Home Blog Page 105

वाहनांच्या सीएनजी सह घरगुती स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचे दर पुन्हा वाढले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महानगर गॅससाठीच्या वायू पुरवठा हिश्श्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. परिणामी कंपनीला महागड्या दरात बाहेरून वायू घ्यावा लागत आहे. देशभरात सध्या वाढत्या महागाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. अशातच आता पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ सहन करावी लागणार आहे. कारण वाहनांमध्ये लागणारा सीएनजी व घरगुती स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पाईप नैसर्गिक वायूच्या दरात (पीएनजी) पुन्हा वाढ झाली आहे.

सीएनजीचे दर वाढले

महानगर गॅस लिमिटेडने सोमवारी सीएनजी आणि पीएनजीच्या दरात अनुक्रमे ६ रुपये व ४ रुपयांच्या दरवाढीची घोषणा केली. याद्वारे दीड महिन्यांपूर्वी झालेली कपात पूर्ववत झाली आहे.

कशामुळे वाढले दर ?

महानगर गॅसच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने वायूच्या दरात १ ऑक्टोबरपासून ४० टक्के वाढ केली आहे. त्याचवेळी महानगर गॅससाठीच्या वायू पुरवठा हिश्श्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. परिणामी कंपनीला महागड्या दराने बाहेरून वायू घ्यावा लागत आहे. त्यामुळेच ही दरवाढ करावी लागली आहे. त्यानुसार आता मुंबई शहर व परिसरात आता सीएनजी ८६ रुपये प्रति किलो व पीएनजी ५२.५० रुपये प्रति एससीएम असेल.

दरम्यान, जवळपास ३७ रुपयांच्या दरवाढीनंतर महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी वाहनधारकांना ऑगस्ट महिन्यात दिलासा देत दरात ६ रुपये प्रति किलो कपातीची घोषणा करण्यात आली होती. तसंच घरगुती स्वयंपाकासाठीच्या पाईप नैसर्गिक वायू (पीएनजी) दरातदेखील ४ रुपये प्रति एससीएमची कपात करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.

“कबड्डी माझा आत्मा तर शरीरसौष्ठव श्वास” – विजू पेणकर


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

“आज मी जे काही आहे ते कबड्डी आणि शरीरसौष्ठव खेळामुळे. हे दोन्ही खेळ माझे सर्वस्व आहेत. याच खेळांनी मला नाव आणि लौकिक मिळवून दिलं. म्हणूनच माझ्यासाठी कोणताही एक खेळ मोठा नाही. कबड्डी माझा आत्मा आहे तर शरीरसौष्ष्ठव माझा श्वास आहे. या खेळांनी मला खूप काही दिलंय. आता उर्वरित आयुष्यात मला या खेळासाठी आणि समाजासाठी द्यायचंय”, अशी भावना व्यक्त केली आपल्या ‘भारत श्री’ किताबाची पन्नाशी पूर्ण करणाऱ्या राष्ट्रीय कबड्डीपटू आणि शरीरसौष्ठवपटू विजू पेणकर यांनी.

महाराष्ट्राला पहिलावहिला ‘भारत श्री’ हे राष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्यपद पटकावून देणाऱ्या विजू पेणकर यांच्या या सोनेरी कामगिरीचा सुवर्णोत्सव साजरा करण्यासाठी मराठी क्रीडा पत्रकार संघांने विशेष कार्यक्रमाचे माझगाव येथील सर एली कदुरी हायस्कूलमध्ये आयोजन केले होते. या कार्यक्रमात जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे यांच्या हस्ते विजू पेणकर यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. तत्प्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत, मराठी क्रीडा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष हरचेकर, कार्याध्यक्ष सुहास जोशी, सचिव संदीप चव्हाण, कोषाध्यक्ष मंगेश वरवडेकर उपस्थित होते.

मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एकाच वेळी दोन खेळांमध्ये खेळणाऱ्या धडाकेबाज आणि जिगरबाज विजू पेणकर यांनी कबड्डीत आपले नाव गाजवल्यानंतर १ ऑक्टोबर १९७२ साली ‘भारत श्री’ या प्रतिष्ठेच्या किताबावर आपले नाव कोरले होते. ही त्यांची पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा होती आणि त्याच जेतेपदाची पन्नाशी साजरी व्हावी आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाची आठवण ताजी व्हावी म्हणून मराठी क्रीडा पत्रकार संघाने सोनेरी कामगिरीचा सुवर्णोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पेणकरांची ज्येष्ठ पत्रकार अश्विन बापट यांनी जबरदस्त मुलाखत घेतली. या मुलाखतीत बापट यांनी विजू पेणकरांना बोलते केले आणि तेही भरभरून बोलले. माझा सुरूवातीचा काळ खूप गरीबीचा आणि हलाखीचा होता. पण माझ्या आईने आम्हाला संघर्ष करायची जिद्द दिली आणि गरीबीला आपली ताकद करण्याची प्रेरणा दिली. आईने दिलेल्या शिकवणीमुळेच दहा बाय दहाच्या घरातून आज मी चार हजार चौरस फूटाच्या घरात पोहोचलोय. आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचे सांगून पेणकरांनी एकापेक्षा एक स्फूर्तीदायक शायरी पेश करून उपस्थितांची मनमुराद दाद मिळविली.

