Home Blog Page 135

डोंबिवलीतील सम्राट चौकात कोरोनाच्या दिर्घकाळानंतर ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’ तर्फे २०२२ च्या भव्यदिव्य दहीकाला उत्सवात कर्णबधिर मुलांना दहीहंडी फोडण्याच्या प्रथम मान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

डोंबिवली पश्चिम येथील पंडित दीनदयाळ रोड वरील सम्राट चौकात यंदा दोन वर्षानंतर दिनांक १९.०८.२०२२ रोजी होत असलेल्या दहीकाला उत्सवात यंदा माजी नगरसेवक व युवा नेता ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’ यांच्यातर्फे “स्वराज्य दहीहंडी महोत्सव २०२२” मध्ये यंदाचे खास वैशिष्ट्य म्हणून दहीहंडी फोडण्याचा प्रथम मान कर्णबधिर मुलांना मिळणार आहे. कोरोना काळात सर्वत्र निर्बंध घालण्यात आल्यामुळे सर्वच उत्सव बंद पडले होते ते निर्बंध आता शिथिल करण्यात आल्यामुळे यंदा गोविंदा पथकांसाठी राज्य शासनाने दहा लाखांचा विमा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण असून राज्यात सगळीकडे ‘जन्माष्टमी व दहीकाला उत्सव’ जोमात आणि जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे असे चित्र आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे देखील या उत्सवासाठी डोंबिवलीत उपस्थित राहणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच या उत्सवाला ‘सोनी’ मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा” या लोकप्रिय कॉमेडी मालिकेतील कलाकार गौरव मोरे व शिवाली परब हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.

विशेष म्हणजे ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’ यांच्यातर्फे यंदा भव्यदिव्य अश्या तीन दहीहंड्या ठेवल्या असून एक डोंबिवलीच्या नागरिकांसाठी व मंडळांसाठी, दुसरी मुंबईच्या मंडळांसाठी व तिसरी महिला पथकांसाठी विशेष दहीहंडी असणार आहे. आतापर्यंत डोंबिवली-कल्याण मधील ३५ गोविंदा पथकाने आपले नाव नोंदीवले आहे तसेच ठाणे, मुंबई व आसपासच्या शहरातून मिळून एकूण १०० पथकं अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

कोरोना काळातील गेल्या दोन वर्षात नागरिकांना कोणत्याही उत्सवात भाग घेता आला नव्हता म्हणून ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’ ने हा उपक्रम राबविण्याचा मानस केल्याचे तसेच कर्णबधिर मुलांना वेगळेपणा वाटू नये याकरिता ‘संवाद’ कर्णबधिर शाळेच्या अध्यक्षा व संचालिका श्रीमती. अपर्णा आगाशे यांच्याशी बोलून त्यांनी कर्णबधिर मुलांना पहिली प्रतिकात्मक दहीहंडी फोडण्याचा मान देत असल्याने डोंबिलीतील पहिली भव्यदिव्य प्रतिकात्मक दहीहंडी फोडण्याचा सम्मान कर्णबधिर मुलांचा असणार आहे असा हा आगळावेगळा उपक्रम राबवून सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न असून सामाजिक संदेश देत असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या उत्सवादरम्यान वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना पश्चिमेकडील सम्राट चौकाच्या पुढे जाण्या-येण्यासाठी गैरसोय होऊ नये याकरिता वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्याशी नियोजन करून सम्राट चौका पर्यंत येणारे रस्ते वाहतुकीसाठी एकदिशा करण्यात आले आहेत व वाहतुकीचे अधिक योग्य नियोजन करण्यासाठी व पोलीस यंत्रणेवर कुठेही ताण पडू नये म्हणून ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’ तर्फे ३० वॉर्डन नेमण्यात आल्याचे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

विशेषतः हा ‘जन्माष्टमी व दहीकाला २०२२’ उत्सव साजरा करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ‘सेफ्टी चे सगळे प्रीकॉशन’ घेत लहान मुलं जी वरच्या थरांवर चढतात त्यांना ‘सेफ्टी हार्णेस’ देखील लावत असून सर्व नियमांचे पालन करून हा दहीकाला उत्सव हा मोठा हिंदू सण साजरा करत असल्याचे माजी नगरसेवक व युवानेते दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेतील उपस्थित पत्रकारांना सांगितले.

