Home Blog Page 112

डोंबिवलीकरांना सांस्कृतिक मेजवानी देत यंदा पुन्हा रंगणार भव्य ‘रासरंग’ नवरात्रोत्सव..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डॉ.श्रीकांत शिंदें फाउंडेशन च्या माध्यमातून गेले पाच वर्षांपासून डोंबिवली शहरात आयोजित केला जाणारा सर्वात मोठा रासरंग नवरात्रोत्सव दोन वर्षांच्या कोरोना मुळे पडलेल्या खंडानंतर आणि यंदाच्या नवीन एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने जसे दहीहंडी व गणेशोत्सव सारख्या हिंदू सणांवरील सगळे निर्बंध उठवल्यामुळे यंदा पुन्हा आयोजित करण्यात आला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून डोंबिवलीत नऊ दिवस हा भव्यदिव्य रास गरबा आयोजित केला जातो. तरुणांसह अबाल-वृद्धांमध्ये नऊ दिवस या उत्सवाची उत्सुकता असते. सुमारे एक लाख नागरिक या उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होत असतात. यंदा २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान हा उत्सव रंगणार आहे.

 

 

विकास कामांच्या माध्यमातून शहराला आकार देणारे कल्याण लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून संस्कृती टिकवून ठेवण्याचे कार्यही करत असतात. कला, नृत्य, संगीत, खेळ यांचा अनोखा संगम असलेला अंबरनाथचा ‘शिव मंदिर आर्ट फेस्टिवल’ देशभरात प्रसिद्ध झाला आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली शहरात आयोजित केला जाणारा भव्यदिव्य रास रंग हा कार्यक्रम ही डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून आयोजित केला जातो. उपनगरातील सर्वात मोठा नवरात्रोत्सव म्हणूनही या रास रंग कार्यक्रमाकडे पाहिले जाते. तरुण-तरुणींसह अबाल आणि ज्येष्ठ नागरिकही या उत्सवाची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. मराठमोळ्या भोंडल्याला गुजराती बांधवांच्या गरब्याचा साज या रासरंग उत्सवाच्या निमित्ताने मिळतो.

दरवर्षी एक लाखांहून अधिक जण या उत्सवात हजेरी लावत असतात. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या या उत्सवाला मराठी, हिंदी सिने, नाट्य आणि टिव्ही जगतातील अनेक प्रसिद्ध कलाकार, गायक, गीतकार, संगीतकार आपली हजेरी लावत असतात. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या सावटामुळे रासरंग नवरात्रोत्सव रद्द करण्यात आलं होता. मात्र यंदा ठाणे जिल्ह्याचे लाडके माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यामुळे नव्या उत्साहात आणि जल्लोषात या रासरंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी प्रमाणे डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि नवदुर्गा युवा मंडळाच्या माध्यमातून २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान डोंबिवलीतील डी.एन.सी शाळेच्या पटांगणावर नऊ दिवस हा उत्सव रंगणार आहे. या नऊ दिवसात तुषार सोनिग्रा यांच्या बिट १६ चे वाद्यवृंद उत्सवात संगीत संयोजन करतील. तर अर्चना महाजन, दिलेश दोषी, सेजल शाह, पंकज कक्कड, धर्मेश जोशी, कौशिक गडा या कलावंतांचे सादरीकरण होणार असून त्याला प्रसिद्ध निवेदिका शलाका हिच्या सूत्रसंचालनाची जोड मिळणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रासरंग उत्सवाला हजेरी लावणार आहेत तर महत्वाचे नेते, मंत्री, कलावंत या उत्सवाला प्रामुख्याने हजेरी लावणार आहेत.

 

गरबाप्रेमींनी मोठ्या कालावधीनंतर साजरा होणाऱ्या डोंबिवलीतील सर्वात मोठ्या गरबा उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या नवरात्रोत्सवात विविध स्पर्धा होणार असून सोन्याची व आकर्षक बक्षिसांची लयलूट उत्सवात सहभागी होणाऱ्यांना करता येणार आहे अशी माहिती झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना शिंदे समर्थक शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, कल्याण जिल्हा युवा अधिकारी दीपेश म्हात्रे, रवी मट्या पाटील, रणजित जोशी, अभिजित दरेकर, उपशहरप्रमुख अमित बनसोडे यांच्या उपस्थितीत देण्यात आली.

हिंमत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून निवडणूक लढून दाखवा – नामदार दादाजी भुसे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

हिंदूगर्वगर्जनेच्या माध्यमातून शिंदे गटाने डोंबिवलीत एमआयडीसी परिसरातील दावडी-रिजेन्सी येथील पाटीदार भवन सभागृहात शिवसेनेचे कल्याण लोकसभा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सगळे माजी नगरसेवक व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन केले. या शक्ती प्रदर्शनाचे प्रमुख मार्गदर्शक कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे व राज्याचे बंदरे आणि खनीकर्म मंत्री नामदार श्री. दादासाहेब भुसे होते.

