Home Blog Page 104

डीआरआयने ११.६५ कोटीचे २३.२३ किलो सोने ईशान्य सीमेवरून ४ जणांना अटक करून केले जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नुकत्याच ईशान्य सीमाभागात सोने जप्त करण्याच्या विविध कारवायांवरून बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवरून सोन्याच्या तस्करीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी देखील सीमांचा वापर तस्करीसाठी केला जात होता. सप्टेंबर २०२२ या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल ११ कारवायांमध्ये एकूण १२१ किलो सोने जप्त करण्यात आले. यावरुन हे दिसून येते की ईशान्य कॉरिडॉर मार्गाचा वापर तस्करांकडून अजूनही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

विशिष्ट गुप्त कारवाई अंतर्गत पाटणा, दिल्ली आणि मुंबई येथील तीनही केंद्रांच्या समन्वयाने, महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ने ३३.४० कोटी रुपयांचे विदेशात निर्मित ६५.४६ किलो सोने जप्त केले. हे सोने आयझॉल येथून देशांतर्गत कुरिअर मार्फत मुंबईत पाठवण्यात आले होते. कपड्यांच्या म्हणून जाहीर केलेल्या गोण्यांमध्ये हे सोने लपवण्यात आले होते.

त्याच मार्गाने तस्करीच्या आणखी एका प्रकरणात, विदेशात उत्पादन केलेल्या सोन्याचा तस्करी करून आणलेला एक मोठा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जप्त केला. या साठ्याचे वजन अंदाजे २३.२३ किलो आहे तर त्याची किंमत अंदाजे ११.६५ कोटी रुपये असून या साठ्याची म्यानमारमधून तस्करी केली जात होती. विदेशात निर्मित हा सोन्याचा साठा चंफई- आयझॉल, मिझोराम येथून कोलकाता, पश्चिम बंगाल येथे वाहनात नेऊन लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पुरावे विशिष्ट गुप्तचरांनी सादर केले होते.

ही तस्करी रोखण्यासाठी २८-२९ सप्टेंबर २०२२ रोजी समन्वित कारवाई करण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी सिलीगुडी आणि गुवाहाटीला जोडणाऱ्या महामार्गावर पाळत ठेवली. २ संशयित वाहनांमधून प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांची ओळख पटवून त्यांना रोखण्यात आले. २ दिवसांच्या कालावधीत दोन्ही वाहनांची कसून तपासणी केल्यानंतर, वाहनाच्या विविध भागात २१ दंडगोलाकार तुकड्यांमध्ये लपवून ठेवलेले २३.२३ किलो सोने जप्त करण्यात आले. तस्करीच्या या प्रकरणात सोने दोन्ही वाहनांच्या मागच्या चाकांच्या मागे असलेल्या चेसीच्या उजव्या आणि डाव्या रेल्सला जोडणाऱ्या क्रॉस-मेम्बर मेटल पाईपच्या आत खास बनवलेल्या पोकळीत आणि सस्पेंशनमधे बसवण्यासाठी सोन्याचा विशिष्ट आकार देण्यात आला होता. जप्त केलेले सोने म्यानमारमधून मिझोराममधील झोखावथार सीमेवरून भारतात आणण्यात आले होते. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

 

