Home Blog Page 111

मनसे चे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत विविध ठिकाणी वैद्यकीय शिबिरा़ंचे आयोजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव निवडून आलेले आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या आज वाढदिवसानिमित्त डोंबिवली आणि दिवा परिसरात ‘नाहर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल’च्या संयुक्त विद्यमाने २३ ते ३० सप्टेंबर पर्यंत ‘महात्मा फुले जिवनदायी आरोग्य योजना’ अंतर्गत मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

डोंबिवली पश्चिम येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, ओपन हार्ट सर्जरी, डायलिसिस अश्या असाध्य रोगांवर उपचारांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा लाभार्थींना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तर अस्थी रोग, नाक, कान, घसा व पोटांच्या विकारावर तपासणी करण्यात येत आहे. तसेच स्त्री रोग विषयावर तज्ञ, ई सी जी तपासणी, रँडम शुगर, पल्स प्रमाण मोजण्यासाठी तज्ञ उपलब्ध करून दिले आहेत. या शिबिराचा लाभ डोंबिवलीतील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मनसेच्या वतीने शिबीर आयोजक आणि मनसे चे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी केले आहे.

सदर शिबिराचे मार्गदर्शन मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी केले असून उपशहर अध्यक्ष श्रीकांत वारंगे, राजू पाटील, प्रेम पाटील, विधानसभा क्षेत्र सचिव उदय वेळासकर, शहर सचिव गणेश कदम, संतोष मालुसरे, संदीप (रामा) म्हात्रे, हेमंत दाभोळकर, संकेत तांबे, विजय शिंदे, गौरव गुप्ते, स्वप्नील पाटील इत्यादींचा शिबिराचे आयोजन करण्यात सहभाग आहे. डोंबिवली एमआयडीसी मधील रिजेन्सी येथील नाहर हाॅस्पिटल, आर आर बाज हाॅस्पिटल, मनसेचे फडके रोडवरील मुख्य मध्यवर्ती कार्यालय, दिवा इत्यादी ठिकाणी लाभार्थींना शिबिराच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे असे नाहरचे व्यवस्थापक अरुण जांभळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

 

 

सर्वोच्च न्यायालयात दसरा मेळाव्यासाठी आता आव्हान देणार नाही – दीपक केसरकर


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या परवानगीवरुन शिवसेना आणि शिंदे गटात सुरु असलेल्या लढाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोल्हापूरचे नवनिर्वाचित पालकमंत्री दीपक केसरकर यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. उच्च न्यायालयाने अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्कच्या मैदानात दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली होती. याविरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, दीपक केसरकर यांनी शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ठाकरे गटाकडून चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. आम्हाला परवानगी हवी असती तर आमच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला मिळाली असती. परवानगी आधी कोणी मागितली त्यावर हा निर्णय देण्यात आला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार नाही, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. ते रविवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उच्च न्यायालायने शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आता कायदा व सुव्यवस्थेचे पालन होईल, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना द्याव्यात. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे ठाकरे गटाने पालन करावे. शिंदे गटाचा बीकेसीच्या मैदानात होणारा मेळावा, हा सर्वात मोठा असेल. हा मेळावा शांततेत पार पडेल. आमचा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा असेल. या मेळाव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्थान नसेल हेच स्पष्ट केले जाईल. ठाकरे गटाच्या मेळाव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांचं सोनं लुटायचं असेल हे बाळासाहेबांनी कधीच होऊ दिलं नसतं. जर तसं होणार असेल तर मी काही बोलू शकत नाही, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

राष्ट्रीय हरित लवादाने तब्बल २५० कोटींचा दंड ठोठावत दिला ‘बेंजो केम’ कंपनीला मोठा दणका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बुलढाणा येथील मलकापूर तालुक्यातील दसरखेड एमआयडीसीमध्ये २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘बेंजो केम कंपनी’च्या दूषित पाण्यामुळे शेतजमिनीसह पाणी स्रोतांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ अकोला यांच्याकडे तक्रारी केल्या, मात्र कारवाई झाली नाही.

कंपनीतून वाहणारे विषारी पाणी वाघोळा, म्हैसवाडी, रणथम, दसरखेड या परिसरातील विहिरींमध्येही मिसळत होते. त्यामुळे दसरखेड येथील अरविंद महाजन, निना धारकर, गोविंदराव डोसे, विनोद एकडे, उमेश नारखेडे आणि इतर ४५ शेतकऱ्यांनी पुणे येथील हरित लवाद न्यायालयात प्रकरण ऍड. साहेबराव मोरे यांच्यामार्फत दाखल केले होते.

याचिकाकर्त्याची बाजू ऍड. बिना परदेशी यांनी मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेत २९ ऑगस्ट रोजी निर्णय दिला. मलकापूर येथील ‘बेंजो केम कंपनी’ने गत दहा वर्षांपासून रसायनयुक्त सांडपाणी खुल्या जागेत सोडल्याने तसेच दूषित पाणी पावसाच्या पाण्यात मिसळल्याने ५० शेतकऱ्यांची २५० एकर जमीन नापीक झाली.

याप्रकरणी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केलेल्या प्रकरणात ‘बेंजो केम कंपनी’च्या परवान्यातील अटी व शर्ती, तसेच पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीला २५० कोटी रुपये दंड राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाने दिला आहे. तसेच हा दंड तीन महिन्यांच्या आत जमा करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

 

तरुणीच्या तोंडामध्ये मिरची पावडर कोंबून कपडे फाडले आणि गुप्तांगावर ओतली दारू; पुण्यातील चित्तथरारक घटना..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महिला अत्याचाराची संतापजनक घटना पुण्यातील निगडीमधून समोर आली आहे. ४ तरुणांनी एका तरुणीचा पाठलाग करून तिच्या तोंडामध्ये मिरची पावडर कोंबली. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीतर तिच्या कपड्यांवर आणि गुप्तांगावर दारू ओतून ब्लेडने हातावर वार केले. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी पुण्यातील निगडी परिसरातील गंगानगर येथे दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणीच्या बहिणीने गुरुवारी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपी चेतन मारुती घाडगे सह ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी आरोपी चेतनला अटक केली आहे.

२७ वर्षीय पीडित तरुणी गुरुवारी गुरुदेवनगर येथील बेल्हेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन घरी येत होती. वाटेमध्ये ती एका फेरीवाल्याजवळ मक्याचे कणीस घेण्यासाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी चेतन घाटगे आणि त्याच्या साथीदारांनी पीडितेला कोयत्याने वार करण्याची धमकी दिली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पीडित घटनास्थळावरून निघून गेली. त्यानंतर आरोपी चेतन आणि त्याच्या साथीदारांनी तिचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे ही तरुणीने जीव वाचवण्यासाठी एका शौचालयामध्ये आसरा घेतला. पण पाठलाग करणारे तरुण हे सुद्धा सार्वजनिक शौचालयामध्ये घुसले आणि पीडितेला मारहाण केली. तिच्या तोंडामध्ये मिरची पावडर कोंबली अंगावरचे कपडे फाडले आणि गुप्तांगावर दारू ओतली. एवढंच नाहीतर या नराधमांनी तिला मिरची पावडर खाऊ घातली आणि तिच्या हातावर ब्लेडने वार करून पळ काढला.

या संतापजनक घटनेनंतर पीडितेच्या बहिणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता आरोपी चेतन घाटगेला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. या प्रकरणाचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

राज्यातील नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यांच्या नवीन पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. नवीन पालक मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये १९ जणांवर विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. नियोजन मंत्री म्हणून या जिल्ह्यांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणार आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे. तर मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर हे असणार आहेत. याशिवाय कोल्हापूरचे पालकमंत्रीही ते असतील. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

पालक मंत्र्यांची नावे आणि जिल्हे

* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या सर्व जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे

* राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर
* सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर,गोंदिया
* चंद्रकांत दादा पाटील – पुणे,
* विजयकुमार गावित – नंदुरबार
* गिरीश महाजन – धुळे,लातूर, नांदेड
* गुलाबराव पाटील – जळगाव, बुलढाणा
* दादा भुसे – नाशिक,
* संजय राठोड – यवतमाळ, वाशिम
* सुरेश खाडे – सांगली,
* संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
* उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
* तानाजी सावंत – परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
* रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग
* अब्दुल सत्तार – हिंगोली,
* दीपक केसरकर – मुंबई शहर , कोल्हापूर
* अतुल सावे – जालना, बीड
* शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
* मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर