Home Blog Page 108

गांधी जयंती दिनी ७५ नद्यांची परिक्रमा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध अभियानांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने वर्धा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा समारोप, हॅलो ऐवजी वंदे मातरम् अभियानाचा शुभारंभ, वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय आणि नियोजन भवनाचे उद्घाटन याबरोबरच ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे.

या सर्व उपक्रमांचा आणि नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ कार्यक्रम वर्ध्यातील जिल्हा क्रिडा संकुल येथे होणार असून या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याच बरोबर “हॅलो ऐवजी वंदे मातरम्” या अभियानाचे संकल्पक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मॅगासेसे पुरस्कार विजेते आणि जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

महाराष्ट्रातील नद्यांचे आरोग्य चांगले राहिले तरच आपले आरोग्य चांगले राहणार आहे आणि हेच ओळखून महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील एकूण ७५ नद्यांचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वर्धा येथील सेवाग्राममध्ये “चला जाणूया नदीला” या महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील ७५ नद्यांचे संवर्धन करीत असातना राज्यातील नद्यांची सद्यस्थिती नेमकी काय आहे. तसेच नदी संवर्धन करताना काय करणे आवश्यक आहे याची दिशा मिळण्यास या महोत्सवाच्या माध्यामातून मदत होणार आहे. या राज्य शासनाच्या उपक्रमात लोकसहभाग मिळाला तरच हा महोत्सव यशस्वी होईल, त्यामुळे नागरिकांनी या महोत्सवात मोठया प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

शिल्लक उरलेली सेना बुडत्या काँग्रेसच्या आधाराने वाचविण्याची धडपड सुरू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तित्व पुसले जाण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून बुडत्या काँग्रेसला वाचविण्यासाठी शिल्लक उरलेल्या सेनेचा हात पुढे करण्याची ठाकरे यांची तडजोड आता दोन्ही पक्षांना बुडविणार आहे, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यास गर्दी जमविण्यासाठी काँग्रेसने कार्यकर्ते पुरविण्याच्या मोबदल्यात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रातील शिल्लक सेनेची कुमक पुरविण्याची ठाकरे यांची धडपड केविलवाणी असून आता ‘पेंग्विन’ सेनेने हिंदुत्वाशी कायमची फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला. दसरा मेळाव्याकरिता गर्दी जमविण्याचे अभूतपूर्व आव्हान ठाकरे यांच्यासमोर उभे असल्याने उरल्यासुरल्या ‘पेंग्विन’ सेनेच्या आवाक्याबाहेरच्या या आव्हानास सामोरे जाऊन लाज वाचविण्यासाठी ठाकरे यांची जोरदार धडपड सुरू आहे. त्यासाठी त्यांनी शिल्लक सेनादेखील काँग्रेसच्या दावणीला बांधून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.

अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसपुढे गुडघे टेकल्याने ठाकरे यांचे नेतृत्व संपले, आता काँग्रेसच्या वळचणीस जाऊन उरलीसुरली सेना पण संपविण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट झाला आहे. विश्वासघाताने, जनादेश धुडकावून मिळविलेले मुख्यमंत्रीपद टिकविण्याच्या धडपडीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पक्ष गहाण टाकून त्यांनी अगोदर शिवसेनेची चक्क विल्हेवाट लावली. आता शिवाजी पार्कवरील मेळाव्याचा फज्जा उडण्याच्या भीतीने त्यांनी काँग्रेसच्या कुबड्या घेतल्या आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात फज्जा उडणार याची जाणीव असल्याने काँग्रेसने ‘गांधी यात्रे’ची लाज वाचविण्यासाठी सैनिकांची कुमक देण्याच्या अटीवर ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी गर्दी पुरविण्याची ग्वाही दिली आहे, असा गौप्यस्फोट प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

मुख्यमंत्रीपदाची हाव आणि पुत्रप्रेमाच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण शिवसेना पणाला लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे भवितव्यच या मेळाव्यातील शक्तिप्रदर्शनावरच अवलंबून असल्याने काँग्रेसने त्यांना कोंडीत पकडले आहे. बाळासाहेबांच्या पक्षाची त्यांच्या कौटुंबिक वारसाने केलेली केविलवाणी अवस्था पाहून कीव येते, असेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये जनतेने कौल दिलेल्या जनादेशाचे पालन केले असते, तर आपल्या हाताने पक्षाच्या विसर्जनाची वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला.

ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्याची हवा अगोदरच निघून गेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईचा वापर करून गर्दीसमोर वल्गना करण्यापलीकडे राज्याचे नेतृत्व करण्याची ठाकरे यांची क्षमता नाही, हे त्यांनी स्वतःच अडीच वर्षांच्या सत्ता कार्यकाळात दाखवून दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्यांखेरीज पक्षाचे अस्तित्व टिकविणे शक्य नाही याची जाणीव झाल्यामुळेच उरतणीला लागलेल्या या पक्षांच्या आधाराने उरलासुरला गट टिकविण्याची धडपड संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे, असेही ते म्हणाले.

