Home Blog Page 176

मेल गाड्यांमधील प्रवाशांचे फोन चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास कल्याण लोहमार्ग पोलीसांनी शिताफीने केले अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण येथून सकाळी ०६.३० वा. सुटणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेस कल्याण ते पुणे असा प्रवास करत असताना एका प्रवाशाचा डब्यात चढत असताना त्याचा ₹.१०,५००/- किंमतीचा रेडमी कंपनीचा ग्रे रंगाचा मोबाईल फोन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे तक्रार कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथे दि. १८.०३.२०१९ रोजी गुन्हा रजि क्र. ८८५/२०१९ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्याचा तपास मा. प्रभारी महिला पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना दुसाने व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार करत असताना त्यांना एक मोबाईल चोरणारा इसम कल्याण परिसरात येणार असल्याची गुप्त माहितीदारकडून माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी गुप्त माहितीदारकडून मिळालेल्या बातमीप्रमाणे दि.०५.०४.२०२२ रोजी ०२.५० वा. च्या सुमारास सापळा रचून आरोपी शुभम अरुण सानप (वय:२५ वर्षे) धंदा: गवंडीकाम, रा. रुम नं. ०८, गवळी बिल्डिंग चाळ, भोसरी पुणे. गावचा पत्ता: रा. शिवसेना वसाहत, वीर भगतसिंग नगर, अकोला यांस ताब्यात घेतले. नमूद गुन्ह्याचा अधिक तपास करता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली.

आरोपी शुभम अरुण सानप (वय:२५ वर्षे)याच्याकडे पोलीस कोठडी रिमांड मुदतीत पोलीसी खाक्या दाखवताच त्याने लांब पल्ल्याच्या मेल गाड्यांमध्ये प्रवाश्यांचे चोरलेले स्मार्ट मोबाईल फोन अकोला येथे जाऊन त्याच्याकडे अधिक तपास करून त्याच्याकडून ₹.१,२१,४८७/- किंमतीचे ०९ स्मार्ट मोबाईल फोन हस्तगत केले असून सदर मोबाईल फोनच्या मालकांचा तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी मा. श्री.कैसर खालिद, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, मा. श्री. मनोज पाटील पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई, मा.सहा.पोलीस आयुक्त, कल्याण विभाग, लोहमार्ग मुंबई विजय दरेकर यांच्या आदेशानुसार कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी महिला पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.आर.जी.चव्हाण यांच्या अधिपत्याखाली सहा.पोलीस उपनिरीक्षक आर.टी.आखाडे, पोहवा. एम.आर.निमजे, पोना. पी.बी.पाटील, पोना. पी.पी.मोहिते, पोशि. कुंवर, पोशि. मुख्यदल, पोशि. चोरमले, तसेच अकोला रेल्वे पोलीस ठाण्याचे पोशि. यु.आर.जाधव यांनी केली आहे.

 

मोक्का गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेल्या सराईत चैन स्नॅचर ला कल्याण क्राईम युनिट ने केले जेरबंद आणि दोन गुन्हे आणले उघडकीस..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दि .०३/०४/२०२२ रोजी गांधारी, कल्याण पश्चिम येथे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन मोटरसायकल वरून दोन इसम जबरीने खेचून पळून गेले होते. त्याबाबत खडकपाडा पोलीस ठाणे गु.रजि नं १४२/२२ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. सदर गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखा घटक -३ हे करत होते.

दि. ०६/०४/३०२२ रोजी युनिट कार्यालयातील पोहवा प्रवीण जाधव यांना सदर गुन्ह्यातील आरोपी हा कल्याण परिसरात दुर्गाडी येथे येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. त्या आधारे कल्याण क्राईम युनिट – ३ मधील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून महमद आयाझ इस्तीयाज अन्सारी उर्फ आझाद अन्सारी (वय: २८) रा. भिवंडी यांस मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी करून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून त्याचे साथीदार १. अली, २. अकबर अमजद बेग, ३. हसनेन बरकत बेग, ४. अब्बास शब्बर जाफरी रा. भिवंडी यांच्या मदतीने व दोन मोटरसायकल वापरून वरील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यात सापडलेली पल्सर मोटरसायकलचा वापर सदर गुन्ह्यात केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीकडून एकूण रुपये ३३,०००/- किंमतीची मोटरसायकल, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर पांढऱ्या रंगाची मोटरसायकल चोरीबाबत भिवंडी शहर पोस्टे गु.रजि नं. १०५/२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे दि.२९.०३.३०२२ रोजी नोंद आहे.

