Home Blog Page 109

आमदार विश्वनाथ भोईर यांनी पोलीसांना दिलेल्या निवेदनात साळवी यांना तडीपार नोटिस प्रकरणी बाजू मांडण्याची पूर्ण संधी द्यावी असे म्हटले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाचे कल्याण येथील पदाधिकारी विजय साळवी यांना पोलीसांकडून तडीपारीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र याप्रकरणी साळवी यांना बाजू मांडण्याची पूर्ण संधी द्या, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. आमदार भोईर यांनी आज विविध पदाधिकारी आणि नगरसेवकांसह कल्याणचे झोन-३ चे उपयुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेत यासंदर्भात निवेदन सादर केले.

शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाचे कल्याण येथील पदाधिकारी विजय साळवी यांना काही दिवसांपूर्वीच तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीबाबत विजय साळवी यांनी आपल्याला संपर्क साधल्याची माहिती यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी झोन-३ चे उपयुक्त सचिन गुंजाळ यांना दिली. विजय साळवी यांच्यावरील प्रमूख गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे असून त्यासाठी त्यांना तडीपार करणे न्यायोचित होणार नसल्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी उपयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर विजय साळवी यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी द्यावी आणि सर्व कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तर विजय साळवी यांच्यावर कारवाई करण्यामध्ये शासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही की कोणताही आकस नाही. तसेच अशा कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजिबात वेळ नसल्याचेही आमदार भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेवक रवी पाटील, जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, सुनिल वायले, श्रेयस समेळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ तर्फे जागतिक श्वानदंश दिनानिमित्त जनजागृती रॅली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ तर्फे दर वर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षी देखील दि.२८ सप्टेंबर रोजी रॅबीज दिनानिमित्त एक आठवड्याचा भटक्या श्वानांसाठी रॅबीज लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या आठवड्यात दिनांक १७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत १५८४ भटके कुत्रे व भटक्या मांजरींना रॅबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली. तसेच २८ सप्टेंबर रोजी गणेश मंदिर डोंबिवली येथून एक रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये प्रकाश विद्यालय, महात्मा गांधी विद्यामंदिर, प्रगती कॉलेज व एमकेएम पटेल कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच अनेक श्वानप्रेमी व प्राणी प्रेमी व व्हिपीडब्ल्यूए चे सदस्य या रॅलीत सहभागी झाले होते.

या रॅली नंतर एका चर्चासत्राचे आयोजन गणेश मंदिर हॉल येथे करण्यात आले होते. या चर्चासत्रास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’चे माजी अध्यक्ष डॉक्टर मनोहर अकोले व अध्यक्ष अजय कुलकर्णी यांची भाषणे झाली. रोटरी क्लबतर्फे भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात एक मागण्यांचे निवेदन महापालिकेस देण्यात आले. या चर्चासत्रात बोलताना डॉ.अश्विनी पाटील यांनी नागरिकांनी त्यांच्या जबाबदारीचे पालन करावे व महापालिका या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न व सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. डॉ. मकरंद गणपुले यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. या चर्चासत्रात व्हींपीडब्लूए चे सदस्य, रोटरी सदस्य, श्वान प्रेमी, प्राणी प्रेमी, शालेय व कॉलेज विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

पंकजा मुंडेंच्या विधानावर त्यांच्या कडूनच अधिक स्पष्टीकरण घ्या, मुनगंटीवारांनी दिली प्रतिक्रिया..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात सध्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये त्यांच्या भाषणात केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यादरम्यान, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंच्या विधानावर भाष्य केलं आहे.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले –

“मोदी मला संपवू शकत नाहीत असा पंकजा मुंडेंच्या म्हणण्याचा अर्थ नव्हताच. मोदींनी वंशवाद संपवण्याचा निर्णय घेतला आहे, पण मी जर जनतेच्या ह्रदयाचं प्रतिक असेन तर निश्चितच या वंशवादात बसणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे,” असं सांगत मुनगंटीवार यांनी पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे.

पुढे ते म्हणाले “अनेकदा असं होतं की, पात्रता नसताना मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून एका पदावर जातो. एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाचा मुलगा म्हणून पात्र नसतानाही त्या पदावर जाण्याचा प्रयत्न करतो. नेमका हाच भाव असावा असं मला वाटतं”. यासंबंधीच अधिक स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांच्याकडूनच घेतलं पाहिजे असंही त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं.

पंकजा मुंडेंचं वक्तव्य काय ?

“आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलिकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीदेखील वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते संपवू शकत नाहीत,” असं पंकजा मुंडेंनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण करत म्हटलं आहे.