येरे येरे पावसा तुला देतो पैसा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘येरे येरे पावसा तुला देतो पैसा’ पासून गेल्या वर्षांपर्यंतचे ‘मेरा यार हस राहा हैं बारिश की जाये..’ अशी पावसाबद्दलची सगळी गाणी कविता आपण ऐकत आलो आहोत. देशाच्या राजकारणात मात्र पावसाबद्दलच्या संवेदना अगदी समसमान आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणू नका, शिवसेना म्हणू नका की, अगदी काँग्रेस पक्ष म्हणू नका, राजकीय पक्षातील नेत्यांना पाऊस यावासा वाटतो, असेच दिसते. मागच्या निवडणुकीत ज्यांना खरंच आरामाची गरज आहे, असे वयोवृद्ध शरद पवार यांनी पावसात भिजत भिजत भाषण केले. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ व्हावी, तसेच झाले. त्यानंतर कुठच्या तरी कोपर्‍यात गेलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थोडा वर तरला. त्यानंतर मग काही विचारता सोय नाही. जो तो राजकीय नेता पावसात भिजून भाषण करू लागला. आता या वर्गवारीत राहुल गांधी यांनीही वर्णी लावली आहे. तोच तो एकसारखा सगळ्यांचा फोटो.. पाऊस धिंगाणा घालतोय, लोक हैराण आहेत. पण, नेते पावसात चिंब भिजून कडक भाषण करत आहेत. नेत्यांना वाटत राहते की, ते पावसात भिजले की, लोकांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी वाटते. मग त्यांचा जनाधार वाढतो. खरेच हे खरे आहे का ? मुळात पाऊस आल्यावर त्यापासून वाचण्यासाठी स्वतःसकट उपस्थित सर्वच श्रोत्यांना छत्री उपलब्ध करून द्यायची आर्थिक कुवत या नेत्यांमध्ये असते. किती जणांना छत्री देणार, हा प्रश्न असेल तर सभेच्या ठिकाणी ताडपत्री लावण्याचे नियोजनही हे नेते किंवा त्यांच्या सभेचे आयोजक करू शकतात. पण, काय करावे ? पावसात भिजून भाषण केले नाही तर नेतेपद मिळणार नाही, अशी अंधश्रद्धा नेत्यांमध्ये पसरली आहे. दुसरीकडे पावसात भिजून भाषण ऐकण्यात उपस्थित श्रोत्यांना खूप चांगले वाटत असेल का ? शक्यच नाही. अर्थात, एखाद् दुसरा निवडणूक तिकिट इच्छुकाला पावसात भिजून नेत्याचे भाषण तल्लीन होऊन ऐकतोय, असे नाटक करावेच लागते. पण, बाकीच्यांचे काय? नेते पावसात भिजून भाषण करतात. नंतर त्यांच्या अलिशान गाडीत बसून उबदार घरात आराम करतात. पण, त्या पावसात भिजणार्‍या कार्यकर्त्यांचे काय ? पावसात भिजून भाषण करणे आणि तो फोटो पराक्रम म्हणून मिरवणे, हेच नेत्यांचे इतिकर्तव्य असेल, तर मग आपण तरी काय करणार ? इतकेच म्हणू की ‘नेता भाषण कर रहा हैं, बारिश की जाये’..

वांगी की आलू ? गहन प्रश्न !

कृषी कायद्याबद्दल एकदाही मोदी शेतकर्‍यांशी बोलले नाहीत. शेतकर्‍यांचे नुकसान व्हावे म्हणूनच मोदींनी नायजेरियामधून चित्ते आणले. त्यामुळेच भारतात ‘लम्पी’ व्हायरस पसरला.” महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अशा पाट्या टाकल्या आहेत. अर्थात ‘उचलली जिभ लावली टाळ्याला’ अशी नानांची ख्यातीच! बरं आपण काय बोलतो, याबाबत जराही अभ्यास नाना करत नसावेत, नव्हे करतच नाहीत. त्यामुळेच मोदींनी चित्ते नायजेरियामधून नाही, तर नामिबिया या देशातून आणले, हे सुद्धा त्यांना माहिती नाही.

काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाच्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या अध्यक्षाला वर्तमानकाळातील सामान्य ज्ञान अजिबात नाही, हेच यातून प्रतित होते. नाना असे का करत असतील बरं ? याचे उत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. असे काहीही बोलले की, प्रसारमाध्यमांत त्याची भरपूर चर्चा होते. त्यामुळे नाना असे बरळतात. ‘बदनाम हुये तो क्या ? नाम तो हुआ’ असे नानांचे प्रकरण आहे. पण, तसे पाहिले, तर यातला एक स्पष्ठ मुद्दा असा आहे की, भारतीय लोक भोळे आहेत. अगदी खोट्या बातम्यांनाही खरे मानणारे आपल्या इथे कमी नाहीत. खेडेगावातल्या शेतकर्‍यांपर्यंत नानांचे म्हणणे पोहोचले, तर या मुर्खतापूर्ण विधानाचे खंडन करणारी विधाने पुन्हा या शेतकर्‍यांपर्यंत पोहोचतीलच, असे नाही.

