Home Blog Page 121

कच्च्या तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घट तर भारतात मात्र दर स्थिर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाली असली तरी देशातील महाराष्ट्र आणि मेघालय वगळता इतर राज्यांत तब्बल साडेतीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले मात्र किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजापेठेत कच्च्या तेलाच्या दरांत कमालीची घसरण झाली असली तरी भारतात मात्र दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. ८ फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच ९० डॉलर प्रति बॅरल उतरल्या असून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट दिसून येत आहे. ५ सप्टेंबर रोजी ‘ओपेक’ कडून मागणीतील घट आणि मंदीच्या भीतीनं ऑक्टोबरपासून १ लाख बॅरल प्रति दिवस उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलाचे भाव स्थिर करण्याचा ‘ओपेक’चा प्रयत्न सुरु असला तरी कच्च्या तेलाच्या दरांत मोठी अस्थिरता आहे. ‘ओपेक’च्या निर्णयानंतर तेलाच्या किंमतीने उच्चांक गाठला. मात्र मागणीतच घट झाल्याने पुन्हा किंमती अस्थिर झाल्या. दरम्यान, ‘ओपेक’ कडून तेलाच्या दरांत मोठी वाढ झाल्यास त्याचा परिणाम थेट भारतावर होणार आहे.

महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न भारताकडून सुरु असून अशातच तेलाच्या दरांत मोठी वाढ झाली तर संपूर्ण प्रयत्न वाया जाणार आहेत. संपूर्ण जगात सध्या महागाईनं डोके वर काढले असून गॅसच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. अमेरिकेतही गॅसचे दर १३० टक्क्यांनी वाढले आहेत. तर युरोपात १२० टक्क्यांनी उंचावले आहेत. रशियाच्या ऊर्जा साठवणुकीस कॅप लावण्याचा विचार आहे. ज्यामुळे जागतिक स्तरावरील ऊर्जेचे दर वाढू शकतात. याचाही ज्याचा थेट परिणाम भारतावर होणार आहे.

देशातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने अधिकृत रित्या जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर तर दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

संजय राऊत, अनिल परब यांच्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांचा ‘हा’ नेता भाजपच्या रडारवर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

याकुब मेमनच्या समाधीच्या सजावटीवरून सध्या राज्यात राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेमनचा उदात्तीकरण झाले म्हणून मेमनने माफी मागावी, असे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे मत आहे, तर विरोधी पक्षनेत्यांनी भाजपला विचारले आहे की, मेमनचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे का सोपवला? याप्रकरणी महापालिका आयुक्तांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

याकुबला शहीद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालिका अभियंता आणि विश्वस्तांवर कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे ते म्हणाले. त्याचवेळी शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर हे महापालिकेतील माफिया कंत्राटदार असल्याचा आरोप त्यांनी केला. “जोगेश्वरीतील महाकाली लेणीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी वायकर यांनी अविनाश भोसले या बिल्डरला ५०० कोटी रुपये दिले. हा घोटाळा २०२० मध्ये झाला आणि या घोटाळ्यातील आरोपी अविनाश भोसलेही तुरुंगात आहेत.” असा आरोप सोमय्या यांनी केला.

शिवसेनाप्रमुखांचे उजवे हात असलेले संजय राऊत हेही पत्रव्यवहार प्रकरणात अटकेत आहेत. त्यांचा दुसरा हात अनिल परब हे सुद्धा त्याच मार्गावर आहे. त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल असून ते लवकरच तुरुंगातही जाणार आहेत. रवींद्र वायकर उद्धव ठाकरे यांचा तिसरा हात आहे. जोगेश्वरी येथे महाकाली गुफा रस्त्याच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून त्याचाही लवकरच नंबर येईल, असंही सोमय्या म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यानंतर शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यावर भाजपकडून निशाणा साधला जात आहे. त्याचवेळी अनिल परभी लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांवर कारवाई झाल्यानंतर आता रवींद्र वायकर यांच्यावर कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

बँकांमध्ये मुदत ठेवीकरिता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी चढाओढ करत व्याजदरात घसघशीत वाढ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महागाईचा जोर कमी होत नसल्याने देशातील मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने विविध उपाययोजना केल्या आहे, यानुसार व्याजदरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. सध्याही महागाई सतत डोके वर काढत असल्याने लवकरच आरबीआय व्याजदरात अजून वाढ करणार असल्याचे वृत्त आहे. परंतु इथे कर्ज मागणाऱ्यांमध्ये देखील वाढ झाल्याने मुदत ठेवींची संख्या वाढविण्यासाठी विविध बँकांमध्ये चढाओढ लागल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

दीर्घ काळाच्या मुदत ठेवींकरिता सहसा ग्राहक पुढे धजावत नाही याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक परिस्थितीच्या बदलांचा विपरीत परिणाम बँकांच्या व्याजदरांवर होणार अशी भीती ग्राहकांच्या मनात आहे. सध्याचे कर्जाचे व्याजदर बघता कर्ज घेण्यापेक्षा मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार आहे. याकरिता अनेक बँकांनी कंबर कसली असून ‘फ्लोटिंग एफडी’चा पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये आरबीआयच्या रेपो दराप्रमाणे ठेवींवर व्याजदर देण्याची शाश्वती ग्राहकांना दिली जाते. सोबतच काही बँक एफडीवर १.६ टक्के व्याजदर जोडून देत आहे.

ग्राहकांना बचत करण्यास प्रवृत्त करणे तसेच आकर्षक परतावा देण्याचा विचार देखील यामागे असून आर्थिक तज्ज्ञ गुंतवणूक करण्यावर विशेष भर देण्याचा सल्ला देत आहे. सध्या ‘फ्लोटिंग एफडी’चा मध्यम मार्ग सुलभ आहे ज्यामध्ये कुठल्याही कागदपत्रांशिवाय गुंतवणुकीचा पर्याय मिळतो, परंतु याची दुसरी बाजू बघता रेपो रेट कमी झाल्यास ग्राहकांना परतावा देखील कमी मिळणार आहे. यामुळे मुदत ठेवींबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.

आयुक्त दिलीप ढोलेंच्या अध्यक्षतेखाली मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मलनि:सारण विभागाची आढावा बैठक संपन्न!

मिरा भाईंदर: दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली मलनि:सारण विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस मलनि:सारण विभागाचे उप-अभियंता अरविंद पाटील, दिपक जाधव, प्रफुल्ल वानखेडे आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते.

शहरातील सर्व मलनि:सारण केंद्राची माहिती, सद्यस्थितीतील परिस्थिती आणि पावसाळ्यानंतर सुरु करावयाची कामे याबाबतचा आढावा घेण्यासोबतच मलनि:सारण केंद्रातील भविष्यात करावयाच्या कामाची माहिती कार्यकारी अभियंता यांनी घेतली.

सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज मधील असणाऱ्या विविध संकल्पना, विविध उपक्रम आणि त्या अनुषंगाने मलनि:सारण केंद्रामध्ये करावयाची कामांच्या दृष्टीने संबंधितांना तात्काळ सुचना देऊन पुढील आठवड्यात सर्व मलनि:सारण केंद्राचा पाहणी दौरा आयोजित करणार असून त्यावेळी सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.

महानगरपालिकेचे सद्यस्थितीतील सफाईमित्र सुरक्षा स्पर्धेत स्थान उंचावण्यासाठी मलनि:सारण विभाग, आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य यशस्वी पुर्ण करेल असे कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर यांनी सांगितले.

मालकही भाड्याने दिलेल्या घरात घडणाऱ्या गुन्ह्यासाठी तितकाच जबाबदार – उच्च न्यायालय


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात एखाद्या व्यक्तिला घरं भाड्याने दिल्यानंतर तिथे घडणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांची जबाबदारी मालक झटकू शकत नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील घरमालकाला दिलासा देण्यास नकार दिला आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये पुण्यातील वाकड परिसरात एका घरावर पोलीसांनी धाड टाकली होती. या घरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार नकली गिऱ्हाईक बनून पोलीसांनी छापेमारी केली होती. या धाडीत सापडलेल्यांना अटक करण्यात आली होती आणि तिथे आढळलेली रोख रक्कमही जप्त करण्यात आली होती.

या प्रकरणी मूळ घरमालक याच्या विरोधातही पोलीसांनी कारवाई केली होती. ही कारवाई चुकीची असून आपल्या विरोधातील कारवाई थांबवण्यात यावी यासाठी घरमालकाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याने केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

या सुनावणीवेळी याचिका कर्त्या घरमालकाकडून आपण निर्दोष असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. आपल्या अशिलाने ते घर भाड्याने दिलं होतं. त्या घरात सुरू असलेल्या कोणत्याही गैरकृत्याबाबत त्याला माहिती नव्हती. तसेच, या कारवाईनंतर त्याने ‘लिव्ह अँड लायसन्स’ करार रद्द करून त्या जागेचा ताबा घेतला असून घरमालक यातील कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी नव्हता. त्यामुळे त्याच्या विरोधातील कारवाई थांबवण्यात यावी अशी विनंती घरमालकाच्या वकिलाने युक्तिवादात केली.

हा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला. याचिकाकर्ती व्यक्ती ही त्या घराची मालक आहे, जिथे अशी बेकायदेशीर कृत्यं सुरू होती. एखाद्याला ‘लिव्ह अँड लायसन्स’ करारावर घर भाड्याने देण्याचा अर्थ त्या जागेचा संपूर्ण ताबा देणं असा नसतो. आपल्या घरात हे प्रकार सुरू असल्याची जराही कल्पना घरमालकाला नव्हती, या मुद्द्यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे. फक्त त्या जागेचा थेट ताबा त्यावेळी मालकाकडे नव्हता, म्हणून तो निर्दोष आहे, असं म्हणता येणार नाही, असं न्यायालयाने यावेळी स्पष्ट करत घरमालकाला दिलासा देण्यास नकार दिला आणि त्याची याचिका फेटाळून लावली आहे.