Home Blog Page 163

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्रचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेअंतर्गत हरयाणा येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी बाद फेरीत प्रवेश मिळवत सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल कायम ठेवली आहे. अखेरच्या साखळी सामन्यात मुलींच्या संघाने पंजाबवर सहज मात केली तर महाराष्ट्रच्या मुलांच्या संघाला विजयासाठी पश्‍चिम बंगालने चांगलेच झुंजवले. महाराष्ट्राचे दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत रुबाबात प्रवेश केला.

हरयाणा येथे सुरु असलेल्या स्पर्धेत तिसर्‍या दिवशी सायंकाळच्या सत्रातील साखळी सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी पंजाब संघावर १०-८ (१०-४) एक डाव २ गुणांनी विजय मिळवला. प्रथम आक्रमण करणार्‍या महाराष्ट्र संघाने पंजाबचे १० गडी बाद केले, मात्र महाराष्ट्रच्या मुलींनी उत्कृष्ट संरक्षण केल्यामुळे पंजाब संघाला फक्त नऊ मिनीटात ४ गडी बाद करता आले. मध्यंतराला महाराष्ट्रकडे ६ गुणांची आघाडी होती. त्यामुळे पंजाबला फॉलोऑन देण्यात आले. दुसर्‍या आक्रमणातही उत्कृष्ट संरक्षणामुळे पंजाबला ४ गडीच बाद करता आल्यामुळे महाराष्ट्रचा विजय सोपा झाला. विजयी संघातर्फे अश्‍विनी शिंदेने २ मि. ३० से, नाबाद १ मि. ३५ से, खेळ केला. तर कौशल्या पवारने २ मि. १० से. खेळ करुन १ गडी बाद केला. त्यांना प्रिती काळेने ३ आणि वर्षाली भोयेने ४ गडी बाद करुन चांगली साथ दिली. पंजाबतर्फे दमनप्रित कौरने १ मि. ४० से तर रमणदिप कौरने १ मि. १० से खेळ करत १ गडी बाद केला. या विजयासह महाराष्ट्र संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुलांमध्ये गटातील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राला विजयासाठी पश्‍चिम बंगालने झुंजवले. मध्यंतराला पश्‍चिम बंगालकडे दोन गुणांची आघाडी होती, मात्र नावलौकिकाला साजेसा खेळ करत महाराष्ट्रच्या मुलांनी मध्यंतरानंतर सामन्याचे चित्र पलटवले आणि १८-१५ (८-१०) असा विजय मिळवला. विजयी संघातर्फे रोहन कोरेने १ मि. ३० से, २ मि. संरक्षण केले तर, आकाश तोगरेने १ मि. ३० से. खेळ करतानाच ४ गडी बाद केले. रामजीने १ मि, संरक्षण करत २ गडी बाद केले, आदित्य कुडलेने १ मि. २० से, संरक्षण करत २ गडी बाद केले. सुफियान शेखने आक्रमणात ४ गडी बाद करुन महाराष्ट्राच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत पश्‍चिम बंगालतर्फे अभिजित चौधरीने २ मि, संरक्षणाचा खेळ केला. त्याला सुमन बर्मनने १ मि. ३० से. खेळ करत ५ गडी बाद करुन आणि एसके अलीने १ मि. ३० सें, संरक्षण करतानाच २ गडी बाद करुन चांगली साथ दिली. मात्र विजय साकारता आला नाही.

सायंकाळच्या सत्रातील मुलींच्या सामन्यात ओडीसाने कर्नाटकाचा १ डाव ४ गुण राखून पराभव केला. तत्पुर्वी सकाळच्या सत्रातील सामन्यात मुलींमध्ये पश्‍चिम बंगालने राजस्थानचा १ डाव २ गुणांनी, हरयाणाने तामिळनाडू संघावर अत्यंत चुरशीच्या सामन्यात १ गुणांनी विजय मिळवला. मुलांमध्ये आंध्रप्रदेश संघाने छत्तीसगड संघावर १ गुण आणि साडेतीन मिनिटे राखून विजय मिळवला. तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या मुलांमधील तेलंगणा विरुध्द हरयाणा सामना बरोबरीत राहीला.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक, मतमोजणी रखडली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातून निवडून देण्याच्या सहा जागांसाठी आज २८८ पैकी २८५ आमदारांनी मतदान केले मात्र दोन्ही बाजूने घेतलेल्या हरकतींमुळे मतमोजणी आणि निकाल रात्री उशिरा पर्यंत लांबला होता.

सहा जागांसाठी सकाळपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान झाले. शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाल्याने आणि राष्ट्रवादीच्या नवाब मलिक तसेच अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने ही परवानगी नाकारल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. मात्र भाजपाच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोन्ही आजारी आमदारांनी रुग्णवाहिकेतून येऊन मतदान केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, शिवसेनेचे सुहास कांदे, भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष रवी राणा यांनी केलेल्या मतदानावर दोन्ही बाजूने आक्षेप घेतला गेला मात्र निवडणूक निर्णय अधिकऱ्यांनी तो फेटाळून लावला, तरीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात आली. तिथून निर्णय येण्याची प्रक्रिया रात्री उशीर होऊनही पूर्ण न झाल्याने याबाबतची मतमोजणी आणि निकाल दोन्हीही लांबले.

नियोजीत वेळापत्रक प्रमाणे सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती मात्र रात्री साडे नऊ वाजून गेले तरीही ती सूरु झाली नव्हती यावरून दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. या धामधूमित शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात कोण विजयी ठरतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.

