Home Blog Page 136

एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार नवी यादी देणार; राज्यपाल नियुक्त’साठी लवकरच १२ नवे चेहरे..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवलेल्या विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या यादीला आघाडी सरकार सत्तेवरून खाली येईपर्यंत राज्यपालांनी मंजुरी दिली नव्हती. आता राज्यात आलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने ही यादी परत मागवण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी नवीन यादी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे.

भाजप नेते आणि नवनियुक्त मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विधानपरिषदेतील नव्या सरकारची सदस्य संख्या वाढावी आणि या निमित्तानेविधिमंडळ कामकाजात सरकारच्या निर्णयांना आडकाठी येऊ नये, यासाठी हा सर्व प्रकार करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

याप्रकरणी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नव्हता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांनी यासाठी राज्यपालांच्या अनेकदा भेटी घेतल्या. मात्र तरीही सदस्यनियुक्तीच्या यादीची फाईल पुढे सरकली नाही. आता मात्र, राज्यात आलेल्या नव्या सरकारने या यादीच्या फाइलला गती देण्याचे ठरवले आहे. ही यादी परत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

“जुनी यादी परत मागवण्यासाठी एक प्रस्ताव करावा लागतो. तसा तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे. हा एक प्रक्रियेचा भाग आहे. आता राज्यपाल कधी यादी परत देतील आणि त्यानंतर राज्यपालांना कधी नवी यादी दिली जाईल, याबाबत मात्र आपल्याला नेमकी माहिती नाही”, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

महाविकास आघाडीने राज्यपालनियुक्त आमदारांमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या चार सदस्यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांचा समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांची नावे, तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर यांचा समावेश होता. त्यापैकी विधानपरिषदेवर फक्त एकनाथ खडसे यांची वर्णी लागली आहे.

विधान परिषदेतील रिक्त पदांवर नियुक्त्या करण्याचे अधिकार राज्यपालांना घटनेने दिले आहेत. मात्र, ही नियुक्ती करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करावी लागणार आहे. कलम १६३(१) अन्वये राज्यपाल विधान परिषदेच्या जागांवर नियुक्त्या करू शकतात. कलम १७१(५) नुसार राज्यपाल साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक, सहकार या पाच क्षेत्रात व्यक्तींची नियुक्ती करू शकतात. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आमदारांची नियुक्ती राज्यपाल करतात. मात्र, सरकारने यादी दिल्यानंतर ही नियुक्ती किती दिवसांत करायची, याबाबत कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात विनायक मेटे यांच्या झालेल्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. ते ५२ वर्षांचे होते. या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या विनायक मेटे यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातील अनेकांना धक्का बसला आहे.

विनायक मेटे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढले होते. त्यांनी मोठा लढा मराठा आरक्षणासाठी उभा केला होता. दरम्यान, आता विनायक मेटे यांच्या झालेल्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण मराठा समाजाच्या काळजाला चटका लागला असल्याची भावना व्यक्त केली जाते आहे.

या अपघाताआधीचा मृत्यूपूर्वीचा विनायक मेटे यांचा अखेरचा फोटो समोर आला आहे. या मध्ये विनायक मेटे यांचा रक्तबंबाळ झालेला चेहरा दिसून आलाय. त्यांना एका स्ट्रेचरवर झोपवण्यात आलं होतं. त्यांना शुद्ध नव्हती. पिवळ्या रंगाचा एक शर्ट विनायक मेटे यांनी घातलेला होता. त्याच्या शर्टाच्या खिशाला भारताचा झेंडा तिरंगाही होता. हनुवटीला आणि चेहऱ्याच्या खालच्या बाजूला मोठं रक्त लागल्याचंही दिसून आलं होतं. तसंच शर्टावरही रक्ताचे डाग लागल्याचं दिसून आलंय. या अपघातामुळे विनायक मेटे यांच्या निधनामुळे सर्वत्र प्रचंड हळहळ व्यक्त केली जातेय.

४८ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक; महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने केलेल्या कारवाईत जी.एस.टी. ची ४८ कोटी रुपयांची खोटी बिले देणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. जी.एस.टी. ची खोटी बिले देत असल्याचा संशय असलेल्या  मे. विवांता मेट्ल कॉर्पोरेशन या व्यापाऱ्यांसंबंधी राज्य वस्तू व सेवा कर विभागाने विशेष तपास हाती घेतला होता. मे. विवांता मेट्ल कॉर्पोरेशनचा मालक इम्तियाझ अब्दुल रेहमान सय्यद, (वय -३५ रा. चिता कॅम्प, मानखुर्द, मुंबई) याने कुठल्याही वस्तू किंवा सेवेची खरेदी-विक्री न करता सुमारे ४८ कोटी किमतीच्या खोट्या बिलांवर आधारीत, सुमारे ८.७० कोटी रुपयाचे इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच (ITC), त्याला देय असलेल्या जी.एस.टी रकमेवर, ८.७० कोटी रुपयांची खोटी वजावट घेतली आणि याच स्वरुपाची खोटी बिले इतर कंपन्यांना जारी केली. ही रक्कम देखील सुमारे ९ कोटीच्या घरात आहे.