 

दोन महिन्यांत अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देत केंद्रीय मंत्री नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी मुंबई हायकोर्टाने दिलेले आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले आहेत. सोमवारी न्यायालयाने राणे यांची याचिका फेटाळली आहे व पुढील दोन महिन्यात स्वतःहून अनधिकृत बांधकाम पाडावे अन्यथा मुंबई महानगर पालिकेला कारवाईची मुभा असेल,असा आदेश न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने दिला.
राणे यांच्या बंगल्यात झालेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी पालिकेने आक्षेप घेतला होता. त्यानंतर राणे यांनी बंगल्यातील बांधकाम नियमित करण्याची मागणी करीत मुंबई हायकोर्टात धाव घेतली. पण २ सप्टेंबर रोजी न्यायालयाने राणे यांची याचिका फेटाळात दोन आठवड्यांच्या आत अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश बीएमसीला दिले होते. बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्याची विनंती करीत दुसरा अर्ज केल्याबद्दल ‘कालका रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’ला न्यायालयाकडून १० लाखांचा दंडही करण्यात आला होता.

माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार पालिकेकडे केली होती. यानंतर राणे यांना पालिकेने नोटीस बजावली होती. २१ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाने बंगल्यात जावून तपासणी केली होती. सर्वच मजल्यावर ‘चेंज ऑफ यूज’ झाले असून बहुतांश ठिकाणी गार्डनच्या जागी खोल्या बांधल्याचे आढळून आले होते.
पालिकेने यानंतर राणेंना अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस बजावली होती. याविरोधात त्यांनी आधी हायकोर्टात आणि आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

“महाराष्ट्रात फिरून सगळ्यांच्या नावाने..”, उदय सामंतांचं आदित्य ठाकरेंवर टीकास्र; राम कदमांच्या ‘त्या’ ट्वीटचा केला उल्लेख!


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना दुसरीकडे वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरूनही सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा थेट सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजू यासाठी एकमेकांना जबाबदार धरत असून वेगवेगळे पुरावे सादर करत आहेत. आत्तापर्यंत विरोधकांकडून १५ जुलै रोजी राज्य सरकारच्या झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचा संदर्भ देत याचं खापर सत्ताधाऱ्यांवर फोडलं जात होतं. आता सत्ताधाऱ्यांकडून एक पत्र व्हायरल केलं जात असून त्याचा हवाला देऊन आधीच्या ठाकरे सरकारमुळेच प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात बोलताना कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता आदित्य ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे.

भाजपा आमदार राम कदम यांनी सोमवारी एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटसोबत त्यांनी त्यांच्या पत्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उत्तरादाखल दिलेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे. या पत्रामध्ये ‘वेदान्त फॉक्सकॉन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा आत्तापर्यंत कोणताही ‘एमओयू’ झालेला नाही. वेदान्त फॉक्सकॉन कंपनीला महामंडळाकडून जागेचे वाटप झालेले नाही. त्यामुळे सर्व्हे क्रमांक किंवा ऍग्रीमेंट याबाबत माहिती देता येत नाही’, असं चक्क नमूद करण्यात आलं आहे.

यासंदर्भात टीका करताना भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष ऍड.आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. ‘या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी ! चौकशीला समोरे जा. अजून बरेच काही निघेल! अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करु नये ?’ असा सवाल थेट आशिष शेलार यांनी ट्वीटच्या माध्यमातून विचारला गेला आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. “भाजपा आमदार राम कदम यांनी केलेलं ट्वीट सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात फिरून सगळ्यांच्या नावाने आगपाखड केली जात आहे. एमओयू झाल्याचं सांगितलं जात होतं. दोनच सह्या शिल्लक आहेत असं सांगितलं जात होतं. पण आता आमच्या विभागानं दिलेल्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की वेदान्त फॉक्सकॉनला कोणतीही जमीन दिली गेली नव्हती. कोणताही एमओयू झालेला नव्हता. त्यामुळे काही वाईट झालं तर शिंदे-फडणवीस सरकारमुळे झालं हे सांगण्याची विरोधकांची पद्धत या सगळ्या प्रकारातून आपल्याला पाहायला मिळत आहे”, असं उदय सामंत म्हणाले.

यावेळी उदय सामंत यांनी शिवसेनेकडून थापा एकनाथ शिंदे गटासोबत आल्यावरून केल्या जात असलेल्या टीकेचा समाचार घेतला. “खालच्या स्तरावरची टीका कशी होते, याचं प्रात्याक्षिक महाराष्ट्राला रोज पाहायला मिळत आहे. थापा शिंदेंसोबत का आले, हे तेच सांगू शकतील. कालपर्यंत आम्ही खोके घेतले होते, कालपासून थापाने खोके घेतले. आता उद्या अजून कुणी प्रवेश केला तर अजून कुणी खोके घेतले. खोक्याच्या पलीकडे काही शिल्लकच राहिलेलं नाही”, असं उदय सामंत म्हणाले. “एखादा विषय राजकीयदृष्ट्या कितपत पुढे न्यायचा, त्यातलं तथ्य लोकांसमोर ठेवायचं हे समजून घेण्यापेक्षा लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना बदनाम करायचं यासाठी काम सुरू आहे”, असं सामंत म्हणाले.

“संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला झाला. प्रत्येकाच्या मनगटात ताकद असते. पण आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेत असताना संस्कार पाळतो. वारंवार मारामाऱ्या करणं, गाड्यांवर हल्ला करणं यात फार मोठा पुरुषार्थ आहे असं मला वाटत नाही”, अशा शब्दांत उदय सामंत यांनी शिवसेनेला सणसणीत टोला लगावला.