दुसरे असे की, सध्या काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. नाना पटोले या निवडणुकीत दूरदूरपर्यंत कुठेही नाहीत. नानांना माहिती आहे की, मोदींबद्दल बोलले की प्रसिद्धी मिळते. त्यामुळे मागेसुद्धा नाना मोदींबद्दल असेच काहीसे बरळले होते आणि मग स्वतःच्याच विधानांचा वेगळाच अर्थ त्यांनी लावला होता. ‘मी मोदींना मारू शकतो,’ अशी उद्दाम भाषा केली होती. या विधानावरून वातावरण पेटले तेव्हा मग नाना म्हणाले की, “ते गावच्या गुंडाबद्दल बोललो होतो, पंतप्रधान मोदींबद्दल नाही.” तर असे हे नाना ! जिभेत काँग्रेसी गवतासारखी निरूपयोगी ताकद. पण, डोक्यात बुद्धी असणेही गरजेचे ना ? तिथे सुप्रियाताईंच्या शेतातले एक कोटी रुपयांचे उत्पन्न देणारी वांगी भरलीत की राहुल गांधींच्या आलूपासून सोना बनवण्यातलेे जे आलू आहेत ते भरले, ते नाना जाणोत आणि त्यांची काँग्रेस हायकमांड.. वांगी की आलू ? सरते शेवटी एकचं गहन प्रश्न !!

विजयादशमीनिमित्त खो-खो स्पर्धेत महिला व पुरुष संघांनी लुटले सुवर्ण ! महाराष्ट्राचा गोल्डन धमाका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांनी दसऱ्याच्या पू्र्वसंध्येला सुवर्णपदक जिंकून विजयादशमीचे सोने लुटले. दोन्ही गटात निविर्वाद वर्चस्व गाजवत महाराष्ट्राच्या खो-खो खेळाडूंनी दुहेरी सुवर्णपदकाची भेट देऊन विजयादशमीचा आनंद द्विगुणित केला.

‘संस्कारधाम इनडोअर स्टेडियम’मध्ये मंगळवारी झालेल्या अंतिम लढतीत महिला गटात महाराष्ट्राने ओडिशावर डावाने विजय साकारत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने १८-८ असा एक डाव व १० गुणांनी ओडिशाचा पराभव केला. महाराष्ट्राकडून रुपाली बडेने ३ मि. संरक्षण करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रियांका भोपीने २:५० आणि ३:५० मि. पळतीचा खेळ केला आणि २ गुण मिळवत अष्टपैलू कामगिरी नोंदवली. प्रियांका इंगळेने १:५० मि. संरक्षणाचा उत्कृष्ट खेळ केला. तसेच तिने ८ गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रेश्मा राठोडने २:५० मि. संरक्षण केले. रुपाली बडेने ३ मि. पळतीचा खेळ करुन सर्वांचीच वाहवा मिळवली. अपेक्षा सुतारने १:४० मि. संरक्षण केले व दोन गुण देखील मिळवले. संपदा मोरे हिने १:२० मि. नाबाद संरक्षण केले. ऋतुजा खरे हिने दोन गुण मिळवले. ओडिशाकडून निकिता साहू, शुभाश्री व मागी माझी यांनी अष्टपैलू कामगिरी बजावली.

पुरुष गटात महाराष्ट्राने केरळ विरुद्ध आक्रमक खेळ करत सुवर्णपदक जिंकले. महिला गटाप्रमाणेच महाराष्ट्राचा पुरुष संघ डावाने जिंकतो की काय याची मोठी उत्सुकता होती. मात्र, महाराष्ट्राने केरळचा चुरशीच्या लढतीत सात मि. राखून व ४ गुणांनी (३०-२६) विजय साकारत सुवर्ण पदक पटकावले.

महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंची लक्षवेधक कामगिरी ठरली. अक्षय भांगरेने २ मि. व १:१० मि. संरक्षण केले. रामजी कश्यप याने १:३० मि. व २ मि. पळतीचा सुरेख खेळ केला. ह्रषिकेश मुर्चावडेने अष्टपैलू कामगिरी बजावली. त्याने १:४० व १:३० मि. पळतीचा सुरेख खेळ केला व ६ गुण मिळवून संघाच्या सोनेरी यशात मोलाचा वाचा उचलला. सुरेश गरगटे याने १:२० मि. संरक्षण केले व १४ गुण घेऊन संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. प्रतिका वाईकरने १:२० मि. पळतीचा खेळ केला. लक्ष्मण गवसने ४ गुण मिळवले. केरळकडून निहाल, श्रीजेश व अभिराम यांनी झुंज दिली.

