घेता आयोगाचा निकाल तसेच शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबतच्या वादाचे भवितव्य हे ठरेल,’ असंही यावेळी बोलताना ऍड. उज्वल निकम यांनी सांगितलं.

दोन्ही गटांसमोर नावासाठी आता कोणते पर्याय ?

‘दोन्ही गटांना आगामी निवडणुकांमध्ये ‘शिवसेना’ हे नावच वापरता येणार नाही का ? याबाबत यापूर्वीच्या अशा प्रकारणांमध्ये दिलेले निकाल अभ्यासावे लागतील. तसेच शिवसेना नावाच्या पुढे आणि मागे काहीतरी शब्द घालून ते दोन्ही गटांना वापरता येऊ शकतं,’ असं मत ऍड.उज्वल निकम यांनी मांडलं आहे.

गटातटातील विखुरलेल्या बौद्ध समाजाने एकत्र यावे – भन्ते राहुल बोधी


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बौद्ध समाज डोंबिवली तर्फे आज डोंबिवली पूर्व येथे गांधीनगरातील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात आज ‘कठीण चिवरदान सोहळा, वर्षावास सांगता समारंभ व भव्य धम्म रॅली २०२२’ चे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली शहरात गेल्या तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या विभागात संपन्न झालेल्या वर्षवासाचा सांगता समारंभ सामुदायिकपणे करण्याचे योजिले होते.

समाजामध्ये डॉ.बाबासाहेबांची जयंती छोट्या मंडळ, विभाग आणि गटांमध्ये साजरी होते. त्यामुळे डॉ.आंबेडकरांनी दिलेली बौद्ध धम्माची संस्कृती आपल्या समाजात रुजली गेली पाहिजे. आज जो समाज गटातटात विखुरला गेलेला आहे तो अपेक्षित नाही. समाजाला एकत्र करायचे असेल तर बौद्ध धम्म शिवाय दुसरे कुठलेही माध्यम नाही असे प्रतिपादन भन्ते राहुल बोधी यांनी डोंबिवली येथील वर्षावास सांगता सोहळा कार्यक्रमाच्या वेळी केले.

वर्षावास सांगता समारंभाचे बौद्ध समाजाच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या सोहळ्यानिमित्त कठीण चिवर दान सोहळा व धम्म रॅली २०२२ चा सोहळा पार पडला. सुमारे पन्नासहून अधिक भन्ते सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात पुढे बोलताना भन्ते राहुल बोधी यांनी सांगितले की, वर्षावास हा बौद्ध धर्मात सुमारे २५०० वर्षापासून चालत आलेले प्रतिक आहे. जे भारतात नव्हे तर जगात सुद्धा प्रसिद्ध आहे. वर्षावास ही संस्कृती आपल्या समाजात रुजली पाहिजे, आत्ताच्या तरुण पिढीवर बुद्ध धम्म्माच्या विचाराचा प्रभाव पडल्यास भावी पिढी सुसंस्कृत होईल. बौद्ध समाजाचा आर्थिक, सामाजिक विकास होऊन बौद्ध समाज आदर्श पिढी म्हणून जगासमोर यावा या विचाराचे मंथन म्हणजे ‘वर्षावासाचे नियोजन’ असल्याचे महाथेरो राहुल बोधी यांनी सांगितले.

 

तर भन्ते आनंद महाथेरो यांनी आपल्या देशात बुध्दांनी दिलेला शांततेचा संदेश आणखी खोलवर रुजवला गेला तर शांती नांदण्यास मदत होईल असे प्रतिपादन त्यांनी केले. वर्षावास काळात भगवान गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञान संपादन करायचं असते. भगवान बुद्धाच्या धम्माच्या झेंड्या खाली सर्व समाज एकवटला पाहिजे. भगवान बुद्धाच्या धम्माचा सर्व जगात प्रसार होत आहे. हा बुद्धांचा देश आहे म्हणून ह्या देशात बुद्ध हवा युद्ध नको असे सांगत सर्व बौद्ध समाजाने एक व्हावे असा संदेश येथील उपस्थित उपासकांना त्यांनी दिला.

या वर्षावास सांगता समारंभ व भव्य धम्म रॅली २०२२ चे मुख्य संयोजक भन्ते राहुल बोधी थेरो, प्रमुख मार्गदर्शक भन्ते डॉ. एन.आनंद महाथेरो, रॅलीचे स्वागत, सांगता समारंभाचे नियोजन अध्यक्ष डी. डी. जाधव आणि कार्यकारिणी, महिला मंडळ सम्यक धम्म सामाजिक संस्था, गांधीनगर, डोंबिवली यांनी आयोजन केले.