अशा प्रकारे चैन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीचे असे दोन गुन्हे उघडकीस आले असून एकूण ४ आरोपींना पकडण्यात आले आहे. ताब्यात घेतलेला आरोपी हा सन २०१२ मध्ये मोक्का कायद्या अंतर्गत अटक होता तो डिसेंम्बर २०२१ मध्ये जेलमधून बाहेर आला होता. त्याच्यावर खालील प्रमाणे गुन्ह्याची नोंद आहे.
१. शांतीनगर पोलीस ठाणे गु.रजि नं. ४१/२०१२ भादवि कलम ३७९, ३४
२. वर्तकनगर पोलीस ठाणे गु.रजि नं. ९५/२०१२ भादवि कलम ३९२, ३४ सह (मोक्का १५/१२)
३. राबोडी पोलीस ठाणे गु.रजि नं. ७७/२०१२ भादवि कलम ३९२, ३४

सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी
१. अब्बास शब्बर जाफरी याच्यावर सोनसाखळी, मोटरसायकल चोरीचे ठाणे, नवी मुंबई, कल्याण परिसरात एकूण ३० गुन्हे नोंद आहेत.
२. अली अकबर अमजद बेग याच्यावर सोनसाखळी, मोटरसायकल चोरीचे एकूण ०३ गुन्हे नोंद आहे.

सदरची कामगिरी कल्याण मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेच्या युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.किशोर शिरसाठ, पोनि आनंद रावराणे, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, सहा.पो.उप.नि संजय माळी, पोहवा. बापूराव जाधव, पोहवा. प्रवीण जाधव, पोहवा. किशोर पाटील, पोहवा. शिंपी, पोहवा. अनुप कामत, पोहवा. सचिन साळवी, पोहवा. सोनावणे, पोहवा. बेलदार, पोना. साबळे, पोना. कडू, पोशि. शेकडो, पोशि. मिथुन राठोड, पोशि. गुरुनाथ जरग, पोशि. नवसारे, चपोहवा. बोरकर या कल्याण गुन्हे शाखा घटक-३ यांनी यशस्वीरित्या पार केलेली आहे.

 

‘मँगो मॅन’ चा एक आगळा वेगळा उपक्रम; आंब्याचे बियाणे एकत्रित करून शेतकऱ्यांना देणार..

__
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

  उन्हाळा सुरू झाला आहे त्यात फळांचा राजा म्हणजे ‘आंबा’ याचा सुद्धा मोसम आणि हंगाम सुरू झाला आहे. सर्वांना ज्ञात आहेच की, भारतात दररोज कोट्यावधी आंबे खाल्‍या जातात आणि त्‍याचे ‘बाटे’ रोज केरात फेकल्या जातात. हे सहसा कचरा किंवा रस्त्यावर उतरते. मुंबई येथील एक अवलिया डॉमिनिक फर्नांडिस ज्याला ‘मँगो मॅन’ असे संबोधले जाते यांनी हे बाटे जमवून बियाणे म्हणून काही स्वयंसेवी संस्थांना देण्याचा विचार केला जे नंतर ते महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना पाठवतील जेणेकरून त्यांना शाश्वत उपजीविका मिळेल.

हा एक महान विचार आहे नाही का ? एक उत्तम कामाची संधी. ते लोकांना बिया नीट धुवून स्वच्छ करायला सांगतात आणि नंतर त्या उन्हात वाळवून त्याच्याकडे पार्सल करायचं असते.

