Home Blog Page 110

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून बनावट बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम प्रकरणी २७ बिल्डरांवर गुन्हे दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी:अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कार्यालयातून बनावट बांधकाम परवानगी आदेश बनवून फसवणूक केल्याप्रकरणी केडीएमसीकडून मानपाडा पोलीस ठाण्यात एकाच वेळी २७ विकासकांकांवर गुन्हे दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल झालेली असून केडीएमसी आयुक्तांकडे तक्रार अर्जही सादर करण्यात आला आहे. यानंतर केडीएमसीकडून झालेल्या पडताळणीमध्ये बांधकाम परवानग्या बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील २७ गावांमधील २७ बांधकाम आणि डोंबिवली विभागातील ३९ बांधकाम परवानग्या असे मिळून एकूण ६७ बांधकाम परवानगी आदेश बनावटरीत्या तयार करण्यात आले असून त्यावर कारवाई करण्याचे आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेमध्ये नमूद केले आहे. तसेच या बांधकाम परवानग्या यासंदर्भात पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांकडेही लेखी तक्रारही केली आहे. त्यावरून केडीएमसीच्या नगर रचना (टाऊन प्लॅनिंग) विभागातील सहाय्यक संचालकांनी या बांधकाम परवानग्या तपासल्या असता त्या बनावट असल्याचे आढळून आल्याचेही पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की अशा प्रकारे एकूण ६७ परवानग्या बनावट कागदपत्रे तयार करून दिल्या गेल्याचे संबंधित विकासकांनी भासवले आहे. तसेच या परवानग्या च्या आधारावर त्यांनी रेराकडेही रजिस्ट्रेशन केल्याची माहिती आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिली. तसेच या विकासकांवर फसवणुकीचे गुन्हे दखल करण्यात असले असून रेरा संस्थेशीही यासंदर्भात संपर्क साधण्यात येत आहे.

केडीएमसीकडून विकासकांना देण्यात आलेल्या बांधकाम परवानग्या केडीएमसीच्या वेबसाईटवरही टाकल्या जात असून रेरा आणि आपली वेबसाईट जोडण्यात येणार आहे. जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नसल्याचेही आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

भूमाफियांची नावे

नकुल गायकर, सुमीत आचार्य, मे. समर्थ डेव्हलपर्स (आजदे गोळवली), वसंत म्हात्रे, सोमनाथ जाधव, मे. बिल्डर्स डेव्हलपर्स (नांदिवली), शांताराम जाधव, देवेंद्र म्हात्रे मे. विनायक कन्स्ट्रक्शन (सोनारपाडा), रामसुरत गुप्ता, आदित्य इन्फ्रा (नांदिवली), देवचंद कांबळे, मे. गोल्डन डायमेंशन (नांदिवली), प्रदीप ठाकूर, प्राची असोसिएशट (गोळवली), चंद्रशेखर भोसले, रुंद्रा इन्फ्रा (नांदिवली), प्रसाद शेट्टी, मे. गोल्डन डायमेंशन, ओम लिलाई बिल्डर्स, राजेश विश्वकर्मा, शंकर तेंडुलकर, तुकाराम पाटील (निळजे), अर्जुन गायकर, राजाराम भोजणे, गोल्डन डायमेंशन (आजदे), अविनाश म्हात्रे, मे. गोल्डन डायमेंशन, बालाजी डेव्हलपर्स (नांदिवली), अशोक म्हात्रे, मे. गोल्डन (नांदिवली), अरुण सिंग, बालाजी डेव्हलपर्स, मे. गोल्डन डायमेंशन (माणगाव), सरबन बिंदाचल, मे. विष्णु शाहु कन्सट्रक्शन, मे. गोल्डन डायमेंशन (माणगाव), संजय जोशी, मे. संस्कार बिल्डकाॅन, मे. गोल्डन डायमेंशन (निळजे), चिराग पाटील (आडिवली), महेश शर्मा, सामी असोसिएट (सोनारपाडा), अमृता दीपक घई, मे विनायक वाटिका बिल्डर्स, शेवंताबाई पाटील, (सोनारपाडा), शांताराम जाधव, देवेंद्र म्हात्रे (सोनारपाडा), मनोहर काळण, मे. शिवसाई बााजी बिल्डकाॅन (आजदे गोळवली), अनिल पाटील, मे. त्रिदल एन्टरप्रायझेस (आडवली), सुभाष नामदेव म्हात्रे, अमीन पटेल (नांदिवली), पूनम पाटील, जडवतीदेवी यादव (सोनरपाडा), सुनील लोहार, पार्वतीबाई काळण (सागाव), शिवसागर यादव, मे. साई बिल्डर्स डेव्हलपर्स (आडवली), निवेश एन्टरप्रायझेस जी. एन. गंधे, राजेश ठक्कर.

 

“इंडियन स्वच्छता लीग” स्पर्धेच्या 1800 शहरांमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिका महाराष्ट्रात प्रथम!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: स्वच्छ अमृत महोत्सव अभियान अंतर्गत केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनांना अनुसरून दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिकामार्फत शहरवासीयांच्या सहभागाने “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत स्वच्छता लीग रॅली मोहीम यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आली.

