Home Blog Page 161

डोंबिवली केमिस्ट असोसिएशनची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न; “केमिस्ट ने टीबी मुक्त मोहीम यशस्वी करावी – सहाय्यक आयुक्त आर पी. चौधरी यांचे आवाहन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सामाजिक जवाबदारी जाणून केमिस्ट ने टीबी मुक्त भारत मोहीमेसाठी सहकार्य करून ती यशस्वी करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त आर पी. चौधरी यांनी केले. डोंबिवली मेडिकल केमिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे वतीने औषध विक्री नियम व तरतुदी यावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते.

मार्गदर्शन कार्यशाळेला अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक नितीन आहेर आणि संदीप नरवणे यांची प्रमुख अतिथी म्हणून तर संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव विलास शिरुडे, निलेश वाणी, राजेश कोरपे, महेंद्र चोप्रा यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आर पी.चौधरी यांनी सांगितले की, आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून औषध विक्री केली पाहिजे. देशाला टीबी मुक्त करण्याच्या अभियानात केमिस्ट ची महत्वाची भूमिका आहे. टीबी रुग्णाची माहिती उपलब्ध झाल्यास योग्य उपचाराने त्याचे संक्रमण आपल्याला थांबवता येईल. त्याच प्रमाणे दुकानाच्या विक्री भागात आपण सीसीटीव्ही चे निर्देश केंद्राने दिले आहेत त्यावर देखील अंमल करावा. युवा पिढीचे आपण रक्षणकर्ते बनून डोंबिवली पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जाईल असे कार्य करण्याचे आवाहन शेवटी त्यांनी केले.

औषध निरीक्षक नितीन आहेर यांनी सीसीटीव्ही चे महत्व पटवून सांगितले तर संदीप नरवणे यांनी औषध विक्री करतांना घेण्याची काळजी यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केले तर केमिस्ट च्या समस्या निलेश वाणी यांनी यावेळी मांडल्या. आभार सचिव विलास शिरुडे यांनी मानले.

सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन’ व ‘आयशा आयकॉन’ तर्फे डोंबिवली वाहतूक शाखा पोलिसांना ७० रेनकोटचे वाटप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्या पावसाळा सुरू झाला असून मानसूनचा सामना प्रत्यक्षात रस्त्यावर उभे राहून करण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना खूप अडचण होत आहे व त्यांना पावसाळ्यात रेनकोट असणे गरजेचे आहे. हे ‘सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन’ चे अध्यक्ष श्री.विशाल शेटे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांचे सहकारी चेतन ठक्कर आणि ‘आयशा आयकॉन’ या गृह-संकुलांचे बांधकाम व्यवसायिक श्री.निमेश सेजपाल यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली आणि या संबंधित शहर वाहतूक शाखा डोंबिवलीचे पोलीस निरीक्षक श्री. उमेश गीत्ते यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आमचे ७० वाहतूक कर्मचारी असून यांना रेनकोटची गरज आहे. तात्काळ ‘सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष व ‘आयशा आयकॉन’ चे बांधकाम व्यवसायीक यांनी ७० रेनकोट डोंबिवली शहर वाहतूक शाखेला उपलब्ध करून दिनांक २१/०६/०२२ रोजी माननीय श्री.मंदार धर्माधिकारी साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उमेश गीत्ते शहर वाहतूक शाखा डोंबिवली यांच्या उपस्थितीत डोंबिवली शहर वाहतूक शाखा मध्ये कार्यरत असलेले ७० कर्मचारी आणि वॉर्डन यांना सदर रेनकोट चे वाटप करण्यात आले.

सदर रेनकोट वाटपाचा कार्यक्रम वाहतूक पोलीस विभागाचे उप-आयुक्त श्री.मंदार धर्माधिकारी तसेच वाहतूक उपशाखा डोंबिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उमेश गीत्ते यांच्या उपस्थितीत श्री.निमेश सेजपाल, श्री.चेतन ठक्कर आणि श्री.विशाल वि.शेटे यांच्या हस्ते शहर वाहतूक शाखा रामनगर डोंबिवली येथे पार पडला.


आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार ; मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ ला जय महाराष्ट्र..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार हे आता स्पष्ट झाले आहे.

या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला आणि शिवसैनिकांना भावनिक साद घातली. परंतु एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे निश्चित केले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ‘वर्षा’ सोडलं आणि मातोश्रीवर मुक्काम हलवला. यापुढे ठाकरे पुन्हा वर्षाची पायरी चढणार नाहीत अशीही चर्चाही रंगत आहे.

सोमवारपासून सुरू झालेल्या या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत, यावर चर्चा आणि विचार मंथन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ, नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.

तर, दुसरीकडे गटनेतेपदी स्वतः एकनाथ शिंदे कायम राहत, विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून सुनिल प्रभू यांना हटवून त्यांच्या जागी भरत गोगावले यांची नेमणूक केल्याचे दोन ठराव पारित करून पक्ष प्रमुखांचे आदेश धुडकावले. तसेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीची राजकीय कोंडी झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळेच त्यांनी उशिरा रात्री वर्षा निवासस्थानातील मुक्काम मातोश्रीवर हलवला आणि मुख्यमंत्रीपदाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचे ठरवले.

 

‘हैप्पी स्ट्रीट’ या ओला सुका कचरा वर्गीकरण करण्याकरीता ठाकुर्लीतील ‘सृष्टी रेसिडेन्सी’ चा एक आकर्षक उपक्रम..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज दि १९.०६.२०२२ रोजी मा.पोलीस आयुक्त ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखली ठाकुर्ली (पूर्व) येथील ९० फीट रोड या ठिकाणी ‘हैप्पी स्ट्रीट’ या उपक्रमाखाली सृष्टी रेसिडेन्सी ‘डी’ विंग ठाकुर्ली (पूर्व) या सोसायटी तर्फे “स्वच्छ ठाकुर्ली” या उपक्रमाखाली ९० फीट रोड स्वच्छ ठेवण्यासाठी तसेंच ओला कचरा व सुखा कचरा याचे वर्गीकरण व आपल्या आजूबाजूचा परिसर स्वछ ठेवणे ही आपलीच जबाबदारी, अशा अशायचे पत्रक वाटून एक वेगळा उपक्रम राबवला आणी लोकांचे आकर्षणाचा विषय बनला.

सदर उपक्रमास मा.खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे, मा.पोलीस उपायुक्त कल्याण परिमंडळ – ३ चे श्री.सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुनील कुराडे, श्री प्रशांत मोरे सहायक पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली. या वेळी सृष्टी रेसिडेन्सी सोसायटी चे डॉ. भूषण पाटील यांनी जमलेल्या उपस्थित पत्रकारांना सदर माहिती दिली.

 

दोन वर्षानंतर सुरू झालेल्या मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांचा पाहिला दिवस गणवेश विना!

शाळेच्या पहिल्या दिवशी महापौर, आयुक्तांनी पुष्गुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत!

मिरा भाईंदर: कोरोनाच्या साथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा बुधवार १५ जून रोजी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. मिरा भाईंदर शहरातील महानगर पालिकेच्या शाळेतील नव्या शैक्षणिक वर्षात पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांचे महापौर ज्योत्स्ना हसनाले व आयुक्त दिलीप ढोले यांनी महानगर पालिकेच्या इतर अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थतीत पुषपगुच्छ देऊन स्वागत केले. मात्र या प्रसंगी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे पहिल्याच दिवशी शाळेत आलेले जवळपास सर्वच विद्यार्थी शाळेचा गणवेश आणि पायात चप्पल बूट न घालता आलेले दिसत होते.

या संदर्भात मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितनुसार विद्यार्थ्यांच्या गणवेश, पादत्राणे, बॅग आणि इतर शालेय वस्तू मागविण्यासाठी गेल्या फेब्रुवारी महिन्यातच स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर निविदा प्रक्रिया करून विद्यार्थ्यांच्या गणवेश व शालेय वस्तू मागविण्याचा कार्यादेश संबंधित ठेकेदारास देणे अपेक्षित होते. परंतु तत्कालीन सहायक आयुक्त प्रियांका भोसले आणि उपायुक्त अजित मुठे या दोघांमधील हेव्यादाव्यामुळे निविदा प्रक्रियाच करण्यात आली नाही आणि त्यामुळे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश आणि इतर शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आलेले नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला ह्या कामाचा ठेका देण्याच्या चुरशिमुळे गणवेश व शालेय वस्तूंच्या कामाची निविदा काढण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे करदात्या नागरिकांच्या लेकिन पैशातून लाखों रुपये खर्च करून मौजमजेसाठी शहरातील सर्व पक्षाचे नगरसेवक, अधिकारी मेघालय सारख्या ठिकाणी पर्यटनासाठी जातात परंतु त्याच ठिकाणी शहरातील विद्यार्थी मात्र गणवेश विना शाळेत जात आहेत ही बाब महानगर पालिका आयुक्त आणि शहरातील लोकप्रतिनिधींसाठी लाजिरवाणी असल्याचे बोलले जात आहे.

बुधवार १५ जून रोजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांनी भाईंदर पश्चिम येथील शाळेला व अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (शिक्षण) अजित मुठे यांनी काशिगाव शाळा क्रमांक ४ आणि ५ व नवघर येथील शाळा क्रमांक १३ या ठिकाणी भेट देऊन नव्या शैक्षणिक वर्षात पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. या प्रसंगी सभागृह नेता प्रशांत दळवी, सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग संजय दोंदे, मुख्याध्यापक, शिक्षक व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

दोन वर्षाच्या अंतराने अखेर मनपाच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी देखील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश व शालेय वस्तूंचे वाटप झालेले नाही. आता येणाऱ्या काळात उशिराने का होईना विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.