Home Blog Page 146

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पी.सावळाराम राज्यस्तरीय साहित्य सम्मेलनात कवी तथा संपादक श्री.संतोष सावंत यांना दोन सन्मान चिन्हाने गौरविले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मुंबई प्रदेश ठाणे जिल्हा आयोजित आज रविवार दि. २४ जुलै २०२२ रोजी डोंबिवली येथे ‘२’ रे पी सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संम्मेलन’ डोंबिवली पूर्व येथे पार पडले. यात ७० हुन अधिक कवींनी या कवी संम्मेलनात भाग घेतला होता.

या साहित्य सम्मेलनाच्या ठिकाणी कवी तथा ‘लोकसत्यवाणी न्युज’चे संपादक, पत्रकार श्री.संतोष सावंत हे उपस्थित राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी करिता सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम स्वागताध्यक्ष सौ.अनिता गुजर, उद्गघाटक शरद गोरे, संम्मेलन अध्यक्षा हिरकणी राजश्री बोहरा या व अन्य पदाधिकारी उपस्थित होत्या.

.

या संम्मेलन मध्ये कवी संतोष गोपाळ सावंत यांनी आपली “पावसा तू असा कसा” ही वास्तववादी कविता सादरीकरण केल्याबद्धल कवी व प्रेक्षकांमधून कवितेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे त्यांच्या या कामगिरीस सन्मानचिन्ह देण्यात आले, व दुसरे पत्रकार तथा संपादक या उत्कृष्ट कामगिरी करिता म्हणून दुसरे सन्मानचिन्ह अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने देऊन गौरविण्यात आले.


आज एकाच दिवसात एकाच कार्यक्रमात दोन कामाकरिता दोन वेगवेगळ्या सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र कवी तथा संपादक श्री.संतोष सावंत यांना देऊन गौरविण्यात आल्याने संतोष सावंत यांच्या चाहत्यांकडुन त्यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नीरज चोप्राने जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये पुन्हा एकदा रचला इतिहास !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

ऑलिम्पिक खेळांमध्ये ट्रॅक आणि फील्ड सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय बनल्यानंतर, हा भारतीय स्टार जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये पदक जिंकणारा केवळ दुसरा भारतीय बनला आहे. नीरजने रविवारी, २४ एप्रिल रोजी अमेरिकेतील ओरेगॉन येथे झालेल्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या भालाफेकच्या अंतिम फेरीत ८८.१३ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नांसह रौप्य पदक जिंकले. अँडरसन पीटर्सने सुवर्णपदक (९०.४६ मीटर) जिंकले.

नीरज चोप्राचा पहिला जॅविलियन थ्रो फाऊल होता. दुसऱ्या थ्रोमध्ये नीरजने ८२.३९ मीटर, तिसऱ्या थ्रोमध्ये नीरजने ८६.३७ मीटर, चौथ्या प्रयत्नात नीरजने ८८.१३ मीटर फेक केली, तर पाचव्या फेरीत तो अपयशी ठरला. या स्पर्धेतील त्याची सर्वोत्तम कामगिरी ८८.१३ मीटर होती याच थ्रो चा मदतीने त्याने दुसरे स्थान कायम राखत रौप्यपदक जिंकण्यात यश मिळवले आहे.

ग्रेनेडाचा अँडरसन वन पीटर्सनं सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने पहिल्या प्रयत्नात ९०.२१ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ९०.४६ मीटर भाला फेकला. रौप्यपदक विजयानंतर नीरज चोप्राने सांगितले की, वाऱ्यामुळे काहीसा त्रास झाला. पण मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. स्पर्धा कठीण होती, शिकण्यासारखं खूप होतं, अशी भावना त्याने व्यक्त केली.

नीरज १९ वर्षांचा असताना २० वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून प्रकाशझोतात आला. त्यावेळी त्याने ८६.४८ मीटरचा जागतिक विक्रमही रचला. त्यासाठी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी नीरजचं कौतुक केलं होतं. आणि फेसबुकवर पोस्टही लिहिली होती. पुढे २०१८ मध्ये त्याने कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकलं. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय भालाफेकपटू. त्याचवर्षी भारत सरकारने नीरजला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित केलं.

पण तब्बल १९ वर्षांनंतर या चॅम्पियनशिपमध्ये देशाला पदक मिळाले आहे. नीरजच्या आधी अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. या चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू तसेच पुरुष खेळाडू ठरला आहे.

 

शिंदे गटाचा दावा खोटा? गिरा व्यास काँग्रेस मध्येच शिंदे सेनेत प्रवेश केलेला नाही!

मिरा भाईंदर: कोणत्याही प्रकारची राजकीय मान्यता नसताना देखील एकनाथ शिंदे गटाने आपणच अधिकृत शिवसेना असल्याचा दावा करून राज्यभरात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा सपाटा लावला आहे.
अशाच प्रकारे शिंदे गटाने मीरा भाईंदर शहराची कार्यकारिणी देखील घोषित केली असून त्या कार्यकारिणीत अनेक वादग्रस्त नावे देखील सामील असल्याचे उघड झाले आहे.

नव्यानेच जाहिर केलेल्या कार्यकारिणीत १४५ मिरा-भाईंदर शिवसेना महिला संघटक पदी काँग्रेसच्या गिरा व्यास यांना नियुक्त केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र गिरा व्यास यांनी काँग्रेस पक्ष सोडला नसून त्यांचे नाव शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकारिणीत सामील करणे पुर्णपणे चुकीचे असून दिशाभूल करणारे आहे असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी दिले आहे.

