Home Blog Page 113

पत्राचाळ घोटाळा आरोपांवर शरद पवारांचं सरकारला आव्हान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करायची असेल तर लवकरात लवकर करा. पण, जर आरोप खोटे ठरले तर काय कराल हे ही सरकारने स्पष्ट करावं असं म्हणत पत्राचाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला आव्हान देत प्रतिक्रिया दिली. पत्राचाळ घोटाळा नवीन खुलासे होत असतानाच ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे नसून पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांच नाव अतुल भातखळकर यांनी घेतलं होतं. तसेच यासंबधी एका ट्वीटमध्ये पत्राचाळ प्रकरणी ‘राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी व्हावी, ईडी च्या आरोपपत्रात हे नाव आहे. वन अँड ओंली वन शरद पवार. याप्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी,’ असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं होतं.

मुंबई, पाटणा आणि दिल्ली येथे ६५.४६ किलो सोने जप्त करत महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जप्तीच्या कारवाईतील सातत्य कायम ठेवत सुमारे ६५.४६ किलो वजनाची आणि अंदाजे ३३.४० कोटी रुपये किमतीची, मूळ परदेशी सोन्याची ३९४ बिस्किटे जप्त केली आहेत. ईशान्येकडून त्याची तस्करी होत होती.

मिझोराममधून विदेशी मूळ सोन्याची तस्करी करण्याचा आणि त्यासाठी देशांतर्गत कुरिअर पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक कंपनीचा वापर करण्याची योजना एक टोळी आखत आहे, अशी खबर डीआरआयला मिळाली होती.

तस्करी रोखण्यासाठी डीआरआयद्वारे ‘ऑपरेशन गोल्ड रश’ ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मुंबईला नेल्या जाणारा, ‘वैयक्तिक वस्तू’ घोषित केलेल्या विशिष्ट माल अडवण्यात आला. १९.०९.२०२२ रोजी भिवंडी (महाराष्ट्र) येथे तपासणी केली असता सुमारे १९.९३ किलो वजनाच्या आणि सुमारे १०.१८ कोटी रुपये मूल्याच्या विदेशी मूळ सोन्याच्या बिस्किटांचे १२० नग जप्त करण्यात आले.

पुढील विश्लेषण आणि तपासणीत असे दिसून आले की इतर २ वेळा त्याच एका व्यक्तीने त्याच लॉजिस्टिक कंपनीद्वारे त्याच ठिकाणाहून माल मुंबईला पाठवला आहे. पण यावेळी लोकेशन ट्रेस करण्यात आले.

मालाची दुसरी खेप बिहारमध्ये अडवली गेली. लॉजिस्टिक कंपनीच्या गोदमामध्ये तपासणी केल्यावर, सुमारे २८.५७ किलो वजनाची आणि सुमारे १४.५० कोटी रुपयांची, १७२ विदेशी मूळ सोन्याची बिस्किटे सापडली. त्याचप्रमाणे, तिसऱ्यांदा लॉजिस्टिक कंपनीच्या दिल्ली हबमध्ये माल अडवण्यात आला आणि त्याची तपासणी करण्यात आली असता सुमारे १६.९६ किलो वजनाचे आणि ८.६९ कोटी रुपये किमतीचे विदेशी मूळ सोन्याच्या बिस्किटाचे १०२ नग जप्त करण्यात आले.

तपासांच्या या मालिकेमुळे ईशान्येकडील भागातून आणि लॉजिस्टिक कंपनीच्या देशांतर्गत कुरिअर मार्गाने परदेशी मूळ सोन्याची भारतात तस्करी करण्याची विशेष नवीन पद्धत शोधण्यात मदत झाली आहे. तस्करीच्या वेगळ्या आणि अत्याधुनिक पद्धती शोधण्याची आणि त्यांचा सामना करण्याची डीआरआयची क्षमता अशा मोहिमांमुळे वृद्धिंगत होते. सुमारे ६५.४६ किलो वजनाचे आणि अंदाजे ३३.४० कोटी रुपये किमतीचे एकूण ३९४ विदेशी मूळ सोन्याची बिस्किटे या अनेक शहरांत राबवलेल्या मोहिमे अंतर्गत जप्त करण्यात आले व डीआरआयचा पुढील तपास सुरू आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले गेले.

 

जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार- २०२२ सोहळा लातूर येथे संपन्न!

लातूर, प्रतिनिधी: जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभियंता, सर्व अभियांत्रिकी विभाग (जिल्हा लातुर) पुरस्कार- २०२२ सोहळा कार्निव्हल रिसॉर्ट, लातूर येथे मोठया थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक अभियंत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. (भा.प्र.से.), पोलीस अधीक्षक निखील पिंगळे (भा.पो.से.), लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल (भा.प्र.से.), लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल (भा.प्र.से.) उपस्थित होते.