 

मराठा समाजाच्या न्याय्य हक्काच्या मागण्या पूर्ण करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनायक मेटे यांना श्रद्धांजली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मराठी समाजाला आरक्षण, सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, हा दिवंगत विनायक मेटे यांचा ध्यास होता. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अरबी समुद्रातील शिवस्मारक यासाठी स्व.मेटे यांनी सतत प्रयत्न केले. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी, त्यांच्या उन्नती, प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, हीच दिवंगत विनायक मेटे यांना श्रद्धांजली अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली.

शिवसंग्राम चे नेते दिवंगत विनायक मेटे यांचे दि.१४ ऑगस्ट राजी अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज येथे शाशकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, महसूल मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, यांच्यासह खासदार डॉ.प्रीतम मुंडे, खासदार इम्तियाज जलील यांची प्रमुख उपस्थिती होती.

विनायक मेटे यांचे अपघाती निधन ही अविश्वनिय, मनाला न पटणारी, मनाला चटका लावणारी, अप्रिय, दुःखद, वेदनादायी घटना असल्याचे सांगून श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही माणसं कुटुंबापूरते मर्यादित नसतात, त्यांची समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असते. मराठा समाज व शिवसंग्राम हा त्यांचा परिवार होता, त्यांचा एकाच ध्यास होता तो म्हणजे मराठा समाज आरक्षण सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अरबी समुद्रातील शिवस्मारक यासाठी दिवंगत मेटे यांनी सतत प्रयत्न केले. त्यासाठी जे जे करावं लागेल, ते सरकार करेल हा सरकारचा शब्द आहे.आमचे सरकार मराठा समाजाला नक्की न्याय देईल. दिवंगत मेटे देह रूपाने नसले तरी त्यांचे कार्य, संघर्ष चिरंतन आहे. त्यांच्या जाण्याचं दुःख पचवण्याची शक्ती, ताकद देव त्यांच्या कुटुंबियांना देवो. त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

विनायक मेटे यांचे अपघाती निधन हा आपल्यायासाठी दुःखद प्रसंग असून, आज आपल्याला शब्द सुचत नाहीत. ही आपली वैयक्तिक हानी असल्याच्या भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाज, ऊसतोड कामगारांचे प्रश्न अरबी समुद्रातील शिवस्मारक असे एक एक विषय मार्गी लावण्याचा दिवंगत मेटे यांचा प्रयत्न होता. शिवसंग्राम मधून त्यांनी सामान्य तरूणाला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अचानक जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी जे काम हाती घेतले, ते पूर्ण करण्याचा संकल्प आज करत आहोत, असे सांगून हा प्रसंग सहन करण्याची शक्ती त्यांच्या वैयक्तिक व शिवसंग्राम च्या कुटुंबियांना ईश्वराने द्यावी. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, सामाजिक न्याय मंत्री सामाजिक अधिकारा करिता मंत्रालय असल्याने व महाराष्ट्रातील मराठा व बहुजन समाजाचे प्रश्न आग्रहाने मांडणारा नेता म्हणून माझा मेटेंशी दीर्घ काळापासून संपर्क होता. विविध प्रश्न आणि मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या भूमिकेला आमचा कायमच पाठिंबा होता या अनुषंगाने त्यांनी मांडलेल्या प्रश्नासाठी पुढच्या काळात नक्कीच कार्य केले जाईल असे रामदास आठवले म्हणाले.

अंत्यसंस्कारास सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अंत्यसंस्कार प्रसंगी आमदार संजय शिरसाट, आमदार धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, आमदार नमिता मुंडदा, आमदार श्वेता महाले, आमदार संदीप क्षिरसागर, आमदार संजय दौड, आमदार सुमनताई पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी राज्यमंत्री सुरेश नवले, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार सैय्यद सलीम, माजी आमदार रविकांत तुपकर, चंद्रशेखर बावनकुळे, पृथ्वीराज साठे, रमेश आडसकर, रमेश पोकळे, विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे प्रमुख, समाजातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यासाठी देशाच्या विविध भागातून मोठया संख्येने लोकप्रतिनिधी व नागरिक आलेले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी दिवंगत मेटेंच्या पत्नी ज्योतीताई, कुटुंबीय, आप्त परिवार व मातोश्री यांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित मंत्रिमंडळ सदस्यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्काराचा विधी शोकाकुल वातावरणात, कार्यकर्त्यांच्या घोषणाच्या गजरात झाला.

