Home Blog Page 162

येणाऱ्या दीड वर्षात १० लाख नोकऱ्या देणार.. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोजगाराच्या मुद्द्यावरून अनेकदा विरोधी पक्षांच्या टीकेला सामोरे जावं लागणाऱ्या मोदी सरकारने रोजगार देण्याची मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारचे विविध विभाग आणि मंत्रालयांमधली रिक्त पदं भरण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मिशन मोडमध्ये भरती मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार आपल्या विविध विभागांमध्ये पुढील दीड वर्षात १० लाख जणांची भरती करणार आहे. या संदर्भात ‘पीएमओ इंडिया’ या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करण्यात आलं आहे.

पीएमओ इंडियाच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, की ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्रालयं आणि विभागांमधल्या मनुष्यबळाचा आढावा घेतला आहे. यासोबतच येत्या दीड वर्षात मिशन मोडमध्ये १० लाख जणांची भरती करण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत. भरती प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण व्हावी, असे पंतप्रधानांचे स्पष्ट आदेश असल्यानं सर्व विभागांना तातडीने कार्यवाही करावी लागणार आहे.

येत्या दीड वर्षात दहा लाख जणांना नोकऱ्या देण्याच्या पीएमओच्या घोषणेवर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, “या देशात लोकशाही पायदळी तुडवली गेली आहे. बेरोजगारीत ऐतिहासिक वाढ झाली आहे. पंतप्रधान किती दिवस ट्विटर ट्विटर करत राहणार? दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं होतं. ८ वर्षांत १६ कोटी नोकऱ्या द्यायला हव्या होत्या. आता ते सांगत आहेत, की २०२४ पर्यंत फक्त १० लाख नोकऱ्या दिल्या जातील. केवळ सरकारमध्ये ६० लाख पदं रिक्त आहेत, तर केंद्र सरकारमध्ये ३० लाख पदं रिक्त आहेत. किती काळ जुमलेबाजी करणार?”

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी गेल्या वर्षी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितलं होतं, की १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ८.७२ लाख पदं रिक्त होती. आता हा आकडा वाढला असेल. केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये एकूण ४० लाख ४ हजार पदं आहेत. त्यापैकी ३१ लाख ३२ हजार पदांवर सध्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असंही सिंह यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारच्या विभागांमध्ये गेल्या दोन वर्षांत फारशी भरती झालेली नाही. अशा परिस्थितीत पीएम मोदींची ही घोषणा तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आज (१४ जून) संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या खात्यांमधली रिक्त पदं भरण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. या वर्षी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्यानंतर २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. हे पाहता केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे.

 

सामाजिक संघटनांची आघाडी ही काळाची गरज: पुरोगामी संघटना स्नेहमेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ज्याप्रमाणे देशाच्या राजकारणात आजच्या घडीला लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी राजकीय आघाडी शिवाय पर्याय राहिलेला नाही त्याचप्रमाणे देशातील धर्मांधतेच्या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व पुरोगामी संघटनांनी एकत्र येणे ही काळाची गरज झालेली आहे. या देशात सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी सर्व पुरोगामी, समविचारी संघटनांनी एकत्र येवून काम करण्याची अत्यावश्यकता निर्माण झालेली आहे, असे मत डॉ. हमीद दाभोलकर यांनी डोंबिवली येथे पुरोगामी विचारांच्या संघटनांच्या स्नेहमेळाव्यात बोलताना काढले.आपल्या निवृत्तीनंतरच्या काळात समाजातील सर्व पुरोगामी संघटनांची आघाडी उभी करण्यासाठी प्रा. प्रवीण देशमुख यांनी पुढाकार घ्यावा अशी इच्छा व्यक्त करीत त्यांनी प्रा. प्रवीण देशमुख यांना निवृत्ती निमित्त शुभेच्छा दिल्या.

प्रा. प्रवीण देशमुख हे व्हीजेटीआय या जगप्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयातून ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. या निवृत्त पूर्व सोहळ्याच्या निमित्ताने प्रा. प्रवीण देशमुख यांनी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक लाखाचा धनादेश डॉ. हमिद दाभोळकर यांच्या हस्ते सुपूर्द केला.

रविवार दिनांक १२ जून २०२२ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणी राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीतील ठाकूर हॉल येथे विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून सतत कार्यरत असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा प्रवीण देशमुख यांच्या निवृत्ती पूर्व सोहळ्याच्या निमित्ताने पुरोगामी संघटनांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या स्नेहमेळाव्यात राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी सदस्य डॉ.हमीद दाभोळकर, लोकभारती चे राज्य अध्यक्ष श्री अशोक बेलसरे हे प्रमुख वक्ते उपस्थित होते. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील ४० पेक्षा अधिक विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य यांनी प्रा. प्रवीण देशमुख यांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देताना आपल्या अध्यक्षीय भाषणात राजकारणासह सामाजिक क्षेत्रात सुद्धा सर्वत्र कटुता निर्माण झालेली आहे ही खंत व्यक्त केली. सामाजिक क्षेत्रात पुरोगामी म्हणवणाऱ्या संघटनांमध्ये सुद्धा अंतर्गत दुहीचे बीज पाहायला मिळते आहे.

