Home Blog Page 99

२०२२ अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

स्टॉकहोम येथे जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या पुरस्कारांपैकी एक असलेल्या नोबेल पारितोषिकापैकी यावर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. गेल्या आठवडाभरापासून विविध विषयांवरील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले.

२०२२ च्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी अमेरिकी अर्थतज्ज्ञ बेन बर्नांक, डग्लस डायमंड आणि फिलिप डिबिविग यांना विभागून देण्यात आला आहे. आर्थिक मंदीच्या काळात बँकिंग क्षेत्र सुधारण्यासाठी या तिघांनी संशोधन केले आणि आर्थिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी चांगले पर्याय सूचवले होते. याची दखल घेत आज या तिघांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

यावर्षी विविध विषयांसाठी जाहीर झालेले नोबेल पुरस्कार

वैद्यकशास्त्र – स्वंते पाबो (स्वीडन)

भौतिकशास्त्र – एलेन आस्पेक्ट (फ्रान्स), जॉन एफ क्लॉजर (अमेरिका) आणि अँटोन जेलिंगर (ऑस्ट्रिया)

रसायनशास्त्र – कॅरोलिन बरटोजी (अमेरिका, स्टॅनफोर्ड विद्यापीठ), मॉर्टेन मीएलडोल (कोपनहेगन – डेनमार्क विद्यापीठ), के. के बॅरी शार्पलेस (स्क्रिप्स रिसर्च सेंटर – अमेरिका)

साहित्य – अ‍ॅनी अर्नो (फ्रान्स)

शांतता – एलेस बियालियात्स्की (मानवाधिकार वकिल – बेलारूस), मेमोरियल (रशियन मानवाधिकार संघटना) आणि सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज (युक्रेनियन मानवाधिकार संघटना )

नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. याची सुरुवात १९०१ मध्ये झाली आणि अल्फ्रेड नोबेलच्या नावावरून हे नाव देण्यात आले. अल्फ्रेड नोबेल स्वीडनचा रहिवासी होता. त्याने डायनामाइटचा शोध लावला होता.

नोबेल पारितोषिके भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान किंवा औषध, साहित्य आणि शांती या क्षेत्रातील उल्लेखनीय कामांसाठी दिली जातात.

 

कळी तर फुलणारचं आहे फक्त तिला मोकळा श्वास घेत फुलता येईल, असे वातावरण सभोवताली असू द्या !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

११ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिवस’ म्हणून साजरा केला जातो. माणसाच्या समाजव्यवस्थेचा गाडा स्त्री-पुरुष या दोन्ही समान चाकांवरच चालतो आहे, हे तर सत्य आहे. मात्र, जगभरात, अनेक ठिकाणी पुरुषप्रधान व्यवस्था असल्याने स्त्रिया – मुलींना दुय्यम स्थान देण्यात आलं. जवळपास सगळीकडे स्त्रिया-मुलींना आपल्या सुखांसाठी, मूलभूत हक्कांसाठी, कधीकधी तर आपल्या अस्तित्वासाठीही लढा द्यावा लागला. समाज जसजसा सुसंस्कृत होत गेला, तसंतशी स्त्री-मुलगी मुलग्याइतकीच महत्वाची आहे, तिलाही समान हक्क, न्याय्य अधिकार मिळायला हवेत, असा विचार पुढे येत गेला. मात्र, सगळीकडे अजूनही हा विचार म्हणावा तेवढा रुजलेला नाही. आणि म्हणूनच, जागतिक बालिका दिन साजरा करुन, आपल्याला मुलींच्या अस्तित्वाविषयी, लैंगिक समानता, समान संधी आणि समान न्यायाविषयी लोकांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

मुलींना दुय्यम किंवा ओझे मानण्याचा सर्वात भीषण परिणाम म्हणजे स्त्री-भ्रूण हत्या. मुलग्याच्या हव्यासापोटी आणि अज्ञानातून आईच्या पोटात असलेल्या मुलींची हत्या करण्याची अधर्म आणि क्रूर प्रथा सर्वात जास्त भारतातच आढळते. पण, चीन, पाकिस्तान, काही अरब देश, आफ्रिका आणि अगदी ऑस्ट्रेलियातल्या काही टोळ्यांमध्येही ही पद्धत होती. ही क्रूरता बंद करण्यासाठी, सरकारने गर्भजल परीक्षण आणि अशा गर्भपातांवर कायद्याने बंदी घातली असली, तरीही दुर्दैवाने आजही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीनं स्त्री-भ्रूणहत्या सुरुच आहे. आणखी वाईट म्हणजे, जीव वाचवण्याची शपथ घेणारे डॉक्टरच थोड्या पैशांसाठी अशा हत्या करतात. एकही स्त्री-भ्रूण मारले जाणार नाही अशी व्यवस्था निर्माण होईपर्यंत आपण प्रयत्न करत राहायलाच हवं.

