Home Blog Page 177

अलिबाग येथील जमिनीचे ८ प्लॉट जप्त करत ‘ईडी’ ची शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर मोठी कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची ईडीकडून कारवाई करण्यात आली असून संजय राऊत यांना मोठा दणका दिला आहे. तसेच याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार ईडीकडून अलिबाग मधील संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावाने अलिबाग मध्ये खरेदी करण्यात आलेल्या जमिनीचे एकूण ८ प्लॉट ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. तसेच संजय राऊतांचा दादरमधील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आल्याचे समोर आले आहे.

याबाबत गेल्या दीड महिन्यापासून ईडीकडून त्यांच्याकडे विचारणा सुरू होती. त्यादरम्यान मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर १२ वर्षांपूर्वी ५० लाख जमा करण्यात आले होते. त्यामुळे पत्राचाळ घोटाळ्यातील पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यात आल्याचा संशय ईडीला होता. या आलेल्या संशयातूनच ईडीने आज मोठी कारवाई करत संजय राऊतांना दणका देण्यात आला आहे. तसेच अलिबाग मधील एकूण ८ प्लॉट आणि दादर मधील एक फ्लॅट ईडीने जप्त केला असून, याचा संबंध संजय राऊत यांच्याशी असल्याचं म्हटलं आहे.

या आधी गोरेगावमधील पत्राचाळचा घोटाळा जवळपास १०३४ कोटींचा आहे. म्हणूनच या घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरू आहे. तर या चौकशी अंतर्गत प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची मालमत्ता याआधी जप्त करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नीशी निगडीत जागांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

अंबरनाथमध्ये शिवाजीनगर पोलीसांनी घरातून मोबाईल चोरून पसार झालेल्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंबरनाथ मध्ये रात्रीच्या वेळी नागरिकांच्या घरात घुसून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अंबरनाथच्या शिवाजी नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांना सध्या न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात सुनील सरोज हे त्यांच्या परिवारासह वास्तव्याला आहेत. १ एप्रिल रोजी त्यांच्याकडे नातेवाईक आले असल्यानं त्यांनी नातेवाईकांची सोय त्यांच्याच घराच्या वरच्या मजल्यावर रिकामी असलेल्या खोलीत केली. यानंतर पहाटेच्या सुमारास सरोज यांना वरच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आल्याने त्यांनी वर जाऊन पाहिलं असता तिथे एक चोरटा सुनील यांच्या नातेवाईकांचे पैसे आणि मोबाईल चोरत असल्याचं आढळलं. त्यामुळं त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता हा चोरटा खाली असलेल्या त्याच्या एका साथीदाराच्या गाडीवर बसून पळून गेला.

या प्रकरणी सरोज यांनी अंबरनाथ मधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलीसांनी काही तासातच या दोन्ही चोरट्यांना बेड्या ठोकल्या. आसिफ मेहमूद खान आणि अक्षय उर्फ सुर्य मारी नायर अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही उल्हासनगरला राहणारे असून त्यांचा यापूर्वीचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.

 

देशात सातत्याने होत असलेली इंधन दरवाढ व महागाई विरोधात युवासेना प्रमुख मा.आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर केंद्र सरकार विरोधात थाळी बजाव आंदोलन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सातत्याने होत असलेली देशातील इंधन दरवाढ व महागाई विरोधात युवासेना प्रमुख मा.आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना सचिव मा. वरून सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर केंद्र सरकार विरोधात थाळी बजाव आंदोलन करण्यात आले.

डोंबिवली युवासेने तर्फे बाजीप्रभू चौकात सदर आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात युवासेना, शिवसेना, युवतीसेना, महिला आघाडी पदाधिकारी व सहकारी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सर्वांनी थाळी वाजवून सामान्य नागरिकांचा आवाज केंद्र सरकार पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सदर आंदोलनात वाचा थंड बसा, पेट्रोल डिझेल १०० के पार.. हेच का अच्छे दिन मोदी सरकार ?, बहुत होगई महंगाई की मार.. होश मे आओ मोदी सरकार, ना नीती, ना मेल.. बस मेहंगा पेट्रोल डिझेल!, देश संभाले संता-बंता.. बेहाल होगई सारी जनता! अशा घोषणा देण्यात आल्या.

