Home Blog Page 152

मिरा भाईंदरचे शिवसेनेचे १८ नगरसेवक शिंदे गटात गेल्याचा आमदार प्रताप सरनाईक यांचा दावा खोटा?

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी

मिरा भाईंदर: शिवसेनेच्या बंडखोर गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक, अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुख्यंमत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचा दावा केला आहे. मात्र संध्याकाळ पर्यंत ह्या बातमीची शहानिशा केली असता आमदार प्रताप सरनाईक यांचा दावा निखालस खोटा असल्याचे निष्पन्न झाले असून १९ नागरसेवकांपैकी फक्त आठ नगरसेवक आमदार प्रताप सरनाईकां सोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याचे सिद्ध झाले आहे.

याबाबत अधिक माहिती करिता मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे प्रवक्ते शैलेश पांडे यांचेशी संपर्क केला असता “शिवसेनेत कोणताही वेगळा गट नाही जे नगरसेवक, पदाधिकारी आहेत ते सर्व शिवसैनिकच आहेत. आज काही मोजके नगरसेवक, काही पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी त्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात गेले होते हे जरी सत्य असले तरी त्यापैकी कुणीही अद्याप कुठेही गेलेले नाही ते सर्व शिवसेनेतच आहेत” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मिरा भाईंदर शहरात शिवसेनेच्या अधिकृत चिन्हांवर निवडून आलेले एकूण २२ नगरसेवक होते त्यापैकी अनिता पाटील आणि दीप्ती भट यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये आधीच प्रवेश केलेला आहे. एक नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता सध्यस्थितीत मिरा भाईंदर महानगरपालिकेत शिवसेनेचे एकूण १९ अधिकृत नगरसेवक असून विक्रम प्रतापसिंह हे नामनिर्देशित नगरसेवक आहेत. त्यापैकी फक्त आठ नगरसेवक आमदार प्रताप सरनाईक सोबत आज मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या आठ नागरसेवकांपैकी देखील हेलन बोर्जिस आणि एलायस बांड्या या दोघांना आधी प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयात एका दुसऱ्या कामाचे कारण सांगून बोलावून घेतले आणि मग तिथून पुढे काहीही न सांगता मुंबईला घेऊन गेले असे हेलन बोर्जिस आणि एलायस बांड्या या दोन्ही नगरसेवकांचे म्हणणे आहे.

मुळात मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे एकेकाळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे दिसत होते आणि म्हणूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेच्या प्रवक्ते पदावर नियुक्त केले होते. प्रताप सरनाईक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत आल्या पासूनच एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यामध्ये गेली अनेक वर्षे शीत युद्ध सुरु असल्याचे बोलले जात होते. मिरा भाईंदर शहरातील विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असो कि, पक्षाचा काही अधिकृत कार्यक्रम असो प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री असूनही एकनाथ शिंदे क्वचितच त्या कार्यक्रमाला उपस्थित राहात होते. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागण्यामागचे कारण देखील शिंदे-सरनाईक यांच्यातील वितुष्ट असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. मग आता अचानक प्रताप सरनाईक यांचे मन परिवर्तन कसे झाले? प्रताप सरनाईक उद्धव ठाकरे यांच्याशी बंड करुन एकनाथ शिंदे गटात सामील कसे झाले? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून. शिंदे-सरनाईक यांच्या घनिष्ठ संबंधाचे कारण ईडीचा कारनामा तर नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जात आहे.

मिरा भाईंदर शहरात शिवसेनेत आपले किती वर्चस्व आहे हे दाखविण्यासाठीच आमदार प्रताप सरनाईक यांनी आजचा केविलवाणा खटाटोप केला असला तरी मात्र शिवसेनेचे सर्व नगरसेवक त्यांच्या सोबत असल्याचा त्यांनी केलेला दावा फोल ठरला असल्याचे सिद्ध झाले आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांचे सोबत गेलेल्या नगरसेवकांची नावे.-
1.राजू भोईर
2.कमलेश भोईर
3.धनेश पाटील
4.श्रीमती संध्या पाटील
5.अनंत शिर्के
6.इलायस बंड्या
7.हेलन बोर्जिस
8.सौ वंदना पाटील

आमदार प्रताप सरनाईक यांचे सोबत न गेलेल्या नगरसेवकांची नावे.-
1.सौ नीलम ढवण (गटनेत्या)
2.प्रवीण पाटील
3.जयंती पाटील
4.श्रीमती तारा घरत
5.सौ स्नेहा पांडे
6.सौ भावना भोईर
7.सौ अर्चना कदम
8.दिनेश नलावडे
9.सौ कटलीन परेरा
10.सौ शर्मिला बगाजी
11.सौ कुसुम गुप्ता

गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले गुरूंना अभिवादन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरू स्व.आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय जेणेकरून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.

गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे आधी मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे आणि नंतर ठाण्यातील आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळ येथील समाधीचे दर्शन घेऊन वंदन करून दोघांना अभिवादन केले.

टेंभी नाक्यावरील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमामध्ये ही शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व.आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करीत नमन करून त्यांना अभिवादन केले. आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, रविंद्र फाटक, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींसह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्धी आणि प्रसार माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गुरूपौर्णिमेनिमित्त आज शिवसेना प्रमुख बाळासेहब ठाकरे आणि वंदनीय स्व.आनंद दिघे या त्यांच्या दोन्ही गुरुवऱ्यांना त्यांनी वंदन केले. या दोघांची शिकवण आचरणात आणून सामान्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी स्व.आनंद दिघे यांना वंदन करण्यासाठी तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी रांगा लावून मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्विकार केला व त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

 

वसई दरड दुर्घटना: मृतांना प्रत्येकी ६ लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत.

या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी २ लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी ६ लाख मदत केली जाईल. याशिवाय जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

पाण्याचे आणि पथदिव्यांची थकित देयके अदा करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात वीजेचे देयक न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात यावा, यासाठी जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने शासनामार्फत भरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात २०१८ मध्ये प्रारंभ करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह  येथे  झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज कुमार सौनिक, अपर मुख्य सचिव नियोजन नितिन गद्रे, नगर विकास-२ विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी, कृषी विभागाचे  सचिव एकनाथ डवले. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महापारेषणचे अध्यक्ष दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक संजय खंदारे, मेडाचे महासंचालक रवींद्र जगताप, तसेच  विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा थकित कृषिपंपाचा मार्च २०२२ पर्यंतचा अनुशेष दूर करण्यात यावा आणि कृषिपंपाचा अनुशेष दूर करताना सौरऊर्जेला प्राधान्य देत, मार्च २०२२ पर्यंतचे संपूर्ण उद्दिष्ट पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करावेत, यासाठी केंद्र सरकारची ‘कुसुम’ योजना आणि शासनाची योजना अशा दोन्ही योजनांचा वापर करीत अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत विकेंद्रित सौर निर्मितीतून ४५०० मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट या योजनेत आहे. अशा प्रकल्पांसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि गतीने ही योजना कार्यान्वित करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. याशिवाय उपसा सिंचन योजनासुद्धा सौर उर्जेवर आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, तसेच किमान ३० टक्के फिडर यावर्षी सौर उर्जेवर जातील, या दृष्टीने तात्काळ नियोजन करण्यात यावे आणि त्यादृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. खासगीसोबतच महावितरणनेसुद्धा स्वनिर्मितीचे जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करावे, असेही श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने उद्धव ठाकरेंवर शरद पवार नाराज..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्रातील सत्तेत नुकताच मोठा फेरबदल झालेला पाहायला मिळाला. शिवसेनेमध्ये आमदारांनी बंडखोरी केली. परिणामी, आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. महाविकासवआघाडी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर शिंदे गटाने भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. मात्र, आता आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदार देखील बंड करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या खासदारांनी बंड करू नये यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. मात्र, आता काँग्रेससह राष्ट्रवादीनेही उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आता जवळ आली असून या पदासाठी द्रोपदी मुर्मू या एनडीएच्या उमेदवार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी एनडीएला पाठिंबा जाहीर केल्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र समोर आलं आहे. शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी हा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे, सर्व खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती. अखेरीस खासदारांच्या दबावापुढे उद्धव ठाकरेंना हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद पेटला असल्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादीने यावर नाराज व्यक्त केली आहे. भाजपच्या उमेदवारला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँगेस पक्षात देखील नाराजीचा सूर आहे. यूपीएच्या यशवंत सिन्हा यांना सेनेने पाठिंबा न दिल्याने महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे.