Home Blog Page 145

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली असून राज्यात या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र हे सिंगल युज प्लास्टिक बंदी करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

राज्यात प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक शक्तिप्रदत्त समिती नेमण्यात आली होती. या समितीने ७ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीत महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकॉल उत्पादने अधिसूचना २०१८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने १५ जुलै २०२२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर देखील बंदी घातली आहे. या सुधारणेनंतर राज्यात प्लास्टिक लेपीत (कोटेड) तसेच प्लॅस्टिक थर (लॅमीनेटिड) असणाऱ्या पेपर किंवा अॅल्युमिनियम इत्यादी पासून बनवलेले डीस्पोजेबल डीश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर इत्यादी एकल वापरावर, वापर उत्पादनावर आता बंदी असणार आहे.

दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचा कचरा कमी करणे हा बंदीमागचा मुख्य उद्देश आहे.
राज्यातील शहरे, ग्रामीण भागात दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण लक्षणीय असून, यातील कचऱ्याचे विघटन व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. हा कचरा जलाशयांमध्ये व कचरा डेपोत फेकला जातो किंवा पुनरप्रक्रिया शक्य नसल्याने रात्रीच्या वेळी हा कचरा थेट जाळला जातो. सध्या राज्यात सिंगल युज प्लास्टिक मध्ये कप, प्लेट्स, वाडगा, चमचे, कंटेनर इत्यादींच्या वापरावर बंदी आहे. परंतु सध्या बाजारामध्ये डीश, कंटेनर, ग्लास, कप इत्यादी पेपरच्या नावाखाली प्लास्टिक लेप असलेले किंवा प्लास्टिक लॅमिनेशन केलेले मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. या सर्व वस्तुंमध्ये सुद्धा प्लास्टिक आहे. विघटनास घातक ठरणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकचे आक्रमण रोखण्यासाठी हे बंदीचे पाऊल उचलण्यात आले आहे.

 

 

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवितांना त्यांच्या प्रति सकारात्मकता ठेवा; कामासाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सचिवांना भेटले पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा. राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्याच्या योजना गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा असे निर्देश दिले. मुख्यमंत्री आज मंत्रालयात सर्व विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रशासन संवेदनशील, सचोटीचे, प्रामाणिक हवे अशी जनतेची अपेक्षा आहे. महाराष्ट्राची देशात एक चांगली प्रतिमा आहे. खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्य शासनाच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच इतर केंद्रीय मंत्री देखील राज्याला सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा वेळी नावीन्यपूर्ण योजना देखील आपण मांडल्या पाहिजेत. नवनवीन उपक्रमांचे स्वागत आहे. केंद्राचा जास्तीत जास्त निधी कसा मिळेल हे पाहून तात्काळ असे प्रस्ताव सादर करावेत. विशेषत: रेल्वे, महामार्ग याबाबतीत केंद्राकडील पाठपुरावा वाढवावा. राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करताना गतीमान व गुणवत्तापूर्ण कामे झाली पाहिजेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शासन आणि प्रशासन ही राज्य कारभाराच्या रथाची दोन चाके आहेत. दोघांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. लोकाभिमुख योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. राज्यातील नवीन सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. शेतकरी, कामगार, शेतमजूर, यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. सरकारची प्रतिमा ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. यासाठी सर्वांनी राज्याच्या हिताची कामे प्रभावीपणे करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील शेतकरी हा महत्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांसाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करावी. अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यासाठी गती द्यावी. राज्यातील रस्त्यांची सुधारणा करताना नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कोणत्याही कामामध्ये गुणवत्तेत तडजोड करु नका, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आवश्यक कामांना स्थगिती नाही
मागील सरकारने शेवटी शेवटी घाईघाईत, घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. जनतेशी संबंधित आवश्यक अशा कामांना स्थगिती नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

लवकरच १०० दिवसांचा कार्यक्रम शिंदे म्हणाले
लवकरच १०० दिवसांचा कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. पूर्वी सुरु असलेल्या लोकहिताचे कामे सुरु ठेवणार आहोत. प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी रिक्त पदांची भरती होणे पण गरजेचे आहे त्यादृष्टीने विभागांनी नियोजन तयार ठेवावे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.

 

डोंबिवली येथे पीएनटी कॉलोनीतील ‘होली एंजल्स’ विद्यालयातील दीक्षा सुरेंद्र सुवर्णा या विद्यार्थिनीने दहावीत ९९.६०℅ गुण मिळवून महाराष्ट्रात पहिली तर ‘सीबीएसई’ बोर्डाची टॉपर बनण्याच्या मान पटकावला ..


