Home Blog Page 154

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार; योजनेतील जाचक अटी काढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखों शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने जाचक अटी रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत. २०१८-१९ मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे. या निकषात राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँका यांचे आर्थिक वर्ष वेगेवेगळे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही असे म्हटले आहे.

भाजपाची निवडणूक आयोगाकडे नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी – नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषदा, ४ नगर पंचायती व १५ ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुंबईत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांना केली.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय होऊ नयेत, अशी भाजपाची भूमिका असून निवडणुका पुढे ढकलल्यास हे आरक्षण पुन्हा लागू करण्यास सवड मिळेल, असे मत मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी आयोगाच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांना सांगितले

मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या समवेत माजी मंत्री गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष जयकुमार रावल, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे व माजी मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. राज्यातील विविध नगरपालिकांच्या क्षेत्रातील स्थानिक भाजपा आमदार आणि स्थानिक नेते राज्य निवडणूक आयुक्तांसोबतच्या बैठकीस उपस्थित होते.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी अचानक ९२ नगरपालिका ४ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यानुसार २० जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधी निवडणूक कार्यक्रम असेल. हा सर्व पावसाचा कालावधी आहे. सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणूक अर्ज दाखल करणे, प्रचार करणे आणि मतदारांनी मतदान करणे अवघड होणार आहे. त्यामुळे आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी विनंती आम्ही केली. मा. राज्य निवडणूक आयुक्तांनी याबाबत शहरानुसार फेर आढावा घेण्याचे आश्वासन दिले.

त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करताना पावसाचा अंदाज घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे. आयोगाने पावसाच्या आकडेवारीचा विचार केला असला तरी वस्तुस्थितीचा विचार करावा, असे आमचे म्हणणे आहे. २०१९ व २०२१ अशी दोन वर्षे कराड शहराचा बहुतांश भाग काही आठवडे पाण्याखाली होता तर गेल्या वर्षी कागल शहराचा पंधरा दिवस पावसामुळे परिसराशी संपर्क तुटला होता. ही दोन उदाहरणे ध्यानात घेतली तर पावसाच्या बाबतीत वस्तुस्थिती ध्यानात घेण्याची गरज आहे.

 

एकनाथ शिंदे-फडणवीसांमध्ये गृहमंत्रीपदावरून चढाओढ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अडीच वर्षानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिला संयुक्त दिल्ली दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या चर्चेला वेग आलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गृहमंत्रीपदावरून चढाओढ सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

गृह खातं मिळावं यासाठी फडणवीस आग्रही आहेत. तर हे खातं यंदा त्यांच्याऐवजी भाजपच्या दुसऱ्या वरिष्ठ नेत्याकडे देण्यावर केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांचा भर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांचं नाव राज्य गृहमंत्री पदासाठी आघाडीवर असल्याची माहीती सुत्रांकडून दिली जात आहे.

राष्ट्रपती निवडणुकीनंतरच मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त लागेल असे संकेत सत्ताधारी वर्तुळातून दिले जात आहेत. कालच्या बैठकीत सरकारमध्ये प्रामुख्याने नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचं भाजपचे धोरण असल्याची माहीती मिळत आहे. मंत्रीमंडळ विस्तारानंतरच्या प्रस्तावित संघटनात्मक बदलामध्ये प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा नेमला जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंत्रिमंडळचा विस्तार कसा असेल ?

मंत्रिमंडळातील एकूण ४३ मंत्र्यांपैकी शिंदे गटाने १० कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपदांची मागणी केल्याचं बोललं जातं आहे. तर भाजपला २८ मंत्रिपदे देण्याचं या बैठकीत ठरल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच शिंदे गटाला कोणती खाती द्यायची यावरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. गृहखातं फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे. मात्र, त्याला अद्याप भाजपमधून कोणीही दुजोरा दिलेला नाही.

 

प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रा. तानाजी सावंत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, एकदा वापर करुन फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे १ जुलै २०२२ पासून एकदा वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

ज्ञानोबा-तुकोबांसारख्या संतांनी पर्यावरणाचा संदेश आपल्या अभंग आणि भारूडामधून दिलेला आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे संत तुकाराम महाराज म्हणतात, तर ‘नगरेची रचावी जलाशय निर्मावी महा वने लावावी नानाविध’ असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. आपल्याला पर्यावरण जनजागृतीची ऐतिहासिक परंपरा आहे. संतांचा हा संदेश लक्षात घेऊन प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न करावा.

महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरण बदल विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाण्यातील महाराष्ट्र कला संस्कृती मंच या सेवाभावी सांस्कृतिक संस्थेच्या सहकार्याने गेली बारा वर्षे राज्यातील जनतेला पर्यावरण जागृतीचा संदेश या वारीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ हा स्तुत्य उपक्रम आहे असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे व सौ. लता शिंदे यांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम, ‘ज्ञानोबा- माऊली तुकाराम’ गजर करत कलावंतासोबत पाऊली खेळली.

 

‘बा विठ्ठला.. समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर’- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची  परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे  सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी राज्यसमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे त्यांनी विठ्ठला चरणी घातले.

बीड जिल्ह्यातील मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले या वारकरी दाम्पत्याला महापूजेचा मान
आषाढी एकादशी निमित्त श्री.एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी मानाचे वारकरी मु.पो.  रुई, ता.गेवराई, जि.बीड येथील मुरली भगवान नवले (५२) आणि सौ. जिजाबाई मुरली नवले (४७) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, यांच्यासह समितीचे अन्य सदस्य, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मागील दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी होऊ शकलेली नाही. त्यामुळे या वर्षी १० लाखापेक्षा अधिक वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. लाखो वारकरी विठू नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहाने चालत आलेले आहेत. या सर्व वारकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. शासन शेतकरी, वारकरी शेतमजूर व कामगार यांच्यासह राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

समाजातील प्रत्येक घटकाला विकासाचा लाभ मिळवून देणार
राज्यात कृषी, उद्योग, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रासह अन्य सर्व क्षेत्रात चांगली कामे केली जाणार असून विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शासन सर्वसामान्याचे आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न राहतील असे त्यांनी सांगितले.
राज्यात या वर्षी पावसाला उशीरा सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती निर्माण झालेली असली तरी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. चांगला पाऊस पडल्यास चांगले पीक येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल. शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील १२ कोटी जनतेच्यावतीने महापूजा
राज्यात आषाढी एकादशीची वारी एक महापर्व असून या वारीला एक मोठी परंपरा लाभलेली आहे.  आषाढी एकादशीला महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने हा दिवस जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यातील १२ कोटी जनतेच्यावतीने आपण ही शासकीय महापूजा केली असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

वारकरी सन्मान व एसटी मोफत पास वितरण
आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड उपस्थित होते.मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते ‘रिंगण’ या वारी विशेषांकाचे प्रकाशन देखील या प्रसंगी करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचे वितरण
पंढरीची वारी ही महाराष्ट्राची प्राचीन आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन ‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानामध्ये नागरिकांचा  सहभाग वाढवावा या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार  देण्यात येतो.  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल जिल्हा रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक वै.ह.भ.प. भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडी, मु.पो.शेरा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर (७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री संत जगनाडे महाराज दिंडी घोटी बुद्रुक जिल्हा नाशिक (५० हजार व सन्मान चिन्ह) दिंडीला प्रदान करण्यात आले. तसेच ‘ग्रीन बिल्डिंग’ पुरस्काराचे वितरणही यावेळी करण्यात आले.

प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. श्री औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले, तर आभार समिती सदस्य प्रकाश जंजाळकर महाराज यांनी मानले. यावेळी खासदार सर्वश्री डॉ.श्रीकांत शिंदे, बंडू जाधव, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, तानाजी सावंत, दादा भुसे, संजय राठोड, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरतशेठ गोगावले, रविंद्र फाटक, राणा जगजीतसिंह पाटील, माजी आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.