Home Blog Page 178

काशिमिरा ते घोडबंदर परिसरात अवैध वाहतुकीचा सुळसुळाट! युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली तक्रार!

मिरा भाईंदर: काशिमिरा ते घोडबंदर महामार्ग परिसरात अवैध वाहतूकीचा सुळसुळाट झाला असल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचा माफियाराज निर्माण झाला आहे.

गेली कित्येक वर्ष घोडबंदर वरसावे येथील फाऊंटन नाक्यावर मारुती इको गाड्यांच्या माध्यमातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. सदर बाबतीत स्थानिक घोडबंदर वासियांना रोजगार नाकारत, खानिवडे विरार चारोटी मनोर येथील, कल्पेश भोईर उर्फ कुमार भोईर नावाच्या व्यक्ती कडून दमदाटी केली जात आहे. त्यांच्या मार्फत शेकडो गाड्या वापी सुरतच्या दिशेने अवैध प्रवासी वाहतुकीसाठी दररोज चालवल्या जात आहेत.

या संदर्भात २०२० पासून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सातत्याने तक्रारी करून त्यांचा पाठपुरावा करीत असून, घोडबंदर येथील स्थानिक तरुणांना कायदेशीररीत्या प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करता यावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. मात्र कल्पेश भोईर व त्याचे साथीदार बाहेरून मिरा भाईंदर शहरात येऊन स्थानिक तरुणांना दमदाटी करून अनधिकृत रित्या सदर अवैध वाहतूक करीत असतात.

या बाबत युवक काँग्रेस तर्फे गेली दीड वर्षांपासून काशिमीरा येथील वाहतूक पोलीस विभागाशी पत्रव्यवहार केला असून यावर तोडगा काढण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे.

घोडबंदर मधील तरुण ज्यावेळी वाहतुकीच्या व्यवसाय करण्यास पुढे येतात तेव्हा कल्पेश भोईर व त्याच्या गटातील गाडी चालक गुंडांकडून घोडबंदरच्या तरुणांवर हायवेच्या एकांत जागेत गाड्या थांबवून मारहाण करणे, त्यांच्या गाड्यांची तोडफोड करणे व आता तर नाक्यावर येऊन ह्या गरीब तरुणांच्या आई बहिणींना सुद्धा धमक्या देणे असे प्रकार सातत्याने सुरू झाले आहेत.

गेल्या २८ मार्च रोजी सकाळी अशाच प्रकारची एक घटना घोडबंदर येथे राहुल जगळपुरे यांच्या सोबत घडली. कल्पेश भोईर याने फाऊंटन नाक्यावर येऊन त्यास धमकावले, त्याचे व त्याच्या आईचे पुढील महिन्याभरात कसे बरेवाईट करतो याबद्दल भरचौकात धमकी दिली.

या घडलेल्या प्रकारावर राहुल जगळपुरे यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर काशिमीरा वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी घोडबंदर मधील तरुणांना पोलीस ठाण्यात बोलावून उलट राहुल याने गुन्हा दाखलच का केला? असा उलट सवाल केला गेला. यावरून वाहतूक पोलिस देखील अशा प्रकारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गुंडांना सहकार्य करीत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

घोडबंदर येथील वर्सोवा पुलाजवळ या अवैध वाहतुकीचा मुख्य नाका तयार झाला आहे. त्याच प्रमाणे मीरारोड पूर्वेकडील काशिमिरा नाका, दहिसर चेकनाका, मीरारोड येथील शिवार गार्डन, गोल्डन नेस्ट नाका या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्याची दादागिरी खूपच वाढली असून त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या विषयाचे गांभीर्य ओळखून मिरा भाईंदर शहरातील युवक काँग्रेस शिष्टमंडळाने पोलीस उपयुक्त अमित काळे यांची भेट घेतली. पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी तातडीने वाहतूक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्याच बरोबर काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांना संबंधित आरोपींवर चॅप्टर केस तातडीने दाखल करण्याचे देखील आदेश दिले. या विषयाला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे अशी भूमिका युवक काँग्रेस ने यावेळी घेतली. या शिष्टमंडळात, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रतिनिधी, दीप काकडे नवनियुक्त मिरा भाईंदर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धेश राणे, युवक ब्लॉकचे अध्यक्ष अश्फाक शेख व घोडबंदर गावातील तरुण व स्थानिक सहकारी सहभागी होते.