सुवर्ण भेट : शीतल भोर

महाराष्ट्रातील तमाम खो-खो आणि क्रीडा प्रेमींना विजयादशमी निमित्त सुवर्ण पदकाची भेट देता आली यापेक्षा दुसरा आनंद नाही. अंतिम सामन्यात ओडिशा संघाला डावाने हरवून सुवर्ण पदक जिंकू असा विश्वास होताच आणि प्रत्यक्षात सामना डावाने जिंकून आम्ही सुवर्ण जिंकले याचा मोठा आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया महिला खोखो संघाची कर्णधार शीतल भोर हिने व्यक्त केली. शीतल भोर म्हणाली की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपूर्वी खो-खो संघाचा १५ दिवसांचे सराव शिबिर घेण्यात आले. या सराव शिबिरात अधिक प्रभावी पद्धतीने सराव करुन घेण्यात आला. तसेच आम्हाला अतिशय चांगल्या सुविधा देण्यात आल्या. संघात दर्जेदार व अनुभवी खेळाडू असल्याने आमचा संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार होताच. संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक, पदाधिकारी यांनी आमचे मनोबल वाढवले. या सर्वांचा परिपाक म्हणजेच आम्ही मिळवलेले हे सुवर्णपदक आहे, असे शीतल भोर हिने सांगितले.

सुवर्ण जिंकण्याचेच ध्येय होते : ह्रषिकेश मुर्चावडे

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आम्ही सुवर्ण पदक जिंकण्याचेच ध्येय घेऊन आलो होतो. सराव शिबिरात आणि या स्पर्धेत आम्ही जे डावपेच आखले होते. त्यानुसार खेळ केला आणि अपेक्षेप्रमाणे गोल्ड जिंकले. संघातील सर्व १५ खेळाडूंचा समन्वय व ताळमेळ अतिशय सुरेख होता. संघात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू असल्याने आमचा संघ विजेतेपदाचा दावेदार होता आणि आम्ही सर्वांचा विश्वास सार्थ ठरवत गोल्ड जिंकले याचा मनस्वी आनंद होत आहे. प्रशिक्षक शिरीन गोडबोले सरांनी कश्या पद्धतीने खेळ करावयाचा हे सांगितले होते. त्यानुसार आमचा स्पर्धेतील खेळ झाला आणि सुवर्ण पदकावर आम्ही शिक्कामोर्तब केले. विजयादशमीची खो-खो आणि महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींना आम्ही सुवर्णपदकाची भेट देऊ शकलो यापेक्षा दुसरा आनंद नाही असे ह्रषिकेश मुर्चावडे याने सांगितले.

दोन सुवर्णाची खात्री होती : गोविंद शर्मा

महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघांची स्पर्धेपूर्वीची तयारी आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रत्येक सामन्यात त्यांनी गाजवलेले वर्चस्व पाहता दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकतील याची मला खात्री होती. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करुन गोल्डन धमाका केला याचा मोठा आनंद आहे. सर्व खेळाडू याचे हकदार आहेत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी व्यक्त केली.

गोल्डचा डबल धमाका : चंद्रजीत जाधव

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवली. या स्पर्धेत दोन्ही संघ अप्रतिम खेळले आहेत. जवळपास प्रत्येक सामने त्यांनी डावाने वा अधिक फरकांनी जिंकले आहेत. साहजिकच अंतिम सामन्यात दोन्ही संघ सुवर्ण पदक जिंकतील याची खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघ अंतिम सामन्यात जबरदस्त खेळले आणि सुवर्ण पदक जिंकले अशी प्रतिक्रिया भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसे गोल्डन यश : नामदेव शिरगावकर

खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघांनी शानदार कामगिरी नोंदवत दुहेरी सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्रात खो-खो खेळाची मोठी परंपरा आहे. या परंपरेला साजेशी अशी कामगिरी आज नोंदवत महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खेळाडूंनी दुहेरी सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला दुहेरी सोनेरी यश खूपच आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राचा महिला खोखो संघ :

प्रियांका भोपी, प्रियांका इंगळे, ऋतुजा खरे, शीतल भोर, श्वेता वाघ, अपेक्षा सुतार, रेश्मा राठोड, रुपाली बडे, आरती कांबळे, गौरी शिंदे, पूर्वा मडके, जान्हवी पेठे, मयुरी पवार, दीपाली राठोड, संपदा मोरे. कोच – प्रवीण बागल, व्यवस्थापक रत्नराणी कोळी, कोच प्राची वाईकर.

महाराष्ट्राचा पुरुष खोखो संघ :

राहुल मंडल, सागर पोतदार, अविनाश देसाई, मिलिंद कुरपे, अक्षय भांगरे, रामजी कश्यप, ह्रषिकेश मुर्चावडे, सुयश गरगटे, सुरज लांडे, अक्षय मिसाळ, प्रतिक वाईकर, लक्ष्मण गावस, धीरज सेनगर, निहार दुबळे, विजय शिंदे. कोच – शिरीन गोडबोले, संघ व्यवस्थापक कमलाकर कोळी, डॉ. अमित रावटे.

 

केबल व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी डोंबिवलीत महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील इंदिरा चौकात आज प्रचंड मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतर्फे केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील यांच्या आत्महत्ये प्रकर्णी भाजपा पक्ष आरोपीला वाचवण्यासाठी हस्तक्षेप करत असल्यामुळे धरणे आंदोलन करण्यात आले.

 

या धरणे आंदोलनात महाविकास आघाडीतर्फे भाजपा डोंबिवली ग्रामीण चे उपाध्यक्ष संदिप माळी यांना आठ दिवसात अटक करून कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे आणि आठ दिवसात अटक न झाल्यास महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांतर्फे मोठ्या प्रमाणात जेलभरो आंदोलन व मंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

सदर आंदोलनात प्रमुख वक्ते माजीमंत्री जितेंद्र आव्हाड होते तसेच सदर आंदोलनात राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, वंडार पाटील, राष्ट्रवादी चे प्रवक्ते महेश तपासे, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, नंदू धुळे , ऍड.ब्रम्हा माळी इत्यादी तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख विवेक खामकर, महिला आघाडीच्या वैशाली दरेकर, मंगला सुळे, ग्रामीण महिला संघटक कविता गांवड, काँग्रेस चे प्रदेश सचीव संतोष केणे आदि प्रमुख नेते सह आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विषेश म्हणजे आत्महयेपूर्वी मयत केबल चालक प्रल्हाद पाटील यांनी व्हिडिओ काढून आत्महत्या केली होती. तो व्हिडिओ भरपूर व्हायरलही झाला होता. त्यात त्यांनी मुख्यतः भाजपा ग्रामीण शहराचे उपाध्यक्ष संदिप माळी व इतरांची नावे घेतली आहेत, या धरणे आंदोलन मध्ये प्रल्हाद पाटील च्या पत्नी न्याय मागण्यासाठी उपस्थित राहून संदिप माळी व त्यांच्या साथीदारांना अटक करून कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

 

धनुष्यबाणाचे काय होणार ? सुप्रिया सुळे म्हणाल्या, की महिनाभरात राष्ट्रवादीचे चिन्ह घराघरात पोहचते तर ये क्या चीज है ?


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सर्वोच्च न्यायालयाने खरी शिवसेना कुणाची, यासंदर्भातील निर्णयाचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलवला आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाऊ शकते, या चर्चेच्या अनुषंगाने बोलत सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेचा दाखला देत महिनाभरात आम्ही चिन्ह लोकांमध्ये पोहोचवले, निवडून आलो आणि सत्तेतही बसलो, अशी प्रतिक्रिया कराडमधील पत्रकार परिषदेत दिली.

धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार की गोठवले जाणार ?

धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार की गोठवले जाणार, यासंदर्भातील चर्चेच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत दहा दिवसांत निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत पोहोचते. मग ये क्या चीज है, असे एक कार्यकर्ता म्हणाल्याचा किस्सा सांगून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोक सूज्ञ असतात. पण, आम्हीच ते अवघड मानतो. आता तर सोशल मीडिया फास्ट आहे. त्यामुळे नवीन चिन्ह मिळाले तरी लोकांपर्यंत पोहचेल. बंदूक काढणे, थप्पड मारणे ही आपली संस्कृती नाही.

सध्या महाराष्ट्राचे नाव खराब होत आहे

सत्ता गेल्याचे आम्हाला दु:ख नाही. सत्ता येते आणि जाते. परंतु, कोण बंदूक काढतेय, कोण एक थप्पड मारली तर चार थप्पड मारीन म्हणतेय. पन्नास खोके म्हटले तर समोरचा म्हणतो पाहिजेत का तुम्हाला, हे दुर्दैवी आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ज्या पद्धतीने आता महाराष्ट्राचे राजकारण चाललंय त्यामुळे महाराष्ट्राचे नाव खराब होत आहे. देशभरात यापूर्वी कधी महाराष्ट्राची चेष्टा झाली नाही ती आता होतेय, असे सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.