Home Blog Page 127

दीड लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला मोफत एसटी प्रवासाचा लाभ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याच्या घोषणेनंतर ज्येष्ठांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.

गेल्या चार दिवसांत २६ ते २९ ऑगस्ट २०२२ दरम्यान राज्यभरातून सुमारे १ लाख ५१ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. राज्य सरकारच्या घोषणेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

राज्य शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. २५ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ झाला होता. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा २६ ऑगस्ट पासून मोफत प्रवासाला सुरुवात झाली होती. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले असून या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.

या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत राज्यभरात १ लाख ५१ हजार ५५२ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे, असे श्री.चन्ने म्हणाले.

दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाकडे ३४ लाख ८८ हजार ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १४ लाख ६९ हजार आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

‘एलआयसी’ ची ‘जीवन शांती’ विमा पॉलिसी देईल वृद्धापकाळात आर्थिक प्राप्ती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी ‘एलआयसी’ वेळोवेळी लोकोपयोगी योजना आणत असते. वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी ‘एलआयसी’ने एक उत्तम योजना आणली आहे. या योजनेत गुंतवणूक करून वृद्धापकाळाचा खर्च सांभाळणे सहज शक्य आहे. या योजनेचे नाव ‘जीवन शांती पॉलिसी’ असे आहे.

जीवन शांती योजना

‘जीवन शांती’ पॉलिसी ही ‘एलआयसी’च्या जुन्या जीवन लक्ष्य योजनेसारखीच आहे. यामध्ये तुम्हाला दोन पर्याय मिळतात. पहिली तात्काळ वार्षिकी आणि दुसरी स्थगित वार्षिकी. ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. पेन्शनची सुविधा पहिल्या म्हणजेच तात्काळ वार्षिकी अंतर्गत पॉलिसी घेतल्यानंतर लगेच सुरू होते. त्याच सेकंदात म्हणजे डिफर्ड ऍन्युइटी, पॉलिसी घेतल्यानंतर ५, १०, १५, २० वर्षांनी पेन्शन सुविधा उपलब्ध आहे. आपण इच्छित असल्यास, आपण आपली पेन्शन त्वरित सुरू करू शकता.

अशी असेल पेन्शन

जीवन शांती पॉलिसी अंतर्गत पेन्शनची रक्कम निश्चित नाही, तुम्हाला तुमची गुंतवणूक, वय आणि स्थगिती कालावधीनुसार पेन्शन मिळेल. लक्षात घ्या की गुंतवणूक आणि पेन्शन सुरू होण्याच्या दरम्यानचा कालावधी जितका जास्त असेल तितकी जास्त तुम्हाला पेन्शन मिळेल. तुमच्या गुंतवणुकीच्या टक्केवारीनुसार ‘एलआयसी’ तुम्हाला पेन्शन देते.

कोणाला होईल फायदा ?

‘एलआयसी जीवन शांती: योजनेचा लाभ किमान ३० वर्षे आणि कमाल ८५ वर्षे वयाच्या व्यक्तींना मिळू शकतो. याशिवाय पेन्शन सुरू झाल्यापासून एक वर्षानंतर या योजनेत कर्ज घेता येते. जर तुम्हाला पॉलिसी सरेंडर करायची असेल, तर तुम्ही ती ३ महिन्यांनंतर करू शकता

 

परिसरातील नागरिकांचे आरोग्य ‘ट्विन टॉवर’च्या धुळीने धोक्यात..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रविवारी बहुचर्चीत ‘ट्विन टॉवर’ इमारत भुईसपाट झाली. हे टॉवर पाडण्यासाठी साढे ३ हजार किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचे आणि या टॉवरचा मलबा हटविण्यासाठीच तीन महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे ‘डिस्ट्रॉलेशन फर्म एडिफिस इंजिनिअरिंग’ च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे टॉवर पाडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट निर्माण झाले होते, आणि ही धूळ मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे. धुळीमुळे परिसरातील नागरिक श्वसनाच्या रोगांना बळी पडण्याची शक्यता वाढली आहे.