गिरा व्यास ह्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय असून त्यांनी शिंदेंसेनेत प्रवेश केलेला नाही. शिवसेनेचा हा अंतर्गत वाद असून आमची सेना हीच खरी शिवसेना आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे, निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठीच अश्या प्रकारची बोगस नियुक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केला असून गिरा व्यास या काँग्रेस मध्येच आहेत असे स्पष्ट केले आहे.

मिरा भाईंदर शहरातील शिंदे गटाने आपल्या कार्यकर्त्यांची संख्या मूळ शिवसेनेपेक्षा जास्त असल्याचे भासविण्यासाठी नव्याने जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये अशाच प्रकारे अनेकांची नावे परस्पर जाहीर केली असल्याने त्यावर आता एक नविनच वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसेत पक्षात शिंदे गटाला विलीन करण्याचा जर प्रस्ताव आला तर विचार करू – राज ठाकरे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकूण ४० आमदार शिंदे गटात दाखल झाले आहेत. या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. दुसरीकडे राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले तरी कायद्याच्या कसोटीवर हे सरकार टिकेल का ? अशी विचारणा केली जात आहे. सरकार अबाधित ठेवायचे असेल तर शिंदे गटाला कोणत्या ना कोणत्या पक्षात विलीन व्हावे लागेल, असा दावा केला जात आहे. दरम्यान, शिंदे गटाने मनसे पक्षात विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवल्यास त्यावर विचार करू, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

“हे शिवसेनेचे बंडखोर आमदार माझे जुने सहकारी आहेत. याआधीही त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. मला याबाबत तांत्रिक माहिती नाही. पण उद्या त्यांच्याकडून तसा प्रस्ताव आला तर मी नक्की विचार करेन”, असे म्हणत माझ्यासाठी प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा महाराष्ट्र सैनिक असेल बाकी सगळे नंतर येतील, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मी बाळासाहेब ठाकरे यांनाही पत्र लिहिले होते. मी एकच विचारत होतो की, माझे काम काय आहे ? तुम्ही इतरावंर जबाबदारी द्याल आणि मला निवडणुकीच्या भाषणासाठी बाहेर काढणार. माझा शब्द इतरांच्या जीवावर घालणे मला शक्य नव्हते. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निर्णय होता. महाबळेश्वरला असताना मी म्हणालो की तुमच्या मनात काय आहे ते मला माहीत आहे. उद्धव ठाकरेंना अध्यक्ष करा. पण मला जाहीर करू द्या. कारण राज की उद्धव हा मुद्दा बंद होईल. म्हणून मी विषय बंद केला, असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे फेरीवाल्यांना आधार मिळाला ! – मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना काळात हातावर पोट असणाऱ्या फेरी विक्रेत्यांवर मोठा परिणाम झाला होता, प्रधानमंत्री स्वनिधी पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेमुळे अशा फेरीवाल्यांना मोठा आधार मिळाला, मा.पंतप्रधानांच्या या योजनांमुळे अनेक लोकांचे संसार वाचले व त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे कल्याण डोंबिवलीतील पथ विक्रेत्यांसाठी आयोजित स्वावलंबी पथ विक्रेत्यांचा प्रधानमंत्री स्वनिधी महोत्सवा प्रसंगी, दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलताना मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी मा.कपिल पाटील, केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज प्रशासकीय महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, नगर परिषद प्रशासनाचे रोहिदास दोरकुळकर,केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाचे वैभव खानोलकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, माजी नगरसेवक विनिता राणे, रवी पाटील, भाजपाचे प्रेमनाथ म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे फेरीवाले, पथविक्रेते यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम होत आहे. फेरीवाले यांनाही व्यवसाय करण्याचा हक्क आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांना मदत करावी या बरोबरच नागरिकांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी फेरीवाल्यांनी घ्यावी असेही ते पुढे म्हणाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्वनिधी योजनेचे चांगले काम केले आहे. या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेला सर्वतोपरी मदत केली जाईल. नागरिकांनीही शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा.मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

कोरोनामुळे रोजगार गेलेल्या सर्वसामान्याना मदत व्हावी, यासाठी ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ सुरू केली आहे, याबरोबरच केंद्र शासनाच्या विविध आठ योजनेमुळे अनेक लोकांना लाभ झाला आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित करण्याचे कामही विमा योजनेमुळे झाले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून देशातील गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रधानमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. जास्तीजास्त लोकांनी या योजनांचा लाभ घेऊन देशाच्या विकासात हातभार लावावा असे उद्गार मा.कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज यांनी यावेळी आपल्या भाषणात काढले.

महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. महानगरपालिकेस १४९७० पथविक्रेत्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते त्यानुसार ७४३१ पथविक्रेत्यांचे कर्ज मागणी अर्ज भरण्यात आले आहेत आणि त्यापैकी २४८६ पथविक्रेत्यांना रु. दहा हजाराचे कर्ज विविध बँकांद्वारे उपलब्ध झाले आहे अशी माहिती प्रशासकीय महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. यावेळी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच दहा पथ विक्रेत्यांना प्रातिनिधिक स्वरूपात परिचय पत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे या महोत्सवाच्या जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. स्वावलंबी पथ विक्रेत्यांच्या या प्रधानमंत्री स्वनिधी महोत्सवास फेरीवाल्यांचा पथविक्रेत्यांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला महापालिकेचे सावित्रीबाई फुले कलामंदिर या महोत्सवाच्या वेळी गर्दीने तुडुंब भरल्याचे दिसून आले.