Home Blog Page 131

भारताच्या स्वदेशी विकसित पहिल्या हायड्रोजन इंधन सेल बसचे पुण्यात उद्घाटन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुण्यात केपीआयटी तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद ने विकसित केलेली भारताच्या खऱ्या अर्थाने स्वदेशी बनावटीच्या, पहिल्या हायड्रोजन फ्युएल सेल बसचे उद्घाटन केले. डॉ. जितेंद्र सिंह यांनी उपस्थितांना सांगितले की, आत्मनिर्भर म्हणजे परवडण्याजोगी आणि सहजपणे उपलब्ध स्वच्छ ऊर्जा, हवामान बदलाची उद्दिष्टे साध्य करणे, नवीन उद्योजक आणि नोकऱ्या निर्माण करणे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हायड्रोजन व्हिजन भारतासाठी महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, हरित हायड्रोजन हे एक उत्कृष्ट तसेच स्वच्छ ऊर्जा निर्मिती माध्यम आहे जे रिफायनिंग उद्योग, खत उद्योग, पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग आणि अवजड व्यावसायिक वाहतूक क्षेत्रातील वायू उत्सर्जनातून निघणाऱा कार्बन कमी करण्याचे कार्य करते.

हायड्रोजन फ्युएल सेल बस

डॉ. जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की इंधन सेल हायड्रोजन आणि हवेचा वापर करून बस चालण्यासाठी आवश्यक वीज निर्माण करते आणि बसमधून बाहेर टाकला जाणारा घटक केवळ पाणी आहे, त्यामुळे ही बस पर्यावरणास अनुकूल असे वाहतुकीचे माध्यम आहे. तुलनात्मक दृष्ट्या पाहता, लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावणारी एकच डिझेल बस सर्व सामान्यरित्या वर्ष भरात १०० टन कार्बन डाय-ऑक्साईड उत्सर्जित करते आणि भारतात अशा दहा लाखांहून अधिक बस आहेत.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, इंधन सेल वाहनांची उच्च कार्यक्षमता आणि हायड्रोजनची उच्च ऊर्जा घनता हे सुनिश्चित करते की इंधन सेल ट्रक आणि बसेससाठी रुपये प्रति किलोमीटरचा परिचालन खर्च डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा कमी आहे. यामुळे भारतात मालवाहतूक क्रांती होऊ शकते. शिवाय, इंधन सेल वाहने शून्य ग्रीन-हाऊस गॅस उत्सर्जनाची देखील हमी देतात. मंत्री महोदयांनी केपीआयटी आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेच्या संयुक्त विकास प्रयत्नांचे कौतुक केले आणि भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंते यांचा तंत्रज्ञान क्षेत्रातील पराक्रम जगातील सर्वोत्कृष्ट असून कमी खर्चिक असल्याचेही निदर्शनास आणून दिले.