बाळासाहेबांचा फोटो वापरण्यावरून उद्धव ठाकरे शिंदे गटाला मज्जाव करत असल्याने उद्धव ठाकरेंनी हिंमत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढुन निवडणूक लढवून दाखवा असे आवाहन बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे. शिंदे गटाच्या वतीने डोंबिवलीत हिंदूगर्वगर्जना शिवसेनेच्या संपर्कयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर विनीता राणे, शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, दिपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, प्रशांत काळे, उपशहर प्रमुख अमित बनसोडे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक या मेळाव्याला उपस्थित होते.

यावेळी दादाजी भुसे यांनी आपल्या भाषणात उपस्थितांची गर्दी पाहून हा मेळावा दसरा मेळाव्याचा ट्रेलर असून दसरा मेळाव्याला कोणतं मोठं मैदान शोधावं हा प्रश्न पडला असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं. एनडीआरएफच्या निकषात डबलने मदत केली जाणार आहे.

उद्धव ठाकरे हे वारंवार सांगत असतात बाळासाहेबांचा फोटो काढून टाका. मात्र बाळासाहेब हे एका कुटुंबाचे बाप नव्हते तर संपूर्ण महाराष्ट्राचे बाप होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून निवडणूक लढवा. निवडणूकीपूर्ती महाराजांना आठवायचं नंतर विसरून जायचं हे काम सुरू असल्याची टीका यावेळी दादाजी भुसे यांनी केली.

तर शिवाजी पार्कच्या परवानगी बाबत भुसे यांनी बोलताना सांगितले की, आम्ही लोकशाही मानणारे शिवसैनिक आहोत. झालं ते चांगलं आहे. शिवाजी पार्क ची क्षमता कमी असल्याने तिथे एवढे शिवसैनिक बसणार नाहीत. त्यामुळे मोठ्या मैदानात हा दसरा मेळावा होणार असल्याचे सांगितले. तसेच आगामी दिवाळीत राज्यातील सर्व महिलांसाठी मुख्यमंत्री विशेष भेट देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

या मेळाव्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. दसरा मेळाव्याची ही बैठक असून जेव्हा मेळावा होईल तेव्हा मैदान देखील कमी पडेल. ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ता मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. मुख्यमंत्री ज्या प्रकारे कामं करत आहेत त्यामुळे विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. इतकं गतिमान सरकार महाराष्ट्राने पाहिले नव्हते. बाळासाहेबांचे विचार बासनात बांधून अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार सुरू होतं. या सत्तेचा फायदा फक्त काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. त्यावेळी पक्ष वाढीसाठी सत्तेत आलो. मात्र उलटं झालं. जिथे जिथे शिवसेनेचा कार्यकर्ता काम करत होता तिथे राष्ट्रवादी काँग्रेस वाढत गेली. आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दाबलं गेलं. कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस केल्या. आमदारांचा निधी थांबविला. आधी नावाला एक आणि कामाला दुसरा मुख्यमंत्री होता. मात्र आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच सगळीकडे दिसत असल्याने त्यांना पोटशूळ उठला असल्याचा खोचक टोला खासदार शिंदे यांनी लगावला.

तर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या व्हायरल होत असलेल्या फोटो बद्दल हा फोटो ठाण्यातील घरातला असल्याचे सांगत आता घरी बसायची देखील चोरी असल्याचे सांगितले. मी सलग दोन वेळा खासदारकीची निवडणूक लढवून पहिल्या वेळी अडीच लाख मताधिक्याने आणि दुसऱ्यांदा साडेतीन मताधिक्याने लोकांनी मला निवडून दिले आहे त्यामुळे मी घरात बसायचं कुठे ? कुठे नाही ? ते मला कळतं. आज पर्यंत एकनाथ शिंदे यांची खुर्ची दिसत होती आता माझी पण खुर्ची दिसत आहे असा टोलाही लगावला.

एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात अनेक कामं झाली. आनंद दिघेनंतर शिवसैनिकांना आधार देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनीच केलं. शिवसेना वाढविण्याचं काम केलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदुहृदयसम्राटचं वंदनीय बाळासाहेब ठाकरे झालं, ठाकरे सरकार हिंदुत्व विसरल्याची टीका देखील श्रीकांत शिंदे यांनी करत दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

पोलीस चौकीतच २० हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पोलीस नाईकाला पकडले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पोलीस चौकीतच रंगेहात लाच घेताना एका पोलीस नाईकाला पकडले आहे. ही घटना मुंबई-नाशिक महार्गावरील भिवंडी तालुक्यातील तळवली नाका पोलीस चौकी जवळच घडली आहे. भरत शरद जगदाळे असे अटक केलेल्या लाचखोर पोलीस नाईकाचे नाव आहे. २० हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पोलीस चौकीतच रंगेहात या लाचखोर पोलीस नाईकाला पकडण्याची कारवाई केली. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून लाचखोर पोलीसाला बेड्या ठोकल्या गेल्या आहेत. पोलीस नाईक भरत शरद जगदाळे असे अटक केलेल्या लाचखोर पोलीस नाईकाचे नाव आहे.

