Home Blog Page 158

राज्यात पावसाचे थैमान ! मुंबई, ठाण्याला ऑरेंज, तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरला रेड अलर्ट जारी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्रात जून अखेरपासून आगमन झालेल्या पावसाने सोमवारी संध्याकाळनंतर राज्यात मुसळधारेसह हजेरी लावली. सोमवारी रात्री तसेच मंगळवारी दिवसभर अविश्रांत बरसणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. नागरिकांच्या घरातही पाणी शिरले.

मुंबईसह कोकण विभागामध्ये शनिवारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई, ठाण्यालाही शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा घाट परिसर येथे शुक्रवारपर्यंत रेड अलर्ट आहे. पालघरलाही शुक्रवारी रेड अलर्ट असून इतर दिवशी ऑरेंज अलर्ट आहे.

मुंबईमध्ये मंगळवारी सकाळी ८.३० ला झालेल्या नोंदीनुसार आधीच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे १२४.२ तर कुलाबा येथे ११७.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. सोमवारी संध्याकाळनंतर पावसाचा जोर अधिक वाढला. मंगळवार पर्यंत तो कायम होता. कोकणातील पावसामुळे राज्यातील पावसाची सरासरी भरून येण्यासाठी मदत झाली आहे.

मराठवाड्यात नांदेड येथे चांगला पाऊस झाला असून तिथे ४७.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे १४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात आता पाऊस सरासरीच्या श्रेणीत आला असून मंगळवारी सकाळी १२ टक्के तूट नोंदवली गेली. पावसामुळे मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमारे अर्धा तास ठप्प झाले होते.

येत्या शनिवारपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. मध्य प्रदेशावरील कमी दाबाचे क्षेत्र, गुजरात किनारपट्टीपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती, दक्षिणेकडे सरकलेले मान्सून ट्रफ आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांची वाढलेली तीव्रता या चार कारणांमुळे राज्यातील मान्सून सक्रिय झाला आहे, असे मुंबई प्रादेशिक विभागाचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी स्पष्ट केले.

या प्रभावामुळे कोकण विभागाव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे येथेही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा परिसरातील घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात गुरुवारी अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, वाशिम, अकोला येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाली. आपण लवकरच राज्यातील पक्षनेते आणि ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांची पवारांनी घेतलेली ही सदिच्छा भेट होती.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांच्या फौजेमध्ये महाराजांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हे सरकार उर्वरित कालावधी पूर्ण करणार नाही. मध्यावधीच्या तयारीला लागा, असे आदेश पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिले होते. पवारांच्या ‘या’ वक्तव्यावर शिंदे नाराज असतील, अशी शक्यता असताना त्यांनी अचानक घेतलेल्या ‘या’ भेटीबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मनसे नेते राज ठाकरे यांचीही ते भेट घेणार आहेत. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीसुद्धा ते भेट घेतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आशियायी व जागतिक स्पर्धेसाठी राष्ट्रीय खो-खो प्रशिक्षण शिबिर पुण्यात..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय खो-खो महासंघाने काही दिवसांपूर्वी आशियायी व जागतिक खो-खो स्पर्धेची घोषणा केली होती. त्यानुसार चौथ्या आशियायी खो-खो स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे ६ ते १९ जुलै या कलावधीत प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. सपूर्ण देशातून १२० मुले या प्रशिक्षण शिबिरासाठी निवडण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी देशभरातून १२ प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून प्रतिक वाईकर, अक्षय बांगर, अनिकेत पोटे, ॠषिकेश मुर्चावडे, सुयश गरगटे, राहूल सावंत, सागर लेंगरे, गजानन शेंगाळ, अरुण अशोक गुणकी, दुर्वेश साळुंखे अशा मातब्बर खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या १२० खेळाडुंमधून भारताच्या संघाची निवड केली जाणार आहे. १२ पैकी ३ प्रशिक्षक महाराष्ट्रातून निवडल्याचे फेडरशेनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी कळविले आहे.

खो-खो खेळाडूंचे कौशल्य आणि खेळातील बारकावे व परिणामकारकता वाढविण्यासाठी या राष्ट्रीय खो-खो प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे प्रमुख म्हणून फेडरशेनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव आणि महाराष्ट्र समन्वयक म्हणून शिरीन गोडबोले यांच्याकडे जबबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

बीएमसी च्या खास अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना दणका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर आता चांगलेच धडाक्याने कामाला लागले आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले काही निर्णय आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे समजले जाणाऱ्या अधिकाऱ्यांची शिंदेंनी बदली केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताच मुंबई महानगरपालिकेतील ३ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. धारावीचे कोविड-१९ संकट हाताळण्यासाठी ओळखले जाणारे सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर यांची दादर येथील बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रभाग कार्यालयातून भायखळा येथे बदली करण्यात आली आहे.

किरण दिघावकर यांच्या जागी प्रशांत सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जे सध्या पश्चिम उपनगरातील के/पूर्व (अंधेरी पूर्व, जोगेश्वरी) प्रभाग कार्यालयाचे प्रमुख आहेत. दरम्यान, सपकाळे यांच्या जागी सध्या भायखळा प्रभागाचे प्रभारी मनीष वलंजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किरण दिघावकर यांनी जी/उत्तर (जी/एन) वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर म्हणून काम केले. त्यांनी दादर, माहीम आणि धारावी परिसराचा तीन वर्षे समावेश केला आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे अशी ओळख आहे.

शिवसेनेचे नवे प्रतोद भरत गोगावले यांनी सोमवारी झालेल्या बहुमत चाचणीनंतर शिवसेनेच्या आमदारांवर कारवाई करण्याचं ठरवलं आहे. शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली आहे. आमचा व्हीप न पाळणाऱ्या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस आम्ही दिली असल्याचं गोगावले यांनी सांगितलं. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर दाखवत त्यांनी आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव दिलेलं नाही.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले महत्वाचे आदेश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यासह मुंबईत ही हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जीवित, वित्त व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी सकाळी लवकर जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना देण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.