 

खासगी शाळांकडून अनुदान पुनर्विचारासाठी प्रस्ताव मागविल्यामुळे राज्य सरकारवर खर्चाचा अतिरिक्त बोजा वाढणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार विविध मुद्द्यांना बारकाईने हाताळत असून सध्यस्थितीत राज्यातील अनेक शाळांमध्ये तोकडी पटसंख्या असताना सुद्धा त्यांना अनुदान देण्याबाबत सरकार फेरविचार करत आहे. या प्रक्रियेसाठी राज्यातील एकूण ११९ शाळांकडून अनुदान प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सदर शाळा राज्यातील विविध विभागातील असून एकूण ८ जिल्ह्यातील शाळांना सध्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. अशा सर्व शाळांना येत्या १५ दिवसांत असलेल्या तुटींची पूर्तता करून प्रस्तावाचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शालेय शिक्षण विभागाने दिले आहे.

नव्याने फेरविचार करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक खासगी शाळांसोबतच कनिष्ठ महाविद्यालयांचा देखील समावेश आहे. जिथे राज्य सरकारचे वार्षिक एकूण उत्पन्न सव्वा तीन लाख कोटी आहे त्याच सरकारवर वार्षिक ४ लाख कोटी खर्चाचा बोजा असताना नव्याने अनुदानाचा प्रस्ताव स्वीकारण्याची तयारी राज्य सरकार दाखवत आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर खर्चाचा भार आणखी वाढणार आहे. याचाच परिणाम म्हणजे दरवर्षी सरकार खर्चापोटी जवळपास ४५ हजार कोटींचे कर्ज घेते.

सदर प्रस्ताव बघता काही अशा देखील संस्था अनुदानासाठी पुढे सरसावल्या आहे ज्यांची पटसंख्या समाधानकारक आहे व अनुदान मागणी २० ते ४० टक्के इतकी आहे. त्यामुळे सरकारचा हा निर्णय कितपत योग्य ठरेल हे सांगणे एक कोडेच आहे. सध्या खासगी शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे त्यामुळे त्यांना जर पात्रता निकष पूर्ण करण्यात यश आले तर भविष्यात सरकारच्या या निर्णयाचे स्वागतच होईल. इथे महत्वाची बाब म्हणजे तपासणीतून अनेक शाळांची पटसंख्या अतिशय कमी होती परंतु ते २० टक्के इतक्या अनुदानावर कार्य करत होती त्यामुळे त्यांना पटसंख्या निकष पूर्ण करावे लागतील तरच अनुदानावर येत्या काळात फेरविचार होईल. याकामी सरकारला वार्षिक दीडशे ते दोनशे करोड रुपये खर्च करावा लागेल.

 

एकनाथ खडसेंची भाजपात घरवापसीची चर्चा; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कानात ‘एकदा भेटून मिटवून टाकू’ म्हटल्याचा खुलासा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.

राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. आता नाशिकमध्ये एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीबाबत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबत गौप्यस्फोट केला.

एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि माझी नाशिक येथे एका कार्यक्रमात भेट घेतली. यावेळी त्यांनी फडणवीसांच्या कानात ‘एकदा भेटून मिटवून टाकू’ असा खुलासा महाजनांनी केला आहे. महाजनांच्या या खुलासानंतर खडसेंना नेमका काय तोडगा काढायचा ? खडसे भाजपमध्ये जाण्याच्या विचारात आहेत का ? अशा अनेक चर्चांना आता उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह एकनाथ खडसे दिल्लीत अमित शहांना भेटायला गेले होते. मात्र, अमित शहा यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही बैठक होऊ शकली नाही. मात्र, खडसे यांची अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती खुद्द रक्षा खडसे यांनी दिली होती. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या भेटीमुळे घरवापसीची चर्चा जोरात रंगली आहे.

 

पत्नीबरोबर संबंध ठेवायची इच्छा बोलल्याने मित्राचा खून; पोलीसांनी आरोपीला केली अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

टिटवाळ्यातील सावकरनगर परिसरात एका बंद घरात टिटवाळा पोलीसांना एक मृतदेह आढळून आला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. परिसरात दुर्गंधी पसरली होती. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील प्रक्रिया सुरु केली. कल्याण तालुक्यातील टिटवाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक दिलीप देशमुख पोना. दर्शन सावळे,पोना. नितिन विशे, पोकॅा. योगेश वाघेरे या पोलीस कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलीसांच्या तपासानंतर जी बाब समोर आली ती धक्कादायक होती. ज्या प्लॅटमध्ये महेश साबळे याचा मृतदेह आढळून आला होता. त्या फ्लॅटमध्ये खरात कुटुंबियातील एका तरुणाने आत्महत्या केली होती. त्या फ्लॅटला कुलूप लावून कुटुंबीय नाशिकला निघून गेले होते.

२२ सप्टेंबर रोजी आरोपी सागर खरात आणि त्याची पत्नी आणि मुलांसोबत टिटवाळा येथील सावकरनगरला परतला. या दरम्यान एके दिवशी रात्री त्याच्या घराखाली त्याचा जुना मित्र महेश साबळे त्याला भेटला. दोघांनी दारु पार्टी केली. हॉलमध्ये दारु पार्टी सुरु असताना महेश साबळे याने सागरला सांगितले की मला तुझ्या पत्नीसोबत संबंध ठेवायचे आहे. हे ऐकताच सागरने सोबत आणलेल्या दारूच्या बाटल्या महेशच्या डोक्यात फोडून मानेवर धारदार शास्त्राने वार करून त्याचा खून केला. अखेर पोलीसांनी सागर खरातला बेडय़ा ठोकल्या आहेत. सागर खरात या आधीही वांगणीतील एक हत्ये प्रकरणात जेल भोगून आला आहे. तो सराईत गुन्हेगार आहे.

सीसीटीव्हीच्या सहाय्याने टिटवाळा पोलीसांनी हा गुन्हा उघडकीस आणत आरोपी सागर खरात याला नाशिकहून अटक केली आहे. मयत तरुणाचे नाव महेश साबळे असे होते.