Home Blog Page 134

तीन सराईत गुन्हेगारांना गजाआड करण्यात महात्मा फुले पोलीसांना यश..



संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण तालुक्यातील चिकणघर येथे असणाऱ्या ‘मोरया स्वीट्स ऍण्ड ड्रायफ्रुट’ च्या दुकानाचे शटर फोडून दुकानातील ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरणाऱ्या तिघांना महात्मा फुले पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान या संशयीत आरोपींकडून ८ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली.

मोहम्मद करीम उर्फ लाडो अख्तर अली बागवान (रा. खेमाणी उल्हासनगर), साकीर जाकीर खान (वय २०, रा. म्हारळगाव), शिवम महेंद्र बतमा उर्फ ‘मच्छी’ (वय २०, रा. जावसईगाव, अंबरनाथ पश्चिम) अशी सराईत आरोपींची नावे आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, चिकणघर येथे ‘मोरया स्वीट्स ऍण्ड ड्रायफ्रुट’ चे दुकान आहे. या दुकानात गुरुवारी दि.१७ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चोरी करून रुपये ३२ हजार २०० चा मुद्देमाल लंपास करण्यास आला. त्यानंतर या घटनेची तक्रार दुकान मालकाने महात्मा फुले पोलीस ठण्यात नोंदवली. यानंतर सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीसांनी तीन संशयीत आरोपींना शिताफीने शोधून काढत गजाआड केले आहे.

कल्याणमध्ये भगव्यामय वातावरणात निघाली तिरंगा रॅली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘हर घर तिरंगा‘ अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिक यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. कल्याण पश्चिम येथील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती नवनीतानंद महाराज (मोडक महाराज) यांच्या सूचनेनुसार १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सकाळी ११ वाजता फॉरेस्ट कॉलनी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत गुरुबंधू व गुरुभगिनी भगवेवस्त्र परिधान करून पायी यात्रा काढण्यात आली. यावेळी लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती, सर्वांच्या हातात तिरंगा ध्वज व देश भक्तीपर घोषणा देत पदयात्रा काढण्यात आली.

फॉरेस्ट कॉलनीतील मठापासून सुरू झालेली पदयात्रा मुरबाड रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून काळा तलाव, बेतूरकर पाडा, खडकपाडा मार्गे पुन्हा मठात येऊन महाभंडारा घेऊन या पदयात्रेची सांगता झाली, यावेळी गुरुवर्य नावनीतानंद महाराज मोडक महाराज यांच्या सह माजी आमदार नरेंद्र पवार, माजी परिवहन सदस्य बाळा परब, अशोक गायकवाड यांच्यासह शेकडो स्वामी भक्त उपस्थित होते.

 

‘शिवसंग्राम’ संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महासंचालकांना आदेश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिलेले आहेत.

मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते.

त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ याना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

 

भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेश कार्यालयात जल्लोषात स्वागत; मुंबई भाजपा अध्यक्ष मा. आशिष शेलार यांचा सत्कार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

पावसांच्या धारात, वाद्यांच्या जल्लोषात आणि घोषणांच्या दणदणाटात भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात बुधवारी स्वागत केले. मुंबई भाजपाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार यांचेही कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, मा. बावनकुळे व मा.शेलार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत भाजपा आगामी काळात मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवेल.

भाजपाचे मावळते प्रदेशाध्यक्ष व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या स्वागत समारंभास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, आ. राणा जगजितसिंह, आ. नितेश राणे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत भारतीय, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. उमा खापरे यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा. बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला एकविसाव्या शतकात देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला राज्यातील प्रत्येक बूथवर ५० युवा वॉरिअर्स उभे करायचे आहेत. या २५ लाख युवा वॉरिअर्सच्या जोरावर आगामी २०२४ च्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठे यश मिळवायचे आहे. आपल्याला आगामी काळात मुंबई महापालिका जिंकायची आहे. सर्व निवडणुकांमध्ये भाजप पक्षच नंबर एकचा राहील यासाठी मेहनत करायची आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या यशाची परंपरा टिकवायची आहे.

भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मा. बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले.

मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे सामान्य पार्श्वभूमीतून पुढे आले आहेत. भाजपाचा अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी घराण्याची पार्श्वभूमी नव्हे तर पक्षातील मेहनत आणि गुणवत्ता आवश्यक असते. पक्षामध्ये नेतृत्वावर विश्वास ठेऊन श्रद्धेने काम करत रहावे याचे बावनकुळे हे उदाहरण आहे. मेहनत घेणारे नेतृत्व राज्याचे अध्यक्ष म्हणून मिळाले आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने मा. आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी दिली असून ते पक्ष नेतृत्वाच्या विश्वासाला पात्र ठरतील, असे मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. मुंबई महानगरपालिकेवर विजयाचा झेंडा लावल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार मा. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश झाल्याबद्दल मा. देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी व मा.आशिष शेलार यांनी विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीस्थळ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आणि चर्चगेट येथील अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा येथे अभिवादन केले.

 


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. यापूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि गोविंदा संघांसाठी घेतलेल्या निर्णयांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुबार मदत केली जाईल. राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. बस मधून मोफत प्रवास देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहकार मंत्री अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात जिरायती शेतीसाठी १० हजार प्रति हेक्टर ऐवजी १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर, बागायती शेतीसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि २५ हजार रुपये प्रति हेक्टर करण्यात आली आहे. बारमाही शेतीसाठी आता हेक्टरी ३६ हजार रुपये झाले आहेत. २ हेक्‍टरवरून ३ हेक्‍टरवर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात जवळपास दुप्पट मदत होईल. शेतकर्‍यांची गय केली जाणार नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय लागू करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील, असेही शिंदे म्हणाले.

शेतकऱ्यांना वीजदरात सवलत

जून २०२१ पासून उच्च दाब व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनांच्या शेतकर्‍यांना प्रति युनिट २ रुपये १६ पैसे प्रती युनिट इतकी सवलत कायम आणि लघुदाब जलसिंचन ग्राहकांनासुद्धा जून २०२१ पासून नवीन सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीज वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून महावितरण कंपनीने ३९ हजार ६०२ कोटी रुपये आणि बेस्टचे ३ हजार ४६१ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आला आहे.

तसेच वीज वितरणातील हानी १५ टक्केपर्यन्त कमी करून ग्राहकांसाठी प्रिपेड / स्मार्ट मीटर याचा १ कोटी ६६ लाख ग्राहकांना फायदा ग्राहकांना होणार आहे. ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील पात्र परंतु भूमीहीन लाभार्थीना जागा देण्यासाठी सवलती देण्यात आल्या आहेत. यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या धर्तीवर १ हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क रक्कम निचित, मोजणी शुल्कामध्ये ५० टक्क्यांपर्यंत सवलत २ मजली ऐवजी ४ मजली इमारत बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

गोविंदा पथकांना विमा संरक्षण

अनेक गोविंदा पथकांना सरकारने विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी होत होती, या मागणीनुसार आता गोविंदा पथकातील सदस्यांना सरकारकडून १० लाखांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. या विमा संरक्षणाचा हप्ता सरकार भरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच भंडारा जिल्ह्यातील महिलेवर झालेल्या अत्याचारप्रकरणी राज्य राखीव पोलीस दलाच्या आयुक्त श्रीमती रागसुधा यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला असून या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यात येणार आहे. शक्ती कायद्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

मागील सरकारने घेतलेले निर्णय रद्द केलेले नाहीत. त्या निर्णयाचा आढावा घेऊन पूनर्विलोकन करण्यात येत आहे. अत्यावश्यक व प्राधान्य क्रमानुसार निर्णयांची अंमलबजावणी केली जाईल. राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ३ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येणार आहे. आता हा महागाई भत्ता ३४ टक्के होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या भागाचे ९५ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी पंचनामे केल्याच्या तक्रारी असल्याने ते पूर्णत्वास जात आहेत. याबाबत तातडीने मदत केली जाईल. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हे सरकार जनतेच्या हिताचे असून कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नसून त्याचा आढावा घेऊन महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बैठकीत स्पष्ट केले.