आणखी एक समस्या म्हणजे, बालिकांवर अजाणत्या वयात होणारे विनयभंग, चुकीचे स्पर्श. ही विकृती संपवण्यासाठी समाजप्रबोधन, कायद्याचा धाक आणि त्यासोबतच मुलींचे समुपदेशन करुन, त्यांना या संदर्भात जागृत करणे, गैरप्रकार सहन न करता त्याविषयी मोठ्या माणसांना माहिती देण्याची समज आणि हिंमत देणे, यावर अनेक समाजसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्या, सामूहिक तसेच वैयक्तिक पातळीवर काम करत आहेत. काही ठिकाणी बालिकांना घरगुती हिंसाचार, पिळवणुकीचाही सामना करावा लागतो. शरीरीक अत्याचार सहन करावे लागू नये यासाठी मुलींना लहानपणापासूनच मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवत, स्वसंरक्षणासाठी कुस्ती, मुष्टियुद्ध, कराटेसारख्या युद्धकलांचे प्रशिक्षण हे द्यायलाच हवे. ग्रामीण भागात आणि शहरातही बलिकांना घरच्या जबाबदारीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागण्याची वेळ येते. अनेक ठिकाणी शाळांमध्ये शौचालये नसतात किंवा,पाळी सुरु झाल्यावर मुलींना शाळेत येता येत नाही. मात्र ही परिस्थिती आता खूपच सुधारली असून त्यामुळे शिक्षणात मुलींचे प्रमाण ग्रामीण भागातही वाढलेले दिसते आहे. घरोघरी नळ पोहचत असल्याने, लांबवरून पाणी आणण्याचे मुलींचे कष्टही कमी होत आहेत.

बालिकांच्या बाबतीत आणखी एक मोठी समस्या म्हणजे, त्यांच्या आहाराकडे केले जाणारे दुर्लक्ष. ही समस्या केवळ कुपोषित, ग्रामीण, आदिवासी भागातच आढळते असे नाही, तर शहरी मध्यमवर्गीय घरातही बालिकांच्या आहाराकडे दुर्लक्ष केले जाते. वाढत्या वयात, पाळी सुरु झाल्यावर मुलींची जी शारीरिक झीज होते. ती भरून काढण्यासाठी त्यांनी योग्य तो पोषक आहार घेणे आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यांना योग्य प्रमाणात लोह, कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्व मिळायलाच हवीत. मात्र दुर्दैवाने याही बाबतीत, मुलांना जेवढे महत्त्व दिले जाते, तेवढे लक्ष मुलींकडे दिले जात नाही. विशेषतः मुलींना व्यायामची गरजच नाही, असा एक गैरसमज आपल्या समाजात आहे, तो दूर करायला हवा. यासाठी सरकारी पातळीवर आणि कौटुंबिक पातळीवर देखील व्यापक काम करण्याची गरज आहे.

यंदाचा जागतिक बालिका दिन, विशेष आहे. बरोबर दहा वर्षांपूर्वी ह्या दिनाची सुरुवात झाली होती. या दशकभरात, आपण बालिकांच्या हक्कांसासाठी, त्यांच्या आयुष्यात सुरक्षितता आणि आनंद आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतून काय साध्य झाले, याचे सिंहावलोकन करण्याची हो योग्य वेळ आहे. मुली आपल्या सर्वांच्या आयुष्यात चैतन्य आणतात, खूप आनंद आणि समृद्धी आणतात. त्यांच्यामुळे जगात सौन्दर्य आहे, गोडवा आहे, सृजन आहे. मात्र, बुरसटलेले विचार आणि कुप्रथा यांना बळी पडून आपण आजवर, या सुंदर कळ्यांवर खूप अन्याय केला आहे. हसण्या-खेळण्याच्या, फुलण्याच्या वयात, त्यांना अनेक छोट्या-मोठ्या संघर्षांचा सामना करावा लागतो. क्षमता असूनही अनेक संधी हातातून निघून जातात, चाकोरीत अडकलेले आयुष्य जगावे लागते. यात त्यांची अनावश्यक शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक झीज होते, जी आपल्याला टाळता येऊ शकेल. स्त्रीला संधी आणि स्वातंत्र्याचे पंख दिले तर ती किती भरारी घेऊ शकेल, हे अनेक स्त्रियांनी दाखवून दिले आहे. तिच्यात उपजतच ताकद आहे, लवचिकता आहे. निसर्गाने स्त्री हे रसायन अत्यंत चिवट आणि जीवट असे बनवले आहे. गरज आहे, ती त्यांना समानता आणि संधी देण्याची. त्याची जबाबदारी शासन, प्रशासन, समाज आणि कुटुंबसंस्था या सगळ्यांनी समानतेने सांभाळली पाहिजे. केवळ एक दिवस जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन, त्यांचे कौतूक करणे पुरेसे नाही, तर हा सन्मान, समानता आणि संधी त्यांना नैसर्गिकरित्याच मिळेल, त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत, असा समाज निर्माण करणे, ही आपली जबाबदारी आहे. जागतिक बालिका दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !

 

हे सरकार धनदांडग्यांचे; अंबादास दानवे यांची टीका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील सरकार हे बोलाची कडी आणि बोलाच भात आहे. कोट्यवधीची घोषणा सरकार करत आणि शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही अजून जमा झाला नाही, हे सरकार धनदांडग्यांचे आहे, गुजरातला मदत करणारे आहे. अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्याचे सरकार स्थगितीचे सरकार आहे, यामुळे जनतेच्या कामाचा विकास थांबला आहे. जनतेची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

तुम्ही सुद्धा काय काय गमावलं हे चेक करा, मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर कसे आले हे चेक करा आणि तुम्ही तुमचे बघा आम्ही आमचं बघू असे खडेबोल सुनावत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर दिलंय.

अब्दुल सत्तार ही विकृती आहे, ते कुठेही जातील तिथे असेच वागतील, असा टोला दानवे यांनी सत्तार यांच्या पीए च्या झालेल्या वादावर लागवलाय.

 

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे आज ८२ व्या वर्षी दिल्ली येथे निधन झाले. मागील महिन्यात त्यांना रक्तदाबाच्या विकाराने ग्रासल्याने दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.

मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला होता. मुलायम सिंह यादव हे अगदी तरुण वयात समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी केलेल्या आंदोलनात सहभागी झाले. प्रदेशामध्ये नेताजी या नावाने परिचित असलेल्या मुलायम सिंह यांनी १९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केली. आठवेळा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते. १९८९, १९९३ आणि २००३ असे तिन वेळा त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी केंद्रामध्येही संरक्षण मंत्रीपदासारखी महत्त्वाची भूमिका पार पाडली. एच.डी. देवेगौडा आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना १ जून १९९६ ते १९ मार्च १९९८ दरम्यान मुलायम सिंह यादव हे संरक्षण मंत्री होते. त्यांच्या निधनामुळे देशातील समाजवादी विचारांनी राजकारणाची मांडणी करणाऱ्या एका मोठ्या चळवळीचे मोठे नुकसान झाल्याचे मानले जात आहे.

त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाची धुरा सांभाळत आहेत. अखिलेश यांनी २०१२ मध्ये देशातील सर्वांत कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून वयांच्या ३८ व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

‘मशाल’ निवडणूक चिन्हं ठाकरेंची तर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ शिंदे गटाची..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांना तात्पुरते मशाल हे चिन्हं दिले असून शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे पक्षाचे नाव दिले आहे तर निवडणूक चिन्हं कोणाचे ते उद्यापर्यंत म्हणणे मांडा असे सांगितले.

शिवसेनेतील अंतर्गत भांडणामुळे दोन दिवसांपूर्वी धनुष्यबाण चिन्हं आयोगाने गोठवले तर शिवसेना हे नाव वापरण्यास ही बंदी घातली होती.आज दुपारी बारा पर्यंत नवीन नावे आणि चिन्हं सुचविण्यासाठी सांगितले होते.

त्यानुसार ठाकरे आणि शिंदे गटाने आपली नावे आणि चिन्हे सुचवली होती, त्यानुसार शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) हे नाव ठाकरे गटाला देण्याचे मान्य करीत मशाल हे चिन्हं तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा आदेश आयोगाने संध्याकाळी उशिरा जाहीर केला आहे.

शिंदे गटाने सुचवलेले एकही चिन्हं आयोगाने मान्य केले नसून आणखी चिन्हे सुचविण्यासाठी सांगितले आहे, मात्र पक्षाचे नाव म्हणून बाळासाहेबांची शिवसेना असे देण्यास मान्यता दिली आहे.

त्रिशूळ आणि गदा ही चिन्हं आयोगाच्या यादीत नाहीत , तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडू च्या द्रमुक पक्षाचे चिन्हं आहे त्यामुळे ही सर्व चिन्हं आयोगाने नाकारली आणि मशाल हे चिन्हं पुढील आदेशपर्यंत वापरण्यास ठाकरे गटाला परवानगी दिली आहे मात्र शिंदे गटाने आणखी चिन्हे सुचावावित असे केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे.