Home Blog Page 148

बँक कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाला आळा बसवण्यासाठी बँक ग्राहकांना आरबीआयचे कवच..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशातील प्रमुख व केंद्रस्थानी असणारी रिझर्व बँक (आरबीआय) सर्व बँकांचे नियमन व नियंत्रण करते. आर्थिक व्यवहार करताना सर्व बँकांना आरबीआयच्या दिशानिर्देशानुसार कार्य करणे आवश्यक व बंधनकारक असते. त्यामुळे बँकिंग प्रणाली सुरळीत ठेवण्यासोबत ग्राहकांच्या (खातेधारकांच्या) हितांना देखील आरबीआय मार्फत प्राधान्य दिले जाते. अनेकदा असे होते की, आपण बँकेमध्ये गेले असता संबंधित बँक कर्मचारी कामाची टाळाटाळ करताना दिसतात अथवा गैरवर्तन करतात. यामुळे ग्राहकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागतो.

बँक कर्मचाऱ्यांद्वारे कामात केली जाणारी दिरंगाई, टाळाटाळीची उत्तरे देणे, जेवणाची वेळ आहे सांगून ग्राहकांना ताटकळत ठेवणे, गैरवर्तन इत्यादी बाबी रोखण्याकरिता आरबीआयने ग्राहकांना काही अधिकार दिले आहेत. कुठल्याही ग्राहकांसोबत संबंधित बँकेत गैरव्यवहार झाल्यास या अधिकाराचा वापर करत बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाते.

जर आपल्यासोबत बँक कर्मचाऱ्याने असभ्य वर्तन केले असल्यास थेट आपण आरबीआयकडे तक्रार नोंदवित समस्येचे निवारण करू शकता, याकरिता आपणाला बँकिंग लोकपालकडे संपूर्ण घडलेल्या प्रकरणाची माहिती सादर करावी लागेल. अशा बँक कर्मचाऱ्यांवर आरबीआय तातडीने कारवाईची हमी ग्राहकांना देते.

जर बँक कर्मचारी हलगर्जीपणामुळे आपणाला नाहक त्रास देत असेल तर सर्वप्रथम आपण बँकेच्या नोडल अधिकाऱ्याजवळ तक्रार नोंदविली पाहिजे किंवा संबंधित बँकेच्या तक्रार मंचकडे सुद्धा याची माहिती सादर केल्यास समस्येचे निवारण केल्या जाते. संबंधित बँकेच्या तक्रार निवारणाच्या टोल फ्री क्रमांकावर देखील ग्राहक त्यांची तक्रार नोंदवू शकतात.

जर आपणाला बँकिंग लोकपालकडे तक्रार द्यावयाची असेल तर आपण फोनद्वारे अथवा ऑनलाईनच्या माध्यमाने तक्रारीची नोंद करू शकता. बँकिंगसंबंधी तक्रार निवारणाकरिता टोल फ्री क्रमांक १४४४८ हा आहे. जर आपण ऑनलाईन तक्रार नोंदवण्यास इच्छुक असाल तर <https://cms.rbi.org.in> या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करून आपली समस्या नोंदवू शकता.

 

इकडे सरकार कोसळले आणि आदित्य ठाकरेंचा काही महिन्यांपूर्वी बांधलेला पूल गेला पुरात वाहून तिकडे..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शेंद्री पाडा येथे काही महिन्यांपूर्वीच लोखंडी पूल उभारला होता त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार सुरु असल्याने नद्या, नाले,ओहोळ, अगदी गटारीसुद्धा दुथडीभरून वाहत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आणि याच पुराच्या पाण्यात हा लोखंडी पूल वाहून गेला आहे यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा लाकडी बल्ल्यांवरून पाण्याची हंडे घेऊन जाण्याची कसरत करावी लागत आहे.

पंचक्रोशितील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार येथे लोखंडी पूल देखील उभारण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुलचे उदघाटनही झाले होते मात्र पहिल्याच पावसात पुलाने अखेरचा श्वास घेतला हे दुर्दैव.

हा पुलचं वाहून गेल्याने महिलांना पुन्हा लाकडी बल्ल्यावरून प्रवास करावा लागत आहे.म्हणून तिकडे सरकार कोसळले आणि इकडे आदित्य ठाकरेंनी उभारलेला पूल पुरात वाहून गेल्याची चर्चा त्र्यंबकवासीयांमध्ये आहे हे खरं.

 

एकीकडे राज्यात पक्ष अस्तित्वाच्या प्रश्नासाठी उद्धव ठाकरेंचा कोर्टात लढा, तर दुसरीकडे मनसे राज्यात ॲक्शन मोडमध्ये सज्ज..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील सत्तासंघर्षाची ठिणगी ही शिवसेना आमदारांच्या बंडाने पडली व त्याने महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर सत्तेची समीकरणे नक्कीच बदलली, सोबतच काही पक्षांच्या अस्तित्वाचाच प्रश्न हल्ली नेमका निर्माण झाला आहे. आज आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे, सोबतच शिवसेना नेमकी कुणाची या मुद्द्यावर देखील सुनावणी दरम्यान प्रकाश टाकण्यात येणार आहे.