आपण एकवेळ श्वास घेणे थांबवू शकत नाही परंतु आपण एक सुजाण नागरिक म्हणून जे करू शकतो ते म्हणजे आपण श्वास घेत असलेली हवा शुद्ध करणे. त्याच शुद्ध श्वासांसाठी ही एक धावपळ हीच या उपक्रमाची संकल्पना असून आपण सर्व साथ द्याल असे अपेक्षित आहे. पत्ता जाणून घेण्यासाठी व्हॉट्सऍप् करा..
डॉमिनिक फर्नांडिस – 9966633632

कल्याण तहसील कार्यालयातील मंडळ अधिकाऱ्यावर १० हजारांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याणच्या तहसील कार्यालयातील तलाठी अमृता बडगुजर आणि तिचा खासगी सहाय्यक अनंत कंठे यांना २३ मार्च रोजी ४५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केली होती. या घटनेला १३ दिवस होत नाही तोच मंडळ अधिकारी राजेंद्र बोऱ्हाडे याच्याही विरोधात १० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी मंगळवारी लाचलुचपत विभागाने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदाराच्या खडवली जवळील मु. गेरसे येथे सर्व्हे नंबर १० हिस्सा नंबर ४/अ या एकूण क्षेत्र हेक्टर ४२ आर ५ प्रती या खरेदी केलेल्या जमीनीवर अधिकार अभिलेखात ७/१२ वर नाव दाखल करण्याकरिता मौजे गरसेच्या तलाठी अमृता बडगुजर हिला १० हजार रूपये दिले होते. तर २3 मार्च रोजी केलेल्या पडताळणीत मंडळ अधिकारी राजेंद्र बोऱ्हाडे यानेही तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. मंडळ अधिकारी राजेंद्र बोऱ्हाडे याच्या कार्यालयातील त्याचा साथीदार निलेश चौधरी याने लाचेच्या मागणीस प्रोत्साहनात्मक स्वरूपाचे वर्तन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मंडळ अधिकारी राजेंद्र बाबुराव बोऱ्हाडे याच्यासह त्याचा साथीदार निलेश बाळाराम चौधरी या दोघांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे (सुधारीत २०१८) चे कलम ७, ७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनाक्रमानंतर कल्याणच्या तहसील कार्यालयाला लागलेले लाचखोरीचे ग्रहण कधी संपणार, अशा चर्चा या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांत रंगलेल्या दिसत आहेत.

 

‘ईडी’ च्या कारवाई नंतर संजय राऊत आक्रमक ! मी तुमच्या बापालाही घाबरत नाही..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रवर्तन निदेशालय अर्थात ‘ईडी’ ने आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि दादर येथे दोन ठिकाणची मालमत्ता जप्त केली असून, या कारवाई नंतर खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रसार माध्यमांशी बोलतांना खासदार संजय राऊत यांनी “मी तुमच्या बापालाही घाबरत नाही” अशा आक्रमक शब्दांचा वापर करत थेट इशाराच दिला आहे.

एक हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ने त्यांची अलिबागमधील ८ प्लॉट ची जमीन आणि दादर मधील एक फ्लॅट जप्त केला असून, यानंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ‘मी तुमच्या बापालाही घाबरत नाही,’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तपास यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत आहेत. संपत्ती म्हणताय तर तीथे राहते घर असेल किंवा कुणी कष्टाच्या पैशांतून घेतलेले असेल तर त्याचा संबंध कुठे तरी जोडायचा आणि जप्त करून दबाव आणायचा. “मी तुमच्या बापालाही घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि आजही मला त्यांचे आशीर्वाद आहेत”, असे राऊत यांनी म्हटले आहे.

माझी संपत्ती काही नाही, जमिनिचा तुकडा आणि राहतं घर याला संपत्ती म्हणत असाल तर संपत्तीची व्याख्याच बदलावी लागेल. माझे राहते घर फार तर २ रूम किचन एका मराठी माणंसाचे घर, एका मध्यमवर्गिय माणसाचे घर आहे. अलिबाग माझे गाव, तेथे साधारणपणे ५० गुंठ्याची जमिन, याला कुणी संपत्ती म्हणत असेल, तर मराठी माणसासाठी तेवढी संपत्ती आहे. एवढेच नाही, तर अशा कारवायांपुढे संजय राऊत आणि शिवसेना झुकणार नाही आणि वाकणारही नाही, असेही राऊत म्हणाले.