Home Blog Page 156

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात सुरक्षेकरिता स्पेशल प्रोटोकॉल नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहन चालकांना मनःस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

याबाबत त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून त्यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गिकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करून कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांना दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपी पेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्रथम प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतूक रोखण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताणही वाढत असल्याने गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो. अतिमहत्त्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत जर अडकून पडली तर रुग्णाच्या जीवाला नाहक धोका होऊ शकतो व तो दगावू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या या प्रवासाचा उगाचंच त्रास वाहनचालकांना नको, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यामागील भूमिका आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

 

अखेर संजय राऊत यांच्या विरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट जारी !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना धक्का देणारी महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि भाजपचे किरीट सोमय्या यांच्यातील वैर आता सर्वश्रुत आहे. दोघेही संधी मिळेल तसे एकमेकांवर आरोप करताना पाहायला मिळतात. अशातच, संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

यादरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांचाही उल्लेख राऊतांनी केला होता. याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत शिवडी कोर्टाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.

मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात आपल्यावर वारंवार बिनबुडाचे आरोप केल्याची तक्रार शिवडी न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश देवूनही संजय राऊत हजर राहिले नाहीत, त्यामुळे त्यांच्याविरोधात आता कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी राऊत यांना मोठा झटका बसणार असल्याचा धमकीवजा इशारा दिला होता. अखेर कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्यामुळे आता राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मीरा भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. त्यापैकी १६ शौचालये बांधण्याचं कंत्राट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, या वॉरंटनंतर राऊत काय भूमिका घेतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

सीबीआय च्या १० ठिकाणी धाडी; माजी पोलीस आयुक्त संजय पांडे अडचणीत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एकीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना आता एक मोठी बातमी आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. सीबीआयने १० ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. बेकायदा कृत्य केल्याचा संजय पांडे यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे सीबीआय कडून १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. संजय पांडेसह एनएसई माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण विरूद्ध कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

नॅशनल स्टॅाक एक्स्चेंजच्या अधिकाऱ्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी ही कारवाई केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी संजय पांडे यांना ईडीने समन्स जारी केला होता.
ईडीच्या समन्सनंतर दि. ५ रोजी चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आता सीबीआय कडून १० ठिकाणी धा़डी टाकल्या आहेत. त्यामुळे संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कोण आहेत संजय पांडे ?

संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय पांडे यांच्या नाराजीनंतर त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती.

 

पी.टी उषा, इलयाराजा यांच्यासह एकूण ४ नामवंताची राज्यसभेसाठी नामनियुक्ती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची निवड राष्ट्रपती द्वारा राज्यसभेवर केली जाते. नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे पार पडली त्यावेळी चार नामवंत व्यक्तींची नावे सुचविण्यात आली होती. प्रसिद्ध धावपटू पी.टी उषा, संगितकार इलयाराजा, के.व्ही विजयेंद्र व विरेंद्र हेगडे यांचा नामनियुक्त व्यक्तींमध्ये समावेश आहे.

नामनियुक्त चारही व्यक्ती दक्षिण भारतीय असून पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. के.व्ही विजयेंद्र हे प्रसिद्ध पटकथाकार आहेत, तर इलयाराजा दक्षिण भारतीय संगित क्षेत्रातील दिग्गज संगितकार आहे. लवकरच या चारही नामवंताची राज्यसभेवर वर्णी लागणार असून नवीन राष्ट्रपती निवडीनंतर त्यांना राज्यसभेचे खासदार पद देण्यात येईल असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

अपघातातील वारकऱ्यांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये देणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्या महाराष्ट्रातील वारकरी पंढरपूरकडे पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. हजारोंच्या संख्येने भाविकांच्या दिंड्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी मिरज-पंढरपूर मार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यात केरेवाडी या ठिकाणी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीला अपघात झाला होता. भरधाव जिप गाडी दिंडीमध्ये घुसल्याने १७ वारकरी गंभीर जखमी झाले होते.

या सर्वांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. सध्या हे सर्व वारकरी या ठिकाणी उपचार घेत आहेत. या जखमी वारकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली. महत्वाचं म्हणजे, त्याआधी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाशी देखील संपर्क केला होता.

या दुर्घटनेत एकूण १९ वारकरी जखमी झाले होते त्यापैकी ३ जणांना घरी सोडण्यात आले आहे, तर उरलेल्या १४ लोकांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात फोन करून जखमींना योग्य उपचार करण्याचे आदेश दिले होते. या रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसतील, मात्र गरज पडली तर वारकर्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा, त्यांच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी मी घेतो अशा शब्दात त्यांनी डॉक्टरांना सूचना दिल्या होत्या.

जखमी वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात येतील अशा सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. स्वतः मुख्यमंत्री जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आलेले पाहून बंडखोर आमदार अनिल बाबर वारकऱ्यांच्या भेटीला धावले आहेत. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात अनिल बाबर यांनी वारकऱ्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जखमी वारकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आमदार बाबर यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडून जखमी वारकऱ्यांना प्रत्येकी २५ हजारांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, खानापूरचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर आणि सांगली शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि अधिकारी रुग्णालयात उपस्थित होते. यावेळी जखमी झालेल्या १७ वारकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार अनिल बाबर यांनी यावेळी केली.