           प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या यशामागे त्याचे स्वतःचे प्रयत्न तसेच त्याच्या आई-वडिलांचे श्रम व शिक्षकांचे मार्गदर्शन व तो शिकत असलेल्या शैक्षणिक संस्थेचा मोठा वाटा असतो. होली एंजल्स संस्थेने नेहमीच प्रयत्नशील गुणी विध्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे, त्याचेच फलित म्हणून आज या शिक्षण संस्थेतून बाहेर पडणारे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत.

सन २०२१-२२ सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत यावर्षी दीक्षा सुवर्णा या विद्यार्थीनीने ९९.६० टक्के गुण मिळवून महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातील सर्व सीबीएसई शाळांमधून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. हे यश होली एंजल्स संस्थेसाठी तसेच संस्थेतील सर्व शिक्षकांसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. मुळातच अतिशय शांत व अभ्यासू वृत्तीच्या दीक्षा कडे अभ्यासास पूरक असे सारे गुण होते पण त्याच बरोबर उत्तम कथ्थक नृत्य, चित्रकला यातही ती पारंगत आहे. तिच्या या यशामागे तिची आई रोहिणी सुवर्णा ज्या ‘एचडीएफसी’ बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत आहेत व वडील सुरेंद्र सुवर्णा यांच्याही मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे.

होली एंजल्स संस्थेचे माननीय अध्यक्ष डॉक्टर ओमन डेव्हीड सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले १६ वर्ष १००℅ रिझल्ट चा वारसा कायम राखत संस्था चालवत आली आहे व गेल्या कोरोना काळात ही या शिक्षण संस्थेने त्यांच्या होली एंजल्स शिक्षण संस्थेच्या १००% रिझल्टचा वारसा कायम राखत यंदाच्या वर्षी इतिहासातले ‘दीक्षा सुवर्णा’ हे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे व असेच यश तिला व इतर विध्यार्थ्यांना लाभो अश्या शुभेच्छा होली एंजल्स संस्थेचे माननीय अध्यक्ष डॉक्टर ओमेन डेव्हीड सर यांनी आज तिच्या सत्कारासाठी होली एंजल्स शाळेच्या सभागृहात आयोजण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात दीक्षा सुवर्णा व सर्व विद्यार्थ्यांना दिल्या.

यंदा होली एंजल्स शाळेतून दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेस १४९ विध्यार्थी बसले होते त्यात शाळेतील २१ विध्यार्थ्यांना ९२% हुन अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा ही या सत्कार समारंभात पुष्पगुच्छ व आकर्षक ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. खास करून ९७.८० गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या अनुश्री मनिष खिशती व ९७.००% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या रुचिता विनय दीक्षित यांना गौरविण्यात आले.

या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात होली एंजल्स संस्थेचे माननीय अध्यक्ष डॉक्टर ओमेन डेव्हीड सर, प्रिन्सिपल बिजॉय ओमेन, मॅनेजिंग ट्रस्टी श्रीमती लीला ओमेन व मुख्याध्यापिका श्रीमती रफत शेख त्याच सोबत दहावीच्या वर्गावर शिकवणाऱ्या जयंती टीचर, नेहा कामत टीचर, रेवती टीचर, मेरी बोबन टीचर, विजी टीचर व हिंदीच्या अनिता सोनावणे टीचर व गौरवण्यात आलेले विध्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

 

मुसळधार पावसाचे पुढचे ३ दिवस विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांत थैमान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्यात जूनपर्यंत दडी मारून बसलेला पाऊस जुलैमध्ये राज्यातील बहुतांश भागात मुसळधार कोसळतोय. अशातच गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाचं प्रमाण थोडं कमी झालं असलं तरी पुढील ३ दिवस राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

जुलै महिना सुरु झाल्यापासून राज्याच्या विविध भागात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने थोडी उसंत घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काही भागात सूर्यदर्शन झाले होते. बऱ्याचशा नद्यांची पाणी पातळी आता घटली असून पूरही ओसरला आहे. मात्र आता पुढचे तीन दिवस पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे, असं म्हणता येईल.

दरम्यान, पुढील दोन दिवस विदर्भातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यासोबतच मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. मात्र, तो आता उत्तरेकडे सरकल्याने त्याचा फारसा प्रभाव पडणार नसल्याचे चित्र आहे. याशिवाय राजस्थानच्या गंगानगरपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हा पट्टा दोन ते तीन दिवसांत दक्षिणेकडे येण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे.

 

राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. या समारंभास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली आणि भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून त्या पदावर विराजमान झाल्या. यासाठी त्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या श्रीमती मुर्मू या पदाची शान आणखी वृद्धिंगत करतील. त्यांच्यामुळे भारताचा गौरव जागतिक स्तरावर आणखी उ़ंचावेल, असा सार्थ विश्वास आहे. त्यांच्या कारकिर्दीला आदरपूर्वक शुभेच्छा,’ असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथ ग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री. एन.व्ही.रमणा यांनी राष्ट्रपती यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या समारंभास माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री व राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.