असे असले तरी घोडबंदर परिसरातील अवैध प्रवासी वाहतूक अद्याप ही थांबली नसल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गुंडांची दहशत वाढली असून त्यामुळे परिसरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

“घोडबंदर फाऊंटन नाक्यावरील अवैध प्रवासी वाहतूक आता माफिया राज स्वरूप धारण करीत आहे. घोडबंदर मधील तरुणांवर महामार्गावर होणारे हल्ले, आणि त्यांच्या आई बहीणीवर जर गावगुंडांची वाईट नजर पडणार असेल तर युवक काँग्रेस कदापि शांत बसणार नाही. आमचा मिरा भाईंदर पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. आयुक्त श्री सदानंद दाते यांनी सदर विषयात तातडीने लक्ष वेधून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत आहोत! – दीप काकडे (युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी)

यवतमाळ मध्ये शिवभोजन केंद्रातील धक्कादायक किळसवाणा प्रकार झाला उघडकीस ! शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशीतैशी करत शौचालयात धुतली जाताहेत जेवणाची भांडी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

यवतमाळ मध्ये ग्रामीण भागातील गरीब नागरिक शहरात आल्यानंतर त्यांना उपाशी राहू नये यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी द्यावयास सुरू केले. यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवभोजन थाळी केंद्रातील भयाण वास्तव समोर आले आहे. या केंद्रात ग्राहकांना दिली जाणारी शिवभोजन थाळी शौचालयातील पाण्याने धुतली जाते. यवतमाळ जिल्ह्यातील संबंधित शिवभोजन केंद्रावरील व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे.

शिवभोजन केंद्रातील किळसवाणा प्रकार सोशल मीडिया वर दाखवणारा व्हिडीओ समोर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हे शिवभोजन थाळी केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीचे असल्याची माहिती मिळाली आहे. गरिबांना कमी दरात चांगले व पोषक जेवण मिळावे या हेतूने ठाकरे सरकारनं शिवभोजन थाळी सुरू केली. मात्र यवतमाळमधील प्रकार पाहता सरकारच्या हेतूलाच हरताळ फासला गेला आहे. अशाप्रकारे गलिच्छ जागेवर भांडी धुऊन त्याच थाळीत पुन्हा भोजन दिले जात असल्याने सरकार एक प्रकारे गरिबांची थट्टाच करत असल्याचे दिसून येत आहे. आता या शिवभोजन केंद्र चालकावर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ऍक्सीस बँकेचे एटीएम फोडताना मानपाडा पोलीसांनी सुशिक्षित चोराला रंगेहात पकडले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील मानपाडा पोलीसांच्या हद्दी मध्ये बंद असणाऱ्या एटीएम मशिनच्या गाळ्यातून ड्रीलमशीनचा आवाज येत असल्याचे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लागलीच सतर्कता बाळगून चोराला रंगेहात पकडले असून महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील एटीएम मशीन तांत्रीक पध्दतीने फोडुन गुन्हे केले असावेत असा संशय मानपाडा पोलीस व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे हा चोर उच्च शिक्षित असून तो सिस्को कंपनीत काम करत असल्याचे चौकशी दरम्यान सांगितले.

मध्य प्रदेश येथे राहणारा राहुल चोरडीया (वय ३५ वर्षे) यास अटक करण्यात आली असुन, त्याचेकडुन एटीएम फोडण्यासाठी लागणारे ₹ १४,३००/- चे साहित्य त्यात ड्रील मशीन, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, कटावणी, होल्डर पिन, एमसील अशा वस्तु मिळुन आलेल्या आहेत. शनिवारी रात्री दोन वाजता मानपाडा सर्कलचे ठिकाणी असलेल्या ऍक्सीस बँकेच्या एटीएमचे शटर हे बंद अवस्थेत होते. मात्र आतून कसला तरी आवाज येत असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले. शटर ठोठावले असता आतून आवाज येणे बंद झाले. त्यामुळे पोलीसांचा संशय अधिक बळावला.

त्यानंतर पोलीसांनी हळूच शटर उघडल्या नंतर त्यानी पोलीसांना धक्का देऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी त्याची गचांडी गुंडाळत मुसक्या आवळल्या आहेत. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या काळया रंगाचे बॅगमध्ये एटीएम फोडण्यासाठी लागणारे साहीत्य मिळुन आले, त्याने सदरचे साहित्य एटीएम मशीन तोडुन त्यातील पैसे चोरण्यासाठी जवळ बाळगले असल्याचा कबुली जबाब दिला. परंतु त्याचा चोरी करण्याचा सदरचा प्रयत्न गस्तीवर असणाऱ्या मानपाडा पोलीसांच्या सतर्कपणामुळे अयशस्वी झाला आहे.