दम्याचा त्रास उदभवू शकतो

या परिसरातील ज्या नागरिकांना दम्याचा त्रास आहे त्यांची आणखी काळजी घ्यावी लागणार आहे. इतकेच नव्हे तर निरोगी व्यक्तीलाही खोकला, धाप लागणे तर या प्रदूषणामुळे श्लेष्माची देखील समस्या निर्माण होऊ शकते वायू प्रदूषणामुळेही परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

बुरशीजन्य संसर्गात वाढ

ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना धुळीमुळे दम्याचा त्रास तर होतोच पण श्वसनांच्या आजाराबरोबर त्यांना बुरशी जन्य संसर्ग देखील होण्याची शक्यता आहे. बुरशीचा संसर्ग प्रामुख्याने फुफ्फुसांवर होतो, बुरशीच्या बीजाणूंचा श्वास घेतल्यामुळे छातीत दुखणे, खोकला, डोकेदुखी, भूक न लागणे, श्वास लागणे, सांधे आणि स्नायू दुखणे, थंडी वाजणे असे विकार उद्भवतात.

यावर उपाययोजना काय ?

धुळीच्या त्रासापासून स्वत:ला दूर ठेवायचे असेल तर, आता ‘ट्विन टॉवर’ च्या परिसरापासून काही दिवस दूर राहणे गरजेचे आहे. शिवाय त्या इमारतीपासून जवळपास असणाऱ्या नागरिकांनी कायम आपल्या घराची दारे-खिडक्या ही बंद ठेवणे गरजेचे आहे. आवश्यक असेल तेव्हाच खिडक्या आणि दारे उघडावीत असा सल्लाही सभोवतालच्या रहिवाश्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर देण्यात आला आहे.

 

जम्मू-काश्मीरमधील ६४ नेते राजीनामे देत काँग्रेसला पाडलं मोठं खिंडार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शुक्रवारी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील ६४ नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला पुन्हा मोठं खिंडार पडलं आहे. तब्बल ५० वर्षांचा प्रदीर्घ काळ काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. राहुल गांधींनी काँग्रेसची संपूर्ण सल्लागार यंत्रणा उध्वस्त केल्याचा आरोप करीत ते पक्षातून बाहेर पडले.

आता त्याच्यापाठोपाठ माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह माजी मंत्री माजीद वाणी, डॉ. मनोहर लाल शर्मा, चौधरी घारू राम, माजी आमदार ठाकूर बलवान सिंह आणि माजी सरचिटणीस विनोद मिश्रा यांनीही काँग्रेसला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे. या सर्व ६४ नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असून सर्वांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे एकत्रित राजीनामे सादर केले आहेत.

गुलाम नबी आझाद लवकरच जम्मू-काश्मीरमधून राष्ट्रीय पातळीवरील पक्ष सुरू करणार आहेत. अनेक माजी मंत्री आणि आमदारांसह अनेक प्रमुख काँग्रेस नेते, पंचायती राज संस्थेचे (पीआरआय) शेकडो सदस्य, नगरपालिका नगरसेवक आणि जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरील नेत्यांनी आधीच काँग्रेस सोडून आझाद यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

१७ ऑक्टोबर २०२२ ला ‘काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष’ पदासाठी निवडणूक होणार आहे, परंतु सर्वच मोठ्या चेहऱ्यांनी काँग्रेसकडे पाठ फिरवल्याने पक्षाची ची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. अंतर्गत कलहामुळे काँग्रेस रसातळाला जातांना दिसत आहे याचा खेद वाटत आहे.

 

मुंबई मेट्रो-३ कुलाबा-वांद्रे-सीप्झ कॉरिडोर ट्रेनच्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा शुभारंभ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने लाईफ लाईन ठरणारा मेट्रो- ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने कुलाबा-वांद्रे-सीप्झ कॉरिडोर (एक्वा लाईन) मुंबई मेट्रो-३ च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारीपुत नगर, आरे कॉलनी येथे झाला. यावेळी आमदार दिलीप लांडे, अतुल भातखळकर, जपान सरकारचे डेप्युटी कौन्सुल जनरल तोशीहिरो कानेको, मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य सरकार सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या कामांना प्राधान्य देत आहे. मेट्रो-३ च्या पूर्णत्वानंतर सुमारे १७ लाख प्रवासी प्रवास करू शकणार असून यामुळे रस्त्यावरील सुमारे सात लाख खासगी वाहनांची संख्या कमी होईल. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच ध्वनी आणि वायू प्रदूषणदेखील कमी होईल. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होईल.

