Home Blog Page 175

नौपाडा पोलीस ठाण्यात राज ठाकरेच्या विरोधात गुन्हा दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते अविनाश जाधव आणि रविंद्र मोरे यांच्यावर भारतीय हत्यार कायद्यानुसार ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाण्यामध्ये मंगळवारी झालेल्या सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.

१२ एप्रिल रोजी ठाण्यातील गडकरी चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उत्तर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत राज ठाकरे यांनी तलवार दाखवली.

या प्रकरणी त्यांच्यावर भा.द.वि कलम ३४ सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४ आणि २५ अन्वये अध्यक्ष मनसे राज ठाकरे, ठाणे आणि पालघर जिल्हा मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश अनंत जाधव आणि मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीसांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर आढळला ३०० किलोचा मृत डॉल्फिन

मिरा भाईंदर: भाईंदर पश्चिमेकडील उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर अंदाजे २५० ते ३०० किलो वजनाचा जवळपास साडेसात फूट लांबीचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. कांदळवन विभागाने मृत डॉल्फिनची रीतसर नोंद घेऊन मंगळवारी दुपारी समुद्र किनाऱ्यावरच त्याचे दफन केले.

उत्तनच्या वेलंकनी तीर्थमंदिर जवळील समुद्र किनारी मृतावस्थेतील डॉल्फिन मासा सोमवारी आढळून आल्याची माहिती उत्तन सागरी पोलिसांना मिळाली. सदर मासा कुजलेल्या अवस्थेत होता. शासनाच्या कांदळवन विभागास याची माहिती मिळाल्या नंतर मंगळवारी वनक्षेत्रपाल चेतना शिंदे, वनपाल सचिन मोरे सह वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत डॉल्फिनचा पंचनामा करून किनाऱ्यावरच जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून त्यात त्याचे दफन करण्यात आले आहे.

सदर डॉल्फिन हा साडे सात फूट लांब व सुमारे २५० ते ३०० किलो वजनाचा असल्याचे वन विभागाने सांगितले. डॉल्फिनच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी अंदाधुंद वाढत असलेले शहरी कारण त्यामुळे वाढते जल प्रदूषण आणि पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असल्यामुळेच समुद्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे त्यामुळेच कदाचित हा डॉल्फिन मृत्यु पावला असावा आणि लाटांनी त्याचा मृतदेह किनारी लागल्याचे सांगण्यात आले.

भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्यासह भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क कोळीवाडा व पश्चिम धक्का येथे देखील गेल्या काही काळात अनेक डॉल्फिन मासे अशा प्रकारे मृतावस्थेत सापडले आहेत. उत्तन समुद्रात तसेच भाईंदरच्या खाडीत देखील डॉल्फिनचा वावर असलेला अनेक वेळा पाहायला मिळतो. या ठिकाणी अनेक वेळा डॉल्फिन दिसून आले आहेत. तर समुद्र किनारी व खाडीतील पाण्यात वाढलेल्या प्रदूषणामुळे मत्स्य पैदास प्रचंड कमी झाली असून जलप्रदूषण हे भाईंदर मधील डॉल्फिन माश्यांच्या मृत्यूचे मोठे कारण असल्याचे बोलले जात आहे.

संजय राऊत ला राज ठाकरेंनी झोडपुन काढले ! पण..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज झालेल्या “उत्तर सभेत” मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अनेक नेत्यांच्या टीकेला सणसणीत उत्तर दिले. यात दै. ‘सामना’ चे संपादक संजय राऊत हे देखील सुटले नाहीत. राज ठाकरेंनी शेलक्या भाषेत संजय राऊत यांचा खरपुस समाचार घेतला. मालमत्ता जप्त होताच त्यांची भाषा बदलली. पत्रकार परिषदेत शिवराळ भाषा वापरण्या इतके ते बिथरले. संजय राऊत नेमके शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे हेच कळतच नाही.ते लवंडे आहेत. जिथे वरण पडते तिथे लवंडतात, अशी जहरी टीका राज ठाकरेंनी त्यांच्या “उत्तर सभेत” केली.