प्रा. प्रविण देशमुख हे टेक्स्टाईल इंजिनिअरिंग चे तज्ञ आहेत. ज्या प्रमाणे ते विविध रंगाच्या धाग्यांना एकत्रितपणे गुंफून सुंदर वस्त्र विणतात त्याचप्रमाणे आपल्या दीर्घ सामाजिक-राजकीय अनुभवाच्या जोरावर सामाजिक संघटना मधल्या कटुता दूर करून, सर्व पुरोगामी संघटनांना एकत्रित आणण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अनेक जुन्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या शिबिरांमधून प्रेरणा घेऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये वाटचाल सुरू केली याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. राष्ट्र सेवा दल ते पत्रकारिता, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते उद्योजक आणि पुन्हा राष्ट्र सेवा दल असा त्यांचा प्रवास त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात उलगडून सांगितला.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाण्याचा दिवा पेटवून आणि त्यामागील विज्ञान उलगडून सांगून तसेच गायन विशारद शालिनी मेखा यांनी सादर केलेल्या ‘खरा तो एकचि धर्म’ या गाण्याने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर आकाश पवार आणि साथींनी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी ज्वलंत विषयांवरील अनेक गाणी दमदारपणे सादर केली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.अशोक वानखेडे यांनी या स्नेह मेळाव्या मागची पार्श्वभूमी आपल्या प्रास्ताविकात मांडली.

सेवानिवृत्तीनिमित्त केवळ माझा सत्कार न करता या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील सर्व पुरोगामी विचारांच्या, समविचारी संघटनांच्‍या साथींना एकत्र करण्याची संकल्पना प्रा. प्रवीण देशमुख यांनी सुचविली. समाजातील अनेक विषयांवर, अनेक संघटना आपापल्या परीने कार्य करीत असतात, परंतु त्यांचा एकमेकांशी संवादच नसतो. आपण जे काही करतो, ते आपलेच कार्य आहे इतर कोणी त्यामध्ये सहभागी होणार नाही किंवा होऊ नये अशा प्रकारची मानसिकता दृढ झालेली दिसते. त्यामुळे त्या संघटनांचे, संस्थांचे विचार समाजामध्ये तेवढ्या प्रभावीपणे पुढे जातांना दीसत नाही आणि ही विचार करायला चिंता करायला लावणारी ही बाब श्री.अशोक वानखडे यांनी आपल्या प्रास्ताविकात अधोरेखित केली.

‘मी म्हणजेच संघटना’ ही प्रवृत्ती संघटनेच्या वाढीला अडथळा ठरते आहे. एखादी सामाजिक समस्या म्हणजे केवळ माझीच समस्या आणि त्याला मीच सोडविणार हा अट्टाहासामुळेही सामाजिक संघटनांमधील अंतर्गत कटुता वाढीला लागलेली आहे..!
सर्वच संघटनांना थोडा-अधिक प्रमाणात या ‘मी’ पणाने ग्रासलेले आहे. या ‘मी’ पणा मुळेच चळवळ आणि विचार पुढे जात नाही आणि हे पुरोगामी विचारांच, विवेकाचं लक्षण नव्हे, यावर प्रत्येकाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे असं आम्हाला ठामपणे वाटतं म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे आयोजन आहे, अशी भूमिका प्रा.प्रवीण देशमुख यांनी सत्काराला उत्तर देताना मांडली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विवेकशील विचारांनी मागील ३२ वर्ष कार्य करीत आहे तर राष्ट्र सेवा दल ८० पेक्षा जास्त वर्षांहून साने गुरुजींच्या ‘जगाला प्रेम अर्पावे’ या विचाराने कार्यरत आहे. एवढा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या दोन संस्थांनी समाजातील अनेक विखुरलेल्या संस्था आणि संघटनांना एकत्रित आणण्याचं दायित्व स्वीकारायलाच हवं असे ठाम मत प्रा.प्रवीण देशमुख यांनी बोलताना व्यक्त केलं. आणि याच भावनेतून या कार्यक्रमाची आखणी केली गेली. विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीं व पदाधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. यामध्ये व्हीजेटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ.डी पी. काकड उपाध्यक्ष गोपाळ धारपवार, प्राचार्य राम नेमाडे यांच्यासह, ख्रिश्चन असोसिएशन, साउथ इंडियन असोसिएशन, रोटरी क्लब, महिला मुक्ती संघटना, श्रमिक दल अश्या विविध क्षेत्रात, सामाजिक घटकात काम करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांचाच याप्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला.

लोकसत्ता, लोकमत, स्थानिक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यासह अनेक पत्रकार मित्र, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री.रोहित सामंत, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिक्षण मंडळाचे सदस्य व ठाणे जिल्हा लायब्ररी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.रमेश दिनकर, माजी नगरसेवक आणि डोंबिवली विधानसभा क्षेत्राचे कार्याध्यक्ष श्री.नंदू मालवणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष श्री.युवराज पवार, समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री.शिवाजीराव मस्के, ‘कायद्याने वागा’ लोकचळवळीचे राज असरोंडकर यांच्यासह शिवसेना, मनसे या पक्षांचे अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. या स्नेहमेळावाच्या आयोजनात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तसेच राष्ट्रसेवा दलाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, हा स्नेहमेळावा यशस्वी व्हावा याकरता प्रयत्न केले.

शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया!’ आणि साने गुरुजींच्या,’जगाला प्रेम अर्पूया!’ या विचारांना नमन करून या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा.वृषाली विनायक यांनी अतिशय चोखपणे पार पडली तर राष्ट्र सेवा दलाच्या सौ.कल्पना शेंडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष श्री.अशोक वानखेडे, राष्ट्र सेवा दलाचे कल्याण-डोंबिवली जिल्हा मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश चिंचोले, सल्लागार मंडळ सदस्य डॉ. श्यामकांत जाधव, वंदना ताई शिंदे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी किरणताई जाधव, श्रीप्रसाद खुळे, राजू कोळी, जगदिश संदानशीव, यांच्यासह श्री.सचिन शिर्के, सौ.सुरेखा देशमुख, अक्षिता पाटील, छाया शिर्के, राजेंद्र कोळी, डी. जे. वाघमारे, बापू राऊत, नितीन सेठ, बबन सोनवणे, डॉक्टर नितीन जोशी, डॉ.दुष्यंत भादलीकर, सौ.संध्या देशमुख, श्री.नागले सर, साक्षी डोळस इत्यादी साथीनी परिश्रम घेतले.

 

खेलो इंडिया युवा क्रीडा खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला दोन्ही गटात सुवर्ण पदक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पंचकुला, हरयाणा, १३ जून, (क्री.प्र.) खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेअंतर्गत हरयाणा येथे संपन्न झालेल्या खो-खो स्पर्धेत शेवटच्या दिवशी अंतिम सामन्यात आज सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी कमालीचा खेळ करत सुवर्ण पदकाला गवसणी घालत महाराष्ट्राला पदक तालिकेत अव्वल ठेवण्यास महत्वाची भूमिका बजावली आहे.

आज झालेल्या सकाळच्या सत्रात मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओरिसावर २१-२० (८-६, ७-९, व जादा डावात ६-५) असा अतिशय अटितटिच्या सामन्यात रोमहर्षक विजयाची नोंद केली. नाणेफेक जिकून ओरिसाने संरक्षण घेत महाराष्ट्राला आव्हान दिले. मात्र पहिल्या डावात त्यांचा होरा चुकवत महाराष्ट्राने घेतलेली २ गुणांची आघाडी सुखावणारी होती. मात्र या आनंदावर ओरिसाच्या खेळाडूंनी जोरदार आक्रमण करत बरोबरी साधली. त्यावेळी मात्र महाराष्ट्र खो-खो चे सर्वेसर्वा डॉ. चंद्रजीत जाधव यांनी प्रशिक्षकांपर्यंत कानमंत्र देत जोरदार लढत देण्याचा सल्ला दिला. पुन्हा एकदा गुणफलकावर सर्वांची नजर खिळून होती मात्र महाराष्ट्राला आक्रमणात फक्त ६ गुणांचीच कमाई करता आली. आता सारी दरोमदार संरक्षकांवरच होती. पहिली तुकडी ३:५० मि. गारद झाल्यावर मात्र प्रेक्षकांच्या तोंडचे पाणीच पळाले. जान्हवी पेठे व प्रीती काळे यांनी ओरिसाच्या मनसुब्यांना सुरुंग लावत विजयात मोठी कामगिरी बजावली. या सामन्यात महाराष्ट्राच्या कर्णधार जान्हवी पेठे (१:३५, २:२० मि. संरक्षण ), प्रीती काळे (१:४५,२:४० मि. संरक्षण व २ गुण), संपदा मोरे (१:३०,१:४० मि. संरक्षण व ६ गुण) व वृषाली भोये (४ गुण) यांनी विजयात सुवर्ण कामगिरीची नोंद केली. तर ओरिसाच्या अर्चना (२:१५ १:४५ मि. संरक्षण व २ गुण), स्मरणिका साहू (१:३०, २:१० मि. संरक्षण व ७ गुण) व अनन्या प्रधान (१:४५, १:३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी परभवातही जोरदार कामगिरीची नोंद केली.

मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओरिसाचा १४-११ असा एक डाव ३ गुणांनी दणदणीत पराभव केला व सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या सामन्यात महाराष्ट्राच्या शुभम थोरात (२ मि. संरक्षण व २ गुण), नरेंद्र कातकडे (२ मि. संरक्षण व २ गुण), ऋषीकेश शिंदे (२ मि. संरक्षण) व रामजी कश्यप (१:५० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी विजयश्रीत दमदार कमगिरिची नोंद केली तर ओरिसाच्या टि.जगन्नाथ दास (१:१० संरक्षण व ६ गुण) व संजीतने दिलेली जोरदार लढत अपयशी ठरली.

 

महाराष्ट्र व ओरिसा हे दोन्ही खो-खो संघ अंतिम फेरीत; महाराष्ट्र विरुद्ध ओरिसा अंतिम फेरीत लढणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेअंतर्गत हरयाणा येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी पश्‍चिम बंगालचा तर ओरिसाने पंजाबचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या मुलांनी दिल्लीचा तर ओरिसाने पश्‍चिम बंगालचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी प. बंगालचा ९-८ (९-३) असा एक डाव १ गुणाने पराभव केला. महाराष्ट्रने प्रथम आक्रमण करताना पश्‍चिम बंगालचे ९ खेळाडूंना बाद केले होते. त्यानंतर फॉलोऑन देऊनही पश्‍चिम बंगालला तेवढे खेळाडू बाद करता आले नाहीत. यामध्ये महाराष्ट्रातर्फे अश्‍विनी शिंदेने २:१ मि. संरक्षण केले, प्रिती काळेने २:२० मि. पळतीचा खेळ करत १ खेळाडू बाद केला. दिपाली राठोडने २:३० मि. नाबाद संरक्षणाचा खेळ केला. मयुरी पवारने २:३० मि., जान्हवी पेठेने १:४० मि. पळतीचा खेळ केला. संपदा मोरेने ३ खेळाडू बाद करताना १:३० मि. संरक्षणाचा खेळ केला. त्यामुळे महाराष्ट्रच्या मुलींनी सहज अंतिम फेरी गाठली. पश्‍चिम बंगालतर्फे इशिता विश्‍वास २:२० मि. संरक्षण करत १ खेळाडू बाद केला.

मुलींच्या दुसर्‍या उपांत्य सामन्यात ओरिसाने पंजाबचा ९-८ (९-३) असा १ डाव १ गुणाने विजय मिळवला. विजयी ओरिसातर्फे एम. कदंबिनीने १:५० मि. तर एम अर्चनाने १:५० मि. संरक्षण करत ३ खेळाडू बाद केले. पंजाब संघातर्फे गुरुवीर कौरने १:५० मि. आणि सनप्रित कौरने १:३० पळतीचा खेळ केला.

उपांत्य सामन्यात मुलांमध्ये महाराष्ट्राने दिल्लीचा १५-९ (१५-५) असा १ डाव ६ गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे आदित्य कुडाळेने २.३० मि. खेळ करत १ गडी, मिलिंद आर्यनने २.३० मि. नाबाद खेळी करत १ गडी तर ॠषिकेश शिंदेने २.१० मि. खेळ करत २ गडी बाद केले. सुफियान शेख आणि अक्षय तोगरेने प्रत्येकी ३ गडी बाद करत आक्रमणाची धुरा उत्तमरितीने सांभाळली. पराभूत दिल्लीतर्फे सत्यमने १.४० मि., अजय कुमारने १.३० मि. खेळ करत २ गडी बाद केले.

 

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा करण्यात येणार शाळेत प्रवेशोत्सव – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मागील दोन वर्षातील महाभयंकर कोरोना विषाणू संसर्ग काळाच्या कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होऊन कायम राखण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात १५ जून रोजी तर विदर्भात २७ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यानुसार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी यासंबंधीच्या परिपत्रकाद्वारे शिक्षण संचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना सूचना दिल्या आहेत.

इयत्ता पहिली ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक अधिकाऱ्याने किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रबोधन करावे. फूल देऊन किंवा शालेय उपयोगी साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात यावे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण होण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक राहील असे व्यवस्थापन करावे, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

मागील दोन वर्षांच्या काळात विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने शैक्षणिक अध्ययन कमाल पातळीपर्यंत असल्याचे स्पष्ट दिसून येत नाही. तसेच शाळांतील शैक्षणिक सोयीसुविधा अस्त-व्यस्त झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी आणि दर्जेदार तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित असल्याने हा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतू अभ्यासक्रम, इतर शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सहकार्य करावे. तसेच शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ यांचे सहकार्य घेण्यात यावे, असेही याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.