तर भोजनदान व विशेष मदत अंकुश गायकवाड, किरतकर कुटुंबीय, विश्वविकास गायकवाड, बिरजू जाधव, धम्मविवेक जाधव, वर्षावास सहभागी संस्था सम्यक धम्म सामाजिक संस्था गांधीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र एम.आय.डी.सी., यशोधरा महिला मंडळ गणेश नगर, बौद्ध सेवा संघ डोंबिवली, सम्राट अशोक बुद्ध विहार संजय नगर, धम्मदीप बुद्ध विहार लोढा हेरीटेज, लुंबिनी बुद्ध विहार कोपर, भीमगर्जना महिला मंडळ त्रिमूर्तीनगर, देसलेपाडा – भोपर बौद्ध समाज, सिद्धार्थनगर रहिवासी, सहभागी राजकीय सामाजिक संस्थेचे प्रल्हाद जाधव (अध्यक्ष रिपब्लिकन पक्ष कल्याण जिल्हा), अंकुश गायकवाड (अध्यक्ष डोंबिवली शहर रिपब्लिकन पक्ष), माणिक उघडे (अध्यक्ष झोपडपट्टी महासंघ), लक्ष्मण अंभोरे (अध्यक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष), आनंद नवसागरे (रिपब्लिकन सेना), सुरेंद्र ठोके (अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी डोंबिवली – पूर्व), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन संस्था, भारतीय बौद्ध महासभा, भारती फौंडेशन यांच्या उपस्थितीत विशेष सहकार्य अंबादास खंडागळे, रविकिरण मस्के, अशोक कापडणे, प्रा.धनंजय पगारे, महेंद्र जाधव, सुहास रोकडे, कल्पना चौधरी, रवींद्र गुरचळ, निलेश कांबळे, विजय इंगोले, बाजीराव माने, रवी इंगोले, अर्जुन केदार, संजय गौतम, गुलाब खंदारे, सचिन साळवी, सूर्यकांत पारधे, आशिष कांबळे, विलास खंडिझोड, श्रीकांत माने, राष्ट्रपाल ढोबळे, मनीष सरकटे यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

 

 

नाशिकला अग्नितांडव; बसमधील १८ प्रवाशी होरपळून ठार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शनिवारी सकाळी खासगी ट्रॅव्हल बस आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे, अपघटनांतर बसने लगेच पेट घेतला. यामध्ये १८ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

कसा झाला अपघात


चिंतामणी ट्रॅव्हल्सची खासगी बस शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास औरंगाबादहून मुंबईकड़े जात होती. अमृतधाम चौफुलीजवळ टाकळीकडून कोळसा भरून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर ट्रकने बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बस ने आयशर ट्रकला सुमारे ५०० ते ६०० मीटर फरफटत नेलं. यावेळी आयशर ट्रकचा डिझेल टॅंक फुटल्याने काही क्षणातच बसने पेट घेतला.

बसमधून उड्या घेत प्रवाश्यांनी जीव वाचवला

पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याने बसमधील बरेच प्रवासी गाढ झोपेत होते. बसला आग लागताच, अनेक प्रवाशांनी बसच्या खिडकीतून रस्त्यावर उड्या घेतल्या, तर काही प्रवासी हे आगीत होरपळून बाहेर पडले. मात्र त्यांना मदत न मिळाल्याने जागीच गतप्राण झाले.

मदत वेळेवर पोहोचली नाही

अपघातस्थळी हजर असलेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने १००, नंबर ११२, रुग्णवाहिका १०८, अग्निशमन दल आपत्कालीन व्यवस्था या ठिकाणी संपर्क साधला. परंतू पहाटे ६ वाजेपर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर जखमींना आणि मृतांनाही शहर बस मधून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

बस दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन दुर्घटना बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे. नाशिक दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून प्रत्येकी २ लाखांची मदत दिली जाणार असून जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री नाशिकला रवाना

नाशिक बस अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करण्यासाठी नाशिकला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, मी सर्व अधिकारी, प्रशासकीय वर्गाच्या संपर्कात आहे. जखमींचा जीव वाचवण्याचा प्राधान्य दिलं जाईल. काही जणांना खासगी रुग्णालयात दाखल केलंय त्यांच्यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करू असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