 

केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील आत्महत्या प्रकरणात बदनाम करण्याचा राष्ट्रवादीचा डाव असा भाजपचा आरोप..

_
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा-पनवेल मार्गावरील दातिवली आणि निळजे रेल्वे स्थानकादरम्यान संदप गावातील केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांतील अंतर्गत कलह कारणीभूत असून यात भाजपच्या कार्यकर्त्याला नाहक गोवण्याचा प्रयत्न होत असून भाजपला बदनाम करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. डोंबिवली भाजपा ग्रामीण चे अध्यक्ष नंदू परब, पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, माजी नगरसेविका रवीना माळी, अमर माळी या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

डोंबिवली जवळील संदप गावातील केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील यांनी १० सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी प्रल्हाद पाटील यांनी एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओत सदर आत्महत्या ही भोपर गाव येथील राहणारे संदीप माळी मारहाण आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला होता तसेच काही लोकांची नाव जाहीर करत आत्महत्या केली होती. याबाबतची तक्रार मयत प्रल्हाद पाटील यांचे मोठे बंधू चंद्रकांत नारायण पाटील यांनी ठाणे रेल्वे पोलीसांकडे केली असून ठाणे जीआरपीमध्ये गुन्हा दाखल झाला होता._

भोपर आणि परिसरात संदीप माळी, रवीना माळी, अमर माळी यांनी मूलभूत सुविधा, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवली आहे. भाजपचे संघटन विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करीत असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात दुखु लागले आहे म्हणूनच राष्टवादीचे प्रवक्ते महेश तपासे हे आत्महत्या प्रकरणात भाजपच्या कार्यकर्त्यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या आत्महत्या प्रकरणात भाजपाच्या संदीप माळी यांना नाहक गुंतवलं जात असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे केबल व्यवसायिकाच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने उभे ठाकले आहेत.

भाजपचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

यावरून भाजपाने पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ठाणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी पक्ष संपत चालला आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पक्षावर लक्ष नाही दिलं तर जे दोन पाच लोक निवडून येतात ते देखील येणार नाहीत असा टोला कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांसमोर लगावलाय. केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील याच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाच्या संदीप माळी यांना नाहक गुंतवलं जात असल्याचं भाजपाकडून आरोप करण्यात आलाय. त्यामुळे पक्षनिष्ठा ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे भाजपा ठामपणे उभा राहिल. या प्रकरणाबाबत ठाणे रेल्वे पोलीस तपास करीत असून, त्यांनी निःपक्षपातीपणे तपास करावा असे शशिकांत कांबळे यावेळी बोलताना म्हणाले तसेच यापुढे बोलताना भान ठेवून बोला, असा इशाराही देत केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत.

व्यावसायिकाने मानसिक त्रासाला कंटाळून केली होती आत्महत्या

सदर आत्महत्या ही झालेल्या मानसिक त्रासातून आणि अंतर्गत कौटुंबिक कलहातून झाली आहे. संदीप माळी यांच्या वर या प्रकरणी कोणत्याही प्रकारचे आरोप नसल्याचे पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी यांनी सांगितले. तर केबल व्यावसायिकांच्या बैठकीत कोणताही वाद नव्हता. सर्व काही बोलणी सामंजस्याने झाली होती. असे भाजपा ग्रामीण अध्यक्ष नंदू परब म्हणाले. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने उभे ठाकले आहे आहेत व या प्रकरणाचा तपास पुढे नेमका कोणत्या दिशेला जातो ते आता पहावं लागेल.

 

गडकरींची मोठी घोषणा ! पुढील वर्षापासून कारमध्ये ‘सहा’ एअरबॅगची अंमलबजावणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय आता लांबणीवर पडला आहे. पुढील वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे वाहन उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आठ आसनी कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय लागू करण्यात आला. हा निर्णय १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होणार होता. पण आता या निर्णयाची अंमलबजावणी एक वर्ष लांबणीवर गेली आहे. आता १ ऑक्टोबर २०२३ पासून कारमध्ये सहा एअरबॅग्ज बसवण्यात येणार आहेत.

निर्णय लांबणीवर ?
नितीन गडकरी यांनी ट्विट करून आपल्या निर्णयाची माहिती दिली. वाहन उद्योग सध्या मागणी-पुरवठा साखळीतील आव्हानांना तोंड देत आहे. या समस्यांचा परिणाम वाहन उद्योगावर होत आहे. हे लक्षात घेऊन पुढील वर्षापासून वाहनांच्या एम-१ श्रेणीत सहा एअरबॅग्ज लागू करण्यात येणार आहेत.