लाचखोर भरत शरद जगदाळे हा पडघा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत आहे. तो मुंबई-नाशिक महामार्गवरील तळवली नाका पोलीस चौकीत ड्युटीवर कार्यरत होता. त्याने २१ सप्टेंबर रोजी तक्रारदार यांना त्यांच्या ताब्यातील वाहनावर कारवाई न करण्यासाठी व त्यांचा वाहतुकीचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी ३० हजार रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले होते. या संदर्भात तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाच्या पथकाने २२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस चौकी नजीक सापळा रचला होता.

पहाटे अडीचच्या सुमारास तक्रारदार यांच्याकडून तळवली नाका पोलीस चौकीजवळ पंचांसमक्ष लाचखोर भरत जगदाळे याने २० हजार रुपयांची लाच घेताना त्याला पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. याप्रकरणी तो कार्यरत असलेल्या पडघा पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करून त्याला कोठडीत ठेवले आहे व पुढील तपास सुरू आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

प्रख्यात कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी आज वयाच्या ५८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांचे आज सकाळी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांचं निधन झालं. गेल्या ४० दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. जिममध्ये वर्कआउट करताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांची मोठी टीम त्यांच्यावर उपचार करत होती पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि अखेर आज राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालवली.

राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. या राजू श्रीवास्तव याला प्रथम आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. हिंदी सिनेसृष्टीत अनेक वर्षे प्रेक्षकांना ‘गजोदर भैय्या’ बनून हसवणाऱ्या या अभिनेत्याचे आज निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर राजू श्रीवास्तव यांना वाचवू शकले नाहीत, अखेर त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. राजू श्रीवास्तव यांनी आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली. आता त्यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

 

शिंदे गट-शिवसेनेचा कलगीतुरा रंगणार; दसरा मेळाव्यावरून ‘महाभारत’ सुरु..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे विरुद्ध दंड थोपटले असून दोन्ही नेते दसरा मेळावा मुद्द्यावरून माघार घ्यायला तयार नाहीत. सध्या दसरा मेळावा कुणी घ्यायचा? नेमका हा वाद उच्चन्यायालयाच्या दरबारी पोहचला असून उद्या यावर सुनावणी होणार आहे. यावरच अधूनमधून दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर शरसंधान सोडताना दिसत आहे त्यामुळे वातावरण कमालीचे तापलेले आहे. युवासेनेचे शरद कोळी यांनी येत्या दसऱ्याला शिवसेनेला शिवतीर्थ न मिळाल्यास रामायण महाभारत घडून येईल, असे भाष्य केले आहे. त्यामुळे नेमका हा मुद्दा कुठल्या वळणावर जात आहे, याचा अंदाज लावता येतो.

सध्या शिंदे गटाला बीकेसी मध्ये असलेले एमएमआरडीएचे मैदान मिळाले असून, उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याला एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावरच घेण्यात येईल जर इथे सील लावले गेले तर ते तोडून टाकण्यात येईल अशी धमकीवजा सूचनाच दिली आहे. दरवर्षी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून शिवसेनाप्रेमी व कार्यकर्ते दसरा मेळाव्याकरिता शिवाजी पार्कवर लाखोंच्या संख्येत एकत्र येत असतात त्यामुळे यंदा दसरा मेळावा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसत आहे.

चंद्रकांत खैरे यांच्या प्रतिक्रियेवर शिंदे गटाचे नेते व राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्रमक पवित्रा घेत त्याच शैलीत उत्तर दिले आहे, यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले की तोडफोड व घुसखोरी करत सभा घेतल्या जात नसतात त्यामुळे जर कोणी असा प्रयत्न करेल तर राज्यातील सुरक्षा यंत्रणा त्यांना रोखण्याकरिता सज्ज असेल. दरम्यान दसरा मेळावा मुद्द्यावरून रामायण महाभारताची भाषा करणारे शरद कोळी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. सध्याचे चित्र बघता दोन्ही गट आक्रमक असल्याने राडा सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर राज्याच्या शांतता व सुव्यवस्थेची प्रमुख जबाबदारी असल्याने ते शेवटी नरमाईचे धोरण अवलंबतील हे देखील सत्य आहे.