“इंडियन स्वच्छता लीग” स्पर्धेमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेस महाराष्ट्रात 3 लाख ते 10 लाख लोकसंख्या गटामध्ये प्रथम क्रमांकाने मानांकित करून गौरविण्यात करण्यात आले असून त्यामुळे मिरा भाईंदर महानगरपालिकेने मानाचे स्थान पटकावले आहे.

स्वच्छ अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतामध्ये 1800 शहरांनी भाग घेतला होता. मिरा भाईंदर महानगरपालिकेने “मिरा भाईंदर स्वच्छाग्रही” या नावाने सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. “मिरा भाईंदर स्वच्छाग्रही” टीमचे कप्तान मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या नेतृत्वाखाली मिरा भाईंदर शहरात 17 सप्टेंबर 2022 रोजी स्वच्छता रॅली, बीच क्लीनअप, किल्ले व उद्यानांची स्वच्छता मोहीम खूप व्यापक स्वरूपात राबवली गेली.

शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, शाळा, कॉलेज, कर्मचारी यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. स्वच्छतेचा संदेश घेऊन असंख्य विद्यार्थ्यांनी श्रमदान करत शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली. “मिरा भाईंदर स्वच्छाग्रही” टीमचे कप्तान म्हणून आयुक्त यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शहरात सुरू असलेल्या रॅलीला भेटी दिल्या.

विशेष म्हणजे ही स्वच्छता मोहीम सुरू असताना ठाणे/पालघर जिल्ह्यात सतत पावसाचे थैमान सुरू असूनही आयुक्त दिलीप ढोले यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता लीग रॅली यशस्वीरीत्या संपन्न झाली.

या स्वच्छता मोहिमेचे खास आकर्षण म्हणजे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अभिनेत्री मुग्धा गोडसे व राहुल देव सुद्धा या अभियानात सहभागी झाले होते. अनेक नागरिकांनी या मोहिमेत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याच प्रमाणे जेजे स्कूल ऑफ आर्टसच्या विद्यार्थ्यांनी समुद्र किनारी वाळूतील शिल्प साकारून एका अनोख्या पद्धतीने जनजागृतीचा संदेश दिला होता.

या सर्व मोहिमेची दखल घेऊन केंद्र शासनाच्या स्वछ भारत मिशन द्वारे मिरा भाईंदर महानगरपालिकेला “इंडीयन स्वच्छता लीग” अंतर्गत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने मानांकित करून महापालिका आणि पर्यायाने आयुक्त दिलीप ढोले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

हा सन्मान फक्त महानगरपालिकेचा नसून सर्व मिरा भाईंदर शहरवासीयांचा आहे असे म्हणत “मिरा भाईंदर स्वच्छाग्रही” टीमचे कप्तान महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी पालकमंत्री, खासदार, आमदार, मिरा भाईंदर महानगरपालिका माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू व संपूर्ण शहरवासियांचे आभार व्यक्त केले असून सर्व स्तरातून महापालिका आयुक्त तसेच पालिका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.

शरद पवारांच्या चौकशीच्या मागणीवर काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ईडी ने अटक केल्यानंतर पत्राचाळ प्रकरणाला नवं वळणं लागलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पत्राचाळ प्रकरणीसंदर्भात राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांच्या चौकशीची मागणी केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. दरम्यान, त्यांना “पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांचं नाव समोर आलेलं आहे. त्यांच्या चौकशीची देखील आता भाजपाकडून मागणी केली जात आहे. तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे?” असा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी, ‘नाही, त्याची मी माहिती घेतो. मला माहिती घेऊ द्या. त्यानंतर मी नक्की बोलेन,’ असं उत्तर दिलं.

त्यानंतर पत्रकारांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखही या बैठकीला उपस्थित असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारला. “तत्कालीन मुख्यमंत्री आणि शरद पवार दोघांचं नाव आहे,” असे पत्रकाराने म्हटले. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी, ‘नाही, म्हणून मी त्या बाबतीत माहिती घेऊन नक्कीच आपण सविस्तर बोलू,’ असे उत्तर दिले.

नेमकं काय आहे प्रकरण ?

पत्राचाळ प्रकरणामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड जेलमध्ये मुक्कामी आहे. याच प्रकरणात आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा उपस्थितीत होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचा आणि संजय राऊत यांचा काय संबंध होता ? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भातखळकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कल्याण-डोंबिवलीतील बीएसयूपी प्रकल्प बाधितांना अडीच महिन्यात मोफत घरे देण्याचा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवलीच्या विकासाचा आणखी एक अडचणीचा मार्ग मोकळा झाला असून विकासकामांतील बाधित नागरिकांना बीएसयूपी योजने अंतर्गत पुनर्वसन करण्याकरिता मोफत घरे दिली जाणार आहेत. यासाठी आकारली जाणारी प्रत्येकी १७ लाख रुपयांची रक्कम माफ करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