युवासेना जिल्हा अधिकारी दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलनात शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, युवासेना डोंबिवली शहर अधिकारी सागर जेधे, युवासेना जिल्हा सचिव राहुल म्हात्रे, युवासेना उपजिल्हा अधिकारी आशु सिंह, युवासेना डोंबिवली विधानसभा अधिकारी सागर दुबे, नगरसेवक नितीन पाटील, प्रतिक राणे, युवतीसेना कल्याण लोकसभा अधिकारी लिना शिर्के, जिल्हा समन्वयक पुर्विका म्हात्रे, जिल्हा समन्वयक वैशाली मोंडकर,महिला आघाडी उपशहर संघटक शिल्पा मोरे व सर्व शिवसैनिक आदी उपस्थित होते.

 

कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने उपनिरीक्षक सुधाकर कदम या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जाहीर सत्कार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

विठ्ठलवाडी येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशन मधील गेले ३७ वर्ष पोलीस खात्यात अविरत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कदम हे दि.३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. बशीर शेख यांनी त्यांना त्यांच्या पोलीस खात्यातील उत्कृष्ट सेवा बजावल्या बद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मोठ्या दिमाखात त्यांचा जाहीररीत्या सत्कार केला.

त्यांच्या ३७ वर्षे पोलीस खात्याच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचे सहकारी उपनिरीक्षक पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बोचरे यांनी सुधाकर कदम यांच्या कार्याची स्तुति करत त्यांचे कौतुक केले व पोलीस स्टेशन च्या त्यांच्या इतर सहकार्‍यांनी कृतज्ञता व्यक्त केली व सर्वांनी त्यांना पुढील निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.


पोलीस खात्यात भरती झाल्यापासून सुधाकर कदम यांनी मिळवलेली उपलब्धी व थोडक्यात कारकीर्द व ठळक वैशिष्ठ्ये :

• सुधाकर कदम यांची पोलीस भरती दिनांक १ / ११ / १९८५ रोजी झाली.
• ते एक उत्कृस्ट फुटबॉलपटू व फुटबॉल प्रशिक्षक आहेत.
• महाराष्ट्र पोलीस टिम मध्ये ते सलग ५ वर्ष फुटबॉल खेळले.
• सन १९९५ खंडणी विरोधी पथकात काम करुन मंचेकर टोळीचा व अरूण गवळी टोळीचा त्यांनी बिमोड केला.
• सन २००६ – २००७ मध्ये डोंबिवलीच्या ‘पेंढारकर कॉलेज’च्या मुला-मुलींना फुटबॉल चे मोफत प्रशिक्षण दिले.
• प्रथमच डोंबिवलीतील ‘महिलांची फुटबॉल टिम’ तयार करण्याचे भाग्य त्यांना प्राप्त झाले.
• त्यामधीलं १९ वयो गटातील ३ मुलींचे नॅशनल फुटबॉल टिम मध्ये निवड झाली.
• त्यानंतर आजतागायत डोंबिवलीतील गरीब होतकरू मुलांना एकत्र करून ‘ऑलफ्रेन्ड्स’ नांवाचा फुटबॉल क्लब मोफत सुरू केला व आजही कार्यरत आहे.
• सन २०१३ मध्ये विभागीय PSI परिक्षा पास होवून अंबिवली येथील मोहना सारख्या संवेदनशील ठिकाणी २ वर्ष इन्चार्ज म्हणूण काम करीत असतांना ४ वर्ष ठाणे भिवंडी कल्याण ईत्यादी पो.स्टे च्या मोका केस मध्ये फरारी असलेल्या अट्टल आरोपी गुलाम इराणी या कुख्यात गुंडास अटक केली व सध्या तो आजही आधारवाडी कारागृहात बंदीस्त आहे.
• पुर परिस्थिती उद्भवलेली असताना त्यांनी जनतेची नि:स्वार्थ सेवा केली.
• कोरोना सारख्या भीषण महामारीच्या कालावधीत सुद्धा रजा न उपभोगता अखंडीत सेवा बजावली
• मुंबई जेल कैदी पार्टी मध्ये मगरुर आरोपीने पोलीसावर थुंकून बिभत्स वर्तन केले ती क्लिप सोशल मीडिया वर वायरल झाली होती त्यावर गुन्हा दाखल करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता कारण कैदी पार्टीचे ते इंन्चार्ज होते.
• आजही शाळेतील मुलांनी त्यांना सेवा निवृत्ती नंतर फुटबॉल शिकविण्याची विनंती केली असून लवकरच मुलांच्या शालेय परिक्षा संपताच विजयनगर (कल्याण पूर्व) येथे मोफत फुटबॉल प्रशिक्षण ते सुरू करणार आहेत.

