Home Blog Page 153

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवाजी पार्क, दादर येथील स्मृतीस्थळावर दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले की, सकाळपासूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बोलतो आहे. त्याचबरोबर रात्री उशिरा देखील मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशीही चर्चा झाली आहे. धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. एकंदरीत राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत.पण दुर्देवाने तशी वेळ आल्यास त्या ठिकाणी तत्काळ आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा पोहचतील असे प्रयत्न आहेत. आतापर्यंत ज्यांना स्थलांतरित केले आहे, त्यांना जेवण तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.’

 

कारचालकाने ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलीसाला फरफटत नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली स्टेशन जवळील एस.के.पाटील चौक येथे वाहतूक पोलीस हवालदार बाळासाहेब होरे (वय ४४) हे आपले कर्तव्य बजावत असतानाच यांना एका चारचाकी गाडीने धडक देत फरफटत नेल्याची घटना बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास डोंबिवलीत घडली आहे. गाडीला काळ्या काचा आणि मोठ्याने डेक लावला असल्याने हवालदार होरे यांनी गाडी चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा दिला असता त्याने गाडी न थांबवता होरे यांच्या अंगावर घातली. होरे यांनी गाडीचे बोनेट पकडले असता चालकाने त्यांना फरफटवत गाडी चिपळूणकर रोड मार्गे बालभवन पर्यंत पळवत नेली. तेथे होरे यांना गाडीवरून खाली पाडत चालकाने पुन्हा मागे गाडी वळवून तेथून पळ काढला.

दरम्यान ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून यादरम्यान कारचालकाने एका रिक्षाचालकास देखील धडक दिली असून रिक्षाचालक देखील जखमी झाला आहे. यात होरे यांच्या हाताला, पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गाडी चालकावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे व पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

 

पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे त्यांनी प्रयाण केले.

तत्पूर्वी विमानतळावर त्यांचे विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी स्वागत केले.

विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे यांनी त्यांना विमानतळावर पूर्व विदर्भातील पूर परिस्थितीचा आढावा दिला. त्यानंतर खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर ऐवजी रस्ते मार्गाने त्यांनी गडचिरोलीकडे प्रयाण केले.

 

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र कडून स्थगिती..



संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ५ जुलै, २०२२ रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात आज सुनावणी झाली. एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

राज्यपालांच्या हस्ते दिया मिर्झा, अफरोज शहा ‘मदर तेरेसा स्मृती पुरस्कार २०२१’ ने सन्मानित..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पर्यावरण रक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा तसेच मुंबईतील वर्सोवा सागरी किनारा स्वच्छता मोहीमेचे नेतृत्व करणारे पर्यावरण कार्यकर्ते अफरोज शहा यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे ‘मदर तेरेसा स्मृती पुरस्कार २०२१’ प्रदान करण्यात आले.

पर्यावरण सेवा ही ईशसेवा असून त्यातून माणसाला आत्मिक समाधान लाभते. दिया मिर्झा व अफरोज शहा यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी पर्यावरण संवर्धन कार्यात पुढाकार घेतल्यामुळे अनेक युवक पर्यावरण रक्षण – संवर्धनाच्या कार्याशी जोडले जातील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

पुरस्कार रूपात दिया मिर्झा व अफरोज शहा यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष अब्राहम मथाई व सुसान अब्राहम प्रामुख्याने उपस्थित होते. सानिया शेट्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.