Home Blog Page 155

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही सरकार स्थापन केले आहे. हे सरकार राज्यातील  सर्व घटकांच्या हितांची जपणूक करण्यासाठी कार्यरत राहील व यासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे, म्हणूनच सरकार स्थापनेनंतर शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती, प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यासह दिल्लीत आलो असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्राच्या विकासाबाबतचा दृष्टीकोन समजून घेऊन केंद्राच्या सहकार्याने राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांची सदिच्छा भेट

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी रात्री केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची ६ ए, कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. सकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तर दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ७, लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

तत्पूर्वी, त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची १७, अकबर रोड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

 

शिंदे सरकारची पेट्रोल-डिझेल बाबत वाहनधारकांना दिलासा देत मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची, तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. विधानसभेत दि. ४ रोजी भाजप व शिंदे गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यामुळे आता खऱ्या अर्थ्याने महाराष्ट्रात शिंदे सरकार आले आहे..

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणार असल्याचा मोठा निर्णय जाहीर केला.

व्हॅटमध्ये कपात करणार..
महाराष्ट्र सरकार लवकरच पेट्रोल-डिझेलवरील ‘व्हॅट’मध्ये कपात करणार आहे. लवकरच यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्रातील नागरिकांना स्वस्त दरात पेट्रोल-डिझेल देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मोदी सरकारने गेल्या दिवाळीत पेट्रोल-डिझेल वरील अबकारी करात मोठ्या प्रमाणात कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनीही कर कपात केली. त्यामुळे त्या राज्यांमध्ये १५ ते २० रुपयांनी इंधनाचे दर कमी झाले होते. मात्र, ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेल वरील कर कमी करणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले होते.

केंद्र सरकारने पुन्हा २ महिन्यांपूर्वी अबकारी कर कमी केला. मात्र, त्यावेळीही ठाकरे सरकारने कर कपात करण्यास नकार दिला होता. कोविड बाबत झालेल्या आढावा बैठकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यांना कर कमी करण्याची सूचना केली होती. त्यावर केंद्राने आम्हाला ‘जीएसटी’ परतावा दिलेला नाही, असं सांगून ठाकरे सरकारने कर कपात फेटाळली होती.

ठाकरे सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिलाच निर्णय इंधनाबाबत घेतला. लवकरच महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेल वरील करात कपात केली जाणार असून, राज्यातील नागरिकांना स्वस्त दरात इंधन मिळणार असल्याचे शिंदे यांनी घोषित केले. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

रिझर्व्ह बँकेने चार सहकारी बँकांना दणका देत त्यांच्यावर कठोर निर्बंधासह व्यवहारावर आणली बंदी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशातील प्रमुख बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे बँकिंग व्यवसायाच्या वित्तीय नियमन व नियंत्रणाची जबाबदारी असून बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर पर्यायाने कठोर कारवाईची कृती देखील रिझर्व्ह बँकेतर्फे वेळोवेळी करण्यात येते. आता देशांतील विविध चार सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने पुढील सहा महिन्यांकरिता कठोर कारवाई केली आहे सोबत या बँकांवर दंडही आकारण्यात आला आहे. येथे महत्वपूर्ण असे की या सर्व बँकांना दंड सक्तीने भरावा लागणार आहे.

साहेबराव देशमुख सहकारी बँक (मुंबई), शारदा महिला सहकारी बँक (तुमकूर, कर्नाटक), सांगली सहकारी बँक (मुंबई) व रामगढिया सहकारी बँक (नवी दिल्ली) अशी कारवाई करण्यात आलेल्या बँकेची नवे आहे. या सर्व बँकांची आर्थिक स्थिती अतिशय खालावली असून भविष्यात व्यवसायाच्या दृष्टीने दिवाळखोरी होण्याची शक्यता अधिक असल्याने रिझर्व्ह बँकेने निर्बंधाची कारवाई सदर बँकांवर केली आहे.

शुक्रवारी उशिरा कामकाज आटोपल्यानंतर सदर बँकांवर निर्बंध लादण्यात आले असून यानंतर पुढील सहा महिन्यापर्यंत या सर्व बँकांना ठेवी स्वीकारण्यास, कर्ज देण्यास, गुंतवणुकीकरिता मज्जाव घालण्यात आलेला आहे. येथे सर्वात वाईट बातमी खातेधारकांसाठी असून या निर्बंधामुळे त्यांना खात्यातून रक्कम काढण्यावरही बंधने असेल. सध्यस्थितीत या बँकांचे परवाने रद्द न करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेतर्फे जाहीर करण्यात आले आहे, परंतु भविष्यात दंड न भरल्यास कारवाई अधिक कठोर होऊ शकते व परवाने देखील रद्द होऊ शकतात असे प्रसिद्धी माध्यमांना कळवले आहे.

 

AJFC या राष्ट्रीय पत्रकार संघटनेची पत्रकार कार्यशाळा पनवेलमध्ये होणार!

पनवेल/प्रतिनिधी: एजेएफसी ही राष्ट्रीय पत्रकार संघटना गेली पंधरा वर्षे पत्रकारांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. यामुळे समाजातील चांगल्या-वाईट घटना समोर आणणे आणि सामान्य जनतेवर होणा-या अन्यायाला वृत्तपत्रात बातम्याच्या माध्यमातून प्रसिद्ध करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या क्षेत्रात काम करीत असताना अनेक ठिकाणी पत्रकारांवर हल्लेही होत असतात. अशा वेळी त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि पत्रकारितेत टिकून राहण्यासाठी पत्रकारांनी नेमके काय करावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक २३/७/२०२२ रोजी सकाळी दहा वाजता बी. एड. काॅलेज, एस.टी. स्टॅंड पनवेल येथे करण्यात आलेले आहे.

या कार्यशाळेसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेश शिर्के, रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील, संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यशाळेसाठी नवीमुंबई, मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विवीध वर्तमानपत्रातील पत्रकारांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन ajfc संघटनेचे केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विठ्ठलाची महापूजा करू शकणार नाही ? ऐनवेळी एक नवा खोळंबा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मागच्या बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेलया राजकीय नाट्याच्या पहिल्या अंकाला पूर्णविराम लागला असं म्हणता येईल. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला यंदाची विठ्ठल महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार हे स्पष्ट झालं. नुकतीच काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यामुळे शिंदे यांनाच शासकीय महापूजेचा मान मिळणार आहे. उद्या म्हणजे रविवारी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल.

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. मात्र, दुसरीकडे राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली असून मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. निवडणूक आयोगाद्वारे परवानगी मिळाल्यासच मुख्यमंत्र्यांना पंढरपूर दौरा करता येणार आहे.

खरं तर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर नेमक्या कोणत्या कार्यक्रमांना निवडणूक आयोग परवानगी देईल, यावर मुख्यमंत्र्यांचा दौरा अवलंबून असेल. मात्र अशा प्रकारची वेळ पहिली नाही. मागील काही वर्षांपूर्वी कार्तिकी यात्रेला आचारसंहिता लागू झाली होती. त्यावेळेस तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांना शासकीय महापूजेस परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापूजेची परवानगी मिळेल अशी माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान, विश्रामगृह येथे ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी!’ याचा समारोप सोहळा होईल. एकादशीच्या दिवशी पहाटे शासकीय महापूजा झाल्यावर पहाटे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम नियोजित आहे. तसंच सकाळी ११ वाजता सुंदर माझे कार्यालय, स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास हजेरी लावणार आहेत.