भारतासाठी हायड्रोजनचे महत्त्व लक्षात घेता १५ ऑगस्ट २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमे बाबत केलेल्या घोषणेची आठवण डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी करून दिली. त्यांनी भारतातील शास्त्रज्ञांना भारताच्या हायड्रोजन मोहिमेसाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित करण्याचे आवाहन केले. मंत्र्यांनी आशा व्यक्त केली की, नजीकच्या काळात हायड्रोजन इंधनाचे महत्व वाढेल कारण भारतातील मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक ही रस्ते मार्गाने होते ज्यात मोठ्या प्रमाणात अवजड व्यावसायिक वाहनांचा वापर केला जातो. डॉ. जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की, सुमारे १२-१४% कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे उत्सर्जन आणि सूक्ष्मकणांचे उत्सर्जन डिझेलवर चालणार्‍या अवजड व्यावसायिक वाहनांमधून होते आणि हे विकेंद्रित स्वरूपाचे उत्सर्जन असल्या कारणाने आहेत ते थांबवणे कठीण आहे. मंत्री म्हणाले, या क्षेत्रात हायड्रोजन इंधनावर चालणारी वाहने रस्त्यावरून होणारे उत्सर्जन दूर करण्यासाठी एक उत्कृष्ट माध्यम प्रदान करतात. ते म्हणाले, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी अंतर्देशीय जलमार्ग वाढवण्याचेही भारताचे ध्येय आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी निष्कर्ष काढला की, ही उद्दिष्टे साध्य करून, भारत जीवाश्म ऊर्जेचा निव्वळ आयातदार होण्यापासून ते स्वच्छ हायड्रोजन उर्जेचा निव्वळ निर्यातदार होण्यापर्यंत मोठी झेप घेऊ शकतो आणि अशा प्रकारे, एक प्रमुख हरित हायड्रोजन उत्पादक आणि हरित हायड्रोजन संबंधित उपकरणांचा पुरवठादार बनून हायड्रोजनच्या बाजारपेठेत भारताला जागतिक नेतृत्व प्रदान करू शकतो. नंतर, डॉ जितेंद्र सिंह यांनी (सीएसआयआर-एनसीएल) मधील बिस्फेनॉल या प्रायोगिक तत्वावर चालणाऱ्या (पायलट) सयंत्राचे उद्घाटन केले आणि सांगितले की,या नव्या संयंत्रामुळे सीएसआयआर च्या कोरोना मोहीम आणि बल्क केमिकल्स उत्सर्जन कार्यक्रमाअंतर्गत एनसीएल ने विकसित केलेल्या नवीन प्रक्रिया तंत्रज्ञानाचे यशस्वीपणे प्रात्यक्षिक केले आहे.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, बिस्फेनॉल-ए (बीपीए) हे इपॉक्सी रेजिन, पॉली कार्बोनेट आणि इतर अभियांत्रिकी प्लास्टिकच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा कच्चामाल ठरू शकते. ते म्हणाले, वर्ष २०२७ पर्यंत बिस्फेनॉल-ए ची जागतिक बाजारपेठेतली मागणी ७.१ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, २०२०-२७ या कालावधीचे विश्लेषण करता, २% ने सीएजीआर वाढेल. भारतातील एकूण अंदाजे वार्षिक मागणी १ लाख ३५ हजार टन एवढी असून आज ती आयात केली जाते. सीएसआयआर-एनसीएलच्या तंत्रज्ञानामुळे या महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या आयातीला पर्याय शक्य होईल आणि भारताच्या आत्मनिर्भर उपक्रमाला मदत होईल, अशी आशा मंत्र्यांनी व्यक्त केली.

सीएसआयआर-एनसीएल ने विकसित केलेल्या प्रक्रियेचे वेगळेपण म्हणजे स्वदेशी तंत्रज्ञानाला जागतिक मापदंडासह स्पर्धात्मक बनवणारे हे एक नवीन प्रकारचे तंत्रज्ञान आहे.

 

मिलिंद नार्वेकरांचा बंगला तुटला, आता पुढचा हातोडा अनिल परब यांच्या रिसॉर्टवर; सोमय्यांचा इशारा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईतील दहीहंडी कार्यक्रमात शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडणार असे ठणकावून सांगणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीमुळे शिवसेनेचे माजी आमदार अनिल परब यांच्यावर मोठी कारवाई होणार आहे. अनिल परब यांच्या रिसॉर्टवर केंद्र सरकारकडून कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि भाजपची सत्ता आल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना नेते अनिल परब यांचे रिसॉर्ट लवकरच पाडण्यात येईल, असं ट्विट सोमय्यांनी केलंय. मिलिंद नार्वेकरांचा बंगला तुटला, आता अनिल परबांचे रिसॉर्ट तोडणार. सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने ‘साई रिसॉर्ट’ आणि ‘सी शंख रिसॉर्ट’ पाडण्याचे अंतिम आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र सरकार आता रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना रिसॉर्ट पाडायला सांगणार. बांधकाम पाडण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. अनिल परब यांचे रिसॉर्ट बंद करण्याचा आदेश केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने जारी केला आहे. हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश महाराष्ट्र पर्यटन विभागाला मिळाले आहेत. त्यानुसार कारवाई केली जाईल. अनिल परब यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थेने उत्तन समुद्रकिनारी आपले १५० वे स्वच्छता अभियान राबविले!