एकप्रकारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शिंदे गटाला आमदार, खासदार, नगरसेवक इत्यादींचे मोठ्या प्रमाणात समर्थन असल्याने न्यायालयाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिल्यास शिवसेना प्रमुखपद देखील उद्धव ठाकरेंना गमवावे लागू शकते. याशिवाय संसद भवनातील शिवसेना भावनावर शिंदे गटाचा अधिकार यामुळे स्थापित होईल. दुसरीकडे मनसे पक्षाचा प्रभाव येत्या महापालिका निवडणुकीत कसा असेल, यावर देखील मनसेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

आज पक्षबांधणी व येत्या महापालिका निवडणुकीबाबत चर्चेकरिता पक्ष नेते व कार्यकर्त्यांसोबत पक्षाध्यक्ष राज ठाकरे आढावा बैठक मुंबईत विविध शाखेत घेत आहे. त्यामुळे सध्याचे राजकीय वारे बघता मनसेकरिता सुद्धा अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षाचे बळ राज्यापुरते मर्यादित आहे परंतु शिंदे गटासोबत भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाची साथ असल्याने सध्या एकनाथ शिंदे यांचे पारडे जड आहे. परंतु खरी लढाई उद्धव ठाकरे – महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट – भाजप अशी असल्याने आज होणारा सर्वोच्च न्यायालयातील निकाल पुढील घडामोडी स्पष्ट करेल, हे नक्की.

 

कुठे नेऊन ठेवलाय आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र ! “या विषयावर परिसंवाद आणि खुली लेख स्पर्धा”


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्राच्या इतिहासात ‘संयुक्त महाराष्ट्राचा लढा’ या लोकचळवळीला फार महत्व आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्णच होऊ शकणार नाही. १९५५ ते १९६० असा सलग पाच वर्षे संयुक्त महाराष्ट्र समितीने जो लढा दिला त्यातून मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्या जनआंदोलन लढयाचे नेतृत्व करणारे सर्वच आचार्य अत्रे, डांगे, एस.एम.जोशी, उद्धवराव पाटील, सेनापती बापट, शाहीर अमरशेख, थोर नेते या विजयाचे शिल्पकार होते. परंतु ज्याला तोफखाना म्हणता येईल असे वाणी आणि लेखणीने जबरदस्त काम केले ते आचार्य अत्रे यांनी.

मराठी जनतेला संयुक्त महाराष्ट्र लढयासाठी उभे करण्यात अत्रेंचा सिंहाचा वाटा होता. राजकीय नेते हे सगळीकडे वा सगळ्या राज्यांमध्ये सारखेच असतात, पण असे म्हटले जायचे की महाराष्ट्रातील राजकारण एकेकाळी सभ्यतेच्या पातळीवर होते. परंतु गेल्या काही वर्षांत सत्ताकारणासाठीच्या राजकीय घडामोडी पाहाता सर्वसामान्य मराठी माणसाला काही प्रश्न पडले आहेत. या अनुषंगाने ‘मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई’ आणि आचार्य अत्रे स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कुठे नेऊन ठेवलाय आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र !’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आणि चित्रलेखाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि सुप्रसिद्ध वक्ते ज्ञानेश महाराव आपले विचार मांडणार आहेत. तर राजेंद्र पै हे आपले आजोबा ‘आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र’ या विषयावर बोलणार आहेत.

शुक्रवार, दि.२९ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी ६ .३० वा. धुरु हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर – पश्चिम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर या विषयावर खुली लेख स्पर्धा आयोजित केली आहे. मराठीमध्ये ३०० शब्दात टाईप करून लेख <chalval1949@gmail.com> या मेलवर अथवा 8779983390 राजन देसाई यांच्या व्हॉट्सअपवर पाठवावा. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना तीन रोख पारितोषिक व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असे संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी तर कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आणि आचार्य अत्रे स्मारक समितीच्या अध्यक्षा ऍड.आरती पुरंदरे- सदावर्ते यांनी केले आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्त नागरिकांची व नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांची आणि नुकसानग्रस्त शेतीची पाहणी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याठिकाणी भेट देऊन केली तसेच अतिवृष्टीग्रस्तांशी संवाद साधला.

भाजपा नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार आदी त्यांच्यासोबत होते. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट मधील कान्होली या गावाचा पुरामुळे संपर्क तुटला होता. अतिवृष्टीग्रस्तांना ग्राम पंचायातीमध्ये ठेवण्यात आले आहे. गावाला भेट देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

अतिशय कठीण परिस्थितीमध्ये लोकांना वाचविण्याचे काम शासकीय यंत्रणांनी केले आहे आणि अजूनही ते करीत आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. दुबार पेरणी सुद्धा संकटात आली आहे, शेतकऱ्यांना योग्य मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली व त्यांनी पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त आणि अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांची विचारपूस केली तसेच नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.