Home Blog Page 157

रस्त्यांवरील खड्डे ताबडतोब शास्त्रोक्त पद्धतीने बुजविण्याची राष्ट्रवादीची मागणी! जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी दिला आंदोलनाचा इशारा!

मिरा भाईंदर: पावसाळा सुरू होताच मिरा-भाईंदर शहरामध्ये रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याचे दिसून येत असून त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. या वर्षी जून महिन्याच्या अखेरीस नुकताच पावसाळा सुरु झाला असताना मिरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याचे दिसत आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना देखील घडत आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या कामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळेच निष्कृष्ट दर्जाचे रस्ते बनवण्यात आल्याचा आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे.

अशाच प्रकारे गेल्या मंगळवारी (5 जून) घोडबंदर रोड येथील काजुपाडा येथे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये एका 37 वर्षीय दुचाकीस्वार अचानक अडखळून पडला आणि त्याच्या अंगावरून मागून येणारी एसटी बस गेली त्यामुळे त्या दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्या घटनेमुळे मीरा-भाईंदर शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मीरा-भाईंदर शहराचे जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना लेखी पत्र देऊन मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांवर पडलेले सर्व खड्डे शास्त्रोक्त पद्धतीने ताबडतोब बुजविण्याची मागणी केली आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेने जर त्वरित कारवाई करून शहरातील सर्व खड्डे ताबडतोब बुजविले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोठे जन आंदोलन केले जाईल असा इशारा अरुण कदम यांनी दिला आहे.

मीरा-भाईंदर शहरामध्ये रस्त्यांचे डांबरीकरण आणि नव्याने होत असलेले काँक्रिटचे रस्ते यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अनेकदा केलेले ऐकायला मिळतात. शहरातील अनेक ठिकाणी निष्कृष्ट दर्जाचे रस्ते बनविले गेले असून त्याचा परिणाम असा होतो की काही दिवसातच त्या रस्त्यावर ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले जातात. पावसाळा सुरू झाला असला तरीही मिरा भाईंदर शहरात अनेक ठिकाणी काँक्रिट रस्त्यांचे, नाल्यांचे, गटरांचे काम चालू आहे. त्यासाठी ठेकेदारांनी रस्ते, नाले खोदून ठेवले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत.

पावसाळ्याच्या आगोदरच सर्व नाल्यांची सफाई केली जावी, शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती केली जावी, रस्त्यांची, नाल्यांची, गटारांची नवीन कामे केली जाऊ नये असे असताना भर पावसात देखील अनेक ठिकाणी काँक्रिट रस्त्यांचे, नाल्यांचे, गटारांची विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी ठेकेदारांनी रस्ते खोदून ठेवले आहेत. यावरून महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या कामकाजात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. तर ठेकेदारांच्या फायद्यासाठीच पावसाळ्यात देखील टेंडर काढली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

शहरातील अनेक ठिकाणी या खड्ड्यांमुळे पादचारी नागरीक किंवा दुचाकीस्वार घसरून पडून जखमी तर होतातच तर काही प्रसंगी मृत्यू देखील झाले आहेत. त्यामुळे मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणा सोबतच भ्रष्टाचाराचा करदात्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

घोडबंदर रोडवरील काजुपाडा येथे रस्त्यावरील खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वाराला मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन महानगरपालिकेस ताबडतोब रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. आणि जर प्रशासनाने तात्काळ कारवाई करून रस्ते दुरुस्ती केली नाही तर मोठे जन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

आता मिरा भाईंदर महानगर पालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कारवाई करते का? हे पाहावे लागेल. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्यांची दुरुस्ती सध्या तरी करणे शक्य नाही असेच दिसत आहे.

शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात सहभागी; ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे महत्वाचे नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेविरुद्ध बंड पुकारले. त्यानंतर शिवसेना आणि अपक्ष मिळून जवळपास ५० आमदार या बंडात सहभागी झाले, परिणामी राज्यातील महविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. शिंदे गट आणि भाजपने बहुमत सिद्ध करून राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र, राज्यातील या सत्तातरानंतर उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण, ठाण्यात शिवसेनेला आता मोठं खिंडार पडलेलं आहे.

नगरसेवकांमधील शिवसेनेतील मोठा गट शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातले शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे ठाणे महानगरपालिकेतील अर्धे नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत आहेत.

६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. माजी महापौर नरेश म्हस्केंसमवेत ६६ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी आपलं समर्थन शिंदे गटाला दिलं. विशेष म्हणजे, शिवसेनेचा एकही नगरसेवक आता ठाणे महानगरपालिकेत राहिलेला दिसत नाही.

ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा शब्द सर्वस्व मानला जातो. मुंबई प्रमाणेच ठाणे महानगर पालिकाही शिवसेनेसाठी तितकीच महत्त्वाची आहे. अशातच शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेला ठाण्यात मोठं खिंडार पडलं आहे.

 

शिंदे सरकारचा राऊतांना दणका; किरीट सोमय्यांना दिलासा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना एकीकडे स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. काही निर्णयांमध्ये बदलही करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये पेटलेल्या आरोप युद्धाला आता पूर्णविराम मिळाला आहे. संजय राऊतांच्या आरोपांमुळे जितेंद्र नवलानी प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलीसांनी बरखास्त केली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि ईडीवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी संजय राऊत यांनी आरोप केलेल्या जितेंद्र नवलानी विरोधात मुंबई लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला होत. ५९ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप प्रकरणी हा ईओडब्लू नंतर एसीबी ने गुन्हा दाखल केला होता.

मात्र, संजय राऊत यांनी उद्योजक जितेंद्र नवलानी यांच्यामार्फत बिल्डरांकडून पैसे उकळल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर केला. त्यानंतर या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (एसआयटी) मुंबई पोलीसांनी बरखास्त केल्याची माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. दरम्यान, हा निर्णय किरीट सोमय्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. जितेंद्र नवलानी प्रकरणामुळे किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा अडचणीत सापडले होते. पण आता नवलानी प्रकरणच बरखास्त केल्यामुळे सोमय्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. जितेंद्र नवलानी नावाची एक व्यक्ती ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून अनेक कंपन्यांकडून खंडणी वसूल करते असा आरोप त्यांनी यावेळी केला होता. या आरोपानंतर कट्टर शिवसैनिक अरविंद भोसले यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या नावे एक तक्रार दिली होती. ८ मार्च २०२१ या दिवशी ही तक्रार दिली होती. या तक्रारारीच्या १ वर्षानंतर म्हणजे २२ मार्च या दिवशी मुंबई पोलीसांनी या तक्रारीच्या आधारावर जितेंद्र नवलानी संबंधीत ५ कंपन्यांना आणि ज्या कंपन्यांनी जितेंद्र नवलानी यांच्याशी संशयास्पद व्यवहार केले आहेत अशा कंपन्यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावल्या आहेत.

 

भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘या’ ३ नेत्यांमध्ये जोरदार चुरस..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपामध्ये संघटनात्मक बदलांच्या हलचालींना वेग आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची राज्य मंत्रिमंडळातील जागा निश्चित आहे. त्यामुळे भाजपातील ‘एक व्यक्ती एक पद’ या तत्वानुसार त्यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल. चंद्रकांत पाटील यांचा उत्तराधिकारी म्हणून ३ नेत्यांची नावं चर्चेत आहेत.

सत्ताबदलानंतर भाजपाचं पुढील लक्ष्य हे मुंबई महापालिका जिंकणे हे आहे. राज्य भाजपाचा अध्यक्षही मुंबईतील द्यायचा ठरल्यास आशिष शेलार हे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. शेलार हे मुंबईतील आक्रमक भाजपा नेते आहेत. ते यापूर्वी मुंबई भाजपा अध्यक्ष तसंच फडणवीस सरकारमध्ये मंत्री देखील होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठी पश्चिम महाराष्ट्रातून राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. नगर जिल्ह्यातील शिंदे देखील फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. नुकतीच विधान परिषदेवर त्यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर विदर्भातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे देखील नाव भाजपा प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.’पक्षानं मला आजवर भरभरून दिलं आहे. यापुढेही पक्षाचा जो आदेश असेल तो स्विकारेन’ असं बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेवर बोलताना जाहीर केले आहे.

 

बहुसंख्य लोकं स्ट्रोक बाबतच्या लक्षणां विषयी अनभिज्ञ

मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलने केले स्ट्रोक सर्वेक्षण

गोल्डन अवर्सबाबत जागृकता होणे आवश्यक असून योग्य वेळी रूग्णला उपचार मिळाले तर स्ट्रोक पासूनही वाचविणे शक्य!

मुंबई: मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सने एक सर्वेक्षण केले ज्यामध्ये स्ट्रोक बाबत चिंताजनक तथ्ये समोर आली. २०० नागरीकांमध्ये आँनलाईन सर्वेक्षणातून सुमारे 61% लोकांना स्ट्रोकची लक्षणेच माहित नसल्याची बाब समोर आली आहे. संतुलन गमावणे, दृष्टी धूसर होणे किंवा कमी होणे, हात कमजोर होणे, बोलण्यात अडचणी यासारखी प्राथमिक लक्षणेही माहिती नाहीत. सामान्य लोकांमध्ये पक्षाघाताबाबत जागरूकतेचा अभाव आहे. पण, स्ट्रोकचा झटका आल्यास आणि गोल्डन अवर्समध्ये उपचार केल्यास अनेकांचे जीव वाचू शकतात. स्ट्रोकच्या रूग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना स्ट्रोकची चेतावणी देणारी चिन्हे ओळखण्यास मदत करण्यासाठी, वोक्हार्ट हॉस्पिटल, मिरारोडने पुढाकार घेतला आहे. सर्वसमावेशक आणि सर्वसमावेशक उपचार प्रदान करण्यासाठी स्ट्रोक सपोर्ट ग्रुप सुरू करून हॉस्पिटलने आणखी एक बेंचमार्क सेट केला आहे.

मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे किंवा अडथळ्यामुळे स्ट्रोक होतो. मग मेंदूच्या पेशी किंवा न्यूरॉन्स काही मिनिटांनंतर रक्त किंवा ऑक्सिजनशिवाय अकार्यक्षम ठरतात आणि मेंदूची कार्यक्षमता नष्ट होते. स्ट्रोक एखाद्या व्यक्तीच्या हालचाली, बोलणे, खाणे, विचार करणे आणि लक्षात ठेवणे आणि शरीराच्या इतर महत्त्वपूर्ण कार्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम करेल. हे कोणालाही कधीही होऊ शकते. या जीवघेण्या स्थितीबाबत अत्यंत कमी जागरूकता आहे. यादृष्टीने, रुग्णालयाने लोकांच्या सामान्य समस्या जाणून घेण्यासाठी स्ट्रोक सर्वेक्षण केले.

डॉ. पवन पै, सल्लागार इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशालिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स मीरा रोड म्हणाले, सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 64.4% लोक विंडो पिरियड (पहिल्या स्ट्रोकच्या 4.5 तास) दरम्यान स्ट्रोकच्या उपचारांबद्दल जागरूक असले तरी सुमारे 61% लोकांना स्ट्रोकची चेतावणी देणारी चिन्हे माहित नाहीत. ज्यांना लक्षणे दिसून येतात त्यांना रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की 65.4% लोकांना हे माहित आहे की जर रुग्णाला अशा रुग्णालयात नेले तर त्याचे व्यवस्थापन केले जाते. लोकांना त्यांच्या आरोग्याचे महत्त्व कळू लागले आहे आणि 95.2% लोकांना असे वाटते की वर्षातून एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी केली पाहिजे. शिवाय, सुमारे 82.7% लोक दरवर्षी त्यांची वार्षिक आरोग्य तपासणी करतात. स्त्री-पुरुष गुणोत्तर 3:1 होते आणि सुमारे 200 सहभागी या सर्वेक्षणाचा भाग होते. स्ट्रोकच्या रूग्णांना त्यांचे परिणाम सुधारण्यात मदत करण्यासाठी आम्ही सपोर्ट ग्रुप सुरू केला आणि डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांची एक वचनबद्ध टीम चोवीस तास मदत पुरवण्यासाठी आणि जलद पुनर्प्राप्ती सुनिश्चित करण्यासाठी उपलब्ध आहे. प्रगत उपकरणे आणि बहु-अनुशासनात्मक सांघिक उपचार पद्धतीसह रुग्णांचे निरीक्षण केले जाईल.

स्ट्रोक आल्यानंतर माझे जीवन विस्कळीत झाले. पण मी नशीबवान आहे की माझ्या कुटुंबातील सदस्यांना स्ट्रोकची लक्षणे ओळखता आली आणि गोल्डन अवरमध्ये मला उपचार मिळाले. मी या प्लॅटफॉर्मद्वारे माझा अनुभव शेअर करू शकलो आणि मला आनंद आहे की मी इतर स्ट्रोक रुग्ण आणि यातून जीव वाचलेल्यांशी संवाद साधू शकलो. रुग्णांना तज्ज्ञांच्या मदतीने स्ट्रोकबद्दल त्यांच्या सर्व शंका दूर करण्यात यश आले. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि मला त्वरित वैद्यकीय मदत दिल्याबद्दल मी रुग्णालयाचे आभार मानतो. मी कोणत्याही अडचणीशिवाय माझी दैनंदिन कामे पुन्हा सुरू केली आहे. हा स्ट्रोक ग्रुप इतर रुग्णांसाठी वरदान आहे ज्यांना स्ट्रोकचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर हस्तक्षेप करण्यास मदत मिळू शकते. या उपक्रमाचा एक भाग बनून मला खूप छान वाटतं, “सहभागींपैकी एका व्यक्तीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.