 

काचेच्या बाटली ने पत्नीच्या गुप्तांगावर वार करून खून करणाऱ्या पतीस जन्मठेप – कल्याण न्यायालयाचा निकाल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

पत्नी वारंवार फोनवर बोलत असल्याने तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन पतीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार करीत पत्नीच्या गुप्तांगावर बियरच्या बाटलीने जखमा करून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना शहापूर तालुक्यातील बिरवाडी परिसरात घडली होती. याच गुन्ह्यातील आरोपी पतीला पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. संतोष शेळके असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

मृत सुनीता आणि आरोपी पतीचा २० वर्षापूर्वी विवाह

मृत सुनीता संतोष शेळके (वय:४० वर्षे) हिचा विवाह १९९४ साली बिरवाडीत राहणाऱ्या आरोपी संतोषशी झाला होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगा आणि मुलगी झाली. त्यातच २०१७ पासून पती कामधंदा करीत नव्हता शिवाय त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे मृत पत्नीवर २०१८ पासून कुटुंबाच्या पालनपोषण करण्याची जबाबदारी पडली. त्यामुळे ती बिरवाडीजवळच असलेल्या एका भगर मिलमध्ये कामाला जात होती.

पत्नीच्या चारित्र्यावर निष्कारण संशय

त्या कामानिमित्त मृत सुनीता वारंवार फोनवर बोलत असत, मात्र आपल्याला बघून पत्नी फोन बंद करते, असा संशय आणि राग आरोपी पती संतोषच्या मनात धुमसत होता. या कारणास्तव तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच संशयातून त्याने ३० एप्रिल २०१८ रोजी पत्नीला काही बहाण्या निमित्त दुपारच्या सुमारास गावाजवळच्या सिमेंटच्या पाइपाजवळ बोलवून तिच्याशी दोन वेळा शरीर संबंध ठेवले. त्यानंतर बियरच्या काचेच्या बाटली फोडून तिच्या गुप्तांगाच्या भागावर जखमा करून तिच्याच साडीने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर संतोषनेच त्या रात्री घरी पत्नी आली नसल्याचा कांगावा केला होता.

मृतदेह सापडल्यावर तपासाला गती

सुनीताचा मृतदेह गावाजवळच्या सिमेंटच्या पाइपाजवळ आढळून आल्यानंतर शहापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतक भावाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात भादवी कलम ३०२, ३७६, २०१ प्रमाणे शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीसांनी तपास सुरू केला. घटनेचे गांभीर्य ओळखून शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम. व्ही. शेट्ये यांनी पथकासह आरोपीचा शोध सुरू केला असता आरोपी हा मृतकचा पतीच असल्याचे पोलीस तपासात समोर येताच त्याला पत्नीच्या खून व अत्याचार प्रकरणी १ मे २०१८ रोजी अटक केली होती.


           ऍड.सचिन कुलकर्णी

सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली

आरोपीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी वेळी मुख्य पैरवी अधिकारी सहा, पोलीस उपनिरीक्षक एस.बी. कुटे हे हजर करीत होते. हा खटला अंतिम सुनावणीला आल्यानंतर न्यायालयात या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ऍड.सचिन कुलकर्णी यांनी प्रभावी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू, साक्षी पुरावे तपासून पहिले असता पतीनेच संशयावारुन पत्नीचा खून केल्याचे साक्षी पुराव्यावरून सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेची व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना कारावास अशी शनिवारी (४ जून) रोजी शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकील ऍड.सचिन कुलकर्णी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतना सांगितले.

 

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क डोंबिवली विभाग यांची उत्तम कामगिरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मा.श्री.कांतीलाल उमाप सो, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री. सुनील चव्हाण सो, संचालक (अ.व.द. मुंबई) श्री प्रसाद सुर्वे सो. विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे.व श्री. डॉ.निलेश सांगडे सो. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.किरणसिंग देवीसिंग पाटील, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डोंबिवली, श्री.मल्हारी.एस. होळ, श्री.सागर धिंदसे दुय्यम निरीक्षक, श्री.पी.ए. महाजन सहाय्यक दुय्यम निरीक्षक, अमृता नगरकर, प्रीती पाटील, हनुमंत देवकते जवान व शिवराम जाखीरे जवान आणि वाहन चालक यांनी जामा मशिदच्या समोर, कौसा मुंब्रा पोलीस स्टेशनच्या बाजूला, कौसा मुंब्रा, ता.जिल्हा. ठाणे या ठिकाणी बेकायदेशीर हातभट्टी दारू वाहतुकीवर प्रोहीबिशन गुन्हा अंतर्गत छापा टाकून गुन्हा नोंदवून एक चारचाकी वॅगनआर गाडी जप्त केली असून त्यात एकूण ६४० लिटर हातभट्टी दारू असा एकूण ₹. १,७८,६०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या उत्तम कारवाईवर सर्व थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

दूरदर्शन वरील भारदस्त आवाज काळाच्या पडद्याआड..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

“नमस्कार, आजच्या ठळक बातम्या”, अश्या भारदस्त आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं ६४ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. अखेर आजाराशी झुंज देत अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते. प्रदीप भिडे यांच्यावर संध्याकाळी ६ वाजता अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाला.२४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचा जमाना येण्यापूर्वी एकेकाळी बातम्या देणारे दूरदर्शन हे एकमेव माध्यम असताना प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रामध्ये आपली खास अशी ओळख निर्माण केली होती.

१९७२ मध्ये दूरदर्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर १९७४ पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली होती. तेव्हापासून पुढची अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले होते. त्यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेले वृत्तनिवेदन अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.