अधिक तपास उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

 

सावधान ! १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालवायला दिल्यास त्यांच्या पालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई होणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

१८ वर्षाखालील अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालवायला दिल्याने डोंबिवलीतील पालकांना थेट कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
डोंबिवलीत शहर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण विभागाकडून सतत कारवाई केली जात आहे. त्यातच आता १८ वर्षाखालील अल्पवयीन मुले सरार्सपणे वाहन चालवताना आढळून येत आहेत. त्यामुळे वाहतुक नियंत्रण विभागाच्या पोलिसांनी या मुलांच्या पालकांना संपर्क साधत थेट वाहतूक विभागाच्या कार्यालयात बोलवून घेत त्यांच्या पाल्याने केलेल्या वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच हजार ते दहा हजारापर्यंत दंड पालकांकडून आकारण्यात आला आहे.

तसेच त्याचवेळी त्यांचे समुपदेशन देखील केले जात आहे.आणि जे कोणी पालक आपल्या १८ वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्यासाठी देत असतील तर त्यांना यापुढील कारवाईसाठी सामोरे जावे लागणार असल्याचे डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्याकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले आहे. याच बरोबर अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नये आसे आवाहन देखील पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील शाळांमध्ये अनुचित घटना घडू नयेत यासाठी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा बसण्यासाठी शासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत विधानसभा सदस्य संग्राम थोपटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य जयकुमार गोरे, देवयानी फरांदे यांनी भाग घेतला. या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने ०७ एप्रिल २०१६ च्या शासन परिपत्रकान्वये सर्व शाळांना दिलेल्या आहेत. शासनाच्या जिल्हा परिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्येही सीसीटीव्ही बसविण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत राज्यातील ६५६८६ शाळांपैकी १६२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविलेले आहेत उर्वरीत सीसीटीव्ही लवकरात लवकर बसवावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे अशी माहिती, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील सर्व माध्यमांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसविणे बाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व ते सुरू असतील याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल. असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केले.

शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड म्हणाल्या, राज्यातील शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सी.सी.टी.व्ही बसविण्या संदर्भात धोरण ठरविण्यात आले आहे. राज्यात एकूण शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सुमारे ६५ हजार शाळा आहेत, त्यापैकी सद्यस्थितीत १६२४ शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

उर्वरित शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने सी.सी.टी.व्ही. बसविण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. याकरीता येणारा खर्च जिल्हा नियोजन व विकास निधी (डीपीडीसी / DPDC) / स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी / सी.एस.आर. फंड किंवा लोकसहभागातून तसेच लोकप्रतिनीधींच्या विकास निधीमधून करण्याबाबत सूचना देण्यात येतील.

राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींकरीता निकोप आणि समतामुल्य वातावरण निर्मितीसाठी व सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सखी-सावित्री समित्या गठीत करण्याचे निर्देश शासन निर्णय दि. १० मार्च २०२२ अन्वये देण्यात आले आहेत. या समित्या पुढील १५ दिवसात गठित करण्यात येतील.

शाळा स्तरावरील सखी-सावित्री समितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, महिला शिक्षक प्रतिनिधी, समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ (महिला प्रतिनिधी), पोलीस पाटील, महिला ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, महिला पालक प्रतिनिधी, शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी (२ विद्यार्थी व २ विद्यार्थीनी) इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. सखी-सावित्री समितीमार्फत शाळांमध्ये निकोप, समतामुलक व आरोग्यमय वातावरण निर्माण होईल याबाबत काळजी घेण्यात येईल. तसेच सदर समितीला दर महिन्याचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्याची जबाबदारी देण्यात येईल. त्यामध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास समिती त्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीकडे करेल व तक्रारीचे निवारण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल.

सर्व शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत किंवा नाही, सखी-सावित्री समित्यांचे गठण व नियंत्रण याबाबतची जबाबदारी आयुक्त (शिक्षण) यांची राहील.शाळांमध्ये मुलींना मार्गदर्शन करण्याकरीता एका महिला शिक्षकेवर जबाबदारी देण्यात येईल.

पोलीस विभागामार्फत पोलीस स्टेशन पातळीवर पोलीस काका / पोलीस दीदी संकल्पना राबविण्यात आली असून या पोलीस काका व पोलीस दीदींची तसेच सखी-सावित्री समितीतील महत्वाच्या सदस्यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक शाळेच्या दर्शनी भागावर ठळकपणे दर्शविण्यात येतील. राज्यातील आदर्श शाळांमध्ये चांगला स्पर्श-वाईट स्पर्श (Good touch – Bad touch) या संदर्भात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सदरची मोहीम व्यापक स्वरूपात येणाऱ्या वर्षभरामध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येईल.

अज्ञात व्यक्तींच्या सूचनांचे / निर्देशांचे पालन करू नये याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येईल.प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसविण्याच्या सुचना देण्यात येतील.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नोंदी दोन वेळा म्हणजेच सकाळी आणि शाळा सुटण्याच्या प्रसंगी ठेवण्यात येतील. तसेच अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनद्वारे विचारणा करण्यात येईल, असेही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी बोलताना प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.