भविष्यातील आर्थिक संकटांविरुद्ध धोरण तयार करण्याचे आवाहन करत ‘आयएमएफ’ ने दिला जगाला धोक्याचा इशारा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था’ ही जागतिक स्तरावर आर्थिक बाबींचा अभ्यास तसेच आर्थिक स्थैर्य व वाढीकरिता नियोजन करणारी प्रमुख संस्था असून याआधी संस्थेने आर्थिक मंदीचा इशारा जगातील प्रमुख देशांना दिला होता. नुकतीच आर्थिक दरवाढीची वर्ष २०२२-२३ करिता आकडेवारी कमी करताना संस्थेने ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा पुन्हा एकदा जगाला दिला आहे. ‘आयएमएफ’ च्या ताज्या आकडेवारीनुसार वर्ष २०२६ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसणार असून ती ४ लक्ष कोटी डॉलरने कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेने मोठे आर्थिक संकट जगासमोर उभे राहणार असल्याने जगातील सर्व देशांनी आर्थिक धोरण तयार करण्याचे आवाहन आयएमएफ द्वारे करण्यात आले आहे.

जॉर्जटाऊन विद्यापीठात एका कार्यक्रमाला संबोधित करताना ‘आयएमएफ’ च्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या की जग आर्थिक मंदीच्या सावटाखाली लवकरच जाण्याकडे वाटचाल करत असून यामुळे जगाची आर्थिक स्थिती बिकट होऊ शकते. यामुळे मोठे आर्थिक संकट निर्माण होऊन आर्थिक संतुलन बिघडू शकते. याचा परिणाम म्हणजे मोठे आर्थिक आव्हाने उभे राहणार असल्याने आतापासून प्रमुख देशांनी आर्थिक धोरण राबविणे गरजेचे आहे. हा इशारा जगातील प्रत्येक छोट्या-मोठ्या देशांकरिता असून, मंदीतून सावरण्यासाठी आतापासून प्रयत्नशील असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना जॉर्जिव्हा म्हणाल्या की, सर्व आर्थिक बाबी बिघाडीतलच व सर्व कोलमडेल असे नाही काही गोष्टी या चांगल्या देखील होतील परंतु गंभीर आर्थिक संकटांसोबत लढण्याची स्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी नियोजन व आर्थिक धोरण आवश्यक असल्याने या बाबीवर भर देणे गरजेचे आहे. ‘आयएमएफ’ ने यापूर्वी वर्ष २०२२ करिता आर्थिक वाढीचा दर ३.२ टक्के इतका असेल असे म्हटले होते परंतु तो कमी होऊन वर्षाअखेर २.९ टक्क्यांवर येण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे.

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतरच ७५ हजार पदे शिक्षक भरती; राज्य शालेय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य सरकारने विविध शासकीय विभागाच्या भरतीचा निर्णय घेतला असून या अंतर्गत आधीच एमपीएससी अंतर्गत भरावयाच्या पदांसाठीची महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णयामधील त्रुटी दूर करण्यात आली. लवकरच राज्य सरकार शिक्षण विभागाच्या देखील भरती करणार असून याअंतर्गत ७५ हजार पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. शिक्षण विभागाच्या भरतीमध्ये शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. सध्या राज्यात अतिरिक्त शिक्षक आहेत, त्यामुळे नव्याने भरती करायची झाल्यास या अतिरिक्त शिक्षकांचे भविष्य काय ? असा सवाल देखील उपस्थित होतो. नेमके यावर स्पष्टीकरण देताना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आश्वासन दिले की, शिक्षक भरती प्रक्रिया राबविताना अगोदर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे.

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्याने या शिक्षकांना न्याय तर मिळेलच शिवाय होणाऱ्या आर्थिक बचतीमुळे हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यास मदत होईल. याचा एकंदरीत परिणाम बघता विद्यार्थ्यांवर अधिक खर्चास प्राधान्य देण्याचा मानस शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात राज्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मुलांना जवळच्या शाळांमध्ये समाविष्ट करण्यात येईल, यासाठी क्लस्टर शाळांची निर्मिती होईल तसेच अशा विद्यार्थ्यांकरिता स्कुल बसची सुद्धा व्यवस्था करण्यात येईल, असे केसरकर म्हणाले.

याप्रसंगी बोलताना राज्य शालेय शिक्षण मंत्री म्हणाले की पवित्र पोर्टल बंद केले जाणार नाही. शिक्षण संस्था चालक जरी शाळा चालवत असले तरी सुद्धा शिक्षकांना पगार सरकार देते त्यामुळे आम्ही म्हणू तोच निर्णय योग्य असे धोरण संस्थांचे नसावे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेत एकत्रित कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मत मंत्री महोदयांनी व्यक्त केले.