आधार कार्ड चे विविध प्रकार उपलब्ध आणि त्यांचे वेगवेगळे फायदे..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आधार कार्ड सध्याच्या काळात एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. कोणत्याही सरकारी योजना असो वा पुरावा म्हणूनही आधार कार्ड महत्त्वाचे आहे. देशातील जवळपास संपूर्ण प्रौढ लोकसंख्येकडे आधार कार्ड आहे. सरकारने आधार कार्ड देण्यासाठी एक संस्था स्थापन केली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) असं या संस्थेचं नाव आहे. UIDAI नागरिकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही आधार कार्ड तयार करुन देण्याची सुविधा देते. आधार कार्डचे अनेक प्रकार आहेत.

आधार कार्डचे किती प्रकार आहेत आणि ते कसे मिळवायचे ते जाणून घेऊया. पीव्हीसी आधार कार्ड जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड क्रेडिट कार्ड सारखे बनवायचे असेल तर तुम्ही फक्त ५० रुपये खर्च करून पिव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करू शकता. यामध्ये अनेक प्रकारचे सुरक्षेचे तपशील नोंदवले जातात आणि यामध्ये सर्व नागरिकांचे चिन्ह ‘क्यूआर कोड’च्या स्वरूपात सुरक्षित ठेवावे लागते. हे कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला आधारच्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जाऊन ऑर्डर द्यावी लागेल.

ऑर्डर दिल्यानंतर ५ ते ६ दिवसांत हे कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहोचते. mAadhaar कार्ड UIDAI ने आधार कार्ड धारकांच्या मदतीसाठी मोबाईल ऍप्लिकेशन तयार केले आहे. या ऍपद्वारे तुम्ही आधारची ई-कॉपी तुमच्या मोबाइलमध्ये सुरक्षितपणे सेव्ह करुन ठेवू शकता. हे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

यासोबतच आधार अपडेट केल्यावर तुमच्या आधार mAadhaar कार्डमध्ये सेव्ह केलेले आधार कार्ड आपोआप अपडेट होईल. आधार पत्र जर तुमचे आधार कार्ड गहाळ झाले असेल आणि तुम्हाला ते आपत्कालीन परिस्थितीत डाउनलोड करावे लागले तर तुम्ही आधार पत्र डाउनलोड करू शकता. हे एक मोठे जाड आधार कार्ड असून त्यात नागरिकांची सर्व माहिती नोंदवली जाते. तुम्ही फक्त OTP द्वारे आधार पत्र डाउनलोड करू शकता.

ई-आधार कार्ड तुम्ही मोबाईलमध्ये ई-आधार कार्ड सहज डाउनलोड करू शकता. आधार डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी, UIDAI मास्क केलेले ई-आधार कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा प्रदान करते ज्यामध्ये फक्त शेवटचे चार क्रमांक नमूद केले आहेत. यामुळे तुमचा आधार डेटा चोरीला जाऊ शकत नाही असे प्रसिध्दी माध्यमांना कळवले आहे.

डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि ‘डोंबिवली रायडर्स क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅलीचे आयोजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दिनानिमित्त शहर वाहतूक उपविभाग शाखा डोंबिवली तर्फे डोंबिवली वाहतूक उपविभाग हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उमेश गीत्ते यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस अधिकारी, अंमलदार व वॉर्डन तसेच ‘डोंबिवली रायडर्स क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सदरची बाईक रॅली डोंबिवली पूर्वेकडील रामनगर येथून सुरु होऊन इंदिरा चौक, टिळक चौक, कोपर पूल, सम्राट चौक, कोल्हापुरे चौक, गुप्ते रोड, मच्छी मार्केट, कोपर पूल व परत रामनगर येथे समाप्त झाली. या बाईक रॅलीद्वारे वाहतुक विभागातर्फे वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचा संदेश देण्यात आला.

अखेर राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

इतर १८ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे –

* राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

* सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

* चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

* डॉ. विजयकुमार गावित – आदिवासी विकास

* गिरीष महाजन – ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

* गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता

* दादा भुसे – बंदरे व खनिकर्म

* संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन

* सुरेश खाडे – कामगार

* संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन

* उदय सामंत – उद्योग

* प्रा.तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

* रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

* अब्दुल सत्तार – कृषी

* दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा

* अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

* शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क

* मंगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास