Home Blog Page 141

पत्रा चाळीच्या कंत्राटदारांचीही चौकशी करा – आमदार सुनील राऊत


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना नेते खासदार संजय राऊत अटकेत असलेल्या पत्राचाळ प्रकरणातील कंत्राटदारांची ही चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार सुनील राऊत यांनी केली आहे, दरम्यान संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत याही ‘ईडी’ समोर हजर झाल्या होत्या.

पत्राचाळ व्यवहारात संजय राऊत यांना प्रवीण राऊत यांनी रोख रखमेत फायदा दिला, तसेच वर्षा राऊत यांच्या खात्यातून पैसेही दिले असा ‘ईडी’ चा आरोप आहे, यासाठी या पूर्वी वर्षा राऊत यांची चौकशी झाली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावले होते व त्या हजर झाल्या होत्या.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सुनील राऊत यांनी कंत्रादारांचीही चौकशी करण्याची मागणी केली, भाजप नेते मोहित कंबोज हेही यातले एक कंत्राटदार आहेत.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘आरे कारशेड’ मेट्रो प्रकल्पाबाबत राज्य सरकारला सूचना; पुढील सुनावणी १० ऑगस्टला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

फडणवीस-ठाकरे सरकारच्या काळात आखण्यात आलेला महत्वाकांक्षी ‘आरे कारशेड’ मेट्रो प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता, आरे कॉलनी येथील रहिवासी व निसर्गप्रेमी सातत्याने या प्रकल्पाला विरोध करत असून यामुळे होणारी भरमसाठ वृक्षतोड हा मुद्दा रेटत हे प्रकरण न्यायालय दरबारी पोहचले आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्याने नव्याने आरे कारशेड मेट्रो प्रकल्पाच्या कार्याला गती प्राप्त झाली होती. तांत्रिक बाबींची शहानिशा करत हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या वळणावर असताना, नेमके सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमुळे हा प्रकल्प पुन्हा थंडबस्त्यात पडून राहणार असे सध्याचे चित्र आहे.

नुकतेच सर्वोच्च न्यायालयाचे भावी सरन्यायाधीश उदय लळित यांच्या प्रमुख अध्यक्षतेखालील तसेच न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस व रविंद्र भट यांच्या पिठासमोर स्थानिक आरे वसाहत निवासी व निसर्गप्रेमींची जनहित याचिका सादर करण्यात आली होती. यावेळी सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तर याचिकाकर्त्यांतर्फे चंदरउदय सिंह यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सध्या या प्रकरणी विस्तृत सुनावणीची गरज असल्याने पुढील सुनावणीपर्यंत कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील मेट्रो ३ प्रकल्पासाठी आरे वसाहतीतील एकही झाड तोडू नये, असा आदेश यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या १० ऑगस्टला होणार असून, तोपर्यंत या मार्गिकेत कुठल्याही प्रकारच्या वृक्षतोडीला आता मज्जाव राहणार आहे. दरम्यान ‘मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ने कुठल्याही प्रकारे या भागात वृक्षतोड केली नसून केवळ झुडपे हटविण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी काही जनहित याचिका या लोकोपयोगी असल्याची टिप्पणी न्यायाधीशांनी केली असून आता १० ऑगस्टपर्यंत निर्णय ‘जैसे थे’ राहणार आहे.

पुण्याचे पत्रकार मुज्जम्मील शेख राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानीत…

पुणे : अत्याचार भ्रष्टाचार विरोधी अभियानाचे महाराष्ट्र प्रमुख सय्यद साबीर यांच्या वतीने राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सत्कार मूर्तींचे औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले.

या कार्यक्रमात पुण्यातील पत्रकार मुज्जम्मील शेख यांना संजय मैत्रेवार प्रादेशिक परिवहन अधिकारी व औरंगाबादचे माजी महापौर रशीद मामु यांच्या हस्ते राज्यातील उत्कृष्ट युवा पत्रकारितेकरिता समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी माजी पोलीस अधीक्षक कलंदर शेख, डॉ. चौधरी सर, एड. संगीता भट्टड, ठाण्याचे माजी नगरसेवक मनोज भाऊ, अनवर बैग व आदी उपस्थित होते. मुज्जम्मील शेख हे खूप कमी वयापासून पत्रकारिता करत आहेत. त्यांना अनेक आदर्श पत्रकार पुरस्कार देखील मिळाले आहे. त्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांजवळ चांगली प्रतिमा आहे.

अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील त्यांच्या चांगले परिचयात आहे. शेख हे अनेक मंत्री महोदयांच्या तसेच अनेक मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत व त्यांच्या जवळीक मानले जातात. शेख यांनी कोरोना काळात अनेक मंत्र्यांना सी एस आर फंड उपलब्ध करून दिला होता. त्यामध्ये प्रामुख्याने माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जवळपास 25 लाख किमतीचे कोरोना लक्षणे तपासणारी 3 मशिन उपलब्ध करून दिल्या होत्या.