तर याच कार्यक्रमात महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता सलिम शेख, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, लातुरचे अधिक्षक अभियंता व प्रशासक अभिजीत म्हेत्रे, बीड पाटबंधारे प्रकल्प, मंडळ परळी(वै.)चे अधिक्षक अभियंता ईलियास चिस्ती आणि लातूर जिल्ह्यातील सर्व विभागाचे कार्यकारी अभियंता यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्निव्हल रिसाॅर्ट, लातुर येथे आयोजित या भव्य कार्यक्रमात लातूरचे सुपुत्र व पंचायत समिती, निलंगाचे शाखा अभियंता ए. आर. मौजन यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार- २०२२ प्रदान करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.

निलंगा विभागाचे शाखा अभियंता ए. आर. मौजन यांना 2022 वर्षाचे ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

३ मोटरसायकल व १ रिक्षा चोरणाऱ्या चोरट्याला शिताफीने अटक करत बाजारपेठ पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कामगिरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १९.०९.२०२३ रोजी एपीएमसी मार्केट गोविंदवाडी रोड, कल्याण येथे एक जण चोरीची मोटार सायकल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त बातमी बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली. सदरची माहिती ताबडतोब वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.नरेंद्र पाटील यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी मार्केट कल्याण येथे डिटेक्शन इन्चार्ज सपोनि श्री. घोलप यांनी डीबी पथकासह त्या ठिकाणी सापळा रचला.

बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार आलम अनिस शेख नामक संशयित आरोपी इसमास त्याच्याकडे असलेल्या चोरीची जुपिटर मोटरसायकलसह त्याला पळून जाण्याचा वाव न देता डिटेक्शन पथकाने मोठे शिताफीने ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखवत त्याच्याकडे कसून तपास केल्यानंतर तपासात त्याच्याकडून खालील चोरीच्या गाड्या मिळून आल्या

१) बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १९८/२२ भादंवि कलम ३७९, ३४ मधील चोरीस गेलेली ज्युपिटर मोटर सायकल
२) महात्मा फुले पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४५०/२२ भादंवि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली पॅशन-प्रो मोटर सायकल
३) खडकपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २५७/२२ भादंवी ३७९ या गुन्ह्यातील चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल
४) एक रिक्षा क्र. एमएच ०५ सीपी १३२४

अशा एकूण ३ मोटर सायकल व १ रिक्षा ज्याची अंदाजे किंमत ९२,०००/- रुपये चा मुद्देमाल सदर चोरट्या कडून हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पावशे करीत आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकरी भूमीपुत्रांचे बेमुदत धरणे आंदोलन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

भिवंडी-कल्याण-शीळफाटा राज्य महामार्ग क्रमांक – ४० या रस्त्याच्या सहापदरी रोड रुंदीकरणात बाधित शेतकरी भूमिपुत्र जागा मालकांना योग्य तो रोख स्वरूपातील मोबदला मिळावा आणि महाराष्ट्र शासनाला जागृत करण्यासाठी ‘सर्व पक्षीय युवा मोर्चा’चा बेमुदत धरणे आंदोलन लढा मंगळवारपासून सुरू झाला आहे. रस्ता बाधित शेतकरी भूमीपुत्रांच्या या आंदोलनाची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावी अशी मागणी यावेळी उपस्थित पत्रकारांसमोर करण्यात आली.

डोंबिवलीतील ग्रामीण विभागातील ग्रामस्थ गजानन पाटील आणि गणेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा बेमुदत धरणे आंदोलन लढा सुरू झाला आहे. गावागावातील रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांनी या बेमुदत धरणे आंदोलन लढ्याला उस्फुर्तपणे समर्थन देत या बेमुदत साखळी धरणे आंदोलनात सहभागी होऊन ग्रामस्थांना अद्याप रोख स्वरूपातील मोबदला न मिळाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.

यावेळी सरकारच्या विरोधात आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर आणि दुर्लक्षित कारभारावर सडकून टीका आंदोलनकर्ते करत आहेत. प्रशासनाच्या दंडेलशाही विरोधात घोषणा व नारे देत या प्रकल्पातील बाधित शेतकरी भूमिपुत्रांना न्याय हा मिळालाच पाहिजे व यासाठी कितीही वेळकाळ लागला तरी मागे हटणार नाही असा पावित्रा घेत मंगळवारपासून बाधित शेतकरी भूमिपुत्र ग्रामस्थांनी कल्याण-शीळ रोडवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

मंगळवारी सकाळपासून सुमारे ४०० बाधित भूमिपुत्र या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झाले असून काटई गाव, कल्याण शीळ रोडवर काटई जकात नाक्याजवळील मोकळ्या जागेत मोठा मंडप टाकून आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागणीसाठी ठिय्या मांडला आहे. या साखळी बेमुदत धरणे आंदोलनात शासनाच्या नियमानुसार रस्त्यातील बाधित शेतकरी भूमिपुत्रांना रोख स्वरूपातील मोबदला मिळाला नाही तर कुटुंबासह रस्त्यावर उतरून ‘रास्ता रोको’ करत उग्र आंदोलन करून सर्व कुटुंबासह जेल भरून गेले तरी चालेल यासाठी आम्ही जामीन घेणार नाही आणि सरकारी जेलमध्येच राहू अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतल्याचा इशारा या वेळी बाधित शेतकरी भूमिपुत्र ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनकर्ते गजानन पाटील आणि गणेश म्हात्रे यांच्या वतीने सरकारला देण्यात आला.