त्यांची लग्नानंतर ची थोडक्यात वैयक्तीक माहिती :

• त्यांनी त्यांच्या पत्नीस कल्याण येथील ‘बिर्ला कॉलेज’ मध्ये ऍडमिशन करून MA चे पदवियुत्तर शिक्षण दिले.
• त्यांना २ मुली असून त्यांची मोठी मुलगी BAMS वैध्यकीय पदवी घेऊन डॉक्टर झाली तर छोटी मुलगी MBBS पदवी करिता परदेशात शिक्षण घेत आहे.

 

सहा वर्षाच्या मुलीचा स्विमिंग पूल मध्ये पडून दुर्दैवी मृत्यू! या घटनेला जबाबदार कोण?

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर : भाईंदर पश्चिमेकडील उत्तन परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या पालकां सोबत पिकनिकसाठी गेलेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकलीचा स्विमिंग पुलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी उत्तन सागरी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी ज्या बंगल्याच्या स्विमिंग पुलमध्ये मुलगी पडली तिथे जीव रक्षक तैनात न केल्या बद्दल त्या बंगल्याच्या मालकावर मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मिरा भाईंदर शहरातील भाईंदर पश्चिमे कडील उत्तन हा निसर्गरम्य परिसर असून त्याठिकाणी अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. अशाच प्रकारे शुक्रवारी आयसीसीआय बँकेत काम करणारे कुटुंब पिकनिकसाठी उत्तनच्या ऑन द रॉक्स या बंगल्यात थांबले होते.

सकाळी १०.३० च्या सुमारास मुलीचे आई वडील नास्ता करण्यासाठी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर गेले असता त्याच वेळी सहा वर्षाची चिमुकली आणि सहा वर्षाचा मुलगा हे दोघे खाली स्विमिंग पुल जवळ आले. त्याच वेळी सहा वर्षाची चिमुकली स्विमिंग पुल मध्ये पडली. तिच्या सोबत असलेल्या मुलाने आरडाओरडा केली असता पहिल्या मजल्यावर असलेल्या एका महिलेने पाहिले आणि तिने धावत खाली येऊन मुलीला स्विमिंग पूल मधून बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले असता तिचा रुग्णालयात आणण्याच्या आधीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरानी सांगितले.

या प्रकारणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे अशी माहिती उत्तन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लहांगी यांनी दिली.

मात्र सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ज्या वेळी उत्तन येथील अनेक बंगल्यावर नागरिक पर्यटनासाठी येत असतात त्यावेळी ज्या बंगल्यात स्विमिंग पुल आहेत त्या ठिकाणी जीव रक्षक म्हणजेच लाईफ गार्ड तैनात ठेवणे बंधनकारक असते. परंतु उत्तन परिसरातील अनेक बंगल्यात स्विमिंग पूल तर आहेत परंतु त्या स्विमिंग पुलावर लक्ष देण्यासाठी बंगल्याचे मालक पैसे वाचविण्यासाठी जीव रक्षक किंवा लाईफगार्ड तैनात करीत नाहीत. अनेक बंगल्यात आगी पासून सुरक्षा करणारी यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे भविष्यात देखील अश्या प्रकाराची दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याच बरोबर उत्तन परिसरात सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक अनधिकृत बांधकामे करून त्याचा वापर परस्पर खाजगी बंगले, हॉटेल, रिसॉर्ट भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय बेकायदेशररित्या केला जात आहे व त्यामुळे महापालिका प्रशासनाचा कोट्यवधींचा महसूल देखील बुडवला जात आहे. असे असून देखिल महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळेच महापालिके कडून या सर्व अनधिकृत बंगल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही असा आरोप केला जात आहे.

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या भाईंदर विभाग या कार्यक्षेत्र असलेल्या उत्तन परिसरात असलेल्या या अनधिकृत बंगल्यात वेश्यावसाय, रेव्ह पार्ट्या, जुगार असे अनेक प्रकारचे अनैतिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात केले जात असल्याचे आरोप-तक्रारी अनेक वेळा केल्या असून देखील पोलीस प्रशासन मात्र याकडे ‘अर्थपूर्ण’ रित्या दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप केले जात आहेत.

गुढपाडव्याच्या पूर्व संध्येला एका कुटंबातील सहा वर्षाच्या चिमुकलीला आपला जीव गमावावा लागला आणि त्यामुळे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी कसून तपास करून संबंधित बंगल्याच्या मालकांवर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे जेणेकरून भविष्यात अश्या घटना पुन्हा घडू नयेत.