शेख यांना शासकीय कामांचा दांडगा अनुभव असल्याने ते गरजू नागरिकांचे शासकीय कामे त्वरित करून घेतात. शेख यांची न्यू युनिक फाउंडेशन ही संस्था देखील संपुर्ण देश भरात जवळपास 12 ते 15 राज्यात काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सतत पुढे असतात. शेख हे समाजासाठी सतत धावपळ करत असतात. कोरोना काळात देखील अनेक परिवारांना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते.

शेख यांचा देशभरात अनेक राज्यामध्ये दांडगा संपर्क आहे. त्यामध्ये सर्व शासकीय कार्यालये, पुण्यातील अनेक पोलीस ठाणे, अनेक राज्यातील राजकीय वरिष्ठ पदाधिकारी, शैक्षणिक संस्थचे प्राचार्य, सामाजिक संस्था व संघटने मधील पदाधिकारी व इतर विभागातील असे अनेक मान्यवर मुज्जम्मील शेख यांच्या संपर्कात आहेत.

आयुक्तांच्या पत्रकार परिषद बंदी आदेशाच्या तुघलकी फर्मानचा जाहीर निषेध! – प्रकाश नागणे

मिरा भाईंदर: मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांनी पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेण्यास बंदी घालण्यात आल्याचे तुघलकी फर्मान काढले आहे ते लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केली आहे.

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मूलभूत अधिकार दिले आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी पत्रकारिता हा महत्वाचा स्तंभ आहे, प्रशासकीय पातळीवर चाललेले गैरकारभार, भ्रष्टाचार उघड होत असल्याने केवळ सत्ताधारी भाजपच्या इशाऱ्यावर निर्णय घेणाऱ्या आयुक्तांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना वाचवण्यासाठी जे पत्रक प्रशासनातर्फे जारी केले आहे त्यावर कोणाचीही सही नाही.

निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, आचारसंहिता लागू झालेली नाही, नगरसेवकांचा कालावधी या महिन्यात संपणार आहे त्यापूर्वीच आयुक्तांनी प्रशासकीय राजवटीसारखा कारभार सुरू केल्याने ही दडपशाही सहन केली जाणार नाही तसेच ही बंदी सत्ताधारी भाजप सह सर्व राजकीय पक्षांना लागू असेल की फक्त काँग्रेससाठी याचा खुलासा आयुक्तांनी करावा अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केली आहे.

येणारी प्रत्येक निवडणूक जिंकायचीच या जिद्दीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे!- अमीत देशमुख

संपादक: मोईन सय्यद/लातूर प्रतिनिधी

लातूर: लातूर येथील काँग्रेस भवनात अहमदपूर येथील विविध राजकीय पक्षातील नेते तथा बसपाचे माजी जिला अध्यक्ष श्रीकांतजी बनसोडे, नगर परिषद अहमदपूरचे माजी गटनेते रहीमखान पठाण, सय्यद तौसीफ सर, शेख उमर सर आदी कार्यकर्त्यांनी माजी मंत्री, आमदार अमीत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या प्रसंगी लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा नेते, आमदार धीरज विलासराव देशमुख, मा.आ.त्रिंबक नाना भिसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव अभय साळुंके, काँग्रेसचे नेते डॉ. गणेश कदम, तालुका अध्यक्ष हेमंत पाटील, चंद्रकांत मद्दे, शहराध्यक्ष विकास महाजन, चाकुर तालुका अध्यक्ष विलास पाटील, सिराजोद्दीन जागीरदार, मा.उपनगराध्यक्ष कलीमोद्दीन अहमद, केदार काडवादे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा काँग्रेसच्या वतीने आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत अमित देशमुख यांनी नवीन प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सम्मानीत केले व आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कोरोना प्रादुर्भाव काळात काँग्रेस पक्षच रस्त्यावर उतरून जनतेची मदत करीत होता, अशा अनेक तळागाळातील लोकोपयोगी कार्य करणारा पक्ष म्हणून जनता काँग्रेसकडे पाहात आहेत म्हणून समाजकारणासाठी राजकारण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला जनता कधीही विसरणार नाही हे यावेळी आवर्जून सांगितले.

येणारी प्रत्येक निवडणूक जिंकायचीच! या जिद्दीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, प्रत्येक बूथ, वॉर्ड, गाव, मतदार संघ, काँग्रेस पक्षासाठी मताधिक्य देईल या पद्धतीने पक्षाची बांधणी करावी, आपल्यावर असलेल्या जबाबदारीच्या मर्यादेत काटेकोर नियोजन करून कामाला लागावे असे आवाहन करून त्यासाठी आवश्यक असणारे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले.

सामाजिक सौहार्द तसेच कायदा आणि सुव्यवस्था कायम राखून जिल्ह्याचा समतोल विकास काँग्रेस पक्षच करू शकतो हे जनतेला पटवून द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने स्वतःला उमेदवार असे समजून कामाला लागावे येणाऱ्या काळात सत्ता आपलीच असेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.