अस्तित्वात नसलेल्या अशा बोगस कंपन्यांकडून बिले घेऊन कर भरणे टाळणे, हा वस्तू व सेवाकर कायद्यांतर्गत गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर दि. ०५ ऑगस्ट २०२२ रोजी, वस्तू व सेवा कर विभागाने, इम्तियाझ अब्दुल रेहमान सय्यद यास अटक करून न्यायालयात हजर केले. मुंबईचे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी यांनी त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या अन्वेषण-ब शाखेच्या प्रमुख व सहआयुक्त, श्रीमती. सी.वान्मथी (भा.प्र.से), यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यकर उपायुक्त श्रीमती. रुपाली बारकुंड यांच्या पर्यवेक्षणात ही मोहीम पार पडली. याप्रकरणी सहायक राज्यकर आयुक्त श्री. दिपक दांगट, पुढील तपास करत आहेत.  सहायक राज्यकर आयुक्त – ऋषिकेश वाघ, रामचंद्र मेश्राम, सुजीत पाटील आणि अन्वेषण – ब विभागातील राज्यकर निरीक्षकांनी या विशेष मोहीमेत सक्रिय सहभाग घेतला. वर्ष २०२२-२३ मधील या ३३ व्या अटकेद्वारे महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाने, खोटी बिले आणि खोट्या कर वजावटी घेणाऱ्या कसुरदार व्यापाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.

भाषण देण्याआधीच प्रसिद्ध भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकूने भोसकून हल्ला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमधील एका व्याख्यानादरम्यान चाकूने भोसकून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. न्यूयॉर्कमधील इन्स्टिट्यूटमध्ये एका व्यक्तीने स्टेजवर चढून रश्दींना धक्काबुक्की केली आणि हल्ला केला. या घटनेनंतर रश्दी यांना हवाई ऍम्ब्युलन्स ने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. दरम्यान, सलमान रश्दी यांना ‘द सैटेनिक वर्सेस’ या पुस्तकाच्या लेखनावरून जिवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. धमक्या मिळाल्यानंतर त्यांच्यावर तब्बल ३३ वर्षांनी हल्ला करण्यात आला.

मुंबईत जन्मलेले आणि बुकर पारितोषिक विजेते सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर १९८८ पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे. कारण अनेक मुस्लिम धर्मीय याला निंदा मानतात. इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दी यांच्या मृत्यूबद्दल बक्षीस देण्याचा फतवा काढला होता. रश्दींची हत्या करणाऱ्याला ३ मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

रिपोर्ट्सनुसार, रश्दी लेक्चर देण्यासाठी स्टेजवर पोहोचताच एका व्यक्तीने त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. या व्यक्तीच्या हातात चाकूसारखे धारदार शस्त्र असल्याची माहिती समोर आली आहे. धक्काबुक्की केल्यानंतर त्याने रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर रश्दी यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून हल्ल्यामागील कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

 

एकनाथ खडसे यांचा ‘मंत्रिपदासाठी वरिष्ठांची भेट घ्या’ असा पंकजा मुंडे यांना सल्ला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला आता गती मिळत असताना भाजप व शिंदे गटाच्या काही आमदारांचा शपथविधी झाला आहे. मंत्रिमंडळाच्या शर्यतीत काही जणांना सुगीचे दिवस आले आहेत, तर काही माजी मंत्र्यांना डावलल्याने आता अंतर्गत धुसफूस निर्माण होताना दिसत आहे. भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांची देखील एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागेल असा अंदाज होता, परंतू तो साफ खोटा ठरला. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी दिसून येत आहे, स्वतः पंकजा मुंडे यांनी काल याबाबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता भाजपचे माजी नेते व हल्लीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांना खास सल्ला दिला आहे.

एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांना मंत्रिपद हवे असल्यास त्यांनी थेट पक्षातील वरिष्ठांना भेटण्याचा सल्ला दिला आहे, यावेळी मत व्यक्त करताना एकनाथ खडसे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्या जवळच्या लोकांना तसेच ओबीसींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना नेहमीच डावलण्याचा प्रकार घडला आहे. माझ्याबाबतीत सुध्दा नेमका हाच प्रकार झाला होता, त्यामुळे पंकजा यांनी थेट पक्षातील वरिष्ठांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करावी असे सुचवले.

एकंदरीतच नाराज नेत्यांनी आता नाराजीचा सूर आवळणे सुरु केले असून येत्या काळात पंकजा मुंडे व्यतिरिक्त एकनाथ शिंदे गटातील काही आमदार त्यांची नाराजी व्यक्त करतात की ‘जैसे थे’ भूमिका घेतात हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.