ज्या राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम असते, तेथील नागरिक त्याचा वापर करतात, पर्यायाने रस्त्यावरील खाजगी वाहतूक कमी होते असे सांगून ‘बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ हा सुद्धा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

या प्रकल्पामुळे नागपूर ते मुंबईपर्यंतच्या अनेक जिल्ह्यांना लाभ होणार असून लवकरच या मार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जनहिताच्या प्रत्येक प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या पाठीशी असून राज्य आणि केंद्र सरकार मिळून विविध महत्त्वाचे प्रकल्प गतीने पूर्ण करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. मेट्रो-३ च्या यशस्वी चाचणीसाठी त्यांनी श्रीमती अश्विनी भिडे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, मुंबई मेट्रो-३ ही मुंबईची महत्त्वाची लाईफ लाईन बनणार आहे. या प्रकल्पाची महत्त्वपूर्ण चाचणी आज यशस्वी झाली आहे. या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. या मेट्रोमुळे रस्त्यावरील खाजगी वाहतूक कमी होणार असल्याने सुमारे २.३० लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. जी झाडे तोडावी लागली, त्यांनी जितके कार्बन शोषून घेतले असते, मेट्रोमुळे केवळ ८० दिवसात तेवढे कमी उत्सर्जन होईल, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. हरित लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाने सर्व घटकांचा परामर्श घेऊन या प्रकल्पाला परवानगी दिली असल्याने पर्यावरणाचा विचार करूनच मुंबईच्या हितासाठी जो निर्णय घेणे आवश्यक होते, ते निर्णय शासनाने घेतल्याचे ते म्हणाले. या मेट्रो लाईनमुळे मुंबईतील प्रवाशांना मोठा लाभ होणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर आत्मीय समाधान लाभेल, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी प्रास्ताविकाद्वारे मेट्रो-३ ची वैशिष्टे सांगून डिसेंबर २०२३ पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

मुंबई मेट्रो-३ (कुलाबा- बांद्रा-सीप्झ कॉरिडॉर) लाईन ची ठळक वैशिष्ट्ये

* मुंबई मेट्रो लाईन-३ च्या ट्रेन ८ डब्यांच्या असतील. ७५% मोटोरायझेशन मुळे गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील.

* रि-जनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे ३० टक्के विद्युत उर्जेची बचत होईल आणि चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज कमी होईल.

* एका गाडीतून अंदाजे २४०० प्रवासी प्रवास करू शकतील.

* ८५ किमी प्रतितास अशा प्रत्यक्षातील प्रचालन वेगामुळे प्रवाशांचा एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होईल.

* स्टेनलेस स्टीलच्या वापरामुळे मेट्रोचे डबे किमान ३५ वर्षे टिकू शकतील.

* ट्रेन प्रचालनासाठी चालक विरहित प्रणाली स्वीकारली असून अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) च्या सिग्नल व्यवस्थेमुळे १२० सेकंदाची फ्रीक्वेन्सी ठेवणे शक्य होणार आहे.

* प्रवाशांच्या सुलभतेसाठी डब्याच्या प्रत्येक बाजूला चार दरवाजे असतील.

* स्वयंचलित प्रकाश नियंत्रण वैशिष्ट्यासह अद्ययावत वीज प्रणाली ऊर्जेचा वापर कमी करण्यास मदत करेल.

* ट्रेनच्या छतावर स्थित व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी (व्हीव्हीव्हीएफ) प्रणालीद्वारे वातानुकूलन यंत्रणेचे नियंत्रण केल्याने ४ ते ५ टक्के ऊर्जा बचत होईल.

* डब्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणेअंतर्गत कार्बन डायऑक्साइड आणि आर्द्रतेसाठी स्वयंचलित नियंत्रण प्रणाली असल्याने सर्व हवामान परिस्थितीमध्ये प्रवाशांना उत्तम आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल.

रोलिंग स्टॉक आणि ट्रॅक या दोन्हीच्या डिझाइनची योग्यता सिद्ध करून आवश्यतेप्रमाणे पुढील नवीन तांत्रिक सुधारणा अंमलात आणता याव्यात म्हणून ‘मुंबई मेट्रो लाइन-३’ या संपूर्ण भूमिगत मार्गिकेवर आज ट्रेन चाचणी करण्यात आली. सेवा चाचण्यांचे नियोजन लाईन-३ साठी डेपो सुविधेसोबत आवश्यक संख्येने ट्रेन संच उपलब्ध झाल्यानंतर केले जाईल.