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: ‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ ( www.forfutureindia.org ) ही पर्यावरण प्रेमी युवांची संस्था असून ही संस्था प्रत्येक आठवड्याला समुद्र किनारा स्वच्छ करण्याची म्हणजेच आपल्या निसर्ग सौंदर्यात भर घालण्याची मोहीम अतिशय उत्साहाने राबवत आहे. प्रत्येक आठवड्याला शनिवारी व रविवारी कोणत्या न कोणत्या समुद्र किनाऱ्यावर ( Beach Cleanups ) किंवा कांदळवन भागात साफ-सफाई करण्याचे उपक्रम राबवत आहे. आता पर्यंत या संस्थेने उत्तन, मनोरी, गोराई, वेलंकनी, जुहू, दानापाणी, खारदांडा, अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर तर भाईंदर पूर्व खाडी व भाईंदर पश्चिम खाडी येथे हा उपक्रम राबवला आहे.

रविवार दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी ‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थेने आपले १५० वे स्वच्छता अभियान उत्तन समुद्रकिनारी राबविले. यावेळी या स्वच्छता अभियानात मीरा भाईंदर येथील रॉयल कॉलेज, अभिनव कॉलेज, शंकर नारायण कॉलेज व मिरा भाईंदर महानगपालिका स्वच्छता विभाग तर प्रामुख्याने उत्तन येथील आमचा घर संस्थेतील लहान मुलांनी हातभार लावला. १६० हुन अधिक स्वयंसेवक या अभियानात सहभागी झाले होते तर सर्वांनी मिळून ३० टन हुन अधिक प्लॅस्टिक व इतर कचरा उत्तन समुद्र किनाऱ्यावरून काढला.
‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थेने गेल्या जानेवारी २०२० पासून आता पर्यंतच्या अडीच वर्षातील प्रवासात हजरो स्वयंसेवकांच्या मार्फत ७०० टनहुन अधिक प्लॅस्टिक व इतर कचरा काढत लाखो लोकांपर्यंत प्रबोधन करण्याचे कार्य केले आहे.

“मिरा भाईंदर येथील वेलंकन्नी व उत्तन समुद्र किनारी पर्यटन व मासेमारी व्यापाऱ्यांकडून तयार होणार कचरा हा दिवसेंदिवस वाढत चाला आहे यात भर म्हणजे पावसाळी काळातील भरती-आहोटी मुळे मोठ्या प्रमाणत किनारी येणारा कचरा यामुळे प्रत्येक किनारी फक्त कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. ‘हा कचरा आपण भरत असलेल्या टॅक्सच्या पैशातून पालिकेला काढायला पाहिजे किंवा स्थानिक नेतेमंडळींनी यात लक्ष देऊन स्वच्छता केली पाहिजे’ असे दुर्लक्षित नागरिकांचा विचार बनण्यापेक्षा स्वतः पुढे येऊन आपले कर्तव्य समजत युवांनी हि मोहीम सुरु केली आहे.” – हर्षद ढगे, संस्थापक/अध्यक्ष – फ़ॉर फ़्यूचर इंडिया व मीरा भाईंदर शहर – पर्यावरण दूत ( www.harshaddhage.com )

आरेचे जंगल वाचवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानासमोर “निषेध धरणे आंदोलन”..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रविवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच पर्यावरण प्रेमींचे ‘आरे जंगल’ वाचावे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर “निषेध धरणे आंदोलन” करण्यात आले. यावेळी मा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरणचे अध्यक्ष श्री. समीर वर्तक यांच्यासह ३० ते ३५ आंदोलकांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले.

ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे जंगलाची निवड करण्यात आली. दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ रोजी पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनानंतरही रात्रीच्या अंधारात हज़ारो वृक्षांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली. वृक्ष वाचविण्यासाठी आंदोलन करीत होते त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. त्यावेळी एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकार मध्ये नगरविकास मंत्री होते. सरकारतर्फे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलून आरे हे जंगल म्हणून घोषित केले. मुंबई व महाराष्ट्रातल्या पर्यावरणप्रेमी जनतेनी या निर्णयाचे स्वागत केले परंतू आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून पदग्रहण करताच आरे जंगलातील मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही ही घोषणा केली. या घोषणेमुळे मुंबई व महाराष्ट्रातील समस्त जनता व पर्यावरणप्रेमी फार नाराज झाले आहेत. पर्यावरण व हवामान ढासळत असताना अश्या तुघलकी निर्णयाच्या विरोधात आणि आरेचे जंगल वाचावे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागातर्फे हे “निषेध धरणे आंदोलन” करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या किसान सेलचे अध्यक्ष पराग पष्टे, पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्यासह प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय पाटील, प्रदेश सरचिटणीस सौ. वर्षा विजय शिखरे, अभिजित घाग, अम्मार पटेल, प्रदेश सचिव आमिर देशमुख, विलास साळवे, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष अनुक्रमे ठाणे शहर मनोज डाकवे, ठाणे ग्रामीण रामचंद्र जोशी, वसई विरार जिल्हाध्यक्ष डेरीक फुरताडो व कार्याध्यक्ष संदीप किणी, उपाध्यक्ष तारीक खान, सरचिटणीस आमिर सय्यद, कल्याण डोंबिवली – सौ. रीना खांडेकर, भिवंडी – नौशाद अन्सारी, कोल्हापूर – प्रदीप डाखरे, पनवेल – सुरेश पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते दर्शन राऊत, पवन भोईर आणि अनिल जाधव उपस्थित होते. ठाणे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस रविंद्र परटोले, शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेश धानके, राष्ट्रीय फेरीवाला संघाचे महासचिव मॅकेन्झी डाबरे, युवा संस्थेचे राजू भिसे, कामगार संघटनेचे अरनॉल्ड करवालो तसेच पर्यावरण विभागाचे अनेक कार्यकर्ते आणि असंख्य पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले होते.

 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे शाखा यांच्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या वार्ता संकलन व समाजसुधारकांची रेखाचित्रे या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

पुणे येथे २० ऑगस्ट २०२२ रोजी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते श्री. उदय देशमुख यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे तसेच श्रीपाल लालवाणी यांनी संकलित केलेल्या २०१३ ते २०२२ या कालावधीतील शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संबंधातील वृत्तपत्रातील कात्रणांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले.

घोले रोड, शिवाजीनगर पुणे येथील राजा रविवर्मा कलादालनात हे चित्र प्रदर्शन २० ते २२ ऑगस्ट पर्यंत हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले राहणार होते. या वार्ता संकलन व चित्र प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी राज्य कार्यकारणी सदस्य मुक्ता दाभोलकर, श्री. मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र ट्रस्टचे विश्वस्त श्री. गणेश चिंचोले हे आवर्जून उपस्थित होते.

सुप्रसिद्ध चित्रपट कलावंत, सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, प्रख्यात लेखक सदानंद मोरे आदी मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट दिली. पुर्वी चित्रकला शिक्षक असलेले आणि आता पूर्ण वेळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी असलेले डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष श्री. उदय देशमुख यांनी ‘माणूस मारता येतो, विचार मारता येत नाही’ या थीमवर शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या निर्घुण खूनावर आधारित अनेक चित्रे विविध माध्यमांचा वापर करून तयार केलीत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर समाज प्रबोधनाच्या चळवळीत काम करणाऱ्या सर्वच समाज सुधारकांचे पोट्रेट्स तयार केलीत. यामधे राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, बी प्रेमानंद, अब्राहम कोवूर, डॉ. एन डी पाटील, छत्रपती शिवाजी महाराज, यांच्यासह अनेकांची पोर्ट्रेटस् तयार केलीत.

आजपर्यंत त्यांच्या चित्रांची प्रदर्शनी ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिथे-जिथे कार्यक्रम झालेत त्या अनेक ठिकाणी तर भरवण्यात आलेच त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर या ठिकाणी सुद्धा या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक मान्यवरांनी या चित्रांचं भरभरून कौतुक केलं. यातूनच या सर्व चित्रांची स्वतंत्र प्रदर्शनी भरवण्याची कल्पना समोर आली. या प्रदर्शनीसाठी चित्रकार उदय देशमुख यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विश्वस्त श्री गणेश चिंचोले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.