Home Blog Page 106

महाराष्ट्राच्या महिला व पुरुष गटातील खो-खो संघ उपांत्य फेरीत दाखल होत सुवर्णपदकाकडे वाटचाल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खो-खो संघांनी उपांत्य फेरीत धडक मारून सुवर्णपदकाकडे आगेकूच केली आहे. उपांत्य सामने सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून रंगणार आहेत.

साखळी फेरीत अखेरच्या लढतीत महिला गटात महाराष्ट्राने पंजाबचा २४-१८ असा एक डाव आणि सहा गुणांनी पराभव करुन उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. महाराष्ट्राने गटात निविर्वाद वर्चस्व गाजवले. सलग तीन विजयासह महाराष्ट्र संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. संपदा मोरेने २:२० मि. पळतीचा सुरेख खेळ केला. प्रियांका इंगळेची कामगिरी अष्टपैलू ठरली. प्रियांकाने १:३० मि. नाबाद पळतीचा खेळ केला आणि आठ गुण देखील संपादन केले. रुपाली बडेने ३ मिनीटे संरक्षण करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. दीपाली राठोडने २:२० मि. पळतीचा खेळ केला आणि आक्रमणात चार गुण देखील संघाला मिळवून दिले. शीतल भोरने सहा गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पंजाब संघाकडून सावेन व रमणदीप कौर यांनी झुंज दिली.

पुरुष गटात महाराष्ट्राने पश्चिम बंगालवर २२-८ एक डाव १४ गुणांनी विजय नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. साखळी सामन्यात महाराष्ट्राचा हा सलग तिसरा विजय ठरला. या दणदणीत विजयासह महाराष्ट्राने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंची कामगिरी लक्षवेधक ठरली. त्यात प्रामुख्याने ऋषिकेश मुर्चवडेने १:३० मि. संरक्षण केले. रामजी कश्यपने २:३० मि. पळतीचा खेळ केला व आक्रमणात दोन गुण मिळवून दिले. सुयश गरगटेने चार गुण घेत संघाची स्थिती अधिक भक्कम केली. अक्षय भांगरेने २ मि. संरक्षणाचा खेळ केला. मिलिंद कुरपेने आठ गुण घेऊन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रतिक वाईकरने १:३० मि. संरक्षण व चार गुण मिळवत अष्टपैलू कामगिरी केली. लक्ष्मण गवसने १:३० मि. पळतीचा खेळ केला व २ गुण देखील मिळवले. एकूणच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सामन्यावर आपले वर्चस्व कायम ठेवत बंगालला पराभूत करुन सुवर्णपदकाकडे आगेकूच केली आहे. बंगालकडून सुभाष (२ गुण) व मुर्तजा (१:२० मि. संरक्षण व २ गुण) यांचा अपवाद वगळता अन्य खेळाडू छाप पाडू शकले नाहीत.

महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खो-खो संघांनी उपांत्य फेरी गाठल्याने प्रशिक्षक, संघ व्यवस्थापकांनी आनंद व्यक्त केला आहे. संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, कमलाकर कोळी, प्रवीण बागल आणि महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी संघाच्या दणदणीत विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना सुवर्ण पदक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. उद्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राचा संघ पुरुषांमध्ये कर्नाटक विरुध्द तर महिलांमध्ये दिल्ली विरुध्द लढत देणार आहे. तर पुरुषांचा दुसरा सामना केरळ वि. पश्चिम बंगाल व महिलांमध्ये कर्नाटक वि. ओडिशा असा रंगणार आहे.

आज झालेल्या इतर सामन्यात महिलांच्या सामन्यात कर्नाटकने हरियाणाचा २२-२० (१२-०८) असा २:३० मि. राखून २ गुणांनी पराभव केला. पुरुषांमध्ये आंध्र प्रदेश व तामिळनाडू हा सामना २८-२८ असा बरोबरीत सुटला.

 

शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश करत आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील हजारो शिवसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ऐन दसरा मेळाव्याच्या तोडांवर शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

कोस्टल रोडसंदर्भात अदित्य ठाकरेंनी लक्ष न दिल्यानं शिंदे गटात सामील होत असल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसाठी खास धनुष्यबाणाचा पुष्पगुच्छ कार्यकर्त्यांनी आणला होता. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं.