कल्याण-डोंबिवलीमध्ये विविध रस्ता रुंदीकरण आणि इतर शासकीय विकास प्रकल्प राबवण्यासाठी अनेक नागरिकांची घरे गेल्या दोन दशकांत तोडण्यात आली आहेत. मात्र दोन दशकांहून अधिक काळ उलटूनही यापैकी अनेकजण आजही शासकीय मोबदल्यासाठी प्रतीक्षेत आहेत व त्याकरीता आंदोलनं सुरू आहेत तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या ‘बीएसयूपी घरकूल योजने’अंतर्गत पुनर्वसनात कल्याण-डोंबिवली महापालिकेने तब्बल सात हजार घरे उभारली असून त्यामध्ये चार हजार घरे शिल्लक राहिली आहेत. या प्रत्येक घरामागे केडीएमसीला १७ लाख रुपये सरकारकडे भरावे लागणार होते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ‘म्हाडा’ला जे पैसे द्यावे लागणार होते ते १४ लाख रुपये शुल्क माफ करण्याचा निर्णय झाल्याची घोषणा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना केली. या निर्णयामुळे एकूण ५६० कोटी रुपये राज्य सरकारने माफ केले आहेत.

तसेच आजच या बीएसयुपी योजने अंतर्गत पुनर्वसन करण्यात येणाऱ्या घरांची पाहणी करून त्याठिकाणी आवश्यक असणारी सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही आपण दिल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्यामुळे येत्या दोन अडीच महिन्यात बीएसयूपीची एक हजार रेडी पझेशनमध्ये उपलब्ध होणार असून पहिल्या टप्प्यात ३५० लाभार्थ्यांना ही घरे मोफत मिळणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित पत्रकारांसमोर स्पष्ट केले.

त्याचबरोबर डोंबिवलीतील ‘बीएसयूपी योजने’तील अपात्र असलेल्या लाभार्थ्यांना क्लस्टरचा लाभ होऊ शकतो. त्यापैकी अत्यंत निकड असलेल्या ९० लाभार्थ्यांना डोंबिवलीतील इंदिरानगर बीएसयूपी येथे तात्पुरत्या स्वरूपात सशर्त घरे देण्याचाही निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला आहे.

रस्ते बाधिताना घरे मिळत नसल्याने रस्ते प्रकल्पांना अडसर निर्माण होत आहे. महत्वाचे म्हणजे कल्याण-डोंबिवली च्या हद्दीतील रस्ते विकास प्रकल्पात बाधित झालेल्या बाधितांना ‘बीएसयूपी योजने’तून घरे देण्याचा हा निर्णय मोठ्या मदतीचा ठरणार आहे. कारण या निर्णयामुळे रस्ते विकास प्रकल्पांना गती मिळणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. याशिवाय खोणी परिसरातील ‘पंतप्रधान आवास योजने’ अंतर्गत घरे बांधली जात आहेत. ती घरे लाभार्थ्यांना मिळवून देण्यासा विशेष प्रयत्न सुरु आहे. ही घरेही मिळवून दिली जातील असेही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह झोन-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, आमदार विश्वनाथ भोईर, माजी महापौर वैजयंती घोलप, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमूख राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, मल्लेश शेट्टी, रवी मट्या पाटील, कैलास शिंदे, मयूर पाटील, महेश गायकवाड, श्रेयस समेळ आदी पदाधिकाऱ्यांची घेतलेल्या पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.

‘लाईफ ट्री ट्रस्ट निधी लिमिटेड’ च्या माध्यमातून छोट्या व्यावसायिकांना सुलभ कर्ज योजनेचा सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

कोरोना च्या जागतिक महाभयंकर महामारीमुळे हातावर पोट असलेले व रोज काम करुन उपजिविका करणारे हातगाडी ओढणारे, रिक्षाचालक, हमाल,फळे व भाजीपाला विक्रेते, कारागीर, घरकामगार, रंगारी इलेक्ट्रिशन, प्लंबर, बिगारी, सलून कर्मचारी, मजूर, छोटे व्यावसायिक इत्यादी अडचणीत आले. अश्या छोट्या व्यावसायिकांना सुलभ कर्ज व परतफेड योजना ‘लाईफ ट्री ट्रस्ट निधी लिमिटेड’ च्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन डॉ.सुनिता पाटील यांच्या हस्ते सोमवारी सकाळी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. यावेळी ‘लाईफ ट्री ट्रस्ट निधी लिमिटेड’ संस्थेचे संचालक सुजित नलावडे, भाजप ग्रामीण महिला अध्यक्ष मनिषा राणे, हनुमान ठोंबरे आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

 

डोंबिवली पश्चिम येथील गोपी टाॅकीज मॉल येथे ‘लाईफ ट्री ट्रस्ट निधी लिमिटेड’ च्या कंपनीचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. सरकार मान्य कंपनी असून, छोटे व्यावसायिक कोरोनाच्या आर्थिक फटक्यातून आता कुठे सावरु लागले आहेत अश्या व्यावसायिकांना आर्थिक रित्या आधार देण्यासाठी संस्थेच्या वतीने आणि ‘महेश पाटील प्रतिष्ठान’ च्या संकल्पनेतून कंपनीची स्थापना करण्यात आली असल्याचे यावेळी बोलताना सुजित नलावडे यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.