ही टीका राज ठाकरे यांनी केली त्या बद्धल संजय राऊत काय उत्तर देतात ते दिसेलच. परंतू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मी आठवण करून देतो की, हा भस्मासूर ‘सामना’ मधे आपल्याच आशीर्वादाने १९९२ साली लोकप्रभा मधुन आयात करण्यात आला होता. दैनिक ‘सामना’ मध्ये येण्यापुर्वी संजय राऊत हे गुन्हे वार्ताहर म्हणून होते. दै.सामनात पगारी संपादक म्हणून नोकरीस लागेपर्यंत संजय राऊत साधे शिवसैनिक तरी होते का ? हा संजय राऊत बुमरँग प्रमाणे आता उलटला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना सांगावेसे वाटते –
तुम्हीने दर्द दिया है,
तुम ही दवा देना !

किरीट सोमय्या आज जात्यात आहे म्हणून संजय राऊत यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी संजय राऊत हे आज सुपात आहेत ! हे कटू सत्य नाकारता येणार नाही !

मुंबई सत्र न्यायालयाने नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘आयएनएस विक्रांत’ निधी घोटाळाप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यापाठोपाठ त्यांच्या मुलगा नील सोमय्या याचाही अटकपूर्व जमीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे किरीट सोमय्या यांच्यापाठोपाठ नील सोमय्या यांच्याही अडचणीत भर पडली आहे.

सेव्ह विक्रांतच्या नावाखाली पैसे गोळा केल्याचा किरीट आणि नील सोमय्या यांच्यावर ठपका आहे. या प्रकरणी सोमवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावरील निकाल आजपर्यंत राखून ठेवण्यात आला होता. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आज हा निकाल वाचून दाखवत नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला असल्याचे सांगितले. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे किरीट सोमय्या व नील सोमय्या या दोघा पिता पुत्रांना कोणत्याही क्षणी पोलीसांकडून अटक होण्याची शक्यता आहे.

 

वाळू उत्खनन गटांचे लिलाव सुरु करण्याचे महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्य शासनाने वाळू उत्खनन करण्याबाबत नवीन सुधारित धोरण आणले आहे. या धोरणानुसार सर्व निकष पूर्ण असलेल्या वाळू उत्खनन गटांचे लिलाव सुरु करावे तसेच महसूल विभागाशी संबंधित कामांना गती द्यावी, असे निर्देश महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांची आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जमाबंदी आयुक्त, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद विभागीय आयुक्त, नोंदणी महानिरिक्षक आणि महसूल विभागाचे सहसचिव उपस्थित होते.

महूसलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यातील अनेक भागात वाळू अभावी बांधकामे प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नवीन सुधारित धोरण राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या धोरणानुसार राज्यातील वाळू, दगड गटांचे लिलाव सुरु करण्याची गरज आहे. सर्व निकषांची पूर्तता असलेल्या ठिकाणी लिलाव प्रक्रिया तातडीने सुरु करुन नागरिकांना वाळू उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरुन नागरिकांना दिलासा मिळेल व वाळूचोरी सारख्या प्रकारांना आळा बसेल. लिलाव प्रक्रिया वेळेत पूर्ण होतील यासाठी देखरेख करावी. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणातील प्रकरणांविषयी राज्य शासनाने प्रभावी आणि मजबुतीने भूमिका मांडण्याचे निर्देशही महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना दिले.

ई-पीक पाहणी संदर्भात माहिती घेताना येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांची अचूक नोंद करण्यासंदर्भात राज्यव्यापी ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी होईल याकडे प्रशासनाने कटाक्षाने लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना श्री.थोरात यांनी यावेळी बोलताना केल्या.

हरकत नसलेले प्रलंबित नोंदणीकृत फेरफारची प्रकरणे ठराविक कालावधीत निकाली काढावीत. सातबारा संगणकीकरण बहुतांशी पूर्ण झाले असले तरी ही प्रणाली टिकविण्यासाठी नवनवीन संशोधन करुन या प्रणालीमध्ये वेळोवेळी बदल किंवा सुधारणा करण्यात यावी. नवीन उपविभागीय अधिकारी कार्यालय सुरु करणे. क्षेत्रिय स्तरावरील महसूल कार्यालयांमध्ये स्वच्छतेच्या सुविधा, दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी रॅम्प आणि लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्याबाबत विभागाने विशेष मोहीम राबविण्याचे निर्देशही महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांनी दिले.

महसूल विभागाच्या महत्त्वाकांक्षी धोरण आणि निर्णयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागाने आराखडा तयार करावा, अशा सूचनादेखील श्री.थोरात यांनी यावेळी बोलताना केल्या.