किंमतीत वाढ ?
कारमधील एअरबॅगची संख्या वाढल्याने कारच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जर कार सहा एअरबॅगसह आली तर कारची किंमत ३० हजार ते ४० हजारपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

एअरबॅगची गरज काय ?
भारतात कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य केल्या असत्या तर सध्या १८ दशलक्षाहून अधिक एअरबॅगची गरज पडली असती. सध्या देशात ६ दशलक्ष एअरबॅग तयार होतात. याचा अर्थ देशात जवळपास १२ दशलक्ष एअरबॅगचा तुटवडा आहे.

आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वदेशी ‘नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम’ येणार आणि ‘जीपीएस’ होईल लवकरच हद्दपार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जगातील कुठलेही स्थान शोधायचे झाल्यास किंवा एखाद्या ठिकाणाची अचूक माहिती देणे, माहिती असलेले स्थान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शोधण्यासाठी ‘नॅव्हिगेशन प्रणाली’चा वापर करण्यात येते. या अंतर्गत सॅटेलाईटच्या मदतीने नॅव्हिगेशन सिस्टमद्वारे अचूक स्थान शोधण्याकरिता सहाय्य मिळते. सध्या भारतात ही सेवा ‘जीपीएस’ सिस्टमद्वारे देण्यात येते, ज्याला लवकरच हद्दपार करण्यात येणार आहे. या ऐवजी, पुढील वर्षी जानेवारी २०२३ मध्ये स्वदेशी बनावटीचे ‘नॅव्हिक’ म्हणजेच ‘नॅव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन सिस्टम’ भारतभर लागू करण्यात येणार आहे. सदर बाबतीत केंद्र सरकारने सर्व मोबाईल कंपन्यांना सूचना दिल्या आहे, यामुळे जीपीएस सेवा हटविण्यात येणार आहे.

‘नॅव्हिक’ बद्दल सांगायचे झाल्यास हे एक संपूर्णतः स्वदेशी ‘नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम’ असून भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने याची निर्मिंती केली आहे. एकूण १७४ कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला होता. वर्ष २००६ पासून प्रस्तावित असलेले या सिस्टम निर्मितीचे कार्य २०१८ साली सुरु करण्यात आले होते. सध्या हे स्वदेशी ‘नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम’ वापराकरिता सुसज्ज असून वर्ष २०२३ पासून सर्व मोबाईल कंपन्यांना ते लागू करण्याचा आदेश भारत सरकारने दिला आहे. या उपक्रमाकडे आत्मनिर्भर भारत मोहिमेचा भाग म्हणून देखील बघण्यात येत आहे.

सध्या भारत सरकारकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर सर्वात मोठी अडचण झाली आहे ती मोबाईल कंपन्यांची, कारण ‘जीपीएस’ ला वगळून ‘नॅव्हिक’ ला लागू करायचे झाल्यास अतिरिक्त भांडवल व त्यावरील खर्च लागणार, सोबतच देण्यात आलेला कमी वेळ ही सुद्धा मोठी समस्या आहे. ‘जीपीएस’ च्या तुलनेत ‘नॅव्हिक’ सॅटेलाईटची क्षमता सध्या तरी कमी असल्याने यामुळे वापरकर्त्यांना ही प्रणाली कितपत आवडणार, हा देखील महत्वपूर्ण प्रश्न निर्माण होत आहे. कारण ‘जीपीएस’ संपूर्ण पृथ्वीला अनुसरून कार्य करतो तसेच त्याचा उपग्रह पृथ्वीची दिवसातून दोन वेळा प्रदक्षिणा करतो. या तुलनेत ‘नॅव्हिक’ चा सॅटेलाईट फक्त भारत व भोवतालच्या प्रदेशाचे भ्रमण करतो.

सध्या सरकार स्वदेशी बनावटीच्या नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टमला उपयोगात आणून इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासोबतच भारतात आर्थिक स्त्रोतांचे साधन निर्मित करण्यावर भर देत आहे, त्यामुळे आत्मनिर्भर भारत चा भाग म्हणून स्वदेशी सॅटेलाईट आधारित सेवा देण्याचा भारत सरकारचा मानस आहे. परंतु सरकारच्या निर्णयाचा मोबाईल कंपन्यांनी चांगलाच धसका घेतला असून त्यांना भविष्यात होणाऱ्या आर्थिक नुकसानाची चिंता लागली आहे, त्यामुळे ‘नॅव्हिक’ ला लागू करण्याकरिता त्यांनी सरकारला दोन वर्षांची मुदत मागितली आहे.

सरकार लागू करण्याचा विचार करत असलेली स्वदेशी बनावटीची नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम किती यशस्वी होईल हे लवकरच कळेल, परंतु यामुळे येत्या काळात भारत देखील आपल्या देशवासियांना स्वदेशी निर्मित तंत्रज्ञान सेवा देणारा प्रमुख देश म्हणून ओळखला जाईल, हे मात्र नक्की.