“हे सरकार तुमचं सर्वांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. तुम्हाला सर्वांनाही हे सरकार आपलं वाटतंय, त्यामुळे तुम्ही हक्कानं तुमच्या मागण्या मांडत असता. तुमचे सर्व प्रश्न आपण सोडवू. न होणारी कामं आपण पूर्ण करु. तुमचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. असा आपला प्रयत्न असणार आहे. आता मुख्यमंत्री म्हणजे, मी स्वतः सर्वसामान्य माणूस समजतो. हे सरकार तुमच्यासाठीच आहे. तुमचे प्रश्न ते आमचे प्रश्न, तुमच्या समस्या त्या आमच्या समस्या” असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

 

दसरा मेळाव्या सारख्या टोमणे सभांनी महाराष्ट्राचं कधीच भलं होणार नाही; बावनकुळेंची शिवसेनेवर टीका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दसरा मेळाव्याची सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेनुसार शिवाजी पार्कवरच होणार तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांची दसरा सभा होणार आहे. या दसरा मेळाव्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यांमध्ये विरोधी गटांवर कोणते आणि कसे आरोप केले जातील, याची सर्वच चर्चा करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

“उद्धव ठाकरे यांची जी सभा होणार आहे किंवा यापूर्वी ज्या सभा झाल्या त्या टोमणे सभा झाल्या. महाराष्ट्राच्या हिताबद्दल ते कधीच काही बोलले नाहीत. पुन्हा एकदा टिंगलटवाळी सभा होणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे असे कार्यकर्ते आहेत जे दिवसाचे १८ तास समर्पित आहेत. हे दोघेही नेहमीच विकासाचा विचार करतात. दसरा मेळाव्यात काय अपेक्षित आहे तर, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल ? महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर कसा पोहोचेल ? हेच अपेक्षित आहे. पण सेनेकडून आजपर्यंत दसरा मेळाव्यात फक्त टोमणे मारले गेले, टोमणे सभांनी महाराष्ट्राचं भलं होणार नाही.” असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे. विकासासाठी काम करणारं हे नव सरकार आलं आहे. ट्वेंटीट्वेंटी मॅच खेळणारं हे सरकार आहे. हे दोघेही सुपरमॅन आहेत, बुलेट ट्रेन सुसाट सुरू आहे. मी कधीही एकनाथ शिंदेंना पाहतो तर ते विकासाबाबतच बोलत असतात, महाराष्ट्राला क्रमांक एकवर कसं नेता येईल याबाबत बोलत असतात. उद्धव ठाकरेंची सभा ही टोमणे सभाच असणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

 

पुण्यातील चांदणी चौकातील पूल अखेरजमीनदोस्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल स्फोटकांचा वापर करून पाडण्यात आला. पण स्फोटांमुळे पूल पूर्णपणे कोसळला नाही, तर खिळखिळा झाला. त्यानंतर पोकलेन मशीनच्या साह्याने पूलाचा उर्वरित भाग पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. मध्यरात्रीनंतर मोजणी सुरू असताना १ वाजता स्फोट करण्यात आला.

या पुलाचे दगडी आणि सिमेंटचे बांधकाम स्फोटकांमुळे कोसळले असले तरी या पुलाच्या बांधकामात वापरलेले स्टीलचे बांधकाम अबाधित आहे. तसेच ज्या ठिकाणी स्फोटके पेरण्यात आली होती, त्या ठिकाणी सर्व स्फोटकांचा स्फोट झाला नसावा, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, हा पूल ३० वर्षे जुना होता. मध्यरात्री ठीक १ वाजता पुलाचा स्फोट झाल्यानंतर धुराचे लोट निघाले. मात्र, त्यानंतर १५ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. कुठल्या स्फोटकाचा स्फोट होणार होता का ? याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली.

 

गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर केले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या दरानुसार, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३२.५० रुपयांची कपात करण्यात आली असली तरी १४.२ किलोचा घरगुती सिलेंडर स्वस्त किंवा महागही झाला नसल्याने घरगुती सिलेंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सलग सहाव्या महिन्यात घट झाली आहे. नैसर्गिक वायूच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली असून मुंबईमध्ये ३२.५० रुपये, दिल्लीमध्ये २५.५० रुपये, कोलकातामध्ये ३६.५ रुपये तर चेन्नईमध्ये ३५.५ रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे मुंबईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडरचा दर १८११.५० रुपये किमतीला मिळेल.

दरम्यान, महिन्याच्या सुरूवातीलाच नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली जागतिक बाजारात शुक्रवारी नैसर्गिक वायूच्या किमती ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे वीजनिर्मिती, खतनिर्मिती आणि वाहने चालवण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस महाग होण्याची शक्यता आहे. वायू क्षेत्रातून तयार होणाऱ्या गॅससाठी द्यावा लागणारा दर ८.५७ प्रति दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा दर आधी ६.१ प्रति दशलक्ष डॉलर ब्